नितीन गडकरींची 'या' कारणांमुळे भाजपच्या संसदीय समितीतून गच्छंती झाली?

फोटो स्रोत, Getty Images / Narendra Modi
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
"मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत." - नितीन गडकरी
23 जुलै रोजी नागपूरच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी हे विधान केलं होतं.
इंग्रजीत एक म्हण आहे, 'careful what you wish for, you may get it.' म्हणजे तुम्ही काय इच्छा बाळगता याबद्दल काळजीपूर्वक विचार करा, कदाचित तुमची इच्छा पूर्ण देखील होईल.
आणि त्यांची ही इच्छा पूर्णत्वाच्या दिशेने नेण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत की काय असं आता वाटू लागलं आहे. कारण कालच (17 ऑगस्ट ) भाजपच्या संसदीय समितीची कार्यकारिणी जाहीर झाली त्यात नितीन गडकरींचा समावेश नव्हता. थोड्याच वेळात भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची यादी जाहीर झाली त्यात देखील त्यात देखील त्यांचे नाव नव्हते.
नितीन गडकरींनी राजकारणावर अशी विधानं करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राजकारण हे आर्थिक-सामाजिक सुधारणांसाठी असावे असं ते नेहमी बोलताना दिसतात, कधी ते आपल्याच विभागातील अधिकाऱ्यांना सुनावतात तर कधी ते म्हणतात की भाजप हा केवळ मोदी-शाहांचा पक्ष नाही.
पण यावेळी पार्श्वभूमी होती ती महाराष्ट्रात झालेल्या सत्तानाट्याची. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येऊन काही दिवसच झालेले असताना त्यांनी हे विधान करणे थोडे आश्चर्याचे होते.
काय म्हणाले होते गडकरी?
"राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता 100 टक्के सत्ताकारण झालं आहे," असं नितीन गडकरी म्हणाले होते.

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari
पुढे ते म्हणाले, "मला खूप वेळा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत."
याआधी देखील त्यांनी राजकारण किंवा सत्ताकारणापेक्षा मी समाजकारणाला महत्त्व देतो असं विधान केलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
26 मार्चला नितीन गडकरी यांची एका कार्यक्रमात राहुल सोलापूरकर यांनी मुलाखत घेतली होती. त्यात ते म्हणाले, "माझी कल्पना अशी आहे की मी आता राजकारण करत नाही. मी आता जवळपास समाजकारण करतो. राजकारणातही मी लोकांना सांगतो तुम्हाला वाटत असेल तर मत द्या. मी कटआउट नाही लावलं कधी, कोणाच्या गळ्यात हार नाही घातला. आणि विमानतळावर कुणाच्या स्वागताला जात नाही. अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर फक्त याच दोघांना मी माझ्या पैशांनी हार घातला आहे."
नितीन गडकरींनी खेळीमेळीच्या वातावरणात केले असले तरी भाजप हा निवडणुकांकडे अत्यंत गांभीर्याने पाहणारा पक्ष आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले होते की 'फक्त भाजपच उरेल इतर पक्ष उरणार नाही.'
तेव्हा संसदीय समितीमध्ये किंवा निवडणूक समितीमध्ये थेट मत द्यायचे तर द्या नाही तर देऊ नका असं म्हणणारा नेता कुठे फिट बसू शकला असता हा देखील एक प्रश्न आहे. पण केवळ याच विधानांमुळे गडकरींचा समावेश संसदीय समितीत करण्यात आला नाही की इतर कुठली दुसरी कारणं आहेत का या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करू.
नितीन गडकरींचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व
नितीन गडकरींचे व्यक्तिमत्त्व हे स्वतंत्र आहे आणि ते भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या बोलण्याची री ओढणारे नेते नाहीत, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंना वाटतं.
ते सांगतात, "नव्या टीम मोदीमध्ये काही जुने लोक आहेत जसं की बी. एस. येडियुरप्पा. पण मोदींच्या निर्णयावर जे लोक प्रश्न उपस्थित करणार नाहीत त्यांनाच फक्त प्राधान्य मिळत आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील सत्तांतर असेल या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक-बिहार हे 2024 मध्ये महत्त्वाचे असतील. देवेंद्र फडणवीस यांचा महाराष्ट्राच्या दैंनदिन राजकारणाशी संबंध आहे. तसा गडकरींचा आता राहिलेला नाही. त्यामुळे गडकरींच्या ऐवजी फडणवीस यांना स्थान देण्यात आलं आहे."

