You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मणक्यात चाकू लागूनही ताठ उभा कसा? सैफवरील हल्ल्यानंतर उपस्थित होणारे 9 प्रश्न
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
अभिनेता सैफ अली खान यांच्या वांद्रे मधील सद्गुरु शरण या इमारतीत राहत्या घरामध्ये घुसून 16 जानेवारीला मध्यरात्री चोराने प्राणघातक हल्ला केला होता.
या प्रकरणानंतर हल्ला झाला तेव्हापासून ते सैफ अली खान बरा होईपर्यंत अनेक शंका सर्वत्र उपस्थित केल्या जात आहेत. त्यातील काही शंका नेते आणि अगदी सत्ताधारी मंत्र्यांनीही उपस्थित केल्या आहेत.
या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्यानंतर सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोपी पोलिसांना तीन दिवस गुंगारा देत फिरत होता.
पोलिसांची 100 पेक्षा अधिक पथकं आरोपीचा शोध घेत होती. अखेर तीनशे सीसीटीव्ही आणि 50 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवल्यानंतर अखेर 72 तासांनी पोलिसांनी मोहम्मद शेहजाद या आरोपीलाला मध्यरात्री ठाण्यातून अटक केली.
आरोपीला पोलिसांनी 19 जानेवारीला न्यायालयात हजर केलं. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर पुढच्या दोन दिवसांत म्हणजे 21 जानेवारीला सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पण त्यानंतर सोशल मीडिया किंवा प्रत्यक्षपणे लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
या घटनेच्या तपासादरम्यान समोर येणाऱ्या बाबी पाहता, लोकांना अनेक बाबींवर शंका येत आहेत. सोशल मीडियावर तर याबाबत प्रश्नांची सरबत्ती होत आहेत.
पण एवढंच नाही तर, राज्यातील मंत्री आणि राजकीय पक्षातील नेते यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा अॅक्टिंग करतोय का? - नितेश राणे
मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनीही एका भाषणादरम्यान याबाबत प्रश्न उपस्थित केला.
"बांगलादेशी सैफ अली खानच्या घरात घुसले. आधी ते फक्त नाक्यावर उभे रहायचे. आता घरात घुसायला लागले आहेत. कदाचित ते सैफ अली खानला घेऊन जायला आले असतील," असं राणे म्हणाले.
"सैफ अली खान रुग्णालयातून बाहेर असा चालत आला, त्याला बघून मलाच संशय आला, याला खरंच कोणी चाकू मारला की, हा अॅक्टिंग करतोय. तो टुणटुण करत रुग्णालयाच्या बाहेर पडला," असं राणे म्हणाले.
1) बाहेर पडताच एवढा फिट कसा?
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी एक्स अकाऊंटवर सैफ अली खानचा एक व्हीडिओ शेअर केला. त्यात त्यानं लिहिलं की, "डॉक्टरांनी सांगितले की चाकू सैफ अली खानच्या पाठीत 2.5 इंच खोलवर घुसला होता. बहुदा तो आत अडकला असावा.
त्यानंतर सलग 6 तास ऑपरेशन चालले आणि हे सर्व 16 जानेवारीला घडले. आज 21 जानेवारी आहे. अवघ्या पाच दिवसात हॉस्पिटलमधून बाहेर पडताच एवढा फिट? अवघ्या पाच दिवसात? कमाल आहे!"
या शंकेसंदर्भात नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमधील मणक्याच्या विभागाचे प्रमुख डॉक्टर आणि दिल्ली स्पाइन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आर एस चहल म्हणाले की, मणक्याच्या दुखापतीचं प्रत्येक प्रकरण हे वेगळं असतं. सर्वांना एकाच चष्म्यातून पाहू शकत नाही.
पाठीच्या मणक्याची दुखापत गंभीर असते. त्याचा परिणाम केवळ व्यक्तीवरच नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर होतो, असंही ते म्हणाले.
