महाराष्ट्रात औरंगजेब पुन्हा का डोकं वर काढतो आहे?

औरंगजेब, महाराष्ट्र
फोटो कॅप्शन, औरंगजेब
    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

गेल्या दोन महिन्यांच्या काळात महाराष्ट्रात धार्मिक तणावाची अनेक प्रकरणं घडली. कायम आपल्या सलोख्यासाठी आणि तणावातही संयमासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्र, या अशा सलग झालेल्या घटनांची बुचकळ्यात पडला. हे असं अचानक काय झालं?

आणि त्यात एक गोष्ट बहुतांश ठिकाणी समान होती ती औरंगजेब. कुठे व्हॉट्स एप स्टेटस म्हणून औरंगजेबाचा फोटो ठेवला गेला म्हणून, तर कुठे जुलूसमध्ये औरंगजेबाचे पोस्टर्स नाचवले गेले म्हणून, आणि कुठे घोषणा दिल्या गेल्या म्हणून. महाराष्ट्रातली औरंगजेबाबद्दलची असलेली ऐतिहासिक भावना लक्षात, वातावरण संवेदनशील आणि प्रतिक्रिया आली.

काही ठिकाणी बंद पुकारले गेले. मोर्चे निघाले. कुठे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानं दगंलसदृश परिस्थिती निर्माण झाली. दगडफेक झाली, नुकसान झालं. पोलिसांना बळाचा वापरही करावा लागला. जमावबंदी करावी लागली.

एकंदरीत काय, तर सात-आठ जिल्ह्यांमध्ये, केवळ शहरंच नाही तर गावांमधेही, अशी स्थिती निर्माण झाल्यानं महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं. तणावाखाली आलं.

मुळाशी एक प्रश्न होता, आणि अजूनही आहे, तो हे आताच असं महाराष्ट्रात असं का होतं आहे? औरंगजेब महाराष्ट्रात असं का डोकं वर काढतो आहे? इतिहासात कायम औरंगजेबाला 'स्वराज्याचा शत्रू' असंच म्हटल म्हटलं गेलं, पण समकालीन महाराष्ट्रात त्यावरुन कधी वाद झाले नव्हते.

ज्या शहरात, गावात या धार्मिक तणावाच्या घटना झाल्या, ती ठिकाणं वास्तविक सलोख्याचे प्रदेश म्हणून ओळखीचे आहेत. मग तरीही महाराष्ट्रात असं का व्हावं?

याबद्दल महाराष्ट्रात चर्चा होते आहे. काही मोठ्या आवाजात, काही दबक्या आवाजात. राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले. अजूनही चालू आहेत. पण नेमकं जमिनीवर काय झालं, काय बिघडलं, हे पाहणं आवश्यक ठरतं. त्यासाठी अशा घटन घडलेल्या काही ठिकाणी आम्ही प्रवास केला.

मुक्काम कोल्हापूर

7 जूनला, म्हणजे शिवराज्याभिषेक दिनाच्या दुसऱ्या दिवशी, कोल्हापूरच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकानं जे पाहिलं ते या शहरानं अगोदर कधीही पाहिलं नव्हतं. शहराच्या या मध्यभागात, जो प्रसिद्ध महालक्ष्मीच्या मंदिरापासून आणि कोल्हापूर महानगरपलिकेपासूनही अगदी थोड्याच अंतरावर असणाऱ्या या चौकात अक्षरश: दंगलीची स्थिती उद्भवली.

काही अल्पवयीन मुलांनी व्हॉट्स ऍप स्टेटस म्हणून औरंगजेबाचा फोटो ठेवण्याचं निमित्त झालं. ती बातमी वाऱ्याासारखी पसरली. ही काही अशी पहिलीच घटना नव्हती.

काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या सावर्डे नावाच्या गावातही एका मुस्लिम युवकानं ठेवलेल्या व्हॉट्स ऍप स्टेटसचा वाद होऊन वातावरण तंग झालं होतं. तेव्हा ते गावकऱ्यांनी शांत केलं, पण नंतर इतरही गावांमध्ये असे प्रकार झाले.