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari
"टीम मोदीमध्ये सिलेक्टिव्ह लीडरशिप वगैरे अशा गोष्टी नाहीत. गडकरी हे सिनिअर मोस्ट लीडर आहेत. त्यांचा स्वभाव, त्यांचा अनुभव पाहता ते एखाद्या निर्णयाला आक्षेप घेऊ शकतात. ते वेगळी भूमिका पण मांडू शकतात. सध्याही त्यांनी जे म्हटलं की निवृत्त व्हावं वाटतंय हे भाजपची लीडरशिप जे काम करत आहे त्याबद्दलच्या नाराजीतूनच आलेलं दिसतंय," असं देशपांडे सांगतात.
"नितीन गडकरी हे गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत असल्याचं दिसत नाहीये. केवळ काही लोकच निर्णय घेताना दिसतात. आता त्यांना थेट बाहेरच ठेवण्यात आलं आहे," असं देशपांडे सांगतात.
गडकरींचा निवडणुकीच्या दृष्टीने फायदा नाही असं भाजपला वाटतं का?
गडकरी हे निवडणुकीच्या दृष्टीने आता फारसे फायद्याचे नाहीत असं देखील देशपांडे यांना वाटतं ते सांगतात, "भारतीय जनता पक्षात निवडणुकीसंदर्भात अनेक फॅक्टर्स विचारात घेतले जातात. जातीय समीकरणं, तुमच्या पाठीमागे असलेले लोक, या गोष्टी भाजपमध्ये पाहिल्या जातात. केवळ तुम्ही कुणाशी एकनिष्ट आहात या एकमेव भांडवलावर इथे सत्तेत वाटा मिळत नाही.
"पक्षासाठी तुमचा काय फायदा होऊ शकतो, पक्षासाठी असलेली उपयुक्तता, अतिरिक्त फायदा करून देण्याची क्षमता या गोष्टींचा इथे विचार होतो. येडियुरप्पांचा समावेश केला आहे कारण त्यांचा कर्नाटकातल्या राजकारणातलं महत्त्व आणि सामाजिक-राजकीय समीकरणातला त्यांचा वाटा याचा विचार करून त्यांना संधी दिली आहे," देशपांडे सांगतात.
'पार्टीमध्ये फक्त मोदींचाच वरचष्मा'
पक्ष आणि सरकारमध्ये केवळ मोदींचाच वरचष्मा असतो. त्यामुळे नितीन गडकरींचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध असले तरी देखील गडकरी हे मोदींच्या पसंतीचे नेते नाहीत, असं मत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई व्यक्त करतात.

फोटो स्रोत, Getty Images
"मोदींना त्यांच्या पद्धतीनेच काम करणारे नेते हवे आहेत. संसदीय मंडळाचं काम तिकीट वाटपाचे आहे. जर पुढची लीडरशिप देवेंद्र फडणवीस हे असतील तर नितीन गडकरींचा फारसा उपयोग या दृष्टीने नाही. असा देखील विचार भाजपने केला असू शकतो.
"देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे घ्यावे लागले आहे. तेव्हा त्यांची नाराजी दूर करण्याचा देखील हा प्रयत्न असू शकतो," असं देसाई सांगतात.
'गडकरी हे बंड करणार नाहीत'
"मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींच्या वाट्याला अनेक खाती आली होती. गंगा शुद्धीकरण, जहाज आणि पुनर्बांधणी, रस्ते आणि वाहतूक ही खाती त्यांच्याकडे होती नंतर मात्र त्यांच्याकडे केवळ रस्ते आणि वाहतूक हेच खाते देण्यात आले. भाजपमध्ये गटबाजीला सुद्धा वाव नाहीये त्यामुळे गडकरींच्या बंडाची शक्यता नाही. नितीन गडकरी हे बंड करणार नाहीत किंवा त्यांचा तो स्वभाव देखील नाही," असं देसाई सांगतात.
"देवेंद्र फडणवीस हे नेहमी भाषणात मोदींचा उल्लेख करताना दिसतात. पण गडकरी मात्र मोदींची काय व्हिजन आहे याबद्दल फारसं बोलताना दिसत नाही. मोदींचं नाव ते आवर्जून घेताना दिसत नाही," असं देसाई सांगतात.
मोदी-शाहांची भाषा बोलत नाहीत
नितीन गडकरी यांचं धोरण सर्वसमावेशक आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा करत नाही, हे देखील एक कारण असू शकतं असं देसाईंना वाटतं.
"गडकरी हे त्यांच्या विरोधकांविरोधातही विखारी देखील बोलताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी जे. पी. नड्डा यांनी म्हटलं होतं केवळ भाजपच राहील इतर पक्ष राहणार नाहीत. मोदी-शाहांची भाषा ही नड्डांनी अवगत केली आहे. गडकरी हे मोदी-शाहांसारखं बोलत नाही किंवा त्यांच्यासारखी कार्यपद्धतीदेखील नाही."

