You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुकेशला बुद्धिबळाचा वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी त्याच्या वडिलांनी सोडलं होतं करिअर
- Author, शारदा व्ही, बीबीसी तमिळ
- Role, संकलन - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी
भारताचा युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा नवा राजा ठरला आहे. गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं.
याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंदलाच बुद्धिबळाचं जगज्जेतेपद मिळवता आलं होतं. त्यानंतर 11 वर्षांनी गुकेशनं ही कामगिरी बजावली.
तसंच अठरा वर्षांचा गुकेश बुद्धिबळातला आजवरचा सर्वात युवा जगज्जेता ठरला आहे.
सिंगापूरमध्ये झालेल्या विश्वविजेतेपदाच्या लढतीत गुकेश आणि लिरेन एकूण चौदा गेम्समध्ये खेळले. त्यात तेराव्या गेम्सनंतर दोघं प्रत्येकी साडेसहा गुणांसह बरोबरीत होते.
अखेरचा गेमही बरोबरीत सुटेल असं वाटू लागलं होतं. पण गुकेश शेवटपर्यंत खेळत राहिला आणि त्यांनं अखेर लिरेनवर मात केली.
गुकेशच्या यशानं भारताच्या बुद्धिबळातल्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब केलं आहे.
गेल्या काही वर्षांत गुकेशसह प्रज्ञानंद, अर्जुन एरिगसी अशा युवा बुद्धिबळपटूंनी अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे.
बुद्धिबळाचा छंद आणि स्वप्नपूर्ती
चेन्नईत राहणाऱ्या डोम्माराजू गुकेशनं जेमतेम दहा वर्षांपूर्वीच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती गुकेशचे वडील रजनीकांत पेशानं ENT सर्जन (कान, नाक, घशाचे तज्ज्ञ) आहेत तर आई पद्माकुमारी मायक्रोबायोलॉजिस्ट आहेत आणि मद्रास मेडिकल कॉलेजमध्ये त्या शिकवतात. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातलं.
रजनीकांत यांनी मुलाच्या करियरवर लक्ष देण्यासाठी सध्या आपलं काम बंद केलं आहे. तेच गुकेशला वेगवेगळ्या शहरांत, देशांत स्पर्धेसाठी घेऊन जातात.
गुकेश लहानपणी केवळ छंद म्हणून घरच्यांशी बुद्धिबळ खेळत असे आणि तिथेच त्याची या खेळाचे नियम आणि चालींसोबत जुजबी ओळख झाली. बाकी घरात कुणी फारसं बुद्धिबळ खेळत नव्हतं.
शाळा सुटल्यावर वडिलांचं काम आटोपेपर्यंत तो एकटा राहू नये, म्हणून त्यांनी गुकेशला बुद्धिबळाच्या क्लासला घातलं होतं.
पण काही महिन्यांतच त्याच्यातली चुणूक दिसून आली, तेव्हा प्रशिक्षकांनी गुकेशला विशेष सरावासाठी पाठवण्यासाठी पालकांचं मन वळवलं.
गुकेशचा बुदद्धिबळातला रस वाढत गेला, तसा तो अधिकाधिक वेळ खेळू लागला. त्याची गुणवत्ता पाहून शाळेनंही त्याला पाठिंबा दिला.
“आठवड्याच्या शेवटी कुठेही स्पर्धा असेल, तिथे तो सहभागी व्हायचा, तो अशा लढतींची वाटच पाहायचा. त्याला कुठलंही बक्षीस मिळालं, की शाळेतल्या व्यासपीठावरून त्याची माहिती दिली जायची, ज्यामुळे त्यालाही आणखी प्रेरणा मिळायची,” असं रजनीकांत सांगतात.
खोडकर आणि खट्याळ
बुद्धिबळाइतकाच गुकेश अभ्यसातही हुशार आहे. पण तो बाहेरून जितका शांत दिसतो, तसा तो नाही असं रजनीकांत सांगतात.
“बाहेरून पाहिलं तर गुकेश अगदी सरळमार्गी, साधा वाटेल. पण प्रत्यक्षात तो सर्वांत मोठा प्रँकस्टार आहे.”
रजनीकांत पुढे सांगतात, “घरीही तो खोड्या काढत असतो. पण सामन्यांच्या वेळी तयारी करताना मात्र तो लक्ष बुद्धिबळावर केंद्रित करतो.
“अशा वेळी तो कोच वगळता कुणाशी फार बोलतही नाही. मी शेजारी बसलो असेन तर मलाही बोलू देत नाही, कारण त्याला त्याचं लक्ष ढळेल असं काही आसपास नको असतं,” असं रजनीकांत हसत हसत सांगतात, तेव्हा त्यांच्या आवाजात मुलाविषयीचा अभिमान आणि कौतुक झळकतं.
गुकेशची विजेतेपदं
लहान असतानाच गुकेश आपल्या वयापेक्षा मोठ्या प्रतिस्पर्ध्यांनाही सहज हरवू लागला. 2015 साली त्यानं गोव्यात राष्ट्रीय शालेय विजेतेपद मिळवलं आणि पुढची दोन वर्ष त्यानं हे विजेतेपद कायम राखलं.
2016 साली गुकेशनं कॉमनवेल्थ चेस चॅम्पियनशिपचं सुवर्ण जिंकलं, दोनच वर्षांनी 2018 साली बारा वर्षांचा असताना त्यानं वर्ल्ड यूथ चेस चॅम्पियनशिप जिंकली.
2017 साली गुकेशला पहिल्यांदा इंटरनॅशनल चेस फेडरेशन (FIDE किंवा फिडे)चं रेटिंग मिळालं. त्यानं गुकेशला मोठी प्रेरणा मिळावी असं त्याचे वडील सांगतात.
