ट्वेन्टी 20 वर्ल्डकप : जेव्हा झिम्बाब्वेनं वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला होता...

फोटो स्रोत, Phil Cole
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेनं पाकिस्तानला हरवलं आणि भारतीय चाहत्यांमध्ये जल्लोषाची लाट उमटली.
कारण साहजिक होतं. भारताने सलामीच्या लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला हरवलं. पाठोपाठ झिम्बाब्वेने नमवल्यामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनलच्या आशा मावळत चालल्या आहेत.
सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानला आता उर्वरित सगळ्या लढती जिंकाव्या लागतील आणि अन्य गणितीय समीकरणांवर अवलंबून असावं लागेल.
भारताविरुद्धच्या पराभवातून पाकिस्तानचा संघ सावरलेला नाही हे झिम्बाब्वेविरुद्ध दिसून आलं. पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्याचवेळी झिमाब्ब्वेने अतिशय दर्जेदार खेळ करत पाकिस्तानला चीतपट केलं.
पाकिस्तानची सेमी फायनलची वाट झिम्बाब्वेने खडतर केल्यामुळे भारतीय चाहते अतिशय खूश आहेत. मात्र झिम्बाब्वेने वर्ल्डकप स्पर्धेत आपल्यालाही दणका दिलेला आहे हे विसरून चालणार नाही.
थोडं मागे जाऊया. वर्ल्डकप 1999. ठिकाण लिस्टरचं मैदान. वडिलांच्या निधनामुळे सचिन तेंडुलकर मायदेशी परतला होता.
भारताने ढगाळलेल्या वातावरणात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. वीस वर्षांपूर्वी वनडेत घाऊक रन्स होत नसत. झिम्बाब्वेनं 252 रन्सची मजल मारली. अँडी फ्लॉवरने नाबाद 68 रन्सची खेळी केली. ग्रँट फ्लॉवरने 45 रन्स करत त्याला चांगली साथ दिली. फ्लॉवर बंधू सोडले तर बाकी बॅट्समनना मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

फोटो स्रोत, Ross Kinnaird
भारतातर्फे जवागल श्रीनाथ, वेंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे यांनी प्रत्येक दोन तर अजित आगरकर, सौरव गांगुली, अजय जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.
या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सौरव गांगुलीला झटपट गमावलं. त्याने 9 रन्स केल्या. राहुल द्रविडही 13 रन्स करून तंबूत परतला. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला हिथ स्ट्रीकने आऊट केलं. त्याने 7 रन्स केल्या.
56/3 अशा स्थितीतून सदागोपन रमेश आणि अजय जडेजा जोडीने डाव सावरला. रमेशने अर्धशतकही पूर्ण केलं. मात्र त्यानंतर लगेचच ग्रँट फ्लॉवरने रमेशला आऊट करून ही जोडी फोडली. रमेशने 55 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.

थोड्या अंतरात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजय जडेजाला हिथ स्ट्रीकने माघारी धाडलं. त्याने 43 रन्स केल्या. रनरेटचं दडपण वाढलेलं असल्याने रन घेण्याच्या गडबडीत अजित आगरकर रनआऊट झाला. रॉबिन सिंगला नयन मोंगियाची साथ मिळाली. या जोडीने .. विकेटसाठी रन्स जोडल्या. ही जोडी मॅच जिंकून देणार असं चित्र होतं. गाय व्हिटालने मोंगियाला आऊट केलं. त्याने 28 रन्सची खेळी केली.
जवागल श्रीनाथने रॉबिन सिंगला साथ देत भारताच्या विजयाच्या आशा जिवंत राखल्या. फास्ट बॉलर हेन्री ओलोंगाने रॉबिन सिंगला आऊट केलं आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. रॉबिन सिंगने 35 रन्सची खेळी केली. जवागल श्रीनाथ आणि पाठोपाठ वेंकटेश प्रसादला तंबूत परतावत झिमाब्वेने खळबळजनक विजयाची नोंद केली.

फोटो स्रोत, Craig Prentis
झिम्बाब्वेकडून हिथ स्ट्रीक आणि हेन्री ओलोंगा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
1999 वर्ल्डकप स्पर्धेत 12 संघ दोन गटात विभागण्यात आले. भारताच्या गटात झिम्बाब्वे, केनिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका हे संघ होते. प्राथमिक फेरीच्या मॅचमध्येच झिम्बाब्वेने भारताला हरवलं पण भारतीय संघाने केनिया, इंग्लंड, श्रीलंकेला मोठ्या फरकाने हरवल्यामुळे सुपरसिक्स फेरीत प्रवेश मिळाला.
त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवाने स्पर्धेतून बाहेर जाण्याची नामुष्की भारतीय संघावर ओढवली नाही. त्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि पाठोपाठ झिम्बाब्वेने नमवल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता पण उर्वरित तीन सामन्यात त्यांनी खणखणीत प्रदर्शन करत बाजी पलटवली.
झिम्बाब्वेचा संघ आता अनुनभवी असला तरी एकेकाळी त्यांच्याकडे दिग्गज खेळाडू होते. याची झलक आकडेवारीत दिसते.
या वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. प्राथमिक लढतीत भारताची शेवटची लढत झिम्बाब्वेविरुद्धच होणार आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