फोटो स्रोत, Getty Images
एकेकाळी प्रभावशाली असलेल्या गडकरींचा पक्षातला प्रभाव का ओसरत आहे याबद्दल द प्रिंटचे पत्रकार डी. के. सिंह यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, "गडकरी एकेकाळी सक्रियपणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेत असत. आता ते फारसा हस्तक्षेप करत नाहीत. मोदी शाह हे नवीन प्रकारच्या नेतृत्वाला पुढे आणत आहेत. म्हणजे असे लोक जे त्यांच्याशी प्रामाणिक आहेत. ज्येष्ठ नेत्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल मनात शंका आहेत.
पुढे ते सांगतात, "2014 मधील एकूण 69 मंत्र्यांना 2019 मध्ये स्थान मिळालेलं नाही. उमा भारती, रवी शंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, हर्षवर्धन, सुरेश प्रभू, रमेश पोखरीयाल निशंक, महेश शर्मा या बड्या नेत्यांना देखील स्थान मिळाले नाही. सुषमा स्वराज, अरुण जेटली, गोपीनाथ मुंडे, अनंत कुमार यांचे निधन झाले. व्यंकय्या नायडू हे उप-राष्ट्रपती झाले आणि इतर तीन नेते राज्यपाल झाले," असं डी. के. सिंह यांनी मांडलं आहे.
नितीन गडकरींनी काँग्रेसला दिला होता वडीलकीच्या नात्याने सल्ला
नितीन गडकरी हे विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा तर करतच नाही उलट त्यांनी काँग्रेसला निराश न होता काम करत राहण्याचा सल्ला दिला होता. लोकशाहीच्या विकासासाठी काँग्रेस पक्ष मजबूत राहणे आवश्यक आहे, असं ते म्हणाले होते.
"लोकशाहीची दोन चाकं असतात, एक सत्ताधारी पक्ष आणि दुसरे विरोधक. मजबूत विरोधी पक्ष असणे हे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. म्हणून मला मनापासून वाटतं की काँग्रेस सशक्त असणे आवश्यक आहे. जर काँग्रेस दुबळी पडली तर त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेतील. जे लोकशाहीसाठी चांगले ठरणार नाही," असं गडकरी म्हणाले होते.

फोटो स्रोत, Getty Images
"निवडणुकीच्या पराभवाने हताश न होता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची विचारधारा जपत काम करावे. जर पराभव आहे तर एकेदिवशी विजय देखील आहे," असं गडकरी म्हणाले होते.
काँग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या मोदींच्या मंत्रिमंडळातील एका बडे नेते अशी ओळख असलेल्या गडकरींच्या वक्तव्याने तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
तेच गडकरी आता संसदीय मंडळात नाही. निवृत्तीबाबत बोलल्याच्या काहीच दिवसानंतर संसदीय मंडळातून गच्छंती झाली की आपली गच्छंती होणार याचा अंदाज असावा म्हणून गडकरी तसं बोलले हे मात्र गुलदस्त्यातच राहील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








