अहमदनगर स्थापना दिन : दखनी मुसलमानांच्या सांस्कृतिक वारशाचं काय?

फोटो स्रोत, Ganesh Shinde/Ahmednagar
- Author, सरफराज अहमद
- Role, बीबीसी मराठीसाठी
आज अहमदनगर स्थापना दिन आहे. आता अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले आहे. अहमदनगरच्या नामांतरावेळी बीबीसी मराठीने हा लेख प्रकाशित केला होता. यावेळी शहराच्या सांस्कृतिक वारशाबद्दल बीबीसी मराठीन ही चर्चा घडवून आणली होती. ती स्थापना दिनाच्या निमित्ताने देखील प्रासंगिक आहे. त्यामुळे हा लेख पुन्हा शेअर करत आहोत.
महायुती सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर अहमदनगरचे 'अहिल्यानगर' नामांतर केले आहे. अहिल्याबाई होळकरांच्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या जन्मस्थानामुळे हे नामकरण केल्याचं सांगितलं जात आहे.
पण मध्ययुगीन काळातील मुस्लिम संस्कृतीच्या प्रतिकांविरुद्ध भाजपने सातत्यपूर्ण भूमिका घेतली आहे.
त्यामुळे या प्रकरणातही महाराष्ट्रातील भाजप पुरस्कृत राज्य सरकार मुस्लिम संस्कृतीशी या भूमीचे असलेले नाते पुसण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप होतोय.
या आरोपातील तथ्य तपासण्यासाठी आपल्याला दखनी शाह्यांसोबत अहमदनगर शहराची स्थापना, त्या परिसरतील मुस्लिमांच्या सांस्कृतीक इतिहासाचा पट उलगडून पाहावा लागणार आहे.
दखनी मुसलमान विरुद्ध उत्तर भारतीय आणि अफाकी मुसलमान
दखनेतील मुस्लिम सत्तांची सुरुवात ही दखनी मुसलमान विरुद्ध उत्तर भारतीय आणि अफाकी मुसलमान अशा वादातून होते.
अलाउद्दीन खिलजीच्या नंतर मोहम्मद तुघलक दक्षिणेत आला.
इसवी सन 1327 मध्ये दौलताबादला राजधानी स्थापन करुन त्याने राज्यकारभारात गती आणण्याचा आणि राज्याला सुरक्षा प्रदान करण्याचा प्रयत्न केला. पण दखनेविषयीचा तिटकारा आणि उत्तरेकडील केंद्रीय सत्तेच्या अहंकाराने तो दखनेत स्थिरावू शकला नाही.
त्याच्या उत्तरेप्रतीच्या कर्मठतेविषयी रिचर्ड इटन यांनी माहिती दिली आहे : ‘चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला दखनेचा प्रदेश थेट दिल्ली सल्तनतीशी जोडला गेला. तोपर्यंत दिल्लीचे शासक भारतीयत्वाच्या रंगात असे रंगले होते की, ते स्वतःला इस्लाम आणि मुसलमान नव्हे तर उत्तर भारतीय संस्कृतीच्या संरक्षकाच्या रुपात पाहत होते. ही प्रवृत्ती मुहम्मद बिन तुघलकमध्ये पाहता येईल, ज्याने दक्षिणेचे पाणी पिण्यास देखील नकार दिला होता. त्याऐवजी तो गंगा नदीचे पाणी खांद्यावर वाहून दौलताबादपर्यंत मागवत होता.’
टोकाची उत्तर भारतीय अस्मिता आणि दखनद्वेषातून मोहम्मद तुघलक दख्खन सोडून दिल्लीला परतला. पण त्याच्या दख्खनद्वेषी धोरणातून दखनी विरुद्ध उत्तर भारतीय मुसलमान सरदार, अफाकी विरुद्ध दखनी असा वाद उभा राहिला.
परिणामस्वरुप दखनी मुसलमान आणि तुघलकसत्तेतील वाद वाढत गेला. आणि दखनी सरदारांनी केंद्रीय सत्तेविरोधात बंड पुकारुन दखनेत स्वतंत्र दखनी राजवटीची मुहूर्तमेढ रोवली.
