IPL Auction 2023 : सॅम करनसाठी छप्परफाड बोली

फोटो स्रोत, Getty Images
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेसाठीच्या लिलावात आतापर्यंतची सर्वाधिक रकमेची बोली लागली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी पंजाब किंग्ज संघाने 18.5 कोटी रुपये मोजले. सॅमचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्या.
सॅमचा सहकारी आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि कॅमेरुन ग्रीन यांनाही विक्रमी बोली लावून संघांनी ताफ्यात समाविष्ट केलं.
वेगवान गोलंदाज शिवम मावीसाठी जबरदस्च चुरस पाहायला मिळाली. अखेर गुजरात टायटन्स संघाने शिवमला मिळवलं. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या मुकेश कुमारला संघात घेण्यासाठी पंजाब आणि दिल्लीत जोरदार शर्यत होती. पंजाबने माघार घेतल्यामुळे दिल्लीने मुकेशला 5.5 कोटी रुपये खर्चत विकत घेतलं.
इंग्लंडचा ऑलराऊंडर सॅम करनसाठी आयपीएल लिलावातली सर्वोच्च बोली लागली. पंजाब किंग्ज संघाने तब्बल 18.50 कोटी रुपये खर्चून सॅमला ताफ्यात समाविष्ट केलं. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सॅमने मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार पटकावला होता. सॅम यापूर्वी पंजाब तसंच चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. डावखुरा गोलंदाज अससेला सॅम उपयुक्त फलंदाजीही करतो. याव्यतिरिक्त चपळ क्षेत्ररक्षकही आहे. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलमध्ये सॅमला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरुन ग्रीनसाठी लिलावात जोरदार चुरस पाहायला मिळाली. भारताविरुद्ध भारतात चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रीनला मुंबई इंडियन्स संघाने तब्बल 17.50 कोटी रुपये देत ताफ्यात सामील केलं. शेन वॉटसनचा वारसदार असं वर्णन होणाऱ्या ग्रीनसाठी जोरदार दावेदारी होईल याची अपेक्षा होती. त्याप्रमाणेच प्रत्येक संघाला ग्रीन संघात हवा होता.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आता महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने तब्बल 16.25 रुपये खर्चत स्टोक्सला सामील केलं. इंग्लंडला दोन वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या स्टोक्ससाठी लिलावात जोरदार चुरस पाहायला मिळाली. चेन्नईने अगदी शेवटच्या क्षणी लिलावात उतरत बाजी मारली.
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार, विकेटकीपर फलंदाज निकोलस पूरनसाठी लखनौ सुपरजायंट्सने तब्बल 16 कोटी रुपये मोजले. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या सर्वसाधारण कामगिरीमुळे पूरनने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.
दक्षिण आफ्रिकेच्या हेनरिच लासेनसाठी सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपये देत संघात समाविष्ट केलं.
इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूकने लिलावात कोटीच्या कोटी भरारी घेतली. हॅरी ब्रूकची बेस प्राईज 1.5 कोटी होती. लिलावात त्याच्या नावासाठी अक्षरक्ष: झुंबड उडाली. सनरायझर्स हैदराबादने ब्रूकसाठी तब्बल 13 कोटी 25 लाख रुपये खर्च केले. राजस्थान रॉयल्सनेही ब्रूकसाठी जोरदार दावेदारी केली पण त्यांच्याकडील पैसा मर्यादित असल्याने हैदराबादने बाजी मारली. ब्रूकचं हे आयपीएल पदार्पण असणार आहे.
इंग्लंडच्या नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यात ट्वेन्टी20 आणि कसोटी दोन्ही प्रकारात ब्रूकने धावांची टांकसाळच उघडली. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ब्रूकला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
भारताचा सलामीवीर मयांक अगरवालला सनरायझर्स हैदराबादने 8 कोटी 25 लाख रुपये खर्चून ताफ्यात घेतलं. मयांक गेल्या हंगामात पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार होता. मात्र कर्णधार आणि खेळाडू म्हणून त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. म्हणूनच पंजाबने त्याला रिलीज केलं.
भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्सने 50 लाख बेस प्राईजलाच संघात घेतलं. रहाणे याआधी राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स संघांसाठी खेळला आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या 16व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होत आहे. एकूण 405 खेळाडूंसाठी लिलाव होणार आहे. कोचीत लिलाव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला गुजरात टायटन्सने संघात समाविष्ट केलं. विल्यमसन हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार होता. मात्र लिलावापूर्वी हैदराबादने केनला रिलीज केलं होतं. टायटन्सने 2 कोटी बेस प्राईजवरच केनला समाविष्ट केलं.
जवळपास एक हजार खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती. आयपीएल प्रशासनाने संघांशी चर्चा करुन ही यादी 405 वर आणली आहे. 10 संघांनी मिळून 369 खेळाडूंची सूची आयपीएल प्रशासनाला दिली. त्यानंतर संघांनी अंतर्गत बैठकांनंतर आणखी 36 खेळाडूंची नावं लिलावात समावेश करण्यासंदर्भात विनंती केली. त्यामुळे 405 खेळाडूंसाठी लिलाव होईल. यामध्ये 273 भारतीय तर 132 विदेशी खेळाडू आहेत. असोसिएट संघांचे 4 प्रतिनिधी आहेत. 405 खेळाडूंपैकी 119 खेळाडूंनी आपापल्या राष्ट्रीय संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. 282 असे खेळाडू आहेत जे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळत आहेत. 87 विविध स्लॉट्स अर्थात गट निश्चित करण्यात आले आहेत.
