आधी भारतात, फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये; नुसरत फतह अली खान कव्वालीला सर्वोच्च शिखरावर नेणारा आवाज कसे बनले?

नुसरत फतह अली खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुसरत फतह अली खान
    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी

नुसरत फतह अली खान... काळ-वेळ, जात-धर्म, देशाच्या सीमा ओलांडणारे गायक.

काही लोक त्यांना 'पूर्वेचा एल्विस प्रेस्ली' म्हणत, तर काहींनी त्यांना 'पाकिस्तानचे बॉब मार्ली' अशीही उपाधी दिली.

प्रसिद्ध गायक पीटर गॅब्रिएल यांनी त्यांच्याबद्दल म्हटलं होतं की, "मला कोणत्याही आवाजात इतकी अंतरात्म्याची अनुभूती कधी जाणवली नाही. नुसरत फतह अली खान यांचा आवाज हे एक असं उदाहरण आहे की, एक सखोल, गहिरा आवाज अंतरात्म्याला किती खोलवर स्पर्श करू शकतो आणि हलवू शकतो."

फ्रेंच लेखक पियर एलेन बॉड आपल्या पुस्तकात 'नुसरत : द व्हॉइस ऑफ फेथ' मध्ये लिहितात की, एक भारदस्त व्यक्ती, रंगमंचावर मांडी घालून बसलेली आहे, त्याचे बाहू पसरलेले आहेत. जणू तो परमात्म्याशी संवाद साधत आहे. जपानमधील लोक त्याला 'गाणारा बुद्ध' म्हणतात, लॉस एंजेलिसमध्ये त्याला 'स्वर्गाचा आवाज', पॅरिसमध्ये 'पूर्वेचा पावारोत्ती', आणि लाहोरमध्ये 'शहंशाह-ए-कव्वाली' म्हणून ओळखले जाते.

पियर एलेन बॉड लिखीत 'नुसरत: द व्हॉइस ऑफ फेथ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, पियर एलेन बॉड लिखीत 'नुसरत: द व्हॉइस ऑफ फेथ' या पुस्तकाचे मुखपृष्ठ

नुसरत हे प्रत्येक अर्थाने सामान्य माणसांपासून वेगळे होते. भारदस्त देहयष्टी, वरच्या पट्टीत अगदी टिपेला पोहोचत सुरांवर अधिराज्य गाजवणारा आवाज, प्रकाशित झालेले शेकडो अल्बम्स आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी चाहत्यांचे प्रेम.

हार्मोनियम आणि तबल्याचा रियाज

नुसरत यांचे पाकिस्तानी चरित्रकार अहमद अकील रुबी यांच्या मते, त्यांच्या घराण्याची किमान नऊ पिढ्यांची वंशावळ उपलब्ध आहे.

नुसरत यांचे आजोबा मौलाबख्श हे त्यांच्या काळातील अतिशय प्रसिद्ध कव्वाल होते. त्यांचे वडील फतह अली आणि काका मुबारक अली हे फाळणीपूर्व भारतातील नामांकित कव्वालांपैकी गणले जात होते.

फाळणीनंतर त्यांनी जालंधरहून लाहोर येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

नुसरत फतह अली खान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुसरत फतह अली खान

13 ऑक्टोबर 1948 रोजी फतह अली यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला, तो मुलगा म्हणजे नुसरत फतह अली खान. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुलगा डॉक्टर व्हावा, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक त्याला संगीताच्या वातावरणापासून दूर ठेवले

मात्र, ते कसे ठेवता आले नाही, याचा एक लोकप्रिय किस्सा आहे

एकदा नुसरत हार्मोनियम वाजवायचा प्रयत्न करत होते. त्यांना माहिती नव्हतं की, त्यांचे वडील फतह अली यांनी हळूवार पावलांनी खोलीत प्रवेश केला आहे.

जेव्हा त्यांनी हार्मोनियम वाजवणं थांबवलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं की वडील आपल्यामागे उभे आहेत.

फतह अली हसले आणि म्हणाले की, तू हार्मोनियम वाजवू शकतोस, पण अट अशी आहे की यामुळे तुझ्या अभ्यासावर परिणाम होता कामा नये. यानंतर नुसरत यांनी हार्मोनियमसोबत तबल्याचाही रियाज सुरू केला.

जेव्हा अप्रतिम तबला वाजवला...

