अॅलेक्स हेल्स: ड्रग्ज टेस्टमध्ये दोषी, दोन वर्ल्डकप बाहेर, अपघाताने संधी मिळाली आणि...

फोटो स्रोत, Getty Images
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
कारकीर्दीत रोलरकोस्टर राईड पाहिलेल्या अॅलेक्स हेल्ससाठी हा वर्ल्डकप खरोखरच महत्त्वाचा आहे. कारण याआधीचे दोन वर्ल्डकप त्याला मैदानाबाहेरच्या कृत्यांमुळे बाहेर बसावं लागलं होतं.
“वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये संघाच्या विजयात योगदान देणारी खेळी हा माझ्यासाठी हा खूपच मोठा क्षण आहे. मी ज्या पद्धतीने खेळलो ते माझ्यासाठी सुखावह होतं. अॅडलेड हे बॅटिंगसाठी जगातल्या सर्वोत्तम मैदानांपैकी एक आहे.
दोन्ही दिशांच्या बाऊंड्री लहान असल्याने फटके मारायला मजा येते. या मैदानावर खेळण्याच्या माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत. वर्ल्डकपमध्ये मी पुन्हा कधी खेळू शकेन असं वाटलंच नाही. मला या वर्ल्डकपमध्ये खेळायची संधी मिळाली आणि सेमी फायनलसारख्या महत्त्वपूर्ण लढतीत मोठी खेळी करता आली याचं समाधान आहे. ऑस्ट्रेलियात खेळायला मजा येते."
या भावना आहेत भारताविरुद्धच्या सेमी फायनलच्या लढतीत सामनावीर ठरलेला अलेक्स हेल्स याच्या.

फोटो स्रोत, Getty Images
मनमुराद आक्रमक शैलीसाठी हेल्स ओळखला जातो. अॅलेक्सचे बाबाही क्रिकेट खेळायचे. स्थानिक स्पर्धांमध्ये हेल्सच्या बॅटचा तडाखा अनेक बॉलर्सनी अनुभवला. 2005 मध्ये हेल्सचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलं जेव्हा त्याने एका ओव्हरमध्ये 55 चोपून काढल्या. तीन नोबॉलचा समावेश असलेल्या या ओव्हरमध्ये हेल्सने 8 सिक्स आणि एक फोर लगावला.
नॉटिंघमशायर संघासाठी खेळताना हेल्सने सातत्याने चांगली कामगिरी केल्याने इंग्लंडच्या निवडसमितीने त्याची दखल घेतली. 2015 मध्ये इंग्लंडमधल्या स्थानिक ट्वेन्टी20 स्पर्धेत हेल्सने 86 रन्सची खेळी केली, यामध्ये दोन ओव्हर्समध्ये 6 सिक्स लगावले. 2017मध्ये हेल्सने 30 बॉलमध्ये 95 रन्सची अविश्वसनीय खेळी केली.
2011 मध्ये हेल्सने इंग्लंडसाठी ट्वेन्टी20 पदार्पण केलं. दुसऱ्याच लढतीत हेल्सने नाबाद 62 रन्सची खेळी केली. पाचव्या सामन्यात वेस्टइंडिजविरुद्ध खेळताना हेल्सचं शतक अवघ्या एका रनने हुकलं. 2014 मध्ये हेल्सने ही कसर भरून काढली. श्रीलंकेविरुद्ध चट्टोग्राम इथे खेळताना हेल्सने 64 बॉलमध्ये 11फोर आणि 6 सिक्सेससह नाबाद 116 रन्सची खेळी केली.
याच वर्षी हेल्सने इंग्लंडसाठी वनडे पदार्पणही केलं. त्यावर्षी हेल्सला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पण 2015 मध्ये हेल्सने पाकिस्तानविरुद्ध अबू धाबी इथे 109 धावांची शतकी खेळी साकारली. सुरुवातीला ट्वेन्टी20 प्रकारासाठीच योग्य समजल्या गेलेल्या हेल्सने वनडेतही आपल्या बॅटचा हिसका प्रतिस्पर्ध्यांना दाखवला.
याचा परिणाम म्हणजे इंग्लंडच्या निवडसमितीने हेल्सला 2015 मध्ये टेस्ट प्रकारात खेळण्याचीही संधी दिली. मात्र वनडे आणि ट्वेन्टी20 प्रकारात त्याने जे यश मिळवलं त्याची पुनरावृत्ती टेस्टमध्ये करुन दाखवता आली नाही. 2 वर्षात हेल्स 11 टेस्ट खेळला मात्र त्याचं अव्हरेज तिशीतच राहिलं.
त्याने 5 अर्धशतकं झळकावली पण एकही शतक झळकावू शकला नाही. चांगल्या बॉलिंगसमोर, जिवंत खेळट्टीवर हेल्सला खेळणं कठीण होत असल्याचं स्पष्ट झालं.

फोटो स्रोत, Getty Images
तंत्रकौशल्य वाखाणण्यासारखं नसलं तरी अवघ्या काही ओव्हर्समध्ये सामन्याचं चित्र पालटवण्याची क्षमता हेल्सकडे असल्याने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि नंतर सनरायझर्स हैदराबादने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. मात्र दोन्ही संघांचा तो अविभाज्य घटक होऊ शकला नाही.
2019 वर्ल्डकपचं आयोजन इंग्लंडमध्ये होतं. साहजिकच इंग्लंडच्या संघात कोण असणार याविषयी उत्सुकता होती. संघाची घोषणा झाली. सलामीवीर म्हणून अलेक्स हेल्सला संधी मिळाली. पण अवघ्या 2 दिवसात हेल्सने डोमेस्टिक क्रिकेटमधल्या एका सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं.
नॉटिंघमशायर संघाने हेल्स कधी परतेल याविषयी काहीही स्पष्ट केलं नाही. काही दिवसातच हेल्स ड्रग्ज चाचणीत दोषी आढळल्याचं स्पष्ट झालं आणि खळबळ उडाली.