कोल्हापूर शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौक

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, कोल्हापूर शहरातला छत्रपती शिवाजी महाराज चौक

कोल्हापूर शहरात हे घडल्यावर मात्र इथल्या हिंदुत्ववादी संघटनांनी 7 तारखेला बंद पुकारला. पोलिसांनी हे स्टेटस ठेवणाऱ्या अल्पवयीन मुलांना ताब्यातही घेतलं. पण वातावरण तापत गेलं. पोलिसांनी मनाई केली होती तरी चौकात गर्दी जमत गेली.

ताबा सुटला, दगडफेक झाली, पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. हा दाटीवादीचा भाग आहे. हिंदू-मुस्लिम दोघांचीही घरं आणि दुकानं आहेत. अनेक दुकानांचं, गाड्यांचं, घरांचं नुकसान झालं. दगडांच, चपलांचा खच या चौकात पडला होता.

पोलिसांना पुढचे काही दिवस कोल्हापुरात जमावबंदी करायला लागली. किमान 36 तास, कोणत्याही अफवांचा प्रसार होऊ नये म्हणून, जिल्ह्यातली इंटरनेट सेवाही बंद केली गेली होती.

हिंदुत्ववादी संघटनांनी ७ तारखेला बंद पुकारला.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, हिंदुत्ववादी संघटनांनी ७ तारखेला बंद पुकारला.

ही घटना घडून गेल्यावर आठवड्याभरानं आम्ही कोल्हापूरात जातो. कोल्हापूर वरवर शांत आहे, पण आतून सगळ्यांना टोचणारा प्रश्न हाच आहे, की छत्रपती शाहूंच्या कोल्हापूरात असं कसं झालं? असं नाही की तणाव या शहरानं कधी पाहिला नाही. अगदी 1992 मध्येही संयम दाखवला गेला होता.

शिवाय कोल्हापूरची ओळख ही छत्रपती शाहू महाराजांचं शहर आहे, जिथं सगळ्या जातीधर्माच्या लोकांना समान संधी असणारं संस्थान त्यांनी उभं केलं.

पण या दंगलीत त्यांनी बांधलेलं दसरा चौकातलं मुस्लिम बोर्डिंग स्कूलही सुटलं नाही. दसरा चौकातच शाहू महाराजांचा मोठा पुतळा उभा आहे. महाराजांनी विविध समाजातल्या मुलांना शिकता यावं यासाठी त्यांच्या काळात या समाजांची बोर्डिंग स्कूल इथं उभारली.

त्यातलंच हे मुस्लिम बोर्डिंग स्कूल या चौकातच आहे. तिथल्या लायब्ररीमध्ये हिंदू-मुस्लिम, सगळेच विद्यार्थी येऊन अभ्यास करतात. पण त्या दिवशी या अभ्यासिकेवरही दगड आले.

मुस्लिम बोर्डिंग स्कूल

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, मुस्लिम बोर्डिंग स्कूल

"हम तो ऑफिस बंद करके बाहर जा रहे थे. मगर उस तरफ से मॉब आया. उन्होने पथ्थर बरसाए लायब्ररी पर. लायब्ररी मे पाच छे बच्चे लोग थे. उसमे एक बच्चे को थोडा सा लगा. लेकिन वह डर गए. हॉस्टेल के अंदर जो बच्चे रहते है वह डर गए की अचानक कैसे यह हादसा हुआ," इथं काम करणारे नझिर काझी आम्हाला सांगतात. इमारतीबाहेर आता पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही दगडफेक झाली, त्याच चौकात काही पावलांवर काही शे वर्षं जुना घुडणपीर दर्गा आहे. जिथं मुसलमान येतात आणि हिंदूही येतात. शाहू महाराजांच्या काळातही त्यांना काही मदत केली गेली होती.

आम्ही जेव्हा तिथं गेलो तेव्हा अनेक जण आत बसले होते. भाविकही येत जात होते. त्या दिवशी गोंधळ सुरु झाल्यावरही असेच सगळे आत होते.

"अगोदर लक्ष्मीपुरीमध्ये गेले. तिकडनं भुई गल्ली, नंतर बारा महम्मदकडे गेली. तिकडे दगडफेक केली. तिकडनं उठली अकबर मोहल्ल्यामध्ये गेली. मुसलमानांना टारगेट केलं," लियाकत मुजावर सांगतात.

