बेन स्टोक्स : दोन वर्ल्डकप जिंकवून देणारा स्टोक्स आता धोनीसोबत खेळणार

बेन स्टोक्स, इंग्लंड, पाकिस्तान, ट्वेन्टी20 वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेन स्टोक्स
    • Author, पराग फाटक
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

महेंद्रसिंग धोनी आणि बेन स्टोक्स हे दोन दिग्गज खेळाडू एकाच संघासाठी खेळताना पाहण्याची संधी क्रिकेटचाहत्यांना मिळणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सने तब्बल 16.25 कोटी रुपये खर्चत स्टोक्सला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं.

जाणून घेऊया बेन स्टोक्सचा आजवरचा प्रवास...

कठीण समय येता कोण कामास येतो? या प्रश्नावर इंग्लंड क्रिकेट संघाकडे एक रामबाण उत्तर आहे. ते उत्तर म्हणजे - बेन स्टोक्स.

ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या फायनलच्या लढतीत स्टोक्सने नाबाद अर्धशतकी खेळी करत इंग्लंडच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं.

साधारण दीड वर्ष बेन स्टोक्स इंग्लंडच्या ट्वेन्टी20 संघापासून दूर होता. या काळात त्याने वनडेतून निवृत्त होण्याचा निर्णयही घेतला.

बटलरच्या नेतृत्वातील इंग्लंड संघात स्टोक्सला स्थान आहे का असे प्रश्नही विचारण्यात आले. बटलर हा महान खेळाडू आहे, त्याच्या फॉर्मबाबत चिंता नाही असं उत्तर बटलरने सांगितलं.

दडपणाच्या फायनलमध्ये स्टोक्सने संयमाने खेळत संघाला विजय मिळवून दिला.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ठिकाण-कोलकाताचं इडन गार्डन्स. निमित्त ट्वेन्टी-20 वर्ल्डकपची फायनल. तारीख 3 एप्रिल 2016.

वेस्ट इंडिजने थरारक पद्धतीने फायनल जिंकली परंतु रडवेल्या चेहऱ्याचा, घामाने निथळलेला, उष्णतेने लालबुंद झालेला बेन स्टोक्सचा चेहरा चाहत्यांच्या मनात कोरला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये जे घडलं त्यावर विश्वास बसणं कठीण होतं.

इंग्लंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 155 रन्स केल्या. ट्वेन्टी-20 मध्ये हे टार्गेट अवघड नव्हतं. परंतु वेस्ट इंडिजच्या सातत्याने विकेट्स जात होत्या. मार्लन सॅम्युअल्स एकट्याने खिंड लढवत होता. शेवटी त्याच्या साथीला कार्लोस ब्रेथवेट आला. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 19 असं समीकरण झालं. कठीण होतं. इंग्लंडचा कॅप्टन आयोन मॉर्गनने बेन स्टोक्सकडे बॉल सोपवला. धावा रोखणं आणि विकेट्स काढण्यात माहीर स्टोक्स मॅच जिंकून देईल असा विश्वास इंग्लंड संघाला होता. मात्र जे घडलं ते इंग्लंडसाठी विपरीत. 4 चेंडूत 4 सिक्सेस मारून ब्रेथवेटने अविश्वसनीय पद्धतीने वेस्ट इंडिजला वर्ल्ड कप जिंकून दिला.

ब्रेथवेट आणि वेस्ट इंडिजचं सेलिब्रेशन जोशात सुरू असताना स्टोक्स डोक्याला हात लावून बसला होता. गुडघ्यात डोकं घातलेला स्टोक्स सांत्वन करण्याच्या पलीकडे गेला होता. खेळात पराभव होतात परंतु ब्रेथवेटच्या षटकारांनी स्टोक्सच्या आत्मविश्वासावर वर्मी घाव बसला होता.

