You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बाबा सिद्दिकींना राष्ट्रवादीत घेण्यामागे अजित पवारांची नेमकी राजकीय गणितं काय आहेत?
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी 10 फेब्रुवारीला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. बाबा सिद्दीकी यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्वतः एक्सवर पोस्ट करून कॉंग्रेस सोडत असल्याचं जाहीर केलं आहे.
“तरूणपणी मी कॉंग्रेस पक्षात सामिल झालो होतो. राष्ट्रीय कॉंग्रेसबरोबर माझा 48 वर्षांचा प्रवास आहे. मी कॉंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला बरेच काही व्यक्त करायचे आहे. पण काही गोष्टी न बोललेल्याच बऱ्या असं म्हणतात. माझ्या या प्रवासात साथ दिलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो,” असं 8 फेब्रुवारीला सिद्दीकी यांनी पोस्ट केलं आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबत चर्चा होत्या. अखेर सिद्दीकी यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला.
काही दिवसांपूर्वी ‘अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी 30 वर्षांचे संबध आहेत. त्यामुळे प्रवेशाबाबत लवकरच तुम्हाला कळेल' असं बाबा सिद्दीकी म्हणाले होते. बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.
काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या पक्ष सोडण्यामुळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसला अजून एक धक्का बसला आहे.
कसा आहे बाबा सिद्दीकी यांचा राजकीय प्रवास?
बाबा सिद्दीकी यांचा जन्म 30 सप्टेंबर 1958 ला झाला. त्यांचं शिक्षण बीकॉमपपर्यंत झालेलं आहे. सिद्दीकी यांनी वयाच्या 16-17 व्या वर्षापासून कॉंग्रेस पक्षात काम करण्यास सुरूवात केली.
बाबाज ऑर्गनायझेशन ऑफ सोशल सर्व्हीसेसमध्ये ते काम करू लागले.
त्यानंतर ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य बनले. 1999 साली बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हा ते पहील्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
त्यानंतर 2014 पर्यंत विधानसभेवर ते सलग निवडून आले. नोहेंबर 2004 ते डिसेंबर 2008 या काळात कामगार , अन्न नागरी पुरवठा आणि अन्न व औषध प्रशासनाचे ते राज्यमंत्री होते. 2014 साली बाबा सिद्दीकी यांचा भाजपच्या आशिष शेलार यांनी पराभव केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बाबा सिद्दीकी यांनी वांद्रे पश्चिमचा मतदारसंघ सोडून वांद्रे पूर्वमधून तयारी करायला सुरूवात केली. वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेचे बाळा सावंत हे आमदार होते. त्यांचं 2015 साली निधन झालं.
पोटनिवडणुकीत कॉंग्रेसकडून नारायण राणेंचा पराभव करत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या. त्यानंतर बाबा सिद्दीकी मतदारसंघापलिकडे राजकीयदृष्ट्या फारसे सक्रीय दिसत नव्हते.
2019 च्या निवडणुकीसाठी वांद्रे पूर्वचा मतदारसंघ त्यांनी बांधला. पण बाबा सिद्दीकी यांनी निवडणूक न लढवता त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.
शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण नाराज तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.
मतांच्या विभाजनामुळे आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादामुळे झिशान सिद्दीकी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत जिंकून आले. त्यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्यात आणि मातोश्रीच्या दारात कॉंग्रेसने पराभव केल्यामुळे या लढतीची जोरदार चर्चा झाली होती.
बाबा सिद्दीकी यांचं बॉलीवूड कनेक्शन
बाबा सिद्दीकी हे 15 वर्षं वांद्रे पश्चिमचे आमदार राहीले आहेत. वांद्र्यांच्या या भागात अनेक बॉलीवूड अभिनेते राहतात. दरवर्षी रमझान महिन्यात बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी ही चर्चेत असते. त्या पार्टीला राजकीय नेत्यांबरोबर निम्म बॉलीवूड हजेरी लावतं.
काही वर्षांपूर्वी अभिनेत्री कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत अभिनेता शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यात जोरदार वाद झाला.