फोटो स्रोत, Getty Images
वर्ल्डकप संघातील खेळाडूच अशा पद्धतीने नियमबाह्य गोष्टीत अडकल्याने इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण झालं. याची परिणती म्हणजे हेल्सवर 21 दिवसांची बंदी घातली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकप संघातून हेल्सला डच्चू दिला.
इंग्लंड संघाचा कर्णधार आयोन मॉर्गन आणि हेल्स यांच्यात बेबनाव असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. हेल्सने संघाचा विश्वास गमावला असं मॉर्गन म्हणाला होता. हेल्ससारखा धडाकेबाज सलामीवीर गमावल्याने इंग्लंडला रणनीतीत बदल करावा लागला. हेल्सऐवजी जेसन रॉयला संधी देण्यात आली.
हेल्ससाठी दुर्देवाचा फेरा सुरूच राहिला आणि 2021 ट्वेन्टी20 वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.
ट्वेन्टी20 वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यासाठी निवडसमितीने हेल्सला संघात समाविष्ट करत चाहत्यांना धक्का दिला. धडाकेबाज बॅट्समन जॉनी बेअरस्टो दुखापतग्रस्त झाल्याने हेल्सच्या नावाचा विचार करण्यात आला.
मॉर्गनने निवृत्ती स्वीकारल्याने इंग्लंडच्या कर्णधारपदाची धुरा जोस बटलरकडे देण्यात आली. बटलर दुखापतग्रस्त असल्याने मोईन अली संघाचा कर्णधार झाला. नवा कर्णधार, नवा कोच आणि नवा विचार या अंतर्गत हेल्सला पाकिस्तान दौऱ्यात अंतिम अकरातही संधी देण्यात आली.
तीन वर्षानंतर संघात परतलेल्या हेल्सने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. हेल्सने या मालिकेतल्या 6 सामन्यात 130 रन्स केल्या. पण या कामगिरीवर त्याची वर्ल्डकपध्ये निवड होणं शक्य नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
यंदाच्या वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघाची घोषणा झाली. तडाखेबंद सलामीवीर जॉनी बेअरस्टो गोल्फ कोर्सवर झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. पर्यायी सलामीवीर जेसन रॉयला समाधानकारक कामगिरी करण्यात न आल्याने संघातून डच्चू देण्यात आला होता. अखेर निवडसमितीने हेल्सच्या नावाचा समावेश केला.
अपघाताने संधी मिळालेल्या हेल्सने या संधीचं सोनं केलं. अफगाणिस्तान आणि आयर्लंडविरुद्ध हेल्सला मोठी खेळी करता आली नाही पण इंग्लंडच्या निवडसमितीने हेल्सवर विश्वास ठेवला. हेल्सने हा विश्वास सार्थ ठरवत न्यूझीलंडविरुद्ध 52 रन्सची खेळी केली. श्रीलंकेविरुद्ध त्याचं अर्धशतक तीन रन्सने हुकलं. त्याची कसर भारताविरुद्ध भरून काढत हेल्सने 47 बॉलमध्ये 4 फोर आणि 7 सिक्ससह नाबाद 86 रन्सची स्फोटक खेळी केली.
रविवारी होणाऱ्या फायनलमध्येही पाकिस्तान संघासाठी हेल्स डोकेदुखी ठरू शकतो.
बिग बॅशमध्ये खेळणं फायद्याचं
ड्रग्ज चाचणीत दोषी आढळल्याने हेल्स इंग्लंड निवडसमितीच्या योजनांमधून बाहेर गेला असला तरी जगभरातील ट्वेन्टी20 लीगमध्ये तो नियमितपणे खेळत होता.
आयपीएलच्या धर्तीवर ऑस्ट्रेलियात बिग बॅश स्पर्धा खेळवण्यात येते.
हेल्स बिग स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स, अडलेड स्ट्रायकर्स, होबार्ट हरिकेन्स, सिडनी थंडर अशा चार संघांसाठी खेळला आहे.
बिग बॅश स्पर्धेत नियमितपणे खेळत असल्याने ऑस्ट्रेलियात खेळण्याचा पुरेसा अनुभव हेल्सकडे होता. त्याचा पुरेपूर फायदा हेल्सने उठवला. ऑस्ट्रेलियातील मैदानांचा आकार, वातावरण याची सखोल जाण हेल्सच्या खेळात जाणवली.

फोटो स्रोत, Getty Images
मॉर्गनकडे दुर्लक्ष
इंग्लंडचा माजी कर्णधार आयोन मॉर्गनचा हेल्सप्रति विश्वास नसल्याचं स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी सामन्यानंतर बोलताना निवेदिका, हेल्स आणि मॉर्गन असे तिघेजण बोलत होते.
मॉर्गन हेल्सच्या अगदी बाजूला उभा होता. निवेदिकेच्या प्रश्नानंतर हेल्सने तिच्याकडे बघून प्रश्नाचं उत्तर दिलं पण एकदाही मॉर्गनकडे पाहिलं नाही.
हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हेल्सने खुलेपणाने टीका करणं टाळत न बोलता मॉर्गनला प्रत्युत्तर दिलं होतं.
वर्ल्डकप सेमीफायनलसारख्या महत्त्वपूर्ण लढतीत 86 रन्सची निर्णायक खेळी करत हेल्सने मॉर्गन आणि पर्यायाने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