बेन स्टोक्स

फोटो स्रोत, Getty Images

ठिकाण-लॉर्ड्स, क्रिकेटची पंढरी. निमित्त- 50 ओव्हर वर्ल्ड कप फायनल

जगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडवर पहिलंवहिलं जेतेपद मिळवण्याचं दडपण होतं. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 241 रन्स केल्या. इंग्लंडने दबावाखाली सातत्याने विकेट्स गमावल्या. बेन स्टोक्सने खिंड लढवली. तो मॅच जिंकून देणार असं चित्र होतं मात्र मॅच टाय झाली. स्टोक्सने 84 रन्स केल्या. पराभव दिसत असताना, सहकारी आऊट होत असताना स्टोक्सने किल्ला लढवत इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या. सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 15पैकी 8 रन्स स्टोक्सनेच काढल्या होत्या. नाट्यमय अशा फायनलचा स्टोक्स 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.

बेन स्टोक्स, इंग्लंड, पाकिस्तान, ट्वेन्टी20 वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेन स्टोक्स

किमयागार स्टोक्स

भात्यात सगळ्या प्रकारचे फटके असणारा आणि योग्यवेळी ते मारता येणं हे स्टोक्सच्या बॅटिंगचं गुणवैशिष्ट्य. डावखुऱ्या बॅट्समनच्या शैलीत नजाकत असते. स्टोक्सच्या बॅटिंगमध्ये बेडर रांगडेपणा आहे. भागीदाऱ्या रचणं, तळाच्या बॅट्समनबरोबर खेळणं, एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा मेळ घालणं यात स्टोक्स माहीर आहे. स्टोक्स बॉलिंग करतो. त्याच्याकडे सुसाट वेग नाही, फार स्विंगही करत नाही. परंतु बॅट्समनला फसवण्यात स्टोक्स वाकबगार आहे. भागीदारी तोडण्यात तो निष्णात आहे. बॅक ऑफ द हॅड, रिपर, स्लोअर वन यांच्याबरोबरीने बॅट्समनच्या छाताडावर जाणारा बाऊन्सर सोडणारा स्टोक्स धोकादायक आहे.

स्टोक्सची फिल्डिंग इंग्लंडसाठी अनेकदा किमयागार ठरली आहे. बॅटिंग-बॉलिंगच्या इतकाच फिल्डिंगचा सराव करणारा स्टोक्स दुर्मीळ खेळाडू आहे. अफलातून कॅचेस, भन्नाट रनआऊट्स अशी स्टोक्सची खासियत आहे. ऑलराऊंडर कसा असावा याची व्याख्या जॅक कॅलिस, अड्रयू फ्लिनटॉफ यांनी करून दिली. असा खेळाडू जो संघात निव्वळ बॅट्समन म्हणून किंवा विशेषज्ञ बॉलर म्हणून खेळू शकतो तो ऑलराऊंडर. स्टोक्स या व्याख्येचा लाईव्ह डेमो आहे. कॉमेंटेटर स्टोक्सला इम्पॅक्ट प्लेयर म्हणतात. संघात असला की बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मॅचवर तो छाप उमटवतो. स्टोक्स चांगलं खेळला की इंग्लंड जिंकतं असं आकडेवारी सांगते. टेस्ट-वनडे-ट्वेन्टी-20 सगळ्या फॉरमॅटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करणारा स्टोक्स जगातल्या कोणत्याही संघात फक्त बॉलर किंवा केवळ बॅट्समन म्हणून स्थान मिळवू शकतो.

