मक्का शहर जे एकेकाळी इस्लामच्या विरोधाचं केंद्र होतं, त्याच धर्माचं पवित्र स्थळ कसं बनलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, अकील अब्बास जाफरी
- Role, संशोधक आणि इतिहासकार
- Reporting from, कराची
इस्लामचा इतिहास बघायला गेलं तर रमजान महिन्यात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत.
यातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 'फतह-ए-मक्का'.
थोडक्यात मक्केवर विजय मिळवला गेला. त्यानंतर अरबी द्वीपकल्पाच्या पलीकडे इस्लामचा प्रचार आणि प्रसार होऊ लागला.
इस्लामच्या प्रसारात मक्केवर विजय मिळवणं ही महत्वाची गोष्ट होती. पण त्याआधी इस्लामच्या प्रसारात मक्केचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे.
इस्लामपूर्वीचं मक्का
मक्का हे आज अरबस्तानचं मध्यवर्ती शहर आणि इस्लामिक जगताचं धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे.
हॉलंडचे प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक डोझी सांगतात की, मक्केचा इतिहास हजरत दाऊद यांच्या काळापासूनचा आहे.
तोराह (ज्यू धर्माचं पवित्र पुस्तक) आणि बायबलमध्येही या शहराचा उल्लेख आहे.
यानंतर जेव्हा हजरत इब्राहिम (अब्राहम) इजिप्तमधून पॅलेस्टाईनमध्ये आले तेव्हा त्यांना मक्केच्या दिशेने जाण्याची आज्ञा मिळाली आणि ते त्यांची पत्नी हजरत हाजरा आणि मुलगा हजरत इस्माईल यांच्यासह मक्केत आले. तेथे त्यांनी काना-ए-काबाची पायाभरणी केल्याचं सांगितलं जातं.
काना-ए-काबा ही प्राचीन वास्तू असून या जमिनीवर बांधलेल्या पहिल्या इमारतींपैकी एक मानली जाते.
शतकानुशतकं, लोक इथे येऊन आपल्या मनातल्या इच्छा व्यक्त करायचे. आपली मनोकामना पूर्ण होईल असा त्यांचा विश्वास होता.
याच इमारतीच्या पायावर हजरत इब्राहिम यांनी काना-ए-काबाची पुनर्बांधणी केली.
मक्का हे मुख्य शहर होतं
अरबी पट्ट्यात राहणारे लोक नेहमी स्वत:ला अल-अरब किंवा अरबी द्वीपकल्पातील रहिवासी म्हणून संबोधत. त्यामागचं नेमकं कारण सांगता येत नाही.
मात्र त्यांपैकी बहुतेक जण बेदोइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळवंटातील भटक्या समुदायातील असायचे.
पूर्व-इस्लामिक समाजात, बेदोइन समुदायाचे सदस्य अनेक वांशिक गटांमध्ये विभागले गेले होते. त्या सर्वांच्या शासन पद्धती आणि प्रथा वेगवेगळ्या होत्या.
केंब्रिज विद्यापीठाच्या 'हिस्ट्री ऑफ इस्लाम' या पुस्तकानुसार, इस्लामपूर्वी समाजात लहान टोळ्यांची व्यवस्था होती. हे राजकीयदृष्ट्या संघटित किंवा एकात्मिक क्षेत्र नव्हते.
परंतु इस्लामचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मापूर्वी मक्का हे व्यापाराचं प्रमुख केंद्र बनलं आणि त्याला मध्यवर्ती शहराचा दर्जा प्राप्त झाला.

फोटो स्रोत, SEERAT ALBUM, PSO
केंब्रिजच्या 'हिस्ट्री ऑफ इस्लाम' नुसार, जेव्हा पर्शिया आणि रोमचं युद्ध सुरू झालं तेव्हा दुसऱ्या बाजूला मक्का हे शहर एक तिसरी शक्ती म्हणून उदयास येत होतं.
मक्केला आणखी महत्त्व प्राप्त झालं ते बैतुल्लामुळे. बैतुल्ला म्हणजे अल्लाहचं घर.
कुरैश जमातीतील व्यापारी येमेनपासून सीरियापर्यंत प्रवास करून विविध देशांतील लोकप्रिय वस्तू आणत. गोळा केलेल्या या वस्तूंचा मक्केत व्यापार करत.
दरवर्षी मक्केत मोठी जत्रा भरायची. त्यात जीवनावश्यक वस्तूंशिवाय गुलामांचाही व्यापारही व्हायचा.