औरंगजेब, महाराष्ट्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"त्यांचे लोक आमच्याकडे ईदला जेवायला येतात. ते आम्हाला दिवाळीला फराळाला बोलावतात. गुण्यागोविंदानं आम्ही इथं नांदतो. शाहू महाराजांची परंपरा आहे," लियाकत म्हणतात.

पण औरंगजेबाचे फोटो स्टेटस म्हणून लावले गेले. हे घडलं त्याबद्दल काय वाटतं?

"स्टेसस कुणीतरी लावलं. खरं आहे की. त्यांना फाशी द्या. आमचं काही म्हणणं नाही. ज्यानं केलं आहे त्याला शिक्षा द्या. आम्ही त्याला पाठीशी घालणार नाही. ज्यानं चुकीचं काम केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण समाजाला वेठीला का धरता? असं करुन आमचं हिंदू-मुस्लिम प्रेम का कमी करता?," असं लियाकत यांचं उत्तर असतं.

पण दुसरीकडे जेव्हा आम्ही हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींना भेटतो तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की हे स्टेटस सारखे प्रकार अनेक दिवसांपासून सुरु होते आणि ते थांबवण्यासाठी दुसऱ्या बाजूनंही प्रयत्न होत नव्हते. ज्या दिवशी आंदोलन होतं, बंद पुकारला होता, तेव्हाही काहींनी पुन्हा हे स्टेटस ठेवण्याचा प्रकार झाला असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून तुटेपर्यंत ताणलं गेलं.

संभाजी साळुंखे अनेक वर्षं कोल्हापूरात हिंदुत्ववादी चळवळीत आहेत. आता ते हिंदू जनआक्रोश मोर्चा काढणाऱ्या 'सकल हिंदू समाज' मध्येही आहेत.

औरंगजेब, महाराष्ट्र

इथले हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणतात, गेल्या काही महिन्यात औरंगजेब-टिपू सुलतान स्टेटस ठेवणं, केवळ हे कोल्हापुरात भडका उडण्याचं निमित्त होतं. पण तेच एकमेव कारण नव्हे.

लव्ह जिहादच्या त्यांनी आणलेल्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करणं, इथं काही परराज्यांतून मुलं मदरशांमध्ये शिकायला आल्यावर पकडून देणं, अशा प्रकारांनी राग साचत गेला होता. त्यांचं म्हणणं हे आहे की त्यांनी हे मुद्दे वारंवार समोर आणूनही काही झालं नव्हतं.

"फक्त स्टेटस ठेवला म्हणून ही दंगल, या घटना घडल्या असा विषय नाही. तरुणांच्या डोक्यात आमच्यावर अन्याय झाला, अन्याय झाला असं डोक्यात होतं ते एकदम बाहेर पडलं आहे. ते उत्स्फूर्तपणे बाहेर पडलं आहे. कोणत्याही संघटनेनं असं सांगितलं नाही की दगडं मारा. स्वत:हून लोकांनी दुकानं बंद केली. आम्ही सांगितलं नव्हतं," 'हिंदू एकता' या संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई सांगतात.

कोल्हापूर पुरोगामी, हिंदुत्ववादी?

इथं सगळीकडे ऐकायला मिळतं की कोल्हापूरात असं काही होईल याची धास्ती सगळ्यांना होती. काही राजकीय नेत्यांनी तसं जाहीरपणे बोलूनही दाखवलं होतं. ते घडलंच, पण लवकर नियंत्रणात आणलंही गेलं.

पण कोल्हापूरला सलोख्याची, शांततेची, सवर्धमसमभावाची एक परंपरा आहे आणि छत्रपती शाहू महाराजांपासून ती जोपासली गेली आहे, ती या घडल्या प्रकारेमुळे खंडित झाली आहे, असं त्यांना वाटतं का?

छत्रपती शाहू महाराज

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, छत्रपती शाहू महाराज

"कोल्हापूर हे पुरोगामी वगैरे काही नाही. ते सगळं थोतांड आहे. छत्रपती शाहू महाराज पुरोगामी होते असं सांगतात पण ते खरं नाही. आमचे महाराज धार्मिक होते. त्यांनी धर्मासाठी कामं केली आहेत. त्यांनी धर्म वाचवला. त्यांनी कोल्हापूरमध्ये वैदिक शाळा काढल्या."