इस्माईल अफगाणला ‘नसिरुद्दीन’ हा किताब देऊन दखनी सरदारांनी त्याला दखनेचा सुलतान बनवले. पण तो अल्पायुषी ठरला.
त्यानंतर हसन बहामनी हा दखनेचा सुलतान बनला. जो बहामनी सल्तनतीचा संस्थापक मानला जातो. त्याने सुरुवातीला गुलबर्ग्याला राजधानी स्थापन करुन बहामनी राजवट चालवली. कालांतराने बिदरला राजधानीचे शहर बनवले.
दखनी भाषा आणि दखनी संस्कृती
मोहम्मद तुघलकाने दौलताबादला राजधानी वसवताना, आपल्यासोबत दिल्लीहून अनेक विद्वान, कवी, इतिहासकारदेखील आणले होते.
मोहम्मद तुघलक दखनेतून निराश होऊन दिल्लीला परतला. पण हे विद्वान, कवी आणि सूफी येथेच राहिले.
ते जी भाषा बोलत होते, ती भोजपुरी, ब्रज आणि पंजाबीतील शब्द घेऊन व्यवहारात रुजलेली भाषा होती.
अमीर खुसरोंनी त्या भाषेला हिंदवी असे नाव दिले होते. कालांतराने छत्रपती शिवाजी महाराजांनी हाच ‘हिंदवी’ शब्द स्वराज्यासाठी वापरला.
या हिंदवी भाषेला दखनेचे रंगरुप मिळाले. मराठी, कानडी, तेलुगूतील अनेक शब्द त्यात सामाविष्ट झाले. तिला दखनी हेल मिळाला आणि हीच दखनी भाषा बनली.

फोटो स्रोत, Firoz Shaikh/Ahmednagar
बहामनी सत्तेमुळे दखनी संस्कृती आणि भाषेच्या विकासाला गती मिळाली.
दखनी भाषा आणि संस्कृतीविषयी जमील जालबी लिहीतात, "बहामनीमुळे दखनेची सल्तनत त्या लोकांच्या हाती आली, जे उत्तरेकडून आलेले तुर्क असले तरी त्यांना स्वतःला दखनी म्हणवून घेण्यात गर्व वाटत असे.
"या नव्या सल्तनतीच्या स्थापनेत उत्तरेशी असलेल्या शत्रूत्वाच्या भावना सामील होत्या. उत्तरेशी शत्रूत्वाच्या आवेषात त्यांनी आपल्या राजकारणाची योजना म्हणून त्या जाणिवांना उत्तेजना दिली, ज्या उत्तरेपेक्षा निराळ्या आणि दखनी वैशिष्ट्यांशी संबधित होत्या.
"सांस्कृतिक संघर्षाची गरज म्हणून बहामनी सुलतानांनी खुल्या मनाने स्थानिक परंपरांना बळ दिले. देशी परंपरा आणि उत्सव, यात्रा आणि सणांना प्रोत्साहन दिले.
परस्पर संवाद, मेलमिलाप, समाज आणि संस्कृतीची मुळं बळकट करण्यासाठी त्या भाषेच्या बाजूने ते उभे राहिले, जी रंगबेरंगी भाषांच्या या प्रदेशात दखनी राष्ट्रीयत्वाची भाषा होण्याची क्षमता बाळगत होती.
"ज्या भाषेला आज आपण उर्दू म्हणून ओळखतो. यामुळे दखन आणि उत्तरेत एक सांस्कृतीक भिंत उभी राहिली. भारतीय उपखंडाचे हे दोन प्रदेश एकमेकांपासून तुटले.”

या दखनी भाषेची ओळखच पुढे दखनी संस्कृतीला मिळाली.
बहामनी सत्तेने प्रयत्नपूर्वक या दखनी संस्कृतीचा विकास घडवून आणला. असे सांस्कृतिक प्रयोग करणारे मेहमूद गवानसारखे विद्वान सरदार बहामनशाहीच्या पदरी होते. हा महमूद गवान दखनी सरदारांच्या दखनी अस्मितेचा नायक होता. पण पुढे सरदारांच्या वादातून मोहम्दशाह बहमनी (तृतीय) याने महमूद गवानची हत्या केली.