केंब्रिजच्या 'हिस्ट्री ऑफ इस्लाम' नुसार, प्रत्येक वर्षाच्या पवित्र महिन्यांत लोक इथे जमत असत. त्यामुळे मक्केचं महत्त्व अधिक दृढ होत गेलं.
मक्का लोकांच्या आदरातिथ्यासाठी प्रसिद्ध होती. इथले लोक त्यांच्या पाहुण्यांना 'बैतुल्ला'चे पाहुणे म्हणत आणि जी जी सेवा करता येईल ती ती करत असत.
मक्का हे इस्लामच्या प्रतिकाराचे केंद्र होतं
मदिनामध्ये हिजरत (आश्रय) झाल्यानंतर, मक्केच्या लोकांनी मुस्लिमांविरुद्ध तीन युद्धं केली.
इतिहासकारांच्या मते, मक्का इस्लामविरोधी चळवळीचं केंद्र बनलं त्यामागे तेथील कुरैश समुदायाचा मोठा विरोध होता.
अशा परिस्थितीत, 6 हिजरी (इ.स. 628) मध्ये जुलकताह (इस्लामी कॅलेंडरचा अकरावा महिना) महिन्यात, प्रेषित मोहम्मद पैगंबर आपल्या साथीदारांसह काना-ए-काबाची झियारत पाहण्यासाठी मक्केला गेले. त्यावेळी त्यांनी अहरम (विशेष कपडे) घातले होते.
शतकानुशतके ही प्रथा आहे की जर एखादी व्यक्ती अहरम परिधान करून मक्केत आली तर त्याला रोखलं जात नाही.

फोटो स्रोत, SEERAT ALBUM, PSO
मक्केपासून नऊ मैलांवर असलेल्या हुदयबियाला पोहोचल्यानंतर प्रेषित मोहम्मद पैगंबर म्हणाले, "आम्ही अल्लाहचा निरोप घेऊन अल्लाहच्या घरात आलोय. आम्हाला कुरैश समुदायाशी युद्ध करायचं नाही."
हे ऐकून कुरैश समुदायाने मुस्लिमांना उमरा करण्यापासून रोखण्यासाठी उर्वा बिन मसूदला पाठवले. मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही.
नंतर हजरत उस्मान बिन अफान (इस्लामचा तिसरा खलीफा) यांना मक्केतील सरदारांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवण्यात आलं. पण अशी अफवा पसरली की हजरत उस्मान बिन अफान यांना प्रथम तुरुंगात टाकून नंतर ठार मारण्यात आलं. यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी आपल्या साथीदारांचा बदला घेण्याची शपथ घेतली. ते 'बैत-ए-रिजवान' म्हणून ओळखले जात.
कुरैश समुदायाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी हजरत उस्मान बिन अफान सुरक्षित असल्याचा संदेश पाठवला. त्यांनी मुस्लिमांना आश्वासन दिले की ते या वर्षी परत येतील आणि पुढील वर्षी उमराह करण्यासाठी काना-ए-काबाला भेट देतील.
कुरैश समुदायातील लोकांनी संघर्ष टाळण्यासाठी तीन दिवस मक्का सोडण्याचे वचन दिले. हा प्रस्ताव लिखित स्वरूपात पाठवण्यात आला
आणि त्यात काही अटी घालण्यात आल्या. याला 'झुल-हुदैबिया' किंवा 'हुदैबियाचा तह' म्हणून ओळखलं जातं. या तहातील काही अटी मुस्लिमविरोधी होत्या. पण कुराणमध्ये या कराराला फतह-ए-मुबीन (स्पष्ट विजय) म्हटलं आहे.
मक्केवर विजय
हुदैबियाच्या तहाच्या समाप्तीनंतर एक वर्षापेक्षा कमी कालावधीत काही घटना घडल्या. त्यामुळे कुरैश समुदायाने करार मोडणार असल्याचे जाहीर केलं.
10 व्या रमजान, 8 व्या हिजरी (इ.स. 630) रोजी, प्रेषित मुहम्मद पैगंबर आपल्या 7,000 साथीदारांसह मक्केसाठी निघाले.
मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत इतर काही जमातीही सामील झाल्या. त्यामुळे वाटेत त्यांची संख्या 10,000 वर पोहोचली.