नुसरतने इतकं अप्रतिम तबला वाजवला की, त्यानंतर फतह अली यांनी आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्याचा आग्रह सोडून दिला आणि ठरवलं की आता त्यांचा मुलगा लोकांच्या जखमी मनांवर संगीताचं औषध लावणार.

यानंतर फतह अली यांनी आपल्या मुलाला संगीतातील बारकावे शिकवण्यास सुरुवात केली. पण त्यांना फार काळ शिकवता आलं नाही,कारण 1964 साली गळ्याच्या कर्करोगामुळे त्यांचे निधन झाले. त्यावेळी नुसरत हायस्कूलची परीक्षा देत होते.

अजमेर शरीफ, जिथे नुसरत फतह अली खान यांनी कव्वाली गायली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अजमेर शरीफ, जिथे नुसरत फतह अली खान यांनी कव्वाली गायली होती

1996 साली नुसरत यांच्यावर एक टीव्ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आली होती. त्या मुलाखतीत त्यांनी आठवण सांगितली होती की, "वडिलांच्या जाण्यानंतर मला काहीच कळत नव्हतं की मी काय करावं. एके दिवशी मी स्वप्नात पाहिलं की, माझे वडील मला एका ठिकाणी घेऊन गेले आणि म्हणाले, गाणं सुरू कर.' मी म्हणालो, 'मी गाऊ शकत नाही.' ते म्हणाले, 'माझ्यासोबत गा.' मी त्यांच्यासोबत गाणं सुरू केलं आणि जेव्हा मी झोपेतून जागा झालो, तेव्हा मी पाहिलं की मी खरोखरच गात होतो."

नुसरत यांनी हे स्वप्न आपल्या काका मुबारक अली यांना सांगितलं आणि त्या ठिकाणाचं वर्णनही केलं, जे त्यांनी स्वप्नात पाहिलं होतं. हे ऐकताच मुबारक अली म्हणाले, "ही तर अजमेर शरीफची जागा आहे, जिथे तुझे वडील आणि आजोबा नेहमी गायचे."

काही वर्षांनंतर जेव्हा नुसरत यांना अजमेरला जाण्याची संधी मिळाली, तेव्हा लोक सांगतात की, त्यांनी ती जागा तत्क्षणी ओळखली आणि ज्या ठिकाणी त्यांनी स्वप्नात स्वतःला गाताना पाहिलं होतं, त्या ठिकाणी बसून त्यांनी गायन केलं.

भारतामध्ये पहिल्यांदा राज कपूरकडून आमंत्रण

वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका मुबारक अली यांनी नुसरत यांना गायकी शिकवण्याची जबाबदारी घेतली.

अहमद अकील रुबी लिहितात की, "फतह अली यांनी आपल्या मुलाची तयारी तशीच केली जशी एक माळी बी पेरण्याआधी जमीन तयार करतो, पण मुबारक अली यांनी त्याची जोपासना तशी केली जशी माळी नव्याने उगवलेल्या एका रोपट्याची काळजी घेतो."

पाकिस्तानच्या बाहेर नुसरत फतह अली खान पहिल्यांदा जर कुठे गायले असतील तर ते भारतातच.

1979 साली राज कपूर यांनी त्यांना आपल्या मुलगा ऋषी कपूर यांच्या लग्नात गाण्यासाठी खास निमंत्रण दिलं होतं.

राज कपूर यांनी नुसरत फतह अली खान यांना मुलगा ऋषी कपूर यांच्या लग्नात गाण्यासाठी खास निमंत्रण दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज कपूर यांनी नुसरत फतह अली खान यांना मुलगा ऋषी कपूर यांच्या लग्नात गाण्यासाठी खास निमंत्रण दिलं होतं.

अमित रंजन यांनी 3 सप्टेंबर 2007 रोजी 'आउटलूक' मासिकात प्रकाशित 'म्युझिक हिज दरगाह' या आपल्या लेखात नुसरत यांचे तबलावादक दिलदार हुसेन यांचे म्हणणे उद्धृत केले आहे. 'सुरुवातीला लोक आले, पण फारसं लक्ष न देता निघून गेले. मात्र, थोड्या वेळानंतर त्यांच्या गायकीचा जादू दिसू लागली. आम्ही रात्री दहा वाजता मैफलीची सुरुवात केली होती, जी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होती. नुसरत यांनी सलग अडीच तास 'हल्का हल्का सुरूर' गायले आणि लोकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले.