त्यामुळे नाराज झालेल्या महमूद गवानच्या समर्थक सरदारांनी बंड पुकारले. सुरुवातीला बिजापूरला युसुफ शाहने ‘आदिलशाह’ हा किताब घेऊन आदिलशाही स्थापन केली. त्यानंतर अहमद निजामशाहने निजामशाहीची स्थापना केली.
अहमदनगरची स्थापना
अहमद निजामशाहने निजामशाही राजवट स्थापन केल्यानंतर दौलताबाद आणि जुन्नरच्या मध्यभागी 1490मध्ये ‘कोटबाग निजाम’ या महालाची पायाभरणी करुन अहमनगर शहराची मुहूर्तमेढ रोवली.
शहराची रचना अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आली होती. शहरात जवळपास 27 अंतर्गत रस्त्यांची निर्मिती केली. हे सर्व रस्ते एकमेकांमध्ये गुंतलेले होते.
एकही रस्ता सरळ दिशेत बांधलेला नव्हता. त्यानंतर किल्लाच्या अंतर्गत अनेक प्रशासकीय इमारती बांधल्या. शहराच्या गरजेसाठी बाजारपेठा वसवण्यात आल्या. विद्यालये, मदरसे आणि प्रार्थनास्थळाची निर्मिती करण्यात आली.

फोटो स्रोत, Firoz Shaikh/Ahmednagar
फरिश्ता हा मध्ययुगीन तवारीखकार लिहीतो, "अहमद निजामशाहने ऐकले होते की, अमहादाबादचे नाव अहमदशाह गुजरातीने सुचवले होते. त्याचे कारण होते की, बादशाह, वजीर आणि शहराच्या काजीचे नावही अहमदच होते. त्यामुळे शहराचे नाव अहमदाबाद ठेवले होते. अहमदननगर शहराच्या पायाभरणीवेळी निजामशाहीतदेखील हिच स्थिती निर्माण झाली.
"बादशाह, मसनद ए आली या प्रमुख आधिकाऱ्याचे आणि लष्कराच्या काझीचे नावही अहमद होते. त्यामुळे अहमद निजामशाहने या शहराला अहमदनगर हे नाव देणे पसंत केले.”
ही माहिती दिल्यानंतर फरिश्ताने अहमदनगरच्या नगररचनेचे कौतुक केले आहे. दोन तीन वर्षातच हे शहर बगदादप्रमाणे नावारुपाला आल्याचेही त्याने नमूद केले आहे.
अहमदनगरची संस्कृती, विद्वानांचा स्वर्ग
सुरुवातीच्या काही वर्षांचा अपवाद वगळता अहमदनगरची निजामशाही ही शिया राजवट होती. त्यामुळे सुरुवातीपासून शिया संस्कृतीला येथे मोठी चालना मिळाली.
मोहर्रमची एक विशेष संस्कृती या शहरात वाढीस लागली. इमाम हुसैन यांच्या स्मरणार्थ गोवळकोंड्याप्रमाणे अहमदनगरमध्ये कवी संमेलने, मर्सियानिगारीचे जलसे व्हायचे. लखनऊ, गोवळकोंड्यानंतर अहमदनगरचा मोहर्रम इतिहासात विख्यात आहे.
इथल्या मोहर्रमला अनेक स्थानिक परंपरा आहेत. ज्या जगभरातल्या मोहर्रमपेक्षाही निराळ्या आहेत. येथील ताजिये वैशिष्ट्यपूर्ण होते.
याशिवाय अहमदनगरला ज्ञानसंवर्धनाची, विद्वानांची एक मोठी परंपरा लाभली आहे.

फोटो स्रोत, Firoz Shaikh/Ahmednagar
इतिहासकार नसिरुद्दीन हाश्मी लिहीतात, "बहामनीच्या सत्ताकाळापासून दखनेत दखनी भाषेची परंपरा निर्माण झाली होती.
"सामान्यपणे दखनी लिहीली, बोलली जात होती. मलिक अहमद निजामशाहच्या काळातील महत्वाचा कवी अश्रफ हा सर्वांना परिचित आहे. त्याची मसनवी लोकप्रिय आहे.
