SA vs Ned: पाऊस, नशीब आणि दक्षिण आफ्रिकेचा घात

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, श्रीलंका, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Gallo Images

फोटो कॅप्शन, दक्षिण आफ्रिकेच्या मार्गातील अडथळा

रविवारी सकाळी दक्षिण आफ्रिका-नेदरलँड्स सामना सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ जेतेपदाचा दावेदार होता. अवघ्या तीन तासात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंवर मायदेशी परतण्याची वेळ आली.

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमवत सनसनाटी विजयाची नोंद केली. नेदरलँड्सच्या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचं सेमी फायनलचं आव्हान संपुष्टात तर आलंच पण त्याचबरोबर ते स्पर्धेतूनही बाहेर पडले.

पाऊस आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ यांचं नातं विळ्याभोपळ्याचं आहे. मोक्याच्या क्षणी कच खाणारा संघ अर्थात चोकर्स अशी त्यांची हेटाळणी केली जाते. पण पाऊस दक्षिण आफ्रिकेच्या मार्गात कसा खोडा घालतो हे अनेकदा समोर येत नाही.

विरुद्ध झिम्बाब्वे, 24 ऑक्टोबर, 2022 होबार्ट

झिम्बाब्वेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती. पावसाने सातत्याने बाधा आणलेल्या त्या मॅचमध्ये झिम्बाब्वेने 9 ओव्हर्समध्ये 79 रन्सची मजल मारली. आफ्रिकेने क्विंटन डी कॉकच्या वादळी खेळीच्या बळावर 3 ओव्हर्समध्येच बिनबाद 51 अशी सुरुवात केली होती. आफ्रिकेचा विजय स्पष्ट दिसत असताना पुन्हा पाऊस आला.

निकालासाठी ठराविक ओव्हर्सचा खेळ पूर्ण होणं आवश्यक असतं. आणखी एक ओव्हर खरंतर बॉल जरी पडला असता तरी आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आलं असतं. पण मॅच रद्द झाली आणि दोन्ही संघांना एकेक गुण मिळाला. या मॅचमध्ये विजय मिळाला असता तर दक्षिण आफ्रिकेसाठी चित्र वेगळं असतं.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, श्रीलंका, वर्ल्डकप

फोटो स्रोत, DAVID GRAY

फोटो कॅप्शन, पावसामुळे झिम्बाब्वेची लढत रद्द करण्यात आली.

डकवर्थ लुईस प्रणालीनुसार पाचव्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची जी धावसंख्या असणं अपेक्षित होतं ती त्यांनी तिसऱ्या ओव्हरमध्येच गाठली होती. पण मॅचच्या निकालासाठी पाच ओव्हरचा खेळ आवश्यक असल्याचा कौल अंपायर्सनी दिला.

विरुद्ध श्रीलंका, 3 मार्च 2003, डरबान (वर्ल्कप 2003)

श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. ओपनर मर्वन अट्टापटूने 124 रन्सची सुरेख खेळी साकारली. त्याने 18 चौकारांसह श्रीलंकेच्या डावाला आकार दिला. अरविंदा डिसिल्व्हाने 73 रन्सची खेळी करत अट्टापटूला चांगली साथ दिली. या दोघांचा अपवाद सोडला तर श्रीलंकेच्या एकाही बाकी बॅट्समनला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेनं 268 रन्स केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे जॅक कॅलिसने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अँड्यू हॉलने 2 विकेट्स घेतल्या.

या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना ग्रॅमी स्मिथ आणि हर्षेल गिब्स यांनी 65 रन्सची सलामी दिली. स्मिथ 35 रन्स करून माघारी परतला. गॅरी कर्स्टन, जॅक कॅलिस आणि बोएटा डिप्पेनार कोणीही मोठी खेळू करू शकले नाहीत. 73 रन्सची संयमी खेळी करून हर्षेल गिब्स तंबूत परतला.

