सॅम करन : IPL मध्ये 18 कोटी 50 लाखांची बोली लागलेल्या खेळाडूचा प्रवास जाणून घ्या..

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनसाठी आयपीएल लिलावातली सर्वोच्च बोली लागली. पंजाब किंग्ज संघाने तब्बल 18.50 कोटी रुपये खर्चून सॅमला ताफ्यात समाविष्ट केलं. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सॅमने मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता.
काही दिवसांपूर्वीच ट्वेन्टी20 वर्ल्डकप फायनलनंतर पुरस्कारांची घोषणा झाली. यामध्ये 'मॅन ऑफ द मॅच' आणि 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कारासाठी इंग्लंडच्या सॅम करनची निवड झाली.
फायनलमध्ये आणि संपूर्ण स्पर्धेत सॅमने सातत्यपूर्ण प्रदर्शनासह इंग्लंडच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. सॅम करन कारकीर्दीच्या सुरुवातीपासून भारतीय संघाची डोकेदुखी झाला आहे.
24वर्षीय सॅम करनची जगातल्या सर्वोत्तम प्रतिभाशाली खेळाडूंमध्ये गणना होते. प्रतिस्पर्धी बॅट्समनना अडचणीत टाकणारी बॉलिंग करणारा सॅम उपयुक्त अशी बॅटिंगही करतो.
सॅम उत्तम फिल्डरही आहे. ऑलराऊंडर खेळाडू ही क्रिकेटमध्ये दुर्मीळ जमात आहे. इयन बॉथम, अँड्यू फ्लिनटॉफ, बेन स्टोक्स या ऑलराऊंडर्सच्या मांदियाळीत आता सॅम करनचं नाव घेतलं जात आहे.
24 टेस्ट, 16 वनडे आणि 35 ट्वेन्टी20 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलेल्या सॅम करनची कारकीर्द पाठीच्या गंभीर दुखापतीमुळे धोक्यात आली होती. जवळपास वर्षभर सॅम मैदानापासून दूर राहिला.
जोफ्रा आर्चरच्या अनुपस्थितीत झाला मुख्य बॉलर

फोटो स्रोत, Getty Images
प्रमुख बॉलर जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर असल्याने इंग्लंडची बॉलिंग कमकुवत झाली होती.
आर्चरचा वेग आणि अचूकता प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनची भंबेरी उडवत होती. पण आर्चरची दुखापत गंभीर असल्याने तो यंदाचा वर्ल्डकपही खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. त्यातच ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर इंग्लंडला आणखी एक धक्का बसला. डावखुरा बॉलर रीस टोपलेही दुखापतग्रस्त झाला.
याव्यतिरिक्त मार्क वूडही दुखापतीच्या सावटाखाली असतो. अशावेळी इंग्लंडला हूकमी म्हणता येईल असा बॉलर कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता. ही सगळी कसर सॅम करनने भरुन काढली.
सॅमने संपूर्म स्पर्धेत तब्बल 18 विकेट्स पटकावत प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्स अर्थात हाणामारीच्या ओव्हर्समध्ये रन्स रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या सॅमने समर्थपणे सांभाळल्या.
इंग्लंडचा नवा कर्णधार जोस बटलरसाठी संकटसमयी सॅम तारणहार ठरला. फसवे स्लोअरवन, घोटीव यॉर्कर, बॅट्समनच्या शरीराचा वेध घेणारा आखूड टप्प्याचा उसळता चेंडू अशी विविध अस्त्रं सॅमने परजली.
वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अफगाणिस्तानविरुद्ध पर्थ इथे झालेल्या लढतीत सॅमने 5 विकेट्स पटकावण्याची करामत केली.
फायनलसारख्या महत्त्वपूर्ण लढतीत सॅमने पाकिस्तानचा प्रमुख बॅट्समन मोहम्मद रिझवानला त्रिफळाचीत केलं.
उत्तम तंत्रकौशल्य असणारा शान मसूद आणि जोरदार फटकेबाजी करणारा मोहम्मद नवाझ यांना तंबूत परतावताना 12 रन्सच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या.
भारताविरुद्धच्या मालिकेत ठरला होता मालिकावीर

