भारताचा न्यूझीलंडवर 12 धावांनी विजय, शुबमन गिल ठरला सगळ्यात युवा द्विशतकवीर

फोटो स्रोत, Getty Images
हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला.
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडसमोर 350 धावांचं लक्ष्य ठेवलं.
शुबमन गिलने शानदार द्विशतक झळकावलं.
न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलने 78 चेंडूत 140 धावा केल्या. मात्र न्यूझीलंडला तो विजय मिळवून देऊ शकला नाही. न्यूझीलंडचा डाव 337 धावांवर आटोपला.
शुबमन गिल ठरला युवा द्विशतकवीर
धडाकेबाज युवा सलामीवीर शुबमन गिलने न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद इथे द्विशतक साजरं केलं. लॉकी फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार खेचत शुबमनने द्विशतकाला गवसणी घातली.
वनडेत द्विशतक झळकावणारा शुबमन सगळ्यात लहान वयाचा फलंदाज ठरला.
शुबमनने 149 चेंडूत 19 चौकार आणि 9 षटकारांसह 208 धावांची मॅरेथॉन खेळी केली.
शुबमनच्या खेळाच्या बळावर भारतीय संघाने 349 धावांचा डोंगर उभारला.
हे वनडे क्रिकेटमधलं दहावं वैयक्तिक द्विशतक आहे. वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, इशान किशन यांचा समावेश आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तर तीन द्विशतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिलं द्विशतक झळकावण्याचा मान मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरकडे जातो.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त

फोटो स्रोत, Getty Images
या भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त न्यूझीलंडचा मार्टिन गप्तील, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, पाकिस्तानचा फखर झमान यांनी वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं आहे. इशान किशनने काही दिवसांपूर्वीच (10 डिसेंबर 2022) रोजी बांगलादेशविरुद्ध चत्तोग्राम इथे 210 खेळांची विक्रमी खेळी साकारली होती. वैयक्तिक कारणांमुळे के.एल.राहुल आणि अक्षर पटेल या मालिकेसाठी उपलब्ध नाहीयेत. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्याच्याऐवजी रजत पाटीदारला संघात समाविष्ट करण्यात आलं. काही दिवसांपूर्वीच झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने श्रीलंकेवर निर्भेळ विजय साकारला होता.
कोण आहे शुबमन गिल?

फोटो स्रोत, Getty Images
प्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुभमन गिलच्या रुपात टीम इंडियाच्या चाहत्यांसमोर आहे. 2020 मध्ये बॉक्सिंग डे दिवशी शुभमनने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं होतं. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करत शुभमनने प्रयत्नपूर्वक ही संधी मिळवली आहे.
2018 मध्ये U19 वर्ल्डकप स्पर्धेत शुभमनने सर्वाधिक रन्स करत ‘मॅन ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता. सरळ बॅट, डोकं स्थिर स्थितीत, हाय बॅकलिफ्टसह उंचावर जाणारा कोपरा, उसळत्या चेंडूवर पकड मिळवण्याची खुबी यामुळे शुभमन ज्या संघाकडून खेळतो तिथले प्रशिक्षक, कोचिंग स्टाफ, वरिष्ठ खेळाडू यांचं लक्ष वेधून घेतो.
2018-19 रणजी हंगामात शुभमनने 9 डावात 104च्या सरासरीने 728 धावांची लूट केली. चांगल्या संघांविरुद्धची ही कामगिरी लक्षात घेऊन भारतीय अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघात समाविष्ट करुन घेतलं.
टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगने शुभमनच्या खेळाचं कौतुक केलं होतं. 2019 वर्ल्ड कपनंतर या मुलाला भारतीय संघात घ्यायला हवं असंही युवराज म्हणाला होता.
वर्षभरात शुभमनचं टीम इंडियासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. न्यूझीलंड दौऱ्यात शुभमनने वनडे पदार्पण केलं. त्याच वर्षी शुभमनने भारतीय अ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात धावांची टांकसाळ उघडली आणि मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला. या दौऱ्यात त्याने 204 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली होती.
मायदेशी परतल्यानंतर भारतीय अ संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मुख्य बॅट्समन आणि कर्णधारपद अशा दोन्ही भूमिका शुभमन गिल याने समर्थपणे सांभाळल्या होत्या.
2018 मध्ये आयपीएलमधल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने 1.8 कोटी रुपये खर्चून शुभमनला संघात समाविष्ट केलं. ओपनर आणि भविष्यातील कॅप्टन म्हणून केकेआर संघ शुभमनकडे पाहतो आहे. शुभमननेही सातत्याने चांगल्या खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. 2019 हंगामात शुभमनची इमर्जिंग प्लेयर ऑफ द इअर म्हणून निवड झाली. काही महिन्यांपूर्वी आटोपलेल्या आयपीएलच्या 13व्या हंगामात शुभमनने 440 रन्स केल्या.
सध्या शुबमन गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. तब्बल 8 कोटी रुपये खर्चून गुजरातने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं होतं. शुबमनने संघाचा विश्वास सार्थ ठरवत दमदार कामगिरी केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