ग्रँडमास्टर बनणं हे प्रत्येक बुद्धिबळपटूचं स्वप्न असतं. गुलकेशचं हे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झालं.
ग्रँडमास्टर पद मिळवणारा गुकेश सर्वात युवा भारतीय आणि जगातला तोवरचा दुसरा सर्वात युवा बुद्धिबळपटू ठरला. तेव्हापासून त्याची आगेकूच सुरू आहे.
2021 साली गुकेशनं युरोपियन क्लब कप जिंकला, त्या स्पर्धेदरम्यान त्यानं मॅग्नस कार्लसनचा सामना केला.
2022 साली आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवणाऱ्या बुद्धिबळ संघात गुकेशचा समावेश होता.
त्याच वर्षी भारतात बुद्धिबळ ऑलिंपियाडचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा गुकेशनं ब गटातून सुवर्णपदक मिळवलं होतं.
तसंच 2023 च्या चेस वर्ल्ड कपमध्येही त्यानं उपांत्यपूर्व फेरी गाठली, पण माजी जगज्जेता मॅग्नस कार्लसनकडून त्याला पराभूत व्हावं लागलं. पण त्या यशाचं फळही लवकर मिळालं.
सप्टेंबर 2023 च्या रेटिंग लिस्ट मध्ये गुकेशनं अधिकृतरित्या विश्वनाथन आनंदला मागे टाकलं आणि तो भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू बनला. जवळपास 37 वर्ष आनंद भारतात अव्वल स्थानावर होता.
वर्षअखेरीस चेन्नईत झालेली स्पर्धा जिंकून गुकेशननं कँडिडेट्स स्पर्धेत स्थान मिळवलं होतं. आता कँडिडेट्स स्पर्धा जिंकून त्यानं विश्वविजेतपदाच्या लढतीतही प्रवेश केला आहे.
या स्पर्धेत त्यानं भारताच्या विदित गुजराती आणि प्रज्ञानंदला हरवलं होतं.
गेली तीन वर्ष चेस ऑलिम्पियाड, चेस वर्ल्ड कप आणि आता कँडिडेट्स स्पर्धा भारताच्या या युवा खेळाडूंनी गाजवल्या आहेत.
आपल्या या प्रतिस्पर्ध्यांशी गुकेशचं नातं कसं आहे, याविषयी रजनीकांत माहिती देतात, “स्पर्धेत सहभागी होण्याआधी ते एकमेकांशी फार बोलत नाहीत. पण सामने संपले की एकत्र एका खोलीत जमून खेळतात, मौजमजा करतात. पण आपली मैत्री आहे म्हणून सामन्यादरम्यान समोरच्याची हयगय करत नाहीत.”
कँडिडेट्स स्पर्धेत गुकेशचं यश
17 वर्षांचा गुकेश एप्रिल 2024 मध्ये फिडे कॅंडिडेट्स स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरला..
जगभरातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते आणि त्यातल्या एका विजेत्यालाच जगज्जेतेपदाच्या लढतीत विद्यमान विजेत्याशी लढण्याची संधी मिळते.
कॅनडाच्या टोरांटोमध्ये 3 ते 22 एप्रिलदरम्यान कॅंडिडेड्स स्पर्धेचं आयोजन झालं.
स्पर्धेच्या अखेरच्या फेरीत गुकेशला विजेतेपदासाठी अमेरिकेच्या हिकारु नाकामुरासोबतचा डाव बरोबरीत सोडवणंही पुरेसं ठरणार होतं.
हा डाव बरोबरीत सुटला, तसंच अमेरिकेचा कारुआना आणि रशियाचा नेपोम्नियाची यांच्यातला डावही बरोबरीत सुटला आणि गुकेशच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं.
विशेष म्हणजे, यात सहभागी आठ खेळाडूंमध्ये तीन भारतीय होते. गुकेशशिवाय विदित गुजराती आणि प्रज्ञानंद या स्पर्धेत खेळले. त्यामुळे या खेळात भारताच्या नव्या पिढीचं वर्चसवही सिद्ध झालं.
बुद्धिबळावर भारताचं वर्चस्व
2022 च्या चेस ऑलिम्पियाडमध्ये यजमान या नात्यानं भारताला तीन संघ खेळवता आले. त्याचा फायदा गुकेश आणि प्रज्ञानंदला झाला. दोघांनाही तेव्हा रेटिंगनुसार भारताच्या पहिल्या मुख्य संघात स्थान मिळालं नव्हतं.
पण मॅग्नस कार्लसननं त्यावेळी टिप्पणी केली होती, की “ज्युनियर खेळाडूंचा हा इंडिया-2 संघ, भारताच्या मुख्य संघापेक्षा जास्त चांगला खेळतो आहे.” या ज्युनिय संघानं तेव्हा पदकांची लूट केली होती.
गुकेश आणि प्रज्ञानंदचं यश केवळ तेवढ्यापुरतं राहिलं नाही तर प्रज्ञानंदनं 2023 साली चेस वर्ल्ड कपची फायनल गाठली होती तर वर्षभरानं गुकेश विश्वविजेतेपदासाठी लढणार आहे.
त्याशिवाय विदित गुजराती, अर्जुन एरिगसी, निहाल सरीन यांची कामगिरी पाहता, भारतीय बुद्धिबळात सध्या सुगीचे दिवस आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांनी बीबीसी मराठीसाठी 2023 मध्ये लिहिलेल्या लेखात याविषयीचं भाकितच केलं होतं. दोघांपैकी एकजण किंवा दोघंही वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे जगज्जेते होऊ शकतात, असं त्यांनी म्हटलं होतं.
आता प्रवीण ठिपसे यांचं ते भाकीत खरं ठरलं असून गुकेश त्या सिंहासनावर बसला आहे.