You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियकराच्या मदतीनं पतीला मारून बेपत्ताची तक्रार दिली, पण 'या' एका चुकीनं भांडाफोड
- Author, मुश्ताक खान
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Reporting from, रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत विवाहबाह्य संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि त्यानंत पती बेपत्ता झाल्याचा बनाव रचला. किंबहुना, पती बेपत्ता असल्याची तक्रारही पत्नीने पोलीस ठाण्यात दिली. मात्र, पोलिसांना संशय आला आणि हा गुन्हा उघड झाला.
दापोलीच्या गिम्हवणे गावातील ही घटना असून, आरोपी पत्नीचं नाव नेहा बाकर, तर पीडित पतीचं नाव निलेश बाकर आहे. या घटनेने दापोलीमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपी पत्नी नेहा बाकर आणि तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. मंगेश चिंचघरकर हा दापोलीतल्याच पालगड येथील रहिवासी आहे.
14 जानेवारी 2025 रोजी दापोली तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे राहणाऱ्या नेहा बाकरने तिचा पती निलेश दत्ताराम बाकर हा बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यामध्ये दिली.
या तक्रारीवरून पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू केला. चौकशीत नेहा बाकरने ती ज्या हॉटेलमध्ये काम करते, तेथून रात्री 11.30 वाजता घरी आल्याचं पोलिसांना सांगितलं.
पोलीस तपास केला असता आरोपी नेहा बाकरने कामावरून निघाल्याची वेळ आणि घरी येण्याची वेळ याबाबत पोलिसांना दिलेली माहिती आणि प्रत्यक्षातील तपशील यामध्ये तफावत दिसून आली.
दुसरीकडे बेपत्ता झालेल्या निलेश बाकरचा मोठा भाऊ दिनेश दत्ताराम बाकर यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी वहिनीवर (नेहा बाकर) संशय व्यक्त केला.
आरोपी पत्नीने कबुली जबाबात नेमकं काय सांगितलं?
यानंतर पोलिसांनी बेपत्ता व्यक्तीची पत्नी नेहा बाकरचा अधिक तपास केला. या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या.
नेहा बाकरने तिचा प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर याच्याशी संगनमत करत निलेश बाकरला हर्णे-बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं. तिथे निलेश बाकर यांना मोठ्या प्रमाणात दारू सेवन करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली.
हत्येनंतर मृतदेह चारचाकी गाडीतून पालगडमधील पाटील वाडी येथे नेला. तिथे मृतदेहाला चारचाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून रस्त्या लगतच्या विहिरीत टाकण्यात आला.
या खूनाशी आपला संबंध जोडला जाऊ नये यासाठी पत्नी नेहाने स्वतः पती निलेश बाकर बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
आरोपीची पार्श्वभूमी काय?
आरोपी मंगेश चिंचघरकर हा एसटी महामंडळाचा कर्मचारी आहे. तो मंडणगड डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत आहे.
या गुन्ह्याच्या उलगड्यनंतर त्याचं निलंबन अद्यापही झालं नसलं, तरी मंडणगड डेपो मॅनेजर यांनी त्याच्या संदर्भातील अहवाल जिल्हा वाहतूक नियंत्रण कक्षाकडे पाठवला आहे.
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?
गुन्ह्याचा उलगडा कसा झाला यावर बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले, "दापोली पोलीस ठाणे येथे 14 जानेवारीला निलेश दत्ताराम बाकड हरवल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. तपासात हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. त्यात पोलिसांना संशय आला.
"पत्नीचा संशय आल्यानंतर पोलिसांनी काही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून जी माहिती समोर आली, त्यावरून हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीची अधिक खोलात जाऊन चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्या महिलेने विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने मित्राच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचं कबूल केलं. तसेच, मृतदेहाच्या कंबरेला लोखंडी पाटा बांधून पालगड येथील एका विहिरीत टाकल्याचंही नमूद केलं."
"आरोपी महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पालगड येथील विहिरीतून एक मृतदेह बाहेर काढला. संबंधित महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेड उपविभागीय पोलीस अधिकारी भगुजी औटी, पोलीस निरीक्षक विवेक अहीरे व पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने निलेश दत्ताराम बाकर यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.
दापोली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238, 3 (5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)