"मलिक अहमदच्या निधनानंतर त्याचा मुलगा बुरहान निजामशाह सत्तेत आला. दीर्घकाळ सत्तेत राहिला. त्याच्याकाळात अहमदनगरमध्ये कला आणि ज्ञानक्षेत्राची भरभराट झाली.
"इराणहून शाह ताहेर यजदी अहमदनगरला आला. त्याने बुरहान निजामशाहला शियापंथाची दीक्षा दिली. दर शुक्रवारी शाह ताहेर यजदीची व्याख्याने होत.
"या व्याख्यानाला बुरहान निजामशाह स्वतः उपस्थित असायचा. बुरहान निजामशाहने जामा मशीदीसमोर मोठे विद्यापीठ स्थापन केले होते.
"या विद्यापीठात जगभरातील विद्वान विद्यादानासाठी आले होते. ज्यामध्ये तत्कालीन जगातील प्रसिद्ध विद्वान शेख अहमद नजफी, मुल्ला पीर मोहम्मद, मुल्ला अहमद तबरेजी, इस्माईल सफवी, ख्वाजा मोईनुद्दीन सआदी, शाह हसन अंजू, मुल्ला शाह मोहम्मद निशापुरी, मुल्ला अली इस्तराबादी, मुल्ला रुस्तुम जुरआनी, मुल्ला अली माजनदुरानी, मुल्ला अजीजुल्लाह गिलानी, मुल्ला मोहम्मद इमामी इस्तराबादी वगैरे प्रसिद्ध आहेत."

फोटो स्रोत, Firoz Shaik/Ahmednagar
ज्ञानप्रसाराच्या या कार्यामुळेच समकालीन तवारीखकार फरिश्ताने अहमदनगरला 'गुलस्तान ए इरम' म्हणजे ज्ञानाचे स्वर्ग म्हटले होते.
अहमदनगरविषयी फरिश्ता लिहीतो, "शाह ताहेर यांनी निजामशाही घराण्याची खूप सेवा केली. या घराण्याच्या उत्कर्षासाठी अनेक कामं केली. त्यांनी प्रेषितांच्या घराण्यातील लोक अहमदनगरमध्ये येऊन रहावेत यासाठीही प्रयत्न केले.
"शाहसाहेबांनी शाही खजिन्यातून रक्कम मिळवून इराक, खुरासान, फारस, रोम, गुजरात आणि आग्र्याला पाठवली. शिया विद्वानांना अहमदनगरला येण्याचे आमंत्रण दिले. त्यामुळे काही काळातच अहमदनगरमध्ये विद्वानांची आणि विचावंतांची एक मोठी जमात बनली."
इतकेच नाही तर मदिनेतील एका मोठ्या विद्वानाशी बुरहान निजामशाहने आपल्या मुलीचा विवाह केला. आणि त्याला अहमदनगरला आणले. त्याशिवाय बुरहान निजामशाहने जागोजागी लंगरखाने उघडून गरिबांच्या भोजनाची व्यवस्था केली होती.
बुरहान निजामशाहचा मुलगा हुसैन निजामशाह यानेही ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसाराला महत्व दिले. हुसैन निजामशाहच्या काळातच अहमदनगरच्या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली.
काही इमारतीदेखील या काळात बांधल्या गेल्या. अहमदनगरच्या या वैभवामुळेच मोगल आणि गुजरातच्या सुलतानांना अहमदनगरला आपल्या राज्याला जोडण्याची लालसा व्हायची.
अहमदनगरच्या सीमा मोगलांच्या सीमेशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे मोगलांनी अहमदनगरवर हल्ले करण्यास सुरवात केली.
या हल्ल्यांचा अहमदनगरने दखनी अस्मितेच्या आधारे तीव्र विरोध केला. चांदबीबी ही अहमदनगरच्या मोगलांच्या विरोधात झालेल्या दखनी संघर्षाची नायिका होती.
दखनी अस्मितेची नायिका चांदबीबी
इसवी सन 1595मध्ये दुसऱ्या बुरहान निजामशाहच्या निधनानंतर उत्तराधिकाराचा संघर्ष उफाळून आला. दोन-पाच वर्षातच अनेक सुलतान गादीवर आले.
काही उत्तराधिकाऱ्यांनी मोगलांकडे मदत मागितली. त्यामुळे मोगलांना अहमदनगर जिंकण्याची आयती संधी चालून आली.