वादग्रस्त स्टोक्स

बेन स्टोक्स, इंग्लंड, पाकिस्तान, ट्वेन्टी20 वर्ल्डकप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बेन स्टोक्स

ठिकाण- इंग्लंडमधल्या ब्रिस्टल इथला नाईटक्लब. निमित्त- वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाचं सेलिब्रेशन. तारीख-24 सप्टेंबर 2017 ची रात्र हा दिवस बेन स्टोक्स कधीच विसरू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धची तिसरी वनडे जिंकल्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी स्टोक्स सहकारी अलेक्स हेल्ससह नाईटक्लबमध्ये पोहोचला. सेलिब्रेशन राहिलं बाजूला, त्या उत्तररात्री जे घडलं त्याने स्टोक्सच्या आणि पर्यायाने इंग्लंड क्रिकेटच्या प्रतिमेला तडा गेला. नाईटक्लबच्या बाहेर स्टोक्स आणि अन्य काही जणांमध्ये बाचाबाची झाली. त्याचं रुपांतर मारामारीत झालं. दोनजणांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी स्टोक्सला अटक करण्यात आली. याप्रकरणात स्टोक्सच्या हातालाही जखम झाली. त्या घटनेपासून पुढचं वर्ष स्टोक्सच्या आयुष्यातलं काळोखं पर्व ठरलं. या घटनेचे काही व्हीडिओ रिलिज झाले. केटी पीअर्स यांच्या दिव्यांग मुलाची नक्कल त्यानं केल्याचं उघड झालं. स्टोक्सने ट्वीटरच्या माध्यमातून यासाठी माफी मागितली. हे सगळं प्रकरण कोर्टात गेलं. वर्षभर खटला चालला, स्टोक्सचं क्रिकेट मागं पडलं. नाईटक्लबबाहेर दोन गे मुलांची दोन अन्य मुलं चेष्टा करत होते. गे मुलांना उद्देशून त्यांनी आक्षेपार्ह शब्दांचा प्रयोग केला. असं करणाऱ्या त्या मुलांच्या हातात बाटल्या होत्या. स्टोक्सने त्यांना असं वागू नका सांगितलं. मात्र त्यांचा उच्छाद कमी झाला नाही. हेल्सने स्टोक्सला यात पडू नकोस असं सांगितलं परंतु प्रकरण वाढत गेलं. ती मुलं आक्रमक झाल्यानंतर स्टोक्सने स्वसंरक्षणासाठी त्यांना चोप दिला. स्टोक्सच्या माराने त्यातला एकजण बेशुद्ध झाला. कोर्टात स्टोक्स दोषी नसल्याचं सिद्ध झालं. मात्र याप्रकरणाने स्टोक्स आणि इंग्लंड क्रिकेटची नाचक्की झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला 30,000 पौंडाचा दंड केला. स्टोक्सला जामीन मिळाला मात्र त्या सीरिजमधून त्याला वगळण्यात आलं. इंग्लंडसाठी अशेस मालिका म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा. परंतु अशा वर्तनामुळे स्टोक्सची अशेससाठी निवड करण्यात आली नाही. स्टोक्सकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आलं. त्याने वैयक्तिक स्पॉन्सरशिपही गमावली.

मारहाणीच्या प्रसंगाने बेन स्टोक्स बॅड बॉय झाला होता. आधीची काही प्रकरणंही त्याला कारणीभूत ठरली. 2011 मध्ये डरहॅममध्ये दारू पिऊन गाडी चालवताना पोलिसांनी त्याला अटक केली होती. 2013 मध्ये दारु पिण्याबाबतच्या संघाने ठरवलेल्या नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्याला ऑस्ट्रेलियातून परत पाठवण्यात आलं होतं. वर्षभरात वेस्ट इंडिजमध्ये खेळत असताना पहिल्या बॉलवर रनआऊट झाल्याने स्टोक्सने रागाने ड्रेसिंग रुममधला लॉकर तोडला होता. यात तोही जखमी झाला होता. वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युअल्सशी स्टोक्सची वादावादी झाली होती. 2016 मध्ये वेगात गाडी चालवल्याबद्दल चारवेळा त्याला ताकीद देण्यात आली. बांगलादेशच्या सब्बीर रहमानसह झालेल्या वादावादीमुळे त्याच्या मानधनातून 15 टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती. इंग्लंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर असताना मैदानात भारतीय खेळाडू आणि स्टोक्स यांच्यात शाब्दिक चकमकी पाहायला मिळाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)