"शाहू महाराजांनी वैदिक धर्म टिकवला, वाढवला. त्यांच्यासारखं वैदिक धर्मासाठी कोणत्याच राजानं काम केलं नाही. त्यांना कुठल्या तरी एका चौकटीत बसवून ते पुरोगामीच होते ही गोष्टच आम्हाला मान्य नाही. कोणाला आव्हान द्यायचं असेल तर देऊ द्या. पण कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे हे स्पष्टपणे सांगतो," दीपक देसाई उत्तर देतात.

पण तणावानंतरची कोल्हापुरातली उदाहरणं काही वेगळीच कहाणी सांगतात.

उदाहरणार्थ, इक्बाल तांबोळींची कहाणी.महापालिकेजवळच इक्बाल तांबोळी अनेक वर्षं काचेच्या वस्तूंची हातगाडी लावतात. दंग्याच्या दिवशी ते गाडीजवळ नव्हते, पण गाडी तिथंच रस्त्याकडेला लावून ते घरी होते. दंग्यात त्यांची गाडी फोडली गेली.

"मी घरातच होतो. दोन दिवसांपूर्वीच इथनं गाडी मी काढली होती. माझ्या इथल्या हिंदू बांधवांनी सांगितलं होतं दोन दिवस वातावरण जरा तंग आहे तेव्हा तुम्ही गाडी जरा इथनं काढा आणि नंतर परत आणून लावा. मग मी गाडी काढून बाजूला लावली. मग मला बुधवारी समजलं की माझ्या गाडीची नासधूस झाली आहे," इक्बाल त्यांच्या गाडीजवळ उभं राहून आम्हाला सांगतात.

 ७ जूनच्या राड्यात इक्बाल तांबोळींच्या गाडीची आणि सामानाची नासधूस करण्यात आली.

फोटो स्रोत, NItin Nagarkar

फोटो कॅप्शन, 7 जूनच्या राड्यात इक्बाल तांबोळींच्या गाडीची आणि सामानाची नासधूस करण्यात आली.

पुढच्या दोनच दिवसांत त्यांची गाडी पुन्हा उभी राहिली. त्याचं कारण मिलिंद यादव आणि त्यांचे मित्र. मिलिंद यांनी आर्थिक मदत गोळा करुन इक्बाल यांची गाडी आणि त्यावरचा माल पुन्हा आणून दिला. इक्बाल सांगतात, त्यांना अनेकांनी मदत केली.

"मी दुसऱ्या दिवशी जेव्हा वर्तमानपत्रात वाचलं तेव्हा त्यात पान भरुन दंगलीचे फोटो आले होते. त्यात याच्या गाडीचा फोटो होता. तो फोटो बघितल्याबरोबर मी ओळखलं की ही इक्बालची गाडी आहे. शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. त्यामुळे फोटो बघताक्षणी मी ठरवलं की इक्बालचा संसार उभा करुन द्यायची जबाबदारी माझी आहे. मी त्याच्या घरी गेलो. माझ्या परीनं जे काही आहे ते मी केलं. त्याची गाडी उभी राहिली यात मला आनंद आहे," मिलिंद यादव सांगतात.

त्यांनी याविषयी सोशल मीडियावरही लिहिलं. त्यालाही प्रतिसाद मिळाला, मदतीचा ओघ वाढला.

औरंगजेब, महाराष्ट्र

औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरु झालं?

मूळ विषय पुन्हा औरंगजेबापर्यंत येतो. औरंगजेबाची चर्चा आताच सुरु का झाली? औरंगजेबाचा महाराष्ट्र्राबाबतचा इतिहास सर्वज्ञात आहे.

1707 मध्ये मृत्यू होण्याअगोदर आयुष्याची शेवटची तीस वर्षं त्यानं महाराष्ट्रात थांबून मराठ्यांचं साम्राज्य जिंकायचा प्रयत्न केला. पण त्याला कधीही यश आलं नाही. अशा महाराष्ट्रात औरंगजेब असा अचानक केंद्रस्थानी का यावा?