इब्राहिम निजामशाहच्या हत्येनंतर निजामशाहीत धांदल माजली. इब्राहिमचा वजीर मिया मंजूने शाही खजिन्यावर कब्जा केला. सत्ता मिळवण्याची त्याची योजना होती.
आपला निकटवर्तीय अन्सारखानला अहमदनगरच्या किल्यावर नेमून तो दुसऱ्या अहमद निजामशाहला सोबत घेऊन औश्याच्या किल्ल्याला गेला.
चांदबीबीला त्याच्या योजनेची कुणकुण लागली. अन्सारखान किल्ला मोगलांच्या हवाली करेल या भीतीपोटी चांदबीबीने मोहम्मद खान अमीर या आपल्या विश्वासू सरदाराकरवी अन्सारखानची हत्या केली.
यानंतर चांदबीबीचा किल्ल्यावर पूर्ण कब्जा झाला. पण अकबर बादशाहचा मुलगा मुरादने अहमदनगर किल्ल्याला वेढा दिला. चांदबीबी वेढ्यात अडकली.

फोटो स्रोत, Getty Images
इकडे औश्याला गेलेल्या मिया मंजूने चांदबीबीविरोधात इब्राहीम आदिलशाहकडे मदत मागितली. पण वेढ्यात अडकल्यानंतरही चांदबीबीने दखनी सल्तनतींवरील मोगलांचा धोका इब्राहीम आदिलशाहच्या लक्षात आणून दिला आणि उलट मोगलांच्याविरोधात लढाईसाठी 30हजार सैनिकांच्या एका तुकडीची मदत मिळवली.
दखनी सल्तनतींच्या ऐक्याचा नारा देत चांदबीबीने गोवळकोंड्याच्या कुतुबशाहकडेही मदत मागितली. कुतूबशाहनेही चांदबीबीला 7हजार स्वार आणि पायदळ तुकडी पाठवून मदत केली.
अशाप्रकारे चांदबीबीने साठ हजारांचे लष्कर उभे केले. पण मोगलांच्या सैन्याने किल्ल्याच्या भिंती पाडण्यास सुरुवात केली. तेंव्हा चांदबीबी हरममधून बाहेर आली.
तिने पडद्याच्या त्याग केला. हाती शस्त्रे घेतली. आणि ज्या भिंती मोगलांनी पाडल्या होत्या. तेथे येऊन घोड्यावर स्वार होत ती सैन्याचा मुकाबला करायला लागली.
संघर्ष टोकाला पोहोचल्यानंतर चांदबीबीने मोठ्या मसलतीने मुरादसोबत तह घडवून आणला. यामुळे लढाई संपून शांतता नांदेल अशी चांदबीबीला आशा होती. पण अंतर्गत वादाने चांदबीबीला घेरले आणि त्यात तिची हत्या झाली.
चांदबीबी ही रजिया सुलताननंतर दुसरी राज्यकर्ती स्त्री होती, जिने पुरुषसत्तेला आव्हान देण्याचे धाडस दाखवले होते. पण तिचीही रजिया सुलतानप्रमाणेच दुर्दैवी हत्या झाली.
चांदबीबीनंतर मलिक अंबरने अहमदनगरची धुरा हाती घेतली.
दखनी अस्मितेचा दुसरा योद्धा मलिक अंबर
मध्ययुगीन इतिहासात महमूद गवान, युसुफ आदिलशाह यांच्यानंतर सर्वात प्रभावशाली सरदार म्हणून मलिक अंबरचा उल्लेख येतो.
अहमदनगर ही मलिक अंबरची कर्मभूमी होती. गुलाम म्हणून भारतात आलेल्या मलिक अंबरला इथे स्वातंत्र्य मिळाले. हा मलिक अंबर मुळचा कोणत्या प्रांतातला हे काही स्पष्ट होत नाही.
त्याला येमेन आणि भारतात निवास केलेल्या पीटर वान डेन ब्रोके या प्रवाश्याने ‘ॲबिसिनियातील काळा काफीर’ म्हटले आहे.
तर रिचर्ड इटन यांनी त्याची दखनेतील ‘शंभू’ आणि ‘चापू’ ही मुस्लिमेतर नावे नोंदवून तो कोंबाटा प्रांतातील असावा असा तर्क काढला आहे.
