You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रेयसीनं विष देऊन बॉयफ्रेंडला संपवलं; गुगल क्लाऊडच्या मदतीनं 'असं' उलगडलं हत्येचं गूढ
- Author, एस. महेश
- Role, बीबीसी तमिळ
केरळमधील न्यायालय आणि स्थानिक पोलिस सध्या देशात चर्चेचा विषय ठरले आहेत.
जीवापाड प्रेम करणाऱ्या प्रियकराला विष देऊन त्याची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील सत्र न्यायालयाने ग्रीष्मा नावाच्या 24 वर्षीय तरुणीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरुन देशभरात सध्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
ग्रीष्माने 2022 साली प्रियकर शेरॉनला विष देऊन त्याची हत्या केली होती. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे न्यायालयाने शिक्षा सुनावताना डिजिटल पुरावे ग्राह्य धरले.
पोलिसांना गुन्हा सिद्ध करण्यासाठी गुगल क्लाऊडच्या माध्यमातून मिळवलेल्या डिजिटल पुराव्यांची मोठी मदत झाली होती.
"या प्रकरणात प्रत्यक्ष पुरावे नसतानाही, परिस्थितीजन्य पुरावे आणि डिजिटल पुरावे गुन्हा सिद्ध करण्यासाठी वापरण्यात आले. त्याच्या आधारेच न्यायालयाने आरोपींना कडक शिक्षा सुनावली असल्याचे, " सरकारी वकिलांनी सांगितले.
काय आहे हे प्रकरण?
ग्रीष्मा ही कन्याकुमारी जिल्ह्यातील देवीकोडे येथील रहिवासी आहे. तिने इंग्रजी साहित्यात पदवी घेतली आहे. तर शेरॉन राज हा केरळमधील परसलाई भागात राहत होता.
कन्याकुमारीमधील एका महाविद्यालयात (जेव्हा ही घटना घडली) तो बॅचलर ऑफ रेडिओलॉजीच्या (B.Sc., Radiology) अंतिम वर्षाचे शिक्षण घेत होता, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
ग्रीष्मा आणि शेरॉन राज यांच्यात प्रेमसंबंध होते. दरम्यान, ग्रीष्माच्या आई-वडिलांनी तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय लष्करात नोकरी करणाऱ्या एका मुलाशी ग्रीष्माचा साखरपुडाही करण्यात आला. त्यामुळे ग्रीष्माने शेरॉनला आपल्यासोबतचे संबंध तोडण्यास सांगितले. मात्र, दुखावलेल्या शेरॉनने यास नकार दिला.
आई-वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेल्या ग्रीष्माला शेरॉनचा मोठा अडथळा होता. शेरॉन ऐकण्यास तयार नव्हता. भविष्यात शेरॉन आपलं वैवाहिक जीवन उद्धवस्त करु शकतो या भीतीने ग्रीष्माने शेरॉनचा खून करण्याचा कट रचला.
अखेरच शेरॉनला घरी बोलावून ग्रीष्माने जेवणातून त्याला विष दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला.
तपासात आले सत्य समोर
बीबीसी तमिळशी बोलताना या प्रकरणातील विशेष तपास पथकाचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) रशीद म्हणाले की, "सुरुवातीला परसलाई पोलिसांनी एफआयआरमध्ये अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आणि त्या दिशेने या प्रकरणाचा तपास सुरू केला.
पण, शेरॉनच्या नातेवाईकांनी त्याच्या मृत्यूप्रकरणी ग्रीष्मावर संशय व्यक्त केला होता.
ते म्हणाले, "हे प्रकरण नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली."
उलटतपासणीदरम्यान ग्रीष्माने सर्व सत्य सांगितल्याचे डीएसपी रशीद यांनी म्हटले. पोलिसांच्या चौकशीत तिला हे प्रकरण लपवता आले नाही.
ग्रीष्माच्या आई आणि मामाची चौकशी केली असता शेरॉनवर विषप्रयोग झाल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली.
पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
दरम्यान पोलीस कोठडीत असताना ग्रीष्माने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. डीएसपी रशीद म्हणाले की, "ग्रीष्माला नेडूमनकाडून पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावेळी तिने टॉयलेट लिक्विड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता."
रशीद पुढे म्हणाले की, "ग्रीष्माने नंतर कबुली देत सर्व घटनाक्रम न्यायाधीशांना सांगितला. माझे आणि शेरॉन राजचे एकमेकांवर प्रेम होते.
परंतु, आई-वडील माझे लग्न दुसरीकडे करुन देणार असल्याचे समजल्यावर मी त्याला ब्रेकअप करण्यास सांगितले. शेरॉनने यासाठी नकार दिला. त्यामुळे त्याला विष देऊन ठार मारले, असा कबुलीजबाब तिने दिला."
ग्रीष्माने सांगितलेल्या सर्व घटनांचे पुरावे गोळा करून ते न्यायालयात सादर केले, असे डीएसपी रशीद यांनी सांगितले.
मोबाइल डेटा डिलीट केला
या प्रकरणात सरकारी वकील व्ही.एस. विनीतकुमार यांनी बीबीसी तमिळशी संवाद साधला. ते म्हणाले, "या प्रकरणात कोणताही थेट पुरावा नसणे हे आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. त्यामुळे आम्ही डिजिटल, तांत्रिक आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या मदतीने परिस्थितीजन्य पुरावे एकत्र करून न्यायालयात हा खटला सिद्ध केला."
"यापूर्वी एकदा ग्रीष्माने ज्यूसमध्ये पॅरासिटमॉलच्या 50 गोळ्या मिसळून ते शेरॉनला पिण्यास दिले होते. परंतु, शेरॉनने ज्यूसची चव कडवट लागल्याने ते घेतले नव्हते. त्यामुळे तो त्यादिवशी बचावला होता.
हत्येचा हा प्रयत्न करण्यापूर्वी ग्रीष्माने तिच्या मोबाईल फोनवर याबाबतची माहिती शोधली होती. पोलीस तपासात ही गोष्ट महत्त्वाची ठरली", असे विनितकुमार यांनी सांगितले.
त्यानंतर ग्रीष्माने आणखी एक योजना आखली आणि शेरॉनला घरी बोलावले. घरी तिने शेरॉनला एक आयुर्वेदिक टॉनिक पिण्यास दिले. यामध्ये ग्रीष्माने विषारी पदार्थ घातले होते.
हे टॉनिक पिताच शेरॉनला त्रास होऊ लागला. त्याला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्याला उपचारासाठी तिरुअनंतपूरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले.
त्याची प्रकृती बिघडत गेली. त्याच्या शरीरातील एक-एक अवयव निकामी होते गेले. अखेरीस 25 ऑक्टोबर 2022 मध्ये त्याचा मृत्यू झाला.
"शेरॉनचा मृत्यू झाल्याचे समजताच पोलीस चौकशी करायला येतील या भीतीने ग्रीष्माने आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केला. मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवता येतो का हेही तिने सर्च इंजिनवर शोधून पाहिले," असं विनीतकुमार म्हणाले.
पोलिसांनी ग्रीष्माचा मोबाईल तपासला. मात्र त्यातील सर्व डेटा डिलिट केल्याचे त्यांना दिसून आले.
पोलिसांनी तिचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आणि गुगल क्लाउड डेटामध्ये रेकॉर्ड असलेली सर्व माहिती रिकव्हर केली."
ग्रीष्माच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप चॅट्स, व्हिडिओ कॉल्स, सर्च इंजिनचा डेटा आदी सर्व गोष्टी जप्त करून डिजिटल पुरावा म्हणून न्यायालयात सादर करण्यात आले.
"शेरॉनने घटनेच्या दिवशी ग्रीष्माच्या घरी भेट दिली होती हे त्या दिवशीच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज आणि दोघांमधील व्हॉट्सॲप संभाषण हे पुरावे म्हणून घेण्यात आले.
त्याचबरोबर दोघांनी वापरलेले पेन ड्राइव्ह, हार्ड डिस्क आणि सीडीमध्ये असलेली माहिती डिजिटल पुरावा आणि इतर परिस्थितीजन्य पुराव्यांद्वारे ग्रीष्माने हत्याचे केल्याचे आम्ही न्यायालयात सिद्ध केले," असे वकील विनीतकुमार यांनी सांगितले.
पोलीस-सरकारी वकिलांची आव्हानात्मक कामगिरी
"शेरॉनला ग्रीष्माने विष दिल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले. परंतु, शवविच्छेदनात मृत शेरॉनने विष प्राशन केल्याचा कोणताही पुरावा दिसला नाही," असे विनीतकुमार म्हणाले.
"उपचारासाठी दाखल केल्यानंतर शेरॉनचा 11 दिवसांत मृत्यू झाला. उपचारादरम्यान त्याचे तीन वेळा डायलिसिस करण्यात आले होते.
यामुळे, त्याचे रक्त पूर्णपणे शुद्ध झाले होते आणि त्याच्या शरीरात विषाचे कोणतेही घटक राहिले नव्हते," असे विनीतकुमार यांनी सांगितले.
या सर्व गोष्टी आम्ही परिस्थितीजन्य पुराव्यासह न्यायालयात स्पष्ट केल्या, असेही ते म्हणाले.
500 पानांचा निकाल
20 जानेवारी 2025 रोजी दिलेल्या निकालात तिरुअनंतपुरम जिल्हा नियांट्टिकराई अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम. बशीर यांनी ग्रीष्माला मृत्युदंड आणि तिचे मामा निर्मल कुमारन नायर यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली.
निकालात न्यायाधीशांनी पोलिसांच्या तपासाचे कौतुक केले.
आपल्या निकालात न्यायाधीश म्हणाले, "या प्रकरणातील पीडित शेरॉन राज आणि मारेकरी ग्रीष्मा हे दोघे समवयीन होते. शेरॉनचे ग्रीष्मावर खूप प्रेम होते. त्याने तिच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. परंतु, ग्रीष्माने त्याचा विश्वासघात केला.
जेव्हा शेरॉन मृत्यूशय्येवर होता, तेव्हा त्याने न्यायाधीशांसमोर त्याची ग्रीष्माविरोधात कोणतीही तक्रार नाही असा जबाब नोंदवला होता. त्याला ग्रीष्माला शिक्षा होऊ नये असे वाटले होते. हा एक अत्यंत घृणास्पद असा गुन्हा आहे. एका निष्पाप तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे."
"विषबाधेमुळे मूत्रपिंड, यकृत आणि फुफ्फुसांसह शेरॉनचे सर्व अंतर्गत अवयव निकामी झाले होते. त्याच्या सर्वांगाला असह्य वेदना होत होत्या. रुग्णालयातील 11 दिवसांत त्याला पाण्याचा थेंबही घेता आला नाही.
एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या शुद्ध आणि निःस्वार्थ प्रेमाची हत्या झाली, "असे मत न्या. बशीर यांनी नोंदवले.
या प्रकारामुळे संपूर्ण समाजाच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ मानून ग्रीष्माला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
'आईची प्रार्थना पूर्ण झाली'
मृत शेरॉनचे भाऊ डॉ. शिमोन राज बीबीसीशी बोलताना म्हणाले, " दोषीला फाशी मिळावी, हीच आमची इच्छा होती. खटल्याचा निकाल आमच्या अपेक्षेनुसार लागला. याचा आम्हाला आनंद झाला आहे. निकाल ऐकल्यानंतर आईला मोठा दिलासा मिळाला आहे."
"माझा भाऊ आता आमच्यासोबत नाही, हे आम्ही कधीच विसरु शकणार नाही. पण दोषीला फाशीची शिक्षा झाली आहे, ही खूप मोठी दिलासादायक गोष्ट आहे," असेही ते म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.