हे केवळ कोल्हापूरातच झालं असं नाही. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नवी मुंबई इथंही अशा घटना घडल्या. तिथंही काही काळ तणाव निर्माण झाला. 7 जूनला कोल्हापूरमध्ये दंगा झाल्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की जे कोणी याच्या मागे आहे ते आम्ही शोधून काढू.

औरंगजेब, महाराष्ट्र

सध्या औरंगजेबावरुन वाद सुरु आहे. काही वर्षांपूर्वी अफझलखानावरुनही वाद सुरु होता. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच्या असलेल्या कबरीवरुन अनेक वर्षं वाद सुरु होता. 2009 मध्ये अफझलखानाच्या पोस्टरवरुन मिरजेच दंगा झाला होता आणि त्याचे प्रतिसाद दक्षिण महाराष्ट्रात पडले होते.

"शत्रू कोण दाखवायचा? भारतामध्ये आता सगळं ब्लैक एंड व्हाईट असं दाखवायचं सुरु आहे. खरं तर ते सावरकरांपासून सुरु झालं. एका बाजूला हिंदू आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम. त्यातून औरंगजेब हे इतिहासातलं मोठं कैरेक्टर जे सो-कोल्ड हिंदुत्वाचा झेंडा हातात घेतलेले आहेत त्यांच्या हातात मिळालेलं आहे."

"औरंगजेब जिहादी होता, त्यानं मंदिरं पाडली, त्यांनी शंभूराजांना मारलं. मग त्याचा उपयोग आपण करुन घेऊ शकतो. त्यावरुनच मग स्टेटस लावल्यावर वादावादी, दंगल, दगडफेक वगैरे सगळं सुरु झालं झालं आहे. कोल्हापूर कधीच एवढं अशांत नव्हतं. केवळ शहरच अशांत झालं नाही, तर कागल, हेरवाड, हेलूर, वडिंगे, पाडळी, इकडं झालं. या छोट्या गावांमध्ये सुद्धा स्टेटसवरुन दंगली, दगडफेकी, तरुणांवर केसेस व्हायला लागल्या आहेत," असं कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणतात.

औरंगजेबाचा महाराष्ट्र्राबाबतचा इतिहास सर्वज्ञात आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, औरंगजेबाचा महाराष्ट्र्राबाबतचा इतिहास सर्वज्ञात आहे.

सावंत पुढे म्हणतात की महाराष्ट्रातल्या मुस्लिमांनी कधीही औरंगजेबाची बाजू घेतली नाही. त्यामुळे त्याच्या उदात्तिकरणाच्या प्रकारांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.

"औरंगजेबाबद्दल मुसलमान समाजातल्या व्यक्तीही प्रेम दाखवणार नाहीत कारण त्याचा इतिहास तसा आहे. स्वत:च्या बापाला त्यानं कैदेत ठेवलं आहे. स्वत: तीन भावांना त्यानं अत्यंत क्रूरपणे मारलं. स्वत:च्या मुलाचे सुद्धा डोळे काढणारा माणूस आहे हा."

"त्याचा अकबर नावाचा मुलगा शंभू राजांकडे आश्रयाला आला होता. त्याला परागंदा होऊन इराणमध्येच मरण पत्करावं लागलं. त्यामुळे स्वत:च्या मुलाबद्दल ज्याच्या भावना चांगल्या नाहीत असा माणूस कोणाचा आयकॉन होऊ शकतो? मुस्लिम धर्मात सुद्धा औरंगजेबाला मानसन्मान दिला जात नाही. महाराष्ट्रातले मुस्लिम हे मराठा मुस्लिम आहेत. ते मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावूण औरंगजेबाशी लढलेले मुसलमान आहेत. ते कशाला त्याचं नाव घेतील? याचा शोध घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेरुन औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे आले आहेत का, हे शोधलं पाहिजे," सावंत म्हणतात.

जूनच्याच पहिल्या आठवड्यात औरंगजेबाच्या पोस्टरवरुन अहमदनगरमध्येही वातावरण तंग झालं होतं. शहरातल्या एका जुलूसमध्ये काही तरुणांनी हातात औरंगजेबाचे पोस्टर्स घेऊन ते नाचवले. त्याचा वाद राज्यभर झाला. पोलिसांनी कारवाई केली, पण प्रतिक्रिया आल्याच.