कोंबाटा येथेही जातीच्या उतरंडीची समाजरचना होती. त्यावरुन मलिक अंबरने निजामशाहीत जातीच्या उतरंड व समाजरचनेचा आधार घेउन केलेल्या राजकारणाला देखील पुष्टी मिळते.
याच राजकारणाचा आधार घेउन मलिक अंबरने जहांगीरच्या उत्तर भारतीय फौजेला दक्षिणी सैन्याच्या गनिमतंत्राचा वापर करुन आस्मान दाखवले.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तरेच्या राजकारणाचा दक्षिणेत मुहम्मद तुघलकानंतर झालेला हा दुसरा पराभव होता. दखनेच्या अस्मितेचा मलिक अंबर हा हसन बहामनी नंतरचा दुसरा प्रतिनिधी होता.
मलिक अंबरच्या काळात हजारोंच्या संख्येने अफ्रिकन हबशी दखनेत आले होते. या अफ्रिकन हबशी आणि मराठ्यांचे एकमुखी नेतृत्व त्या काळात मलिक अंबरने केले.
हिंदू निम्नवर्णीय मराठे आणि गुलामी लादलेले हबशी हे ज्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, त्याची आखणी मलिक अंबरने केलेली होती.
मराठ्यांनी परधर्मीय अभिजनांच्या विरोधात लढलेला हा पहिला लढा होता, आणि विशेष म्हणजे त्याचे नेतृत्वही परधर्मीय गुलामांच्या नेत्याकडे होते. त्यांनी ज्या गुलामांच्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला त्या नेत्यानेही आणलेली व्यवस्था सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून निर्मिलेली होती.
त्यामुळेच मलिक अंबर पुढे कित्येक वर्षांनी स्थापन झालेल्या मराठ्यांच्या स्वराज्याला देखील पार्श्वभूमी देउन गेला असे शरद पाटील म्हणतात. त्यासाठी मलिक अंबरच्या सामान्य शेतकरीकेंद्री धारा पद्धतीचा ते संदर्भ देतात.
जमीनधारापद्धतीशिवाय मलिक अंबरने खडकी हे शहर वसवले ज्याला आज छत्रापती संभाजीनगर (औरंगाबाद) म्हणून ओळखले जाते.
या शहराची स्थापना करताना मलिक अंबरने उखळी नळ योजनेचा अभूतपूर्व असा प्रयोग केला. जो छोट्या स्वरुपात पहिल्यांदा त्याने अहमदनगरमध्येच राबवला होता.
मलिक अंबरने या परिसरात अनेक उद्योगधंद्याची निर्मितीही केली. दौलताबादच्या नजीक कागजीपुऱ्यात आणि पैठणजवळ त्याने कागद कारखानाही उभा केला होता.
त्यावरुन लिखाणासाठी लागणाऱ्या कागदाची या भागात किती गरज होती, हे स्पष्ट होते. मलिक अंबरच्या काळापर्यंत अहमदनगरचा थेट बगदाद आणि इराणशी व्यापार चालायचा.
मध्यपूर्वेतील व्यापारी अहमदनगरमध्ये येत होते. मलिक अंबर हयात होता तो पर्यंत त्याने निजामशाहीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले.
वयाच्या 80व्या वर्षी मलिक अंबर मरण पावला आणि काही वर्षातच अहमदनगरची निजामशाही अस्तास गेली.
अहमदनगरमधील सुफी संतांची परंपरा
अहमदनगरला ज्या पद्धतीने दखनी राजकारणाची, विद्वत्तेची, ज्ञानसंस्कृतीची परंपरा आहे, तशीच सुफींची देखील आहे.
अहमदनगरी सुफी परंपरेत अनेक महत्वाचे संत आहेत. त्यामध्ये सुफी इब्राहीमशाह कादरी हे आहेत. ते मध्ययुगीन सुफी कवी म्हणूनदेखील ओळखले जातात. त्यांनी लिहीलेली पुढील कविता इतिहासात विख्यात आहे.