त्यानंतर काही वर्षं ते एकमेकांशी बोलत नव्हते. पण बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीत त्यांनी दोघांना एकत्र आणलं. यावेळी या दोन्ही सुपरस्टारमध्ये समेट झाली होती. त्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची जोरदार चर्चा रंगली होती.
अजित पवार गटात प्रवेश करून सिद्दीकी यांना काय फायदा होणार?
काही दिवसांपासून सिद्दीकी कुटुंब आणि कॉंग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू होते. भाई जगताप हे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष असताना झिशान सिद्दीकी यांनी थेट राहुल गांधींकडे भाई जगताप यांची तक्रार केली होती.
माझ्या मतदारसंघात विरोधकांना बळ दिलं जात आहे. मतदारसंघातील कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून मला बोलवलं जात नसल्याचाही आरोप त्यांनी पत्र लिहून केला होता.
त्याचबरोबर भाई जगताप यांच्याकडून युवक कॉंग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी केली जात असल्याचा आरोप झिशान यांनी दिल्लीत जाऊन केला होता.
त्यावेळी भाई जगताप यांनी झिशान तरूण आमदार आहेत. त्यांचा उत्साह मी समजू शकतो, अशी प्रतिक्रीया दिली होती.
महाविकास आघाडी एकत्रितपणे लढताना आगामी विधानसभा निवडणूकीत वांद्रे पूर्वच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं समजतं आहे.
वांद्रे पूर्व याच भागात उध्दव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान आहे. अनेक वर्षं हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहीला आहे.
महाविकास आघाडी जरी एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर कॉंग्रेस आणि शिवसेनेचे वाद आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भविष्यात झिशान सिद्दीकी यांची उमेदवारी सुरक्षित राहील. बाबा सिद्दीकी यांचे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी चांगले संबध आहेत.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला हा धक्का देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर अजित पवारांच्या पक्षाकडे सध्या मुंबईमध्ये कोणताही मोठा चेहरा नाही.
बाबा सिद्दीकींच्या प्रवेशानंतर त्यांच्यावर मुंबईतील संघटनेची जबाबदारी दिली जाईल आणि त्यांच्यामार्फत बॉलिवूड, उच्चभ्रू मतदारांमध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यास मदत होऊ शकते.
'अजित पवारांना मुंबईत पक्षाच्या अस्तित्वासाठी सिद्दिकींचा फायदा'
बाबा सिद्दिकींच्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसमध्ये प्रवेशामुळे काय होऊ शकतं, यावर बोलताना वरिष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर म्हणाले की,
"राष्ट्रवादी काँग्रेसचं मुंबईतलं अस्तित्व अत्यंत कमी राहिलं आहे. अगदी शरद पवारांच्या हातात पक्ष असतानाही मुंबईत ते फारसा वाढवू शकले नाहीत. त्यामुळे बाबा सिद्दिकींनी सोबत घेतल्यास अजित पवारांना मुंबईत पक्षवाढीसाठी फायदा होईल, हे निश्चित. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील मुस्लीम चेहरा आहेत. अशावेळी मुस्लीम मतं आपल्या बाजूला करण्यात अजित पवारांना फायद्याचं ठरेल."
"दुसरं असं की, काही लोकांना भाजपसारख्या हिंदूत्ववादी पक्षात जाणं राजकीयदृष्ट्य परवडणारं नसतं. मग अशावेळी ते युतीतल्या पक्षात प्रवेश करून सोबत जातात. म्हणजे, अजित पवारांच्या पक्षात बाबा सिद्दिकी गेल्यानं अतिमत: फायदा भाजपला होणारच आहे," असंही शिवडेकर म्हणाले.
बाबा सिद्दिकी पक्षात आल्यानं अजित पवारांना लांब पल्ल्यांच्या राजकारणासाठी फायदा होऊ शकतो का, यावर बोलताना संजीव शिवडेकर म्हणाले की,
"आता लांब पल्ल्याचं राजकारण होत नाही आणि होऊही शकत नाही. कारण आज अमूक पक्षातील नेता उद्या कुठल्या पक्षात असेल, याची खात्री देता येत नाही. अशा काळात लांब पल्ल्याचं राजकारणाबाबत बोलणं फारच घाईचं होईल."
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)