नितीन गडकरी: काँग्रेसबाबत भाजपची भूमिका बदलतेय का?

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"लोकशाही सत्ताधारी पक्ष आणि विरोधक अशा दोन चाकांवर चालते. सक्षम विरोधक ही लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे मला मनापासून वाटतं की, काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा. दुसरी गोष्ट म्हणजे, काँग्रेस पक्ष कमी होत असताना, त्यांची जागा प्रादेशिक पक्ष घेतायेत आणि काँग्रेसची जागा प्रादेशिक पक्ष घेणं लोकशाहीसाठी चांगलं नाहीये."

हे वक्तव्य कुणा काँग्रेस नेत्याचं नाहीय, तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरींचं आहे.

लोकमत वृत्तपत्राच्या पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरींची मुलाखत पार पडली. त्यात लोकमतच्या संपादकीय मंडळाचे अध्यक्ष विजय दर्डांनी गडकरींना प्रश्न विचारला की, "मी असं मानतो की, तुम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवता. विरोधक राहिले पाहिजेत, विरोधक राहिले तर लोकशाही जिवंत राहील, असं तुम्ही मानता. तर त्या दृष्टीने काय पावलं उचलायला हवीत."

यावर बोलताना नितीन गडकरींनी हे उत्तर दिलं होतं.

याचसोबत त्यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला आशावादी राहण्याचं आवाहनंही केलं, ते म्हणाले, "प्रत्येक पक्षाला संधी मिळते. निराश होऊन पक्ष आणि विचारधारेला सोडलं नाही पाहिजे. काम करत राहिलं पाहिजे. एक दिवस पराभव होत असेल, तर एक दिवस विजयही होईल."

एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि बहुतांश भाजपचे नेते 'काँग्रेसमुक्त भारत'चं लक्ष्य कार्यकर्त्यांसमोर ठेवत असताना, त्याचवेळी दुसरीकडे नितीन गडकरी मात्र काँग्रेसनं मजबूत पक्ष व्हायला हवं आणि लोकशाहीसाठी ते किती महत्त्वाचं आहे, हे जाहीर व्यासपीठावरून सांगत आहेत.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari

त्यामुळे प्रश्न उपस्थित होतात की, भाजपची काँग्रेसबाबत भूमिका बदलतेय की नितीन गडकरी हे मोदी-शाहांपेक्षा वेगळी भूमिका मांडू पाहतायेत?

भाजप आणि नितीन गडकरींचं राजकारण जवळून अभ्यासणाऱ्या राजकीय पत्रकारांशी बातचित करून बीबीसी मराठीनं या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार महेश सरलष्कर म्हणतात की, "गडकरी हे नेहमीच त्यांना जे म्हणायचं असतं, ते मोकळेपणानं बोलतात. आज त्यांनी पहिल्यांदाच काही ही भूमिका घेतली नाहीय. गडकरींनी स्वत:ची भूमिका वेळोवेळी जाहीर केलीय. ही भूमिका काँग्रेसच्या बाजूनं किंवा भाजपच्या विरोधात म्हणण्यापेक्षा लोकशाहीच्या बाजूनं आहे, असं म्हणता येईल."

"कुठलाही शहाणा नेता निवडणुकीच्या राजकारणात विरोधी पक्ष सक्षम असला पाहिजे. लोकशाही प्रक्रियेत विरोधी पक्ष असलाच पाहिजे, हीच शहाणी आणि परिपक्व भूमिका गडकरींनी घेतल्याचे दिसते," असंही महेश सरलष्कर म्हणतात.

मात्र, गडकरींच्या या भूमिकेनंतर मोदी-शाहांच्या भूमिकेशी गडकरींनी फारकत घेतल्याचीही चर्चा होतेय.

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Facebook/Nitin Gadkari

यावर वरिष्ठ पत्रकार सुनील चावके म्हणतात की, "आपलं काँग्रेसमुक्त भारतचं स्वप्न संपल्याचं मोदी-शाहांनी अद्याप जाहीर केलेलं नाहीय. देशाला घराणेशाहीपासून मुक्त करायचं असल्याचं ते सातत्यानं म्हणतही असतात. अशावेळी गडकरींनी व्यक्त केलेलं मत हे व्यक्तिगत असू शकतं."

त्याचवेळी महेश सरलष्कर म्हणतात की, "मोदी शाह काय म्हणतात, ते त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. गडकरी जे बोलतायेत ते लोकशाहीच्या दृष्टीने बोलतायेत आणि ते बोलत असतील तर चांगली गोष्ट आहे. कुठल्याही लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष सक्षम असलाच पाहिजे. आता तो नाहीय. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांची बाजू सक्षम असली तर चांगली गोष्ट असेल. त्यामुळे गडकरींची भूमिका स्वागतार्हच आहे."

तर गडकरींनी आपल्या कामगिरीच्या माध्यमातून निर्माण केलेल्या स्थानाचा उल्लेख करत सुनील चावके म्हणतात की, "गडकरींनी मंत्रालयाच्या कामाच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे गडकरींचा सर्वांत चांगला परफॉर्मन्स आहे. लोकसभा-राज्यसभेत विरोधकांकडून दाद दिली जाते. गडकरींच्या व्हिजनचं सर्वत्र कौतुकही होतं. त्यामुळे त्यांचं स्थान अढळ बनलंय. त्यामुळे जाहीर व्यासपीठावरून अशी भूमिका मांडल्याचा त्यांना कुठला फटका बसेल असं दिसत नाही."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)