You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीत लोटायचं अवघं बॉलिवूड, असा संपवला सलमान-शाहरूखचा अबोला
- Author, मधु पाल
- Role, बीबीसी हिंदी, मुंबई
महाराष्ट्रातील माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या घटनेला एक वर्ष लोटलं आहे.
मुंबईतील पूर्व वांद्रे भागात 12 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी काही अज्ञात लोकांनी सिद्दिकी यांच्यावर अचानक गोळीबार केला.
या गोळीबारात सिद्दिकी जखमी झाले. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि मुंबईच्या चित्रपट सृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सिद्दिकी यांचे बॉलीवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांशी जवळचे संबंध होते.
बाबा सिद्दिकी राजकीय नेते असले, तरी त्यांची बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांशी जवळचे संबंध होते.
बाबा सिद्दिकी मुंबईतील पहिले असे राजकीय नेते होते ज्यांनी खूप मोठ्या सोहळ्याच्या रूपात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत इफ्तार पार्ट्या व्हायच्या, मात्र सिद्दिकींनी इफ्तार पार्टीला मोठं स्वरूप दिलं.
बॉलीवूड कलाकारांना ज्याप्रमाणे फिल्म फेअर पुरस्कार जसे महत्त्वाचे वाटायचे, तसेच बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी महत्त्वाची वाटायची. सिद्दिकींच्या इफ्तार पार्टीत सहभागी होणं अनेकांसाठी प्रतिष्ठेचं प्रतीक होतं.
या पार्टीत प्रत्येक मोठ्यातील मोठा कलाकारही सहभागी व्हायचा. केवळ चित्रपट कलाकारच नाही, तर मोठे व्यापारी, मंत्री सगळेच या इफ्तार पार्टीत यायचे.
बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा होत आली आहे. बॉलीवूडपासून टेलिव्हिजन क्षेत्रातील अनेक कलाकारांची यावेळी चर्चा होत असे.
सलमान खान, संजय दत्त, शाहरुख खान, आमिर खान, शहनाज गिल, गौहर खान, प्रीति जिंटा, रितेश - जेनिलिया देशमुख, शाहिद कपूर, अनिल कपूर, कटरीना कैफ असे अनेक दिग्गज कलाकार सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी व्हायचे. जया बच्चन यांनीही या पार्टीत हजेरी लावली आहेत.
बाबा सिद्दिकींचे बॉलीवूडशी संबंध कसे?
बाबा सिद्दिकी यांची संपूर्ण वर्षभरात काही बातमी मिळो अथवा नाही, मात्र रमजानच्या महिन्यात त्यांची चर्चा कायमच असायची.
यावर बीबीसी हिंदीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर रामचंद्रन श्रीनिवासन म्हणाले की, "सुरुवातीला बाबा सिद्दिकी यांची राजकीय कर्मभूमी वांद्रे होती.
"हा मुंबईचा तोच भाग आहे जेथे बहुतेक बॉलिवूड कलाकारांची घरं आहेत. त्या काळात त्यांच्या राजकीय करियरची नुकतीच सुरुवात झाली होती. त्यावेळीच त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली," श्रीनिवासन सांगतात.
“बाबा सिद्दिकी आणि सुनील दत्त यांच्यात कौटुंबिक संबंध होते. हेच नातं सिद्दिकी यांचं संजय दत्तसोबतही होतं. संजय दत्त अनेकदा बॉलिवूडच्या पार्ट्यांना गैरहजर असायचा, मात्र त्याने बाबा सिद्दिकी यांच्या इफ्तार पार्टीत सहभागी होणं कधीही सोडलं नाही."
ते म्हणतात, "तुरुंगातून बाहेर आल्यावर संजय दत्तने ज्या पहिल्या पार्टीत हजेरी लावली ती बाबा सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी होती,” श्रीनिवासन सांगतात.
बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याची बातमी समजताच 12 ऑक्टोबर रोजी संजय दत्त त्यांच्या भेटीसाठी तत्काळ गेले होते.
सलमान खान आणि बाबा सिद्दिकी यांची मैत्री
सलमान आणि बाबा सिद्दिकी यांची मैत्री खूप जुनी होती. त्यामुळेच हे सलमान आणि सिद्दिकी अनेक सामाजिक उपक्रमांमध्येही एकत्र दिसायचे.
2020 आणि 2021 मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात सलमान आणि बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांनी एकत्र येत गरजुंना मदतही केली.
इतकंच नाही तर याच काळात त्यांनी ऑक्सिजन तुटवड्यामुळे अडचणीत आलेल्या नागरिकांनाही मदत केली.
सलमान खानच्या वाईट काळातही बाबा सिद्दिकी त्याला साथ दिली. सलमान खान हिट रन प्रकरण आणि काळवीट शिकार प्रकरणात अडचणीत सापडला होता, तेव्हा बाबा सिद्दिकी सलमानच्या मागे उभे राहिलेले दिसले.
जेव्हा जेव्हा सलमान खानची सुनावणी असायची तेव्हा बाबा सिद्दिकी एकतर सलमानसोबत कोर्टात हजर असायचे किंवा सलमानच्या कुटुंबासोबत उभे राहायचे.
सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगने जीवे मारण्याची धमकी दिली तेव्हाही बाबा सिद्दिकी यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच सलमानला धमकी देणाऱ्यांना पकडण्याची मागणी केली होती.
सलमान आणि शाहरुखमधील शत्रुत्व संपवून मैत्री
एक काळ होता जेव्हा सलमान आणि शाहरुख एकमेकांना भेटणंही पसंत करायचे नाही. जवळपास 5 वर्षे दोघांमध्ये बोलणं होत नव्हतं आणि त्यांनी सोबत कामही केलं नाही.
अखेर बाबा सिद्दिकी यांनी 2013 मध्ये झालेल्या इफ्तार पार्टीत सलमान आणि शाहरुख दोघांना बोलावलं आणि त्यांची गळाभेट घडवून आणली. त्यामुळेच आज सलमान आणि शाहरुख खान सोबत दिसतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.