औरंगजेबाच्या पोस्टरवरुन अहमदनगरमध्येही वातावरण तंग झालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, औरंगजेबाच्या पोस्टरवरुन अहमदनगरमध्येही वातावरण तंग झालं होतं.

युनुस तांबटकर अहमदनगरमध्ये 'आम्ही नगरकर' नावाची संस्था चालवतात. त्यांच्या स्वातंत्र्यसैनिक असणा-या वडिलांच्या नावानं 'रेहमत सुलतान फाऊंडेशन'ही चालवतात. नगरमध्ये कधीही तणावाची स्थिती निर्माण झाली की ती सोडवायला पुढे असतात. ते नगरमध्ये आम्हाला भेटतात.

"या मुलांना विचारा फक्त औरंगजेबाबद्दल माहिती. फक्त विचारा त्यांना की औरंगजेबाचं शासन कधी होतं, त्याच्या काळात काय काय घडलं, त्यानं काय काय केलं हे तरी विचारा. ज्यानं ते पोस्टर दाखवलं तो म्हणतो की मला काही माहित नाही, माझ्या हातात कोणीतरी हे पोस्टर आणून दिलं. मी ही गोष्ट मानायला पण तयार नाही. ते अक्षरश: ते घेऊन नाचले. काहीही कारण नव्हतं."

"यामुळे वातावरण खराब होऊ शकतं हे प्रत्येक तरुण मुलाला समजतं. मग माझा प्रश्न आहे तरुण मुलांना की तुम्ही हे सगळं जाणून बुजून करता का? अहमदनगरचं वातावरण खराब करायचंय का? मग औरंगजेबाच्या औलादी म्हणून आणखीन वातावरण खराब करायचंय का?," युनुस तांबटकर विचारतात.

मुक्काम अहमदनगर

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली. बहुतांश निमित्त औरंगजेब होतं तरीही इतरही कारणं काही ठरली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांतली भांडणं कारणीभूत ठरली. त्र्यंबकेश्वरमध्ये मंदिरात धूप दाखवण्याच्या मुस्लिम समाजाच्या एका प्रथेवरुन मतमतांतरं झाल्यानं तणाव निर्माण झाला. पडसाद राज्यभर उमटले.

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली.
फोटो कॅप्शन, गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली.

मुंबईचा मालवणी भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, अकोला, नाशिक, अहमदनगर सगळीकडे काही ना काही झालं आहे. पण त्यापूर्वी वर्षभरातल्या अनेक घटना आणि वादांची पार्श्वभूमीही आहे. अजान आणि मशिदीवरच्य भोंग्यांचा वाद झाला. खुल्ताबादच्या औरंगजेबाच्या कबरीवरुन वाद झाला.

लव्ह जिहाद, लैंड जिहाद असे विषय घेऊन महाराष्ट्राभर 50 हून अधिक हिंदू जनआक्रोश मोर्चे निघाले होते. औंरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झालं आणि नंतर अहमदनगरचं अहिल्यानगर अशा नामांतराची घोषणा झाली.

कोल्हापूरनंतर जर कोणत्या जिल्ह्यातल्या अनेक गावांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये तणाव अनुभवला आहे, तर तो आहे अहमदनगर. राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा, पण सध्या जास्त चिंतेत आहे. शहरासोबत जिल्ह्यातल्या संगमनेर, पारनेर अशा तालुक्यांमध्येही तणावाच्या घटना घडल्या.

शेवगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाली.

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, शेवगावमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक झाली.

पण सुरुवात झाली पाथर्डीजवळच्या शेवगावमध्ये. अहमदनगरपासून 60 किलोमीटरवरच्या शेवगांवमध्ये 14 मे रोजी पहिल्यांदा दंगलीसारखी स्थिती झाली. इथल्या भरवस्तीतल्या बाजारपेठेतून जेव्हा छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक निघाली, तेव्हा दोन गटांमध्ये दगडफेक झाली. वातावरण बिघडलं. आजूबाजूच्या दुकांनाची तोडफोड झाली.

