You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सैफ हल्ला प्रकरण : सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा माझा मुलगा नाही, अटकेतील आरोपीच्या वडिलांचा दावा
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकूहल्ला प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोप मोहम्मद शेहजादला वांद्रे न्यायालयाने शुक्रवारी (24 जानेवारी) पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती आपला मुलगा नसल्याचा दावा शेहजादच्या वडिलांनी केला आहे. बीबीसी बांगलाबरोबर बोलताना त्यांनी हा दावा केला.
सैफच्या घरात घुसून मध्यरात्री 2.30 च्या सुमारास त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. त्यात दुखापत झाल्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार झाले. सध्या त्याला डिस्चार्ज मिळाला आहे.
याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी मोहम्मद शेहजादला अटक केली होती. यापूर्वी 19 जानेवारीला झालेल्या सुनावणीत ही पाच दिवस पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली होती. आज पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले.
दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने आरोपीला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान सैफ अली खानच्या घरी स्टाफ नर्स म्हणून काम करणाऱ्या एलीयामा फिलिप यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी हल्लेखोराचं वर्णन सांगितलं आहे. तसेच त्यादिवशी नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम देखील त्यांनी सांगितला आहे.
सैफ अली खानच्या टीमनं याविषयी माहिती देताना म्हटलं, "सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली असून आता त्याच्या तब्येत कसलाही धोका नाहीये.
"सध्या तो बरा झाला असून डॉक्टर त्याच्या तब्येत लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत."
सैफ अली खानच्या टीमने लिलावती ह़ॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
नेमकं काय घडलं?
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "रात्री उशिरा अभिनेता सैफ अली खानच्या घरी अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आणि त्याच्या मोलकरणीसोबत वाद घातला. जेव्हा सैफने हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत."
अभिनेता सैफ अली खानच्या टीमनेही या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
त्यात म्हटलंय, "सैफ अली खानच्या निवासस्थानी घरफोडीचा प्रयत्न झाला होता. त्याच्यावर सध्या रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे."
सैफ अली खानची पत्नी करीना कपूरच्या पीएआर एजन्सीने म्हटलंय की, "काल रात्री सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी घरफोडीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली असून तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. बाकीचे कुटुंबीय चांगल्या स्थितीत आहे.
"आम्ही मीडिया आणि सैफ अली खानच्या चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. पोलीस तपास करत आहेत त्यामुळे इतर प्रकारचे अंदाज लावू नयेत."
रुग्णालयानं काय सांगितलं?
लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमनी यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं की, "सैफवर त्याच्या घरात अज्ञात व्यक्तीनं हल्ला केला. त्याला साडेतीन वाजता लीलावती हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं.
"त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोलवर आहेत. एक जखम मणक्याजवळ आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. जखम किती खोल आहे हे शस्त्रक्रियेनंतर कळेल."
सैफच्या मानेवरही जखम असल्याचं डॉक्टर उत्तमनी यांनी सांगितलं. दुखापत किती खोलवर आहे हे पाहिले जात आहे. सकाळी साडेपाच वाजता शस्त्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं.
'हल्ला चिंताजनक'
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी भाष्य केलं आहे.
त्यांनी म्हटलं, "मुंबईतील कायदा सुव्यवस्था किती ढासळत गेली याच हे लक्षण आहे. मध्यंतरी एकाची हत्या झाली त्याच भागात आणि आज एकावर हल्ला झाला हे सगळं चिंताजनक आहे. राज्य सरकारने विशेषत: मुख्यंत्री हे गृहमंत्री आहेत त्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहावे."
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं, "सैफ अली खान यांच्यावरील हल्ला ही चिंताजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिकृत निवेदन येऊ द्या."
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
एक्स या समाजमाध्यमावर त्यांनी लिहिलं, "या हल्ल्यानं मला अत्यंत धक्का बसला. मुंबईत काय चाललंय? सुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रामध्ये हे घडते, ही सर्वांत चिंतेची बाब आहे. मग सामान्य माणसाला कोणत्या सुरक्षेची अपेक्षा आहे?"
"दिवसेंदिवस आपण मुंबईमध्ये हिंसाचार, दरोडे, चाकूहल्ले अशा घटनांबद्दल ऐकतो आहोत आणि सरकारकडं उत्तरं नाहीत. आम्हाला उत्तरं हवी आहेत," असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)