चहल यांच्या मते, मणक्याला होणारी हानी अनेकदा कायमस्वरूपी असते आणि ती दुरुस्त करता येत नाही. तर काही दुखापती तात्पुरत्याही असतात. पण त्या निश्चित कधी बऱ्या होतील, हे सांगता येत नाही.
2) रुग्णालयात पोहोचण्यासाठी इतका वेळ का ?
सैफ अली खानचं घर वांद्रे परिसरात आहे. तर रुग्णालयही वांद्रे परिसरातच आहे. तरीही रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याचं आतापर्यंत आलेल्या माहितीतून समोर आले.
रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सैफला 4 वाजून 18 मिनिटांनी दाखल करण्यात आलं. सैफला लिलावतीत सोडणाऱ्या रिक्षाचालक पावणेचार दरम्यान पोहोचल्याची माहिती देत आहे.
यात महत्त्वाचं म्हणजे इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोन वाजून 33 मिनिटांनी आरोपी घरातून जाताना दिसतो. त्यामुळं ही घटना त्यापूर्वीच घडलेली असेल, तर मग रुग्णालयात पोहोचायला अंदाजे दोन तास का लागले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिवाय वांद्रे येथील सद्गुरु शरण ते लीलावती रुग्णालय हे अंतरही फक्त 2.2 किलोमीटर एवढंच आहे. साधारणपणे हे अंतर कापण्यासाठी दहा मिनिटं वेळ लागतो.
त्यामुळं हल्ल्यानंतर रुग्णालयात जाण्यापर्यंत दोन तासांचा वेळ गेला, त्यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
3) घरातील एकही व्यक्ती सोबत का गेली नाही ?
सैफ अली खानला उपचारासाठी दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनीही त्याच्या धाडसाचे कौतुक केले.
लीलावती हॉस्पिटलचे डॉक्टर आणि ट्रस्टी यांनी सैफबद्दल सांगितले की, सैफच्या शरिरातून रक्तस्त्राव होत होता. तो एखाद्या सिंहासारखा आला होता.
"त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा 6 ते 7 वर्षांचा त्याचा लहान मुलगा तैमूर होता. तो चालत आला. तो खरा हिरो आहे," असं माध्यमांशी बोलताना डॉक्टरांनी म्हटलं होतं.
तसंच भजन सिंग या रिक्षावाल्यांनं सैफला रुग्णालयात आणलं त्यावेळी तैमूर आणि एक व्यक्ती होता असं सांगितलं.
रुग्णालय प्रशासनाने अफसर झैदी याने त्याला रुग्णालयात आणल्याचं म्हटलं.
त्यामुळे ही घटना घडल्यानंतर घरातून रुग्णालयात येताना त्याच्याबरोबर घरातील व्यक्ती नसावा, यावरही प्रश्न उपस्थित होत आहे.
4) करिना कपूर खानने स्टोरी डिलीट का केली ?
सैफ अली खानच्या घरी 16 जानेवारीला ही घटना घडली. त्यावेळी सैफ अली खान आणि करिना कपूर खान हे बेडरूम मध्ये होते, असं सैफ अली खान आणि फिलिप यांनी जबाबात सांगितलं आहे.
मात्र, करिना कपूर खानने instagram वर त्या रात्री स्टोरी शेअर केली होती. त्यात करिष्मा कपूर खान हिने गर्ल्स नाईट इन असं म्हणत करिना कपूर खान हिलाही टॅग केलं होतं.
तीच स्टोरी करिना कपूर हिने शेअर केली होती. मात्र, घटना घडल्यानंतर साधारणपण 10:30 च्या सुमारास ती स्टोरी डिलीट केली. त्यावरूनही प्रश्न उपस्थित होत आहेत.
5) सहा वार झाले की पाच?
डॉक्टर आणि पोलिसांनी सुरुवातीला सैफ अली खान वर सहा वार झाले असं सांगितलं होतं. पण आता मेडिकल रिपोर्टमधून सैफच्या शरिरावर पाच ठिकाणी जखमा होत्या, असं समोर आलं आहे.