औरंगजेब, महाराष्ट्र

शेवगाव हे प्रसिद्ध गांधीवादी बाळासाहेब भारदे यांचं गाव. त्यांनी या भागातून निवडणुकही लढवली होती. इथं यापूर्वीचा इतिहास सलोख्याचाच आहे. पण या घटनेनं सगळं बदललं. आम्ही जेव्हा इथल्या बाजारपेठेत फिरतो तेव्हा दंग्याच्या खुणा अजूनही दिसतात. बरेच दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

"शेवगांव एक शांत गाव होतं. इथे दोन यात्रा भरतात. एक खंडोबाची यात्रा असते. पण त्या यात्रेत सगळ्या जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने सहभागी होतात. दुसरी यात्रा त्याच्या पंधरा दिवसांनंतर सोनामिया वली साहेब, हे मुस्लिम समाजातले संतपुरुष होते, त्यांची होते. त्याही यात्रेत सगळेच, अगदी हिंदू बांधवही सहभागी होत असतात. या सलोख्याला बाधा येईल अशा गोष्टी गेल्या वर्षभरात घडत होत्या."

"मग वेगवेगळ्या धर्माचे झेंडे लावण्याचं फॅड असो, कोणाच्या झेंड्याची उंची जास्त असावी, ही एक स्पर्धा तयार झाली. ती तयार करण्यामागे नेमका कोणाचा ब्रेन होता हे जर शोधलं तर या दंगलीचं मूळ हे राजकीय वर्चस्वामध्ये आहे हे उघड होईल," इथले स्थानिक पत्रकार आणि लेखक उमेश घेवरीकर म्हणतात.

आम्ही इथल्याही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भेटतो. त्यांना वाटतं की त्यांच्यावरच्या अन्यायाची भावना साचत गेली. यामागे स्थानिक राजकीय वर्चस्वाची लढाई आहे असंही त्यांना वाटतं. इथली मुस्लिम मतं एकगठ्ठा करुन त्यातून राजकारण करण्याचा प्रयत्न काही काळ सुरु होता असा त्यांचा आरोप आहे.

शेवगाव हे प्रसिद्ध गांधीवादी बाळासाहेब भारदे यांचं गाव.

फोटो स्रोत, Nitin Nagarkar

फोटो कॅप्शन, शेवगाव हे प्रसिद्ध गांधीवादी बाळासाहेब भारदे यांचं गाव.

"इथं तिरंगा रैली असेल, संचलन असेल, शिवजयंती उत्सव असेल खूप चांगल्या पद्धतीनं इथं कार्यक्रम साजरे केले जात होते. हीच खदखद इथे काही राजकीय लोकांच्या मनामध्ये होती. की जर हिंदूंचं एकत्रिकरण होऊ लागलं तर एका विशिष्ट पक्षाला याचा परिणाम चांगला मिळू शकत नाही. त्यामुळे दुसऱ्या बाजूनं विचार करुन जो राहिलेल्या मतांचा गठ्ठा होता तो एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला आहे."

"हिंदूंचा कार्यक्रम झाला की तो कसा चुकीचा आहे हे सांगायचं, त्यावर आक्षेप घ्यायचा, एखाद्या संघटनेवर ती अजेंडा राबवते आहे असं म्हणून हिंदूंमध्ये नाराजी तयार करायची. या गोष्टींचा रोष हिंदूंच्या मनामध्ये साचत गेला होता," डॉ नीरज लांडे हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते सांगतात.

प्रत्येक गावात तणावाची काही स्थानिक कारणं असतात. गावपातळीवर ती सोडवली जातात आणि शांतता राखली जाते. गावपातळीवरच्या शांतता समितींनी आजवर याबाबती महत्वाची भूमिका निभावली आहे. पण तरीही एकामागून एक अनेक ठिकाणी जिल्ह्यात तणाव निर्माण झाला.

औरंगजेब, महाराष्ट्र

"इथं शाह शरीफ दर्गा आहे ज्यावरुन आपल्या शहाजी महाराजांचं नाव ठेवलं गेलं. पहा म्हणजे इथं हिंदू मुस्लिम एकीकरण किती होतं. त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा आम्ही लव्ह जिहाद खपवून घेणार नाही अशी भाषा जेव्हा वापरली जाऊ लागली, तेव्हा नगर जिल्हा जो एकेकाळी कम्युनिस्टांचा जिल्हा होता तो आता हिंदुत्ववादाकडे झुकला आहे, पण एकेकाळी तो सेक्युलर जिल्हाही होता आणि तो आता हिंदुत्वाची भाषा जोरकसपणे बोलू लागला आहे हेही चित्रं दिसतं आहे," 'लोकमत' दैनिकाचे अहमदनगरचे निवासी संपादक सुधीर लंके म्हणतात.

राजकीय ध्रुविकरणाचा प्रयत्न?

अशा कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक वादांचे राजकीय परिणाम हे होतातच. ते टाळता येत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये ध्रुविकरणाच्या राजकारणाचे देशभर प्रयत्न झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या कर्नाटकच्या निवडणुकांमध्येही त्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे आता जे महाराष्ट्रात घडतं आहे त्याचे परिणाम काय होतील. येत्या वर्षभरात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्यानंतर विधानसभेच्या. त्यावर याचा परिणाम होईल का?

"भाजपा आणि शिवसेनेतला एक गट हे सरकारमध्ये आल्यानंतर मला असं वाटतं की त्यांना ध्रुविकरण करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा ज्या बारक्या-सारक्या गोष्टी असतात त्याचा एकत्रितपणे आयडिओलॉजिकल स्वरुपामध्ये उपयोग करता येईल का हेही बघितलं जात असणार. आणि त्यातून अंतिमत:, नेहमी आपण म्हणतोच की यातनं निवडणुकीत कोणाला फायदा होईल? आणि हे उघड आहे की जेवढ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम असं ध्रुविकरण होईल तेवढ्या प्रमाणात भाजपाला त्याचा फायदा होईल," असं निरीक्षण राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर नोंदवतात.

आता जे महाराष्ट्रात घडतं आहे त्याचे परिणाम काय होतील?

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, आता जे महाराष्ट्रात घडतं आहे त्याचे परिणाम काय होतील?

"पण त्याच्यापलिकडे जाऊन पहायला हवं की, महाराष्ट्र हा एकूण दिल्ल्ली आणि इतर ठिकाणच्या भाजपाच्या ज्या भूमिका आहेत, अगदी कर्नाटकातल्याही, त्या तुलनेत गेली दहा वर्षं महाराष्ट्रातलं वातावरण सलोख्याचं राहिलं आहे. त्यामुळे एकूण हिंदुत्वकरण ज्याला आपण म्हणतो, ते करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग आहे असं मला वाटतं," पळशीकर पुढे म्हणतात.

पण तरीही हा मुख्य प्रश्न आहेच की, हे सगळं कुठपर्यंत चालेल?

औरंगजेब, महाराष्ट्र

"हे देशभर, किंबहुना जगभर, दिसणारं चित्र आहे की, पोलरायझेशनमध्ये सुरुवातीला दोन्ही पक्ष सामील असतात. आता जो तणाव आहे त्याचा विचार केला तर दोष केवळ हिंदूंना देण्यापेक्षा हिंदू आणि मुस्लिम दोन्हीकडचे आगळीक करणारे लोक कसे सामील आहेत ते आपल्याला शोधावं लागेल."

"दुसरीकडे दोन्हीकडचे तरुण ज्यांना अर्धवट नोकऱ्या असते, खाण्याची भ्रांत असते, असे तरुण या पोलरायझेशनकडे झपाट्यानं आकर्षित होतात. आणि तिसरी गोष्ट ही की हे करण्यामागचे जे ब्रेन्स असतात ते घरी बसतात मात्र वातावरण कलुषित होईल याची पुरेपूर खबरदारी घेतात. त्यामुळे निवडणुकीबद्दल जरी विचारलं तरी माझं म्हणणं हे आहे की यामुळं वातावरण जर कलुषित झालं तर ते बदलायला पुढची दहा वर्षं लागतात," सुहास पळशीकर सांगतात.

त्यामुळे निमित्त औरंगजेबाच्या वादाचं असेल आणि त्याच्या निवडणुकीवरच्या निवडणुकीवरच्या परिणामांची शक्यता असली तरीही, पळशीकर म्हणतात त्याप्रमाणे, सामाजिक वातावरण कलुषित होण्यावर आणि त्याला पूर्ववत व्हायला लागणाऱ्या प्रदीर्घ काळाचा गंभीरपणे विचार करायला हवा.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)