'नंबर देण्यास नकार दिल्यानं महिलेवर तिच्या मुलांसमोर बलात्कार', आरोपी अटकेत

    • Author, बिस्वा कल्याण पुरकायस्थ
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

आसाममध्ये कछार जिल्ह्यामधील एका 30 वर्षीय महिलेवर तिच्या दोन लहान मुलांसमोरच बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या घटनेतील आरोपी हा महिलेच्या घराशेजारीच राहतो. या शेजारी राहणाऱ्या आरोपीने महिलेकडून तिचा मोबाइल नंबर मागितला होता.

जेव्हा तिने नंबर देण्यास नकार दिला, तेव्हा या आरोपीने कथितपणे महिलेचे हात-पाय बांधले आणि तिच्या दोन्ही मुलांसमोरच तिच्यावर बलात्कार केला.

सध्या या घटनेतील पीडितेवर सिलचर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये (एसएमसीएच) उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुरुवारी (30 जानेवारी) सकाळी खटला दाखल केल्यानंतर आरोपीला शोधण्यास सुरुवात केली आणि आता आरोपीला अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

बलात्कारानंतर आरोपीने महिलेच्या अंगावर अॅसिडसदृश्य द्रव पदार्थ फेकला आणि त्यानंतर तो पळून गेला, असा आरोप महिलेच्या निकटवर्तीयांनी केला. दुसऱ्या बाजूला आरोपीनं त्याला खोट्या खटल्यामध्ये अडकवल्याचा दावा केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पीडित महिलेच्या पतीने बुधवारी (29 जानेवारी) पत्रकारांसमोर न्यायाची मागणी केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.

ही कथित घटना 22 जानेवारी रोजी घडली होती. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी या प्रकरणी धोलई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती या प्रकरणाशी निगडीत असलेल्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली.

21 जानेवारीच्या रात्री पहिल्यांदा आरोपी त्यांच्या घरी आला होता, असा आरोप पीडितेच्या पतीने केला आहे. त्यांनी सांगितलं, "मी काही कारणास्तव घरी नव्हतो. त्याने (आरोपी) जबरदस्ती घरात घुसून माझ्या पत्नीकडे तिचा मोबाइल नंबर मागितला. मात्र, जेव्हा माझ्या पत्नीने नंबर देण्यास नकार दिला, तेव्हा त्याने तिला धमकी दिली."

22 जानेवारी रोजी जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांनी पाहिलं की, त्यांची पत्नी जमिनीवर पडलेली होती. तिचे तोंड, हात आणि पाय बांधलेले होते. महिलेच्या शरीरावर अॅसिडसारखा पदार्थ फेकण्यात आला होता, अशी माहिती पीडित महिलेच्या पतीने बीबीसीशी बोलताना दिली.

पीडितेच्या पतीने पुढे सांगितलं, "त्यानंतर मी त्वरित आपल्या पत्नीला घेऊन जवळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. मात्र, तिथल्या डॉक्टरांनी आम्हाला सिलचर मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगितलं. आम्ही पोलिसांना फोन लावला. मात्र, त्यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये येण्यास सांगितलं."

23 जानेवारी रोजी पीडितेच्या पतीने धोलाई पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर भारतीय न्याय संहितेनुसार वेगवेगळ्या कलमांअंतर्गत आरोपीवर खटला दाखल करण्यात आला.

धोलई पोलीस स्टेशनचे प्रभारी जॉनपन बे यांनी सांगितलं की, आरोपीला गुरुवारी (30 जानेवारी) अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

स्टेशनच्या प्रभारींनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याला लवकरच न्यायालयात हजर केलं जाईल. पीडितेवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांशी सल्लामसलत केल्यानंतर पीडितेचा जबाब नोंदवून घेतला जाईल."

त्यांनी असंही म्हटलं, "या प्रकरणी किती कलमं लावण्यात आली आहेत, याची त्यांना पूर्ण माहिती नाही. मात्र, पीडितेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एसएमसीएचमधून पीडितेच्या तपासणीचा रिपोर्ट आल्यानंतर आणखी काही कलमं लागू शकतात."

मात्र, आता धोलई पोलिसांकडून असं सांगण्यात आलं आहे की, आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (बलात्कार), कलम 331(4) जबरदस्ती घरात घुसणे, कलम 123 (एखाद्या विषारी पदार्थाने इजा करणे) या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

पीडितेच्या पतीने आरोप केला, "आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने आतापर्यंत अनेक महिलांसोबत गैरवर्तन केलं आहे. तो विवाहित महिलांना लक्ष्य करतो. त्यांच्याकडून मोबाइल नंबर मागतो आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह गोष्टी लिहितो. आधी अशी अनेक प्रकरणे स्थानिक लोकांनी आपापसात चर्चा करून मिटवली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्यात काहीही सुधारणा झालेली नाही."

आरोपीनं काय म्हटलं?

दुसऱ्या बाजूला आरोपीने त्याला खोट्या प्रकरणात अडकवलं जात असल्याचा दावा केला. "पीडितेच्या पतीनेच माझ्याकडून मोठी रक्कम उधार घेतलेली होती आणि जेव्हा मी पैसे मागण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला या आरोपांमध्ये अडकवलं," असा आरोप त्याने केला.

असं असलं तरी पीडितेच्या कुटुंबियांनी आरोप केला की, अॅसिड हल्ला झाल्यामुळे पीडितेचं 70 टक्के शरीर भाजलं आहे. सध्या तिची अवस्था गंभीर आहे आणि ती वाचेल की नाही, याबाबतही आम्हाला खात्री नाही. आमच्या दोन्ही मुलांनी हा सगळा क्रूर घटनाक्रम आपल्या डोळ्यांनी पाहिलाय आणि त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मात्र, महिलेवर अॅसिड हल्ला झाला आहे की नाही, याबाबत सध्या खात्रीलायक पद्धतीनं काहीही सांगता येणार नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. घूंघुर पोलीस आऊटपोस्टच्या एका अधिकाऱ्यानं म्हटलं की, महिलेच्या शरीरावर जो पदार्थ फेकण्यात आला आहे, तो नक्कीच विषारी आहे. आम्ही त्यासंदर्भातील रिपोर्टची प्रतिक्षा करत आहोत. मात्र, बलात्कार झाला असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.

सिलचर मेडिकल कॉलेजदेखील याच पोलीस स्टेशन अंतर्गत येतं.

सिलचर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलचे अधिक्षक देबा कुमार चक्रवर्ती यांनी पीडितेच्या वर्णनाशी जुळणाऱ्या एका रुग्णाला दवाखान्यात भरती करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. मात्र, गोपनियतेच्या कारणास्तव पीडितेची सध्याची अवस्था, तिला झालेली दुखापत आणि इतर गोष्टींबाबतची माहिती देण्यास नकार दिला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)