कर्णधार शॉन पोलॉकने 25 रन्स केल्या. 45 ओव्हर्समध्ये 229/5 अशी दक्षिण आफ्रिकेची स्थिती होती. पुढच्या 30 बॉलमध्ये त्यांना 40 रन्सची आवश्यकता होती. वनडे क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून ओळखले जाणारे मार्क बाऊचर आणि लान्स क्लुसनर मैदानात होते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड होतं. पावसाचं आगमन झालं.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, श्रीलंका, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Shaun Botterill

फोटो कॅप्शन, पाऊस आला आणि...

पावसाचा जोर वाढत गेल्याने डकवर्थ लुईस प्रणाली लागू झाली. पावसाचा जोर वाढल्याने मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. डकवर्थ लुईस प्रणालीनुसार दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर श्रीलंकेच्या स्कोरएवढाच झाला. ही मॅच टाय स्थितीत रद्द करण्यात आली. दोन्ही संघांना गुण विभागून देण्यात आले.

गुण विभागून देण्यात आल्यामुळे यजमान दक्षिण आफ्रिकेचे 6 सामन्यात 14 गुण झाले. त्यामुळे यजमानांवर प्राथमिक फेरीत गारद होण्याची नामुष्की ओढवली.

विरुद्ध इंग्लंड, 22 मार्च 1992, सिडनी (वर्ल्डकप 1992)

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सेमी फायनलच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने 252 रन्सची मजल मारली. ग्रॅमी हिकने 9 फोरसह 83 रन्सची खेळी केली. अलेक स्टुअर्ट (33), नील फेअरब्रदर (28), डरमॉट रीव्ह (25) यांनी उपयुक्त खेळी केल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे अलन डोनाल्ड, मेरिक प्रिंगल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने कर्णधार केपलर वेसल्सला 26 रन्सवर गमावलं. त्याने 17 रन्स केल्या. पीटर कर्स्टन 11 रन्स करून आऊट झाला. अँड्यू हडसनने 46 रन्सची खेळी करत विजयासाठी पायाभरणी केली. अड्रियन कुपरने 36 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. हॅन्सी क्रोनिएने 24 रन्स केल्या. अफलातून फिल्डिंचा बादशहा असं वर्णन होणाऱ्या जाँटी ऱ्होड्सने 38 बॉलमध्ये 43 रन्सची खेळी केली.

दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, इंग्लंड, श्रीलंका, वर्ल्डकप

फोटो स्रोत, Social media

फोटो कॅप्शन, 1992 वर्ल्डकपमधील दृश्य

ऑलराऊंडर ब्रायन मॅकमिलन आणि डेव्हिड रिचर्डसन संघाला विजयाच्या पैलतीरी नेणार असं वाटत असतानाच पावसाचं आगमन झालं. दोन्ही संघ ड्रेसिंगरुममध्ये परतले तेव्हा दक्षिण आफ्रिकेला 13 बॉलमध्ये 22 रन्सची आवश्यकता होती. पाऊस बराच वेळ सुरू राहिल्याने लक्ष्य बदलण्यात आलं. डकवर्थ लुईस प्रणाली तेव्हा नवीन होती. दक्षिण आफ्रिकेचे बॅट्समन मैदानात उतरले तेव्हा लक्ष्य 1 बॉल 22 असं अशक्यप्राय झालं. मैदानातल्या जायंट स्क्रीनवर हे लक्ष्य अवतरल्याचा फोटो आजही क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहे.

इंग्लंडने 19 रन्सने जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं आणि त्यांनी फायनलमध्ये धडक मारली. ग्रॅमी हिकला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. वर्ल्डकप सेमीफायनलसारख्या मोठ्या व्यासपीठावर लक्ष्य आवाक्यात आलेलं असताना पावसाने आफ्रिकेच्या नशिबावर पाणी फेरलं.

ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेची कामगिरी

  • 2007-दुसरी फेरी
  • 2009-सेमी फायनल
  • 2010-दुसरी फेरी
  • 2012-दुसरी फेरी
  • 2014- सेमी फायनल
  • 2016-दुसरी फेरी
  • 2021- दुसरी फेरी
  • 2022- दुसरी फेरी

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)