You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किएर स्टार्मर : कामगाराचा मुलगा, घरातील पहिले पदवीधर ते युकेचे पंतप्रधान, असा आहे प्रवास
युनायटेड किंग्डमच्या सार्वत्रिक निवडणुकीत किएर स्टार्मर आघाडीवर असून 14 वर्षांनंतर लेबर पार्टी सत्तेत परतत आहे. लेबर पार्टीचा विजय हा ऐतिहासिक असल्याचं बोललं जातंय.
युकेमध्ये 650 जागांसाठी निवडणूक झाली होती. आतापर्यंत लेबर पार्टीनं 384 जागा जिंकल्या असून ऋषि सुनक यांच्या नेतृत्वात कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला फक्त 92 जागांवर विजय मिळवता आला.
म्हणजे लेबर पार्टीला बहुमत मिळालं असून आता देशात लेबर पार्टीची सत्ता आली आहे.
लेबर पार्टी 410 जागा, तर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी 131 जागा जिंकू शकते, असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवला होता. निकालसुद्धा त्याच दिशेनं जाताना दिसतोय. आतापर्यंतच्या निवडणुकीचे निकाल पाहिले तर लेबर पार्टी 2010 नंतर सत्तेत परतत आहे.
लेबर पार्टीनं 410 जागांवर विजय मिळवला तर ही 1997 मध्ये टोनी ब्लेयर यांच्या काळात पक्षाला मिळालेल्या विजयानंतरचा हा सर्वात मोठा विजय असेल. आता किएर स्टार्मर युकेचे नवीन पंतप्रधान असतील. पण, लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे किएर स्टार्मर कोण आहेत?
कायद्याचं शिक्षण आणि आफ्रिकेत नोकरी
गेल्या 2015 पासून किएर स्टार्मर हॉर्बन आणि सेंट पॅनक्रॉस इथून निवडून येतात. मी कष्टकऱ्यांच्या भूमीतून येतो, असं ते नेहमी सांगतात. त्यांचे वडील टूलमेकर, तर आई नर्स होत्या. त्यांच्या आई स्टील्स म्हणजे एक दुर्मिळ अशा संधिवातानंग्रस्त आहेत.
त्यांनी रिगेट ग्रामर स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं असून त्यांनी या शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दोन वर्षांनंतर या शाळेचं खासगीकरण झालं.
वयाच्या 16 व्या वर्षानंतर त्यांचं शाळेचं शुल्क स्थानिक परिषदेकडून दिलं जात होतं. ते उच्चशिक्षण घेणारे कुटुंबातील पहिले व्यक्ती असून त्यांनी लीड्स विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायद्याचं शिक्षण घेतलं.
1987 मध्ये ते बॅरिस्टर झाले असून मानवाधिकार कायद्याचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी अफ्रिका आणि कॅरेबिया काम केलं असून याठिकाणी फाशीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या केसेस लढल्या. त्यांनी एकही पैसा न घेता 90 च्या दशकाच्या शेवटी तथाकथित मॅक्लिबेल कामगारांची केस लढवली.
1997 मधल्या मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशन विरुद्ध स्टील अँड मॉरीस या प्रकरणाला मॅक्लिबेल केस म्हणून ओळखलं जातं. यामध्ये मॅकडोनाल्ड कॉर्पोरेशननं कंपनीवर टीका करणाऱ्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. कारण, या कार्यकर्त्यांनी मॅकडोनाल्ड कंपनीच्या पर्यावरणीय दाव्यांवर प्रश्न उपस्थित करत एक पत्रक वाटलं होतं. किएर 2008 मध्ये इंग्लंड आणि वेल्समधील सर्वात वरिष्ठ असलेल्या क्रिमिनल प्रॉसिक्युटर पदावर निवडून आले.
राजकारणाची सुरुवात
स्टार्मर 2015 मध्ये उत्तर लंडनमधील हॉबर्न आणि सेंट पॅनक्रॉसमधून पहिल्यांदा खासदार झाले. त्यांनी माजी लेबर नेता जेरेमी कॉर्बिन यांच्या फ्रंटबेंच टीममध्ये त्यांचे ब्रेक्झिट सचिव म्हणून काम केलं. यावेळी त्यांनी दुसऱ्या ब्रेक्झिट निवडणुकीवर विचार करावा असं सूचित केलं.
ब्रेक्झिट हे युरोपियन युनियनमधून ब्रिटनला वेगळं करण्याची प्रक्रिया होती. त्यांच्या पक्षाचा 2019 मध्ये मोठा पराभव झाला होता. त्यानतंर किएर स्टार्मर यांनी लेबर नेतेपदाची निवडणूक लढवली आणि 2020 मध्ये पक्षाचे मोठे नेते बनले.
त्यांच्या विजयानंतर ते भाषणात म्हणाले होते की सगळ्या कामगारांना आत्मविश्वासानं आणि आशेनं पुढे नेतील.
किएर स्टार्मर यांनी निवडणुकीत काय दिलं आश्वासन?
किएर स्टार्मर यांनी निवडणुकीत जनतेला काही आश्वासन दिली आहेत. त्यापैकी पहिलं म्हणजे
आरोग्य सेवा : ब्रिटेनची आरोग्य सेवा एनएचएसमध्ये रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी करण्यासाठी काम करतील. प्रत्येक आठवड्याला एनएचएसमध्ये 40 हजार नियुक्त्या होतील. तसेच जे कर चुकवतात त्यांच्याकडून या कामासाठी लागणारा निधी उभारला जाईल.
बेकायदेशीर स्थलांतर – लहान आणि धोकादायक बोटींमधून होणारी मानवी तस्करी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा कमांड सुरू करण्यात येणार आहे.
गृहनिर्माण – 15 लाख नवीन घरं बांधणार आणि पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या अधिकार देण्यासाठी योजना सुरू करणार
शिक्षण – 6500 शिक्षकांची भरती केली जाईल आणि खासगी शाळांना मिळणारी कर सवलत रोखून हा खर्च केला जाईल.
याआधी लेबर पार्टीची स्थिती काय होती
किएर यांच्या नेतृत्वाखाली पार्टीची लोकप्रियता वाढविण्यासाठी सुरुवातीला थोडी अडचण गेली. पण, 2021 च्या पोटनिवडणुकीत त्यांनी रेड वॉल परिसरावर लक्ष केंद्रीत केलं.
रेड वॉल म्हणजे उत्तर इंग्लंड आणि मिलँड मधील काही जागा ज्या याआधी लेबर पार्टीच्या ताब्यात होत्या. पण, 2019 मध्ये या जागांवर कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा विजय झाला होता.
2019 च्या निवडणुकीत लेबर पार्टीला फक्त 205 जागांवर विजय मिळवता आला होता. दुसरं म्हणजे किएर यांनी पार्टीच्या मूल्यांवर पुनर्विचार केला. त्यानंतर विद्यापीठात निःशुल्क प्रवेश आणि पाणी, वीज कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण करण्याचं आश्वासन त्यांनी मागे घेतलं.
त्यानंतर 2023 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत लेबर पार्टीला कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीपेक्षा 20 टक्के अधिक मतं मिळाली आहेत. आता 2024 ला ब्रिटनमध्ये परत एकदा लेबर पार्टीची सत्ता आली आहे.