फोटो स्रोत, Getty Images
पदार्पणानंतर सॅम करन भारताविरुद्ध मालिका खेळला. इंग्लंडमध्ये झालेल्या या मालिकेत इंग्लंडच्या प्रमुख बॅट्समनना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही पण प्रत्येकवेळी सॅम करन धावून आला.
आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊनही सॅमने चिवटपणे खेळी करत भारतीय संघाला जेरीस आणलं. बॅटिंगनंतर बॉलिंग करतानाही सॅमने भारताच्या बॅट्समनना अडचणीत टाकलं होतं.
डावखुऱ्या सॅमची बॉलिंग खेळताना भारतीय बॅट्समन अडखळत असल्याचं स्पष्ट झालं होतं. या मालिकेदरम्यान सॅमने आपल्या दर्जेदार फिल्डिंगची झलकही अनेकदा सादर केली.
बर्मिंगहॅम टेस्टमध्ये सॅमने 24 आणि 63 रन्सची खेळी केली. बॉलिंग करताना 5 विकेट्स काढल्या. लॉर्ड्स टेस्टमध्ये त्याने 40 धावांचं योगदान दिलं. बॉलिंग करताना त्याने एक विकेट मिळवली. साऊदॅम्पटन टेस्टमध्ये त्याने 78 आणि 46 रन्सच्या महत्त्वपूर्ण खेळी केल्या. बॅटिंगमध्ये योगदान दिल्यानंतर सॅमने 2 विकेट्सही काढल्या. ओव्हल टेस्टमध्ये त्याने 21 रन्स केल्या आणि 3 विकेट्स पटकावल्या. या मालिकेतल्या सगळ्या टेस्टमध्ये भारतीय संघाने पकड मिळवली होती पण सॅम अडथळा बनून उभा राहिला. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सॅमला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.
पहिल्याच मालिकेत एवढा मोठा पुरस्कार मिळवूनही सॅमचे शब्द परिपक्वतेचं द्योतक होते. सॅम म्हणाला होता, "संघ अडचणीत असताना चांगल्या खेळी करता आल्या याचं समाधान आहे. 4-1 अशा मालिकाविजयासह कर्णधार अलिस्टर कुकला विजयी निरोप देता आलं याचा प्रचंड आनंद आहे. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड यांना पाहत मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्याबरोबर खेळण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं. यापुढे कामगिरीत सातत्य ठेवणं हेच माझं उद्दिष्ट असेल. मला फार पुढचा विचार करायचा नाहीये ."
दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता गेल्या वर्षीचा वर्ल्डकप
पाठीच्या दुखण्यामुळे सॅम करन गेल्या वर्षीच्या युएईत झालेल्या वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नव्हता. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना सॅम दुखापतग्रस्त झाला होता.
इंग्लंडला वर्ल्डकपदरम्यान सॅमची उणीव प्रकर्षाने जाणवली.
किंग्स इलेव्हन पंजाबसाठी घेतली होती हॅट्रिक
सॅमचा सर्वसमावेशक खेळ पाहून 2018 मध्ये आयपीएलमधल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने त्याला 7.20 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं.
सॅम पंजाबसाठी दोन हंगाम खेळला. 2019 हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळताना सॅमने हॅट्रिक घेतली.
दिल्लीच्या हर्षल पटेल, कागिसो रबाडा आणि संदीप लमाचीने या तिघांना तंबूत परतावत सॅमने हॅट्रिक घेतली होती. पंजाबला सॅमचं महत्त्व कळलं नाही आणि 2020 मध्ये त्यांनी सॅमला रिलीज केलं.
युवराज सिंग, अक्षर पटेल यांच्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी हॅट्ट्रिक घेणारा केवळ तिसरा खेळाडू ठरला.
धोनीचा विश्वासू साथीदार
पंजाबने जे गमावलं ते चेन्नईने कमावलं. चेन्नईने 5.5 कोटी रुपये खर्चून सॅमला संघात समाविष्ट केलं.
पॉवरप्लेमध्ये आणि हाणामारीच्या ओव्हर्समध्ये बॉलिंग, अफलातून फिल्डर आणि संघाला जिथे गरज असेल त्या क्रमांकावर बॅटिंग करण्याची क्षमता यामुळे चेन्नईसाठी सॅम अतिशय उपयुक्त होता. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा तो विश्वासू साथीदार झाला.
कर्णधार धोनीने सॅमला सलामीला पाठवण्याचा प्रयोगही केला. सॅमने स्फोटक खेळी करत संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवला.
क्रिकेटचे बाळकडू घरातूनच
सॅमला क्रिकेटचे बाळकडून घरातूनच मिळाले आहेत. सॅमचे बाबा केव्हिन करन हेही क्रिकेटपटू होते. त्यांनी 11 वनडेत झिम्बाब्वेचं प्रतिनिधित्व केलं. केव्हिन यांची तीन मुलं सॅम, टॉम आणि बेन हे तिघेही क्रिकेट खेळतात. टॉमने 2 टेस्ट, 28 वनडे आणि 30 ट्वेन्टी20 सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. बेन इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये नॉर्दम्पटनशायर संघासाठी खेळतो.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








