GNSS: टोल भरण्यासाठीची नवी ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
आपण टोल भरुन किती पटकन पुढे जाऊ शकतो हे ट्रॅफिक, फास्टॅग डिटेक्ट होणं..फास्टॅगला बॅलन्स असणं या सगळ्यावर अवलंबून असतं.
पण आता कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.
टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टिम - GNSS हे होऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिमवर आधारित नवीन टोल आकारणी यंत्रणेची भारतातल्या हायवेंवर अंमलबजावणी करण्याचा आपला विचार असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये संसदेत म्हटलं होतं.
कारसाठीचा Barrier Free म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येण्याचा दावा करणाऱ्या या यंत्रणेबद्दल गेली अनेक वर्षं चर्चा आहे.
ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टिम काय आहे?
ही संज्ञा वापरली जाते सॅटलाईट म्हणजे उपग्रहावर आधारित नेव्हिगेशन म्हणजे दळणवळण यंत्रणेसाठी.
ही तीच यंत्रणा आहे जी फोनवर मॅप्स वापरण्यासाठी किंवा फिटनेस बँड्स आणि लोकेशन ट्रॅकर्ससाठी वापरली जाते. त्यावेळी याला म्हटलं जातं GPS - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (Global Positioning System
कारसाठीचा Barrier Free म्हणजे कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करता येण्याचा दावा करणाऱ्या या यंत्रणेबद्दल गेली अनेक वर्षं चर्चा आहे.


ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टिम (GNSS) मध्ये वाहनांमध्ये एक On-Board Unit (OBU) लावलं जातं. हे यंत्र म्हणजे वाहनांसाठीचा tracking device असतं. आणि ते कायमस्वरूपी म्हणजे Fixed असतं. ते तुम्ही ट्रान्सफर करू शकणार नाही.
या यंत्रामुळे काय होईल तर हायवेवरून तुमची गाडी प्रवास करत असताना ती ट्रॅक होईल, तुम्ही हायवेवर किती अंतर कापलंय हे उपग्रहाच्या मदतीने मोजलं जाईल आणि तेवढ्यासाठीचीच टोलची रक्कम आकारली जाईल.
शिवाय टोल बूथला जसं फास्टॅगचा बारकोड स्कॅन होण्यासाठी थांबावं लागतं, तसं या GNSS मध्ये थांबावं लागणार नाही. तुम्ही टोल प्लाझाला न थांबता पुढे जाऊ शकता.
GNSS असणाऱ्या कार्ससाठी बूम बॅरियर नसणाऱ्या वेगळ्या लेन्स असतील.
उपग्रहाच्या मदतीने कारचा प्रवास ट्रॅक केला जाईल आणि नॅशनल हायवे आणि एक्स्प्रेस वेंवर व्हर्च्युअल टोलिंग पॉइंट्स तयार केले जातील. म्हणजे असे टप्पे जिथून एखादी कार पुढे गेल्यानंतर त्या कारमधलं OBU पिंग होईल. आणि त्या कारने कापलेल्या अंतरानुसार मोजणी होऊन तुमच्या बँक खात्यातून ठराविक टोल कापला जाईल.
सरकारच्या नोटिफिकेशननुसार GNSS यंत्रणा असणाऱ्या गाड्यांना 10 सप्टेंबर 2024पासून हायवेज आणि एक्स्प्रेस वेजवर 20 किलोमीटर्सपर्यंतचा प्रवास दररोज टोल फ्री करता येईल. नॅशनल परमिट असणाऱ्या वाहनांसाठी हे लागू नसेल.
Fastag चं काय होणार?
कर्नाटक राज्यातल्या NH 275 च्या बंगळुरू - मैसूर या टप्प्यात आणि हरियाणात NH 709 वर पानिपत - हिसार भागामध्ये या प्रकारच्या GNSS टोल आकारणीसाठीचा पायलट प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलाय.
GNSS च्या वापरासाठीच्या पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठीची टेंडर्स आता काढण्यात येतायत.
GNSS साठीची ऑन बोर्ड युनिट्स ही तुम्हाला कारला लावून घ्यावी लागतील. पण भविष्यात कदाचित ही OBUs नवीन वाहनांसाठी factory fitted असतील. म्हणजे नवीन कार विकत घेताना त्यामध्ये हे युनिट बसवलेलंच असेल. सुरुवातीला फास्टॅग कायम ठेवतच या GNSS चा वापर सुरू करण्यात येईल. GNSS आणि फास्टॅग या दोन्हींसाठी स्वतंत्र लेन्स असतील. आणि OBU नसतानाही GNSS च्या लेनमध्ये घुसणाऱ्या वाहनांना दंड म्हणून दुप्पट टोल भरावा लागेल.
या उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा फास्टॅगची जागा घेईल आणि फास्टॅग बंद होतील.