बेस प्राईज
2 कोटी रुपये ही लिलावातील सर्वोच्च बेस प्राईज आहे. 19 विदेशी खेळाडूंनी आपली बेस प्राईज 2 कोटी रुपये पक्की केली आहे. 11 खेळाडूंच बेस प्राईज 1.5 कोटी रुपये आहे.
दोन कोटी बेस प्राईज असलेले खेळाडू कोण आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स, फिल सॉल्ट, सॅम करन, टॉम बॅन्टन, ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद, जेमी ओव्हर्टन, क्रेग ओव्हर्टन, टायमिल मिल्स या इंग्लंडच्या खेळाडूंनी बेस प्राईज 2 कोटी रुपये पक्की केली आहे. यांच्यासह ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ख्रिस लिन शर्यतीत आहेत. दक्षिण आफ्रिकेचे रायली रुसो आणि रासी व्हॅन डर डूसेचंही नाव आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन आणि जेसन होल्डर, न्यूझीलंडचे जेमी नीशाम आणि अडम मिलने हेही रिंगणात आहेत.
लक्षवेधी खेळाडू
इंग्लंडला दोन वर्ल्डकप जिंकून देणारा अष्टपैलू खेळाडू आणि कसोटी कर्णधार बेन स्टोक्स लिलावाचा केंद्रबिंदू ठरू शकतो. स्टोक्सच्या बरोबरीने अष्टपैलू सॅम करनला कोटीच्या कोटी बोली लागू शकते. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सॅम करला मॅन ऑफ द टूर्नामेंट पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तिन्ही प्रकारात अष्टपैलू कामगिरी करणारा कॅमेरुन ग्रीन संघांच्या रडारवर असू शकतो. ट्वेन्टी20, वनडे आणि टेस्ट अशा तिन्ही प्रकारात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी संघ आतूर आहेत. ट्वेन्टी20 वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू चमकदार कामगिरी करणारा झिम्बाब्वेचा सिकंदर रझा अनेक संघांच्या रडारवर असू शकतो. खणखणीत तंत्रकौशल्यासाठी प्रसिद्ध अजिंक्य रहाणे आणि जो रुट यांच्यासह अनुभवी गोलंदाज जयदेव उनाडकत लिलावात आहेत. सय्यद मुश्ताक अली तसंच विजय हजारे स्पर्धेत दमदार कामगिरी करणारे भारतीय खेळाडूंवरही लक्ष असणार आहे.
पंजाब किंग्ज संघाचा माजी कर्णधार मयांक अगरवाल, आयपीएलमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय खेळाडू मनीष पांडे यांच्याकडे विविध संघांचं लक्ष असणार आहे.
कोणत्या संघाकडे किती पैसे आणि किती खेळाडू घेऊ शकतात?
चेन्नई सुपर किंग्सकडे 18 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे लिलावासाठी 20.45 कोटी रुपये उपलब्ध आहेत. त्यांना 7 खेळाडू हवे आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाने लिलावापूर्वी मर्यादित बदल केले आहेत. त्यांच्याकडे 20 खेळाडू आहेत. लिलावात त्यांच्याकडे 19.45 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 5 खेळाडू खरेदी करायचे आहेत. गतविजेते गुजरात टायटन्स संघाकडे 18 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे 19.25 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 7 खेळाडू खरेदी करायचे आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी समीकरण अत्यंत कठीण आहे. त्यांच्याकडे 14च खेळाडू आहेत. त्यांना 11 खेळाडू खरेदी करायचे आहेत पण त्यांच्याकडे 7.05 कोटी रुपयेच आहेत. लखनौ सुपरजायंट्स संघाकडे 15 खेळाडू आहेत. त्यांच्याकडे लिलावासाठी 23.35 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 10 खेळाडूंची आवश्यकता आहे. मुंबई इंडियन्स संघाने लिलावापूर्वी असंख्य खेळाडूंना रिलीज केलं. त्यांच्याकडे 16 खेळाडू आहेत. आता त्यांना 9 खेळाडू हवे आहेत आणि त्यांच्याकडे 20.55 कोटी रुपये आहेत. पंजाब किंग्ज संघाने संघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यांच्याकडे 16 खेळाडू आहेत. लिलावात त्यांच्याकडे 32.2 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 9 खेळाडू हवे आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने फार मोठे बदल केलेले नाहीत. त्यांच्याकडे 18 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे 8.75 कोटी रुपये आहेत आणि त्यांना 7 खेळाडू घ्यायचे आहेत. राजस्थान रॉयल्सकडे 16 खेळाडू आहेत. 9 खेळाडू खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे 13.2 कोटी रुपये आहेत. सनरायझर्स हैदराबाद संघाने सगळा ढाचा बदलून टाकला आहे. त्यांच्याकडे 12 खेळाडू आहेत. लिलावासाठी त्यांच्याकडे तब्बल 42.25 रुपये आहेत आणि त्यांना 13 खेळाडूंची आवश्यकता आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त