मेडिकल रिपोर्टनुसार, सैफच्या शरिरावर पाच ठिकाणी जखमा होत्या. पाठ, मनगट, मान, खांदा आणि कोपरावर जखमा होत्या.
पाठीवर डाव्या बाजुला जवळपास 0.5 ते 1 सेमी इतकी जखम होती. तर डाव्या मनगटावर 5-10 सेमीची जखम होती, असा उल्लेख आहे.
सैफच्या मानेवर उजव्या बाजूला 10-15 सेमी तर उजव्या खांद्याला 3-5 सेमी आकाराची जखम होती. उजव्या कोपरावर 5 सेमीची जखम असल्याचं मेडिकल रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
6) घटना घडल्यापासून आरोपी 5 तास वांद्रे परिसरातच?
सैफ अली खानच्या घरामध्ये घटना घडली आणि यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत होते. मात्र हल्ल्यानंतर 16 जानेवारीला आरोपी पाच तास वांद्रे परिसरातच होता, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.
वांद्रे आणि खार परिसरातील अनेक सीसीटीव्हीमध्येही पोलीसांना आरोपी दिसला होता, असं सुत्रांकडून समजलं आहे. मग पोलिसांना आरोपीला शोधण्यासाठी 72 तास का लागले? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
7) सैफ अली खान आणि आलियामाचे जबाब वेगळे का?
सैफच्या हल्लेखोर प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सैफ अली खानने 24 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांकडे याप्रकरणी आपला जबाब नोंदवलेला आहे.
याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. तर आरोपी मोहम्मद शेहजाद याला न्यायालयाने 29 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे.
या प्रकरणात सैफ अली खानच्या घरातील नर्स आलियामा फिलिप्सचा जबाब नोंदवत पोलिसांनी सर्वप्रथम तपासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आता प्रकरण उघडकीस आल्यानंतर सैफ अली खानचा देखील जबाब नोंदवला आहे. मात्र या दोन्ही जबाबात फरक असल्याचं पोलीस सूत्रांच म्हणणं आहे.
पोलिसांनी किंवा सैफ अली खान यांच्याकडून काही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
8) शेहजादच्या वडिलांनी आरोप फेटाळले
सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा खरंच मोहम्मद शेहजादच आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. वडील मोहम्मद रुहुल अमीन फकीर यांनी सीसीटीव्हीतील व्यक्ती आणि माझा मुलगा यात फरक आहे, असा दावा केला आहे.
आरोपीचे वडील शरीफुल अमीन फकीर म्हणाले की, मला माहिती आहे की माझा मुलगा आणि सीसीटीव्ही मध्ये दिसणारे व्यक्ती दोन्ही पूर्णपणे भिन्न आहेत. मुलाने कधीही केस लांब ठेवले नाहीत, असं माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं.
याबाबत मुंबई पोलिसांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही.
9) इमारतीत सीसीटीव्ही का नाहीत? सुरक्षारक्षक कुठे होते?
सैफ अली खान प्रकरणामध्ये तपास करत असताना पोलिसांना अनंत अडचणी आल्या. कारण महत्त्वाचं म्हणजे या इमारतीमध्ये सर्वत्र सीसीटीव्ही उपलब्ध नव्हते.
एवढा मोठा सेलिब्रिटी असतानाही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही नसल्याने अनेक प्रश्न पोलिसांनी पडले होते.
तसेच महत्त्वाचे म्हणजे घटना घडली तेव्हा इमारतीतील सुरक्षारक्षक कुठे होते. उपस्थित असलेले सुरक्षारक्षक आणि काही सीसीटीव्ही यांची नजर चुकवत आरोपी आत कसा घुसला? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे.
दरम्यान, सर्वसामान्य आणि राजकीय मंडळींकडून उपस्थित झालेले प्रश्न आणि शंका याबाबत अभिनेता सैफ अली खान आणि मुंबई पोलीस यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर याठिकाणी अपडेट केली जाईल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.