मक्केपासून दहा मैलांवर या गटाने तळ ठोकला. या मोठ्या गटाच्या आगमनाची माहिती मिळताच मक्केतील कुरैश समुदायातील नेता अबू सुफयान हजरत प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याकडे आला आणि त्यांनी इस्लामचा स्वीकार करण्याची घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
सर्व बाजूंनी मुस्लिमांनी मक्केत प्रवेश केला, त्यामुळे मक्केतून निसटण्याचा कुरैश समुदायाचा मार्ग बंद झाला.
काहींनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुमारे 33-34 लोक मारले गेले. प्रेषित मुहम्मद पैगंबर रमजान महिन्यातील 20 तारखेला काना-ए-काबा येथे पोहोचले. इथे मक्केतील लोकांना संबोधित करताना ते म्हणाले, "तुम्ही सर्व स्वतंत्र आहात. आज तुमच्यासाठी कोणतेही प्रश्न नाहीत. अल्लाह तुम्हाला क्षमा करेल. तो खूप दयाळू आहे."
कुराणातील 'फतह' या अध्यायात या विजयाचं वर्णन करण्यात आलं आहे.
आणि मक्का इस्लामचं केंद्र बनलं
तैरा मारीफ-ए-इस्लामिया (इस्लामचा विश्वकोश) मध्ये असं म्हटलंय की, मक्का जिंकल्यानंतर लोकांना कुरैशांची भीती वाटणं बंद झालं.
कुरैशांनी इस्लामला आत्मसमर्पण केलं. त्याचबरोबर अरब आणि जमातींच्या मोठ्या गटांनी इस्लाम स्वीकारण्यास सुरुवात केली.
केंब्रिजच्या 'हिस्ट्री ऑफ इस्लाम'नुसार, मक्का जिंकल्यानंतर हुनैनची लढाई झाली. यात मुस्लिमांना विजय मिळाल्यानंतर विरोध करण्यासाठी एकही मजबूत जमात उरली नाही. आणि म्हणून पैगंबर मुहम्मद त्या प्रदेशातील सर्वात शक्तिशाली मार्गदर्शक बनले.
केंब्रिजच्या 'हिस्ट्री ऑफ इस्लाम'नुसार अरबांना सत्ता हवी होती. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात इस्लाम धर्म स्वीकारण्यास सुरुवात केली.
अशा प्रकारे मक्का जिंकून अरब प्रदेशाला एक नेता मिळाला. हे नेतृत्व निष्ठा किंवा सामाजिक स्थितीपेक्षा धर्मावर आधारित होतं. एकमेकांशी लढणारे अरब योद्धे एका धर्माखाली एकत्र आले होते.

फोटो स्रोत, Reuters
'हिस्ट्री ऑफ इस्लाम'नुसार, अशा प्रकारे समाज निर्माण झाला. इथल्या लोकांना बऱ्याच दिवसांनी शांतता लाभली. दुसरीकडे, पर्शिया आणि रोमचे बलाढ्य राजे आता उतरणीकडे झुकले.
या विजयांच्या मालिकेमुळे अरबी द्वीपकल्पात अरब मिलिशयांनी जी शांतता भंग केली होती ते रोखण्यात मदत झाली असे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. यामुळे एक संघटित अरब गट इस्लामचा प्रसार करू शकला.
'हिस्ट्री ऑफ इस्लाम'नुसार, नव्याने स्थापन झालेल्या इस्लामिक राज्याचा विस्तार शक्य करणारे बहुतेक प्रशासक हिजाझ प्रदेशातील केवळ तीन शहरांशी संबंधित होते. यामध्ये मक्का, मदिना आणि तैफचा समावेश होता.
अशा प्रकारे मक्का जिंकल्यानंतर इस्लामचा ध्वज इराण, इराक, सीरिया, आफ्रिका यांसारख्या अनेक देशांत पोहोचला. यासाठी अनेक विचारवंत, मुजाहिद, सेनापती आणि उलामा काम करत होते. त्यांनीही इस्लामची शिकवण नव्याने घेतली होती.
प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर मदीना ही राजधानी राहिली. परंतु हज यात्रेमुळे मक्का हे इस्लामचे धार्मिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक केंद्र बनलं.
बानू उमय्यादच्या काळात इस्लामिक जगताचे केंद्र मदिना येथून सीरियाची राजधानी दमास्कस येथे स्थलांतरित झाले. तथापि, अध्यात्म आणि शिक्षणासाठी लोक दूरच्या ठिकाणांहून प्रवास करत असल्याने मक्का आणि मदीनाचे महत्त्व कायम राहिले.
आजही जगातील प्रत्येक मुस्लिम मक्केत जाऊन काबा येथे नमाज अदा करतो.