याच भारत भेटी दरम्यान नुसरत यांनी अजमेर शरीफ येथे ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर गायन करण्याची आणि आपल्या तारुण्यात पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्या वेळी पहिल्यांदाच एका परदेशी कव्वालला दर्ग्यामध्ये गाण्याची परवानगी देण्यात आली.

जगभरातून गाण्याची निमंत्रणं

नुसरत यांना 1981 साली ब्रिटनमध्ये गाण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या ऐकणाऱ्यांमध्ये सर्व धर्माच्या आणि समुदायाच्या रसिकांचा समावेश होता. तिथे त्यांनी गुरुद्वाऱ्यामध्ये कार्यक्रम केले, जिथे त्यांनी गुरु ग्रंथ साहबमधील रचनाही गाऊन दाखवल्या.

आपल्या वडिलांसारखेच त्यांनी पंजाबमधील सूफी संत बुल्ले शाह, बाबा फरीद आणि शाह हुसैन यांच्या रचना सादर केल्या. जशी जशी त्यांची प्रसिद्धी वाढत गेली, तशी तशी त्यांनी नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांमधून निमंत्रित केले गेले.

नुसरत फतह अली खान

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, नुसरत फतह अली खान

ते नियमितपणे खाडी देशांमध्येही जाऊ लागले, जिथे मोठ्या संख्येने पाकिस्तानी आणि भारतीय लोक राहत होते. 1988 साली त्यांची कव्वाली 'अल्लाह हू' ने संपूर्ण जगभर लोकप्रियतेचे शिखर गाठले.

सुरुवातीला ते जलालउद्दीन रूमी, अमीर खुसरो आणि बुल्ले शाह यांच्या रचना गात होते, परंतु नंतर त्यांनी आधुनिक काळातील शायरांच्या रचनांनाही आपला आवाज दिला.

प्रसिद्ध संगीत समीक्षक पीटर गॅब्रिएल यांनी त्यांच्याबद्दल म्हटलं की, 'जेव्हा मी त्यांचं संगीत ऐकतो, तेव्हा माझ्या मानेच्या मागे मला कंपनासारखं जाणवतं.'

प्रसिद्ध गायक मिक जॅगरदेखील नुसरत यांचे चाहते

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान देखील नुसरत फतह अली खान यांच्या चाहत्यांपैकी एक आहेत.

एशिया वीकला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं, "जेव्हा मी नुसरत यांना ऐकतो, तेव्हा मला आध्यात्मिक अनुभूती येते. 1992 चा विश्वचषक जिंकल्यानंतर आम्ही आपले मनोधैर्य वाढवण्यासाठी नुसरत फतह अली खान यांच्या गाण्याच्या कॅसेट ऐकायचो."

इमरान खान यांच्या आईच्या नावाने असणाऱ्या शौकत खान मेमोरियल हॉस्पिटलसाठी निधी जमा करण्याकरता नुसरत यांनी जगभरात कव्वालीचे कार्यक्रम केले.

नुसरत फतह अली खान यांच्या संगीत कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक मिक जॅगर यांनीही हजेरी लावली होती

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, नुसरत फतह अली खान यांच्या संगीत कार्यक्रमाला प्रसिद्ध गायक मिक जॅगर यांनीही हजेरी लावली होती

इमरान खान नुसरत यांच्याबद्दल एक आठवण सांगतात की, "मी लंडनमध्ये नुसरतच्या एका शोमध्ये प्रसिद्ध गायक मिक जॅगर यांना आमंत्रित केले होते. त्यांनी सांगितले की ते खूप व्यस्त आहेत, म्हणून फक्त पाच मिनिटांसाठी येऊ शकतात. जेव्हा मी नुसरत यांना हे सांगितले, तेव्हा त्यांनी म्हटले 'जर मिक आले, तर ते शो संपेपर्यंत उठणार नाहीत.' आणि अगदी तसेच झाले."

मिक जॅगर आले आणि नुसरतच्या आवाजाने इतके प्रभावित झाले की, ते पूर्ण तीन तास तिथेच बसले आणि गायन ऐकले.

इमरान खान यांनी सांगितले की नुसरत यांनी या कार्यक्रमांसाठी त्यांच्याकडून कधीही पैसे घेतले नाहीत.