“रुप स्वरुप ये अपना रसिली सुंदर ना रहना होगा
पिया मिलन अहमदनगरी में साजन के घर जाना होगा”
इब्राहीमशाह कादरी यांचेच शिष्य म्हणून इरफान अली शाह अहमदनगरी ओळखले जातात. त्यांनीही अनेक कविता लिहील्या आहेत. सुफी काव्यात त्यांच्या कवितांना सन्मानाचे स्थान आहे.
“माशुक बनके आपही आशिक कहनाहे चल
जख्म ए जिगर को दिद का मरहम लगाए चल”

फोटो स्रोत, Getty Images
इरफान अलींची ही कविता अनेक अभ्यासकांनी नोंदवली आहे. विस्तारभयास्तव आपण दुसऱ्या सुफी कवींच्या कवितांची चर्चा येथे करु शकत नाही.
त्यांचा फक्त नामनिर्देश करु शकतो. ज्यामध्ये सुफी हजरत हसन शाह कादरी, महमूद मियां कादरी, हजरत हाफीज अहमदनगरी, हजरत फकिर मोहम्मदशाह, मौलाना अहमदअली अख्तर सौंस्तरी, हजरत मुन्शी उम्मीद, हजरत सितम भंगारवी यांचा समावेश होतो.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचे गुरु म्हणून ओळखले जाणारे शाह शरीफ हे देखील अहमदनगरचेच होते. त्यांच्या नावावरुन शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव शहाजी आणि काकाचे नाव शरीफजी ठेवले होते.
अहमदनगरच्या ऐतिहासिक वास्तू
अहमदनगर शहरात अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत. ज्या दखनी मुस्लिम वास्तूकलेचा नमुना म्हणून ओळखल्या जातात. ज्यामध्ये बाग रोजा हा अहमद निजामशाहचा मकबरा आहे.
अहमद निजामशाहनंतरचे सुलतान हे शिया होते. त्यामुळे त्यांचे मृतदेह चाळीस दिवसांच्या कालावधीसाठी बाग रोजा येथील एका कबरीत दफन केले जात आणि नंतर ते बगदाद अथवा इराणला अंत्यविधीसाठी पाठवले जात.
बुरहान निजामशाह नंतरच्या सर्व राज्यकर्त्यांचे मृतदेह असेच बगदाद, करबला मशद अथवा इराणला पाठवले गेले.

फोटो स्रोत, Somesh Shinde
चांदबीबीचा मृतदेह इराणला आठवे इमाम मुसा काजीन यांच्या कबरीशेजारी दफन करण्यासाठी पाठवला होता. पण मृत्यूनंतर चाळीस दिवसांसाठी ज्या कबरीत तो दफन केला होता. ती कबर आजही बागरोजामध्ये सुस्थितीत आहे.
याशिवाय बागरोजा परिसरात रामराजाच्या विरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या गुलामअली हत्तीची कबर आहे.
या लक्षवेधी कबरीच्या शेजारीच त्या हत्तीच्या माहुताची आणि माहुताच्या पत्नीची कबर आहे. काळ्या दगडातील ही इमारत इराणी-दखनी वास्तुकलेचा नमुना मानली जाते.

फोटो स्रोत, Getty Images
अहमदनगरच्या इतिहासाचे अभ्यासक आसिफ दुलैखान सांगतात, “या व्यतिरिक्त हश्त बहिश्त महल, लक्कड महल, रुमी खानचा मकबरा, मलीक मैदान ताफे बनवलेले मैदान, दमडी मस्जिद सोहेल खानने बांधलेल्या या मस्जिदीचा रिडर डायजेस्टने केलेल्या सर्व्हेत वास्तूसौंदर्यात आशिया खंडात चौदावा नंबर आला होता.
त्याशिवाय नियामत खानची मस्जिद आणि महल प्रसिध्द आहे, फरहाबाग ही भव्य इमारत आहे, ज्यावरुन शहाजहानने ताजमहालची संकल्पना घेतली होती.
सलाबतखानचा मकबरा (चांदबीबी महल), किल्ला या महत्त्वाच्या इमारती दखनी मुस्लिमांच्या वास्तूकलेचा नमुना म्हणून ओळखल्या जातात.
त्याशिवाय दखनी मुस्लिमांच्या दुरदृष्टीचे प्रतिक असