You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संतोष देशमुख हत्या : सुदर्शन घुलेसह 8 जणांवर 'मकोका', पाहा आरोपींची संपूर्ण यादी
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, प्रतिनिधी, बीबीसी मराठी
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एकूण आठ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
यात मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचाही समावेश आहे.
कोर्टानं आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कुणा-कुणावर 'मकोका'अंतर्गत कारवाई होणार?
1) सुदर्शन घुले
2) सुधीर सांगळे
3) कृष्णा आंधळे
4) जयराम चाटे
5) महेश केदार
6) प्रतीक घुले
7) विष्णू चाटे
8) सिद्धार्थ सोनवणे
'मकोका' कायदा काय आहे?
महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलेला कायदा म्हणजेच 'मकोका' होय. पूर्वी असलेल्या टाडा कायद्यात काही बदल करून तो नव्या स्वरुपात मकोका कायदा म्हणून महाराष्ट्रात आणला गेला.
1999 साली शिवसेना-भाजपच्या सरकारने हा कायदा मंजूर करून घेतल्यानंतर 24 फेब्रुवारी 1999 रोजी तो राज्यभरात अंमलात आला.
संघटित स्वरुपातील गुन्हे करणाऱ्या टोळींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. यामध्ये खून, खंडणी, अपहरण, अंमली पदार्थांची तस्करी, हप्तेवसुली, सुपारी देणे, अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो.
मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांचा गट हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची टोळी असावी लागते. यामध्ये एकट्याने किंवा सर्वांनी एकत्रितपणे टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हा केल्यास हा कायदा लागू होतो. मकोका लावण्यासाठी संबंधित टोळीतील सदस्यांवर गेल्या 10 वर्षांत एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणे गरजेचे आहे.
'मकोका'ची कारवाई केलेला खटला हा विशेष कोर्टात चालविला जातो. भारतीय दंड विधान संहितेअंतर्गत देण्यात येणारी शिक्षाच मकोका कायद्यांअंतर्गत लागू होते.
कमीत कमी पाच वर्षे ते जन्मठेप अशा स्वरुपात या शिक्षा असू शकतात. मकोका सिद्ध झालेल्या आरोपीवर 5 लाखांपर्यंत दंडही लावता येऊ शकतो.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. तसंच या प्रकरणी नुकताच सर्वपक्षीय मूक मोर्चाही काढण्यात आला होता.
सुदर्शन घुलेलं कसं पकडलं?
सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोन्ही आरोपींना पुण्यात अटक केली खरी, पण त्याचा सुगावा पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलेल्या एका डॉक्टरमुळे लागला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली.
बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेंच्या अटकेनंतर काय माहिती दिली, हे आधी आपण पाहूया.
बीड पोलीस अधीक्षकांच्या माहितीनुसार, "गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यातले, तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते. त्यांनी डॉ. संभाजी वायभसे याचेकडे चौकशी करून गोपनीय माहितगार नेमून, तसेच तांत्रिक कौशल्याचा उपयोग करून, सुदर्शन चंद्रभान घुले (वय 26 वर्षे) आणि सुधीर सांगळे (वय 23 वर्षे) यांना ताब्यात घेतलं आहे."
या दोघांनाही बीडच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) चे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांच्याकडे पुढील तपासासाठी सोपवण्यात आल्याचीही माहिती बीड पोलीस अधीक्षकांनी दिली.
सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे हे दोघेही बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचे रहिवासी आहेत.
बीड पोलीस अधीक्षकांच्या अधिकृत माहितीत एक नाव समोर येतं, ते म्हणजे डॉ. संभाजी वायभसे. याच डॉ. वायभसेंमुळे बीड पोलिसांच्या हाती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे लागले.
डॉक्टर वायभसेंच्या चौकशीतून धागेदारे हाती
संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आलं होतं. या एसआयटीनेच डॉ. संभाजी वायभसे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. हे डॉ. वायभसे हे मुकादम असल्याचेही समोर आले आहे.
एसआयटीचे प्रमुख पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी केजमध्ये डॉ. संभाजी वायभसे यांची जवळपास दोन तासांहून अधिक वेळ चौकशी केली.
या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेला पळून जाण्यासाठी डॉ. संभाजी वायभसे यांनीच मदत केल्याचा आरोप आहे. डॉ. संभाजी वायभसे आणि सुदर्शन घुले या दोघांमध्ये संबंध असल्याचे समोर आले आहे. किंबहुना, व्यवसायामध्ये हे दोघेजण भागीदार असल्याचे देखील समोर आले आहे.
लोकेशन सांगणाराही ताब्यात
सरपंच संतोष देशमुख केजवरून मस्साजोगच्या दिशेने निघाल्याचं लोकेशन देणाऱ्या सिद्धार्थ सोनवणे यालाही एसआयटीनं ताब्यात घेतलं आहे.
सरपंच संतोष देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख त्यांच्या स्वतःच्या गाडीतून केजवरून मस्साजोगकडे जात असताना, हे दोघे मस्साजोगला जात असल्याची माहिती सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना दिल्याचा संशय आहे.
याच संशयावरून सिद्धार्थ सोनवणे याला संशयिताला एसआयटी आणि सीआयडीने ताब्यात घेतलं आहे. सध्या सिद्धार्थ सोनवणे याची चौकशी केली जात आहे.
वाल्मिक कराडलाही पुण्यातूनच अटक
यापूर्वी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात 31 डिसेंबर रोजी शरण आले. सीआयडी कार्यालयातच त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांना केजला पाठवण्यात आलं.
वाल्मिक कराड यांना केजच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी झालेल्या सुनावणीनंतर वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडीचे पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरला दुपारी 12.30 वाजण्याच्या दरम्यान वाल्मिक कराड स्वतःहून सीआयडीच्या मुख्यालयात हजर झाले. त्यांची तिथं थोडीफार चौकशी करून, त्यांना तपासी अंमलदारांच्या ताब्यात दिलं आहे. वाल्मिक कराड यांना बीडला रवाना केलं गेलं.
अनिल गुजर हे बीडचे सीआयडीचे डीवायएसपी असून, त्यांच्या ताब्यात वाल्मिक कराड यांना देण्यात आल्याची माहिती सारंग आव्हाड यांनी दिली होती.
पुणे सीआयडीसमोर शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड यांनी व्हीडिओ जारी केला होता.
त्यात त्यांनी म्हटलं, "केज पोलिस स्टेशनला खोटी फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्व जामिनीचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे."
कराड पुढे म्हणाले, "संतोष देशमुख यांच्या मारेकरांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पुढील तपासात मी दोषी दिसलो तर न्यायालय जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे."
वाल्मिक कराड कोण आहेत?
वाल्मिक कराड हे मूळचे बीडच्या परळी तालुक्यातील पांगरी गावचे रहिवाशी आहेत. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी ते परळीत आले. उपजिविकेसाठी कधीकधी ते जत्रेत सिनेमे दाखवायचे.
पुढे गोपीनाथ मुंडेंच्या घरात वाल्मिक कराड घरगडी म्हणून दूध, भाजीपाला, किराणा आणण्याची कामं करू लागले.
गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत गेले.
वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक, परळी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आणि माजी गटनेता, नाथ प्रतिष्ठानचे सदस्य, बीड जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि गेल्या 10 वर्षापासून परळी मतदारसंघातील धनंजय मुंडेंच्या राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
बीडमधील पोलीस ठाण्यात खंडणीशी संबंधित गुन्हा वाल्मिक कराड यांच्याविरोधात दाखल आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)