काही चित्रपटांमध्ये गायन

नुसरत यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाण्यांना आपला आवाज दिला. त्यांना भारतीय चित्रपट खूप आवडत होते. त्यांनी राहुल रवेल च्या चित्रपट 'और प्यार हो गया' मध्ये गायन केले. त्याचबरोबर त्यांनी जावेद अख्तर यांच्यासोबत 'संगम' नावाचा अल्बमही काढला.

शेखर कपूर यांच्या 'बँडिट क्वीन' या चित्रपटाचे संगीतकार नुसरत फतह अली खान होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शेखर कपूर यांच्या 'बँडिट क्वीन' या चित्रपटाचे संगीतकार नुसरत फतह अली खान होते.

जावेद अख्तर यांनी त्यांच्यासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत सांगतात की , "नुसरत यांनी बनवलेल्या चाली ऐकून कधीच वाटत नाही की त्या बनवलेल्या आहेत. असं वाटतं जणू त्या थेट हृदयातून निघाल्या आहेत. त्यांच्यासाठी संगीत ही साधना होती. ते गाताना बर्‍याच वेळा साधनेसारखे तल्लीन होऊन जात."

नुसरत यांनी शेखर कपूर यांच्या चर्चित चित्रपट 'बँडिट क्वीन' साठीही संगीत दिले. त्या वेळी शेखर कपूर यांनी म्हटले होते की, "नुसरतसोबत काम करणं म्हणजे देवाजवळ जाण्यासारखं होतं."

परदेशात नाम कमावल्यानंतर आपल्या देशात सन्मान

1986 साली पाकिस्तानचे राष्ट्रपती जनरल झिया-उल-हक यांनी नुसरत यांना एका खासगी मैफलीसाठी आमंत्रित केले. झिया कट्टरपंथी मुस्लीम होते, ज्यांचा संगीताबाबत फारसा सकारात्मक दृष्टिकोन नव्हता.

पाकिस्तानचे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ आणि नुसरतचे मित्र एडम नैयर यांनी लिहिले होते की, "असं सांगितलं जात होतं की नुसरत यांना जनरल झिया यांची कन्या झैनच्या स्पीच-थेरपीसाठी बोलावलं होतं, जिला बोलण्यात अडचण होती. या चर्चेला तेव्हा चांगलंच बळ मिळालं जेव्हा नुसरत आणि झैनवर उपचार करणाऱ्या मानसशास्त्रज्ञ दोघांनाही राष्ट्रपतींच्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं."

नुसरत फतह अली खान

फोटो स्रोत, Getty Images

विशेष गोष्ट म्हणजे, परदेशात प्रसिद्धी मिळाल्यानंतरच नुसरत यांना आपला देश पाकिस्तानमध्ये सन्मान मिळायला सुरुवात झाली.

त्यांनी एका मुलाखतीत एडम नैयर यांना सांगितले होते की, 'आपल्या फैसलाबादमध्ये खूप चांगले कपडे तयार होतात, पण लोक ते तेव्हाच खरेदी करतात जेव्हा त्यावर 'मेड इन जपान' असे लेबल लागते. मी इथल्या उच्चवर्गासाठी फैसलाबादच्या त्या कपड्यासारखाच आहे.'

सिएटल विद्यापीठात संगीताचे अध्यापन

सप्टेंबर 1992 ते मार्च 1993 पर्यंत नुसरत फतह अली खान यांनी अमेरिकेच्या सिएटल विद्यापीठात संगीत शिकवले.

त्यांना जवळून ओळखणाऱ्या कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या प्राध्यापिका हिरोमी लॉरेन सकाता यांनी आपल्या 'रिमेंबरिंग नुसरत' या लेखात असे लिहिले की, "सिएटलमध्ये त्या काळात नुसरत टी-शर्ट आणि बूट घालून दिसत होते. अनेकदा त्यांना स्थानिक भारतीय आणि पाकिस्तानी किराणा दुकानातून खरेदी करताना पाहिले जात असे. अनेक वेळा इतर ग्राहक त्यांना ओळखून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असत."

नुसरत फतह अली खान आणि प्रोफेसर हिरोमी लॉरेन सकाता

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, नुसरत फतह अली खान आणि प्रोफेसर हिरोमी लॉरेन सकाता

त्यांचे पाच बेडरूमचे घर नेहमी त्यांच्या मित्रांनी, चाहत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी भरलेले असायचे.

नुसरत यांना येथील ते काहीसे अनोळखी जगणं आवडत होतं, कारण येथे ते सर्व काही करू शकत होते ज्याती पाकिस्तानमध्ये त्यांनी कधी कल्पनाही केली नसती. ते आठवड्यात तीन दिवस शिकवायचे आणि उरलेल्या दिवसांत अमेरिकेमधील विविध शहरांमध्ये शो करायचे.

गायनाची कक्षा रुंदावली

संपूर्ण जगभर आणि पाकिस्तानमध्ये गाण्याच्या अनुभवानंतर नुसरत यांनी आपल्या गायकीचा आणखी विस्तार केला.

एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, "सुरुवातीला मी माझ्या वडिलांसारखा आणि काकांसारखा शुद्ध शास्त्रीय संगीत गात होतो. नंतर मी त्यात थोडी मोकळीक घेण्यास सुरुवात केली आणि लोकसंगीत व सुगम संगीतही माझ्या गायनात सामील केले. मी जाणीवपूर्वक अतिशय गहन शास्त्रीय रचना सोपी केली, जेणेकरून सामान्य लोकांनी ती कळू शकेल. त्यानंतर मी रोमँटिक गाणीही गायला सुरुवात केली."

नुसरत फतह अली खान

फोटो स्रोत, Getty Images

पण हे सगळं सुरु असतानाच अनेक वर्षे सतत गाण्यामुळे नुसरत यांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होत होता. शिस्तीचा अभाव असलेल्या त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांचे आधीच नाजूक झालेले आरोग्य आणखी बिघडले.

1993 साली अमेरिकेत झालेल्या वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांना समजले की त्यांना अनेक वेळा हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते, ज्याची त्यांना जाणीवही झाली नव्हती. त्यांच्यावर मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रिया करून अनेक खडे काढण्यात आले.

हृदयविकारामुळे निधन

लाहोरमध्ये नुसरत खूप व्यस्त जीवन जगत होते. त्यांना अनेक सूफी दर्गा आणि खास मैफलींसाठी गायन करण्यासाठी बोलावलं जात असे. त्यांना त्यांच्या पत्नी नाहीद आणि मुलगी निदा सोबत वेळ घालवायला फारच कमी संधी मिळायची.

1995 साली त्यांच्या शेवटच्या युरोप दौऱ्यात ते खूप आजारी झाले, ज्यामुळे त्यांचे अनेक शो रद्द केले गेले. संगीत समीक्षकांनीही नोंदवले की त्यांच्यातील ऊर्जा हळूहळू कमी होत आहे.

प्रसिद्ध पॉप गायक एल्विस प्रेस्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रसिद्ध पॉप गायक एल्विस प्रेस्ली

11 ऑगस्ट 1997 रोजी ते अमेरिकेत मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी लाहोरहून रवाना होणाऱ्या विमानात बसले. प्रवासातच त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना लंडनमधील क्रॉमवेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, जिथे 16 ऑगस्टला त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला.

वयाच्या फक्त 48 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

अत्यंत विचित्र योगायोग म्हणजे 20 वर्षांपूर्वी 1977 मध्ये त्याच दिवशी संगीताच्या क्षेत्रातील एका महान व्यक्ती एल्विस प्रेस्ली यांचे निधन झाले होते.

जगातील 50 महान गायकांमध्ये समावेश

2006 साली न्यूयॉर्क टाइम्सने नुसरत यांना विसाव्या शतकातील साठ आशियाई नायकांपैकी एक नायक म्हणून निवडले.

2007 साली आउटलूक या भारतीय मासिकाने लिहिले की, "त्यांच्या निधनानंतर दशकानंतरही नुसरत जगभरात भारतीय उपखंडातील सर्वात प्रसिद्ध गायक आहेत."

अमेरिकेतील 'नॅशनल पब्लिक रेडिओ' च्या मते, नुसरतचे रेकॉर्ड्स एल्विस प्रेस्लीपेक्षा अधिक विकले गेले. एनपीआरनेच त्यांना जगातील 50 महान आवाजांमध्ये समाविष्ट केले.

2009 साली जेव्हा भारतीय चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांना विचारले गेले की, कोणतं गाणं ते आपल्या आयुष्याचा साऊंडट्रॅक बनवू इच्छितात, तेव्हा त्यांचे उत्तर होते, नुसरत फतह अली खान चे 'अल्लाह हू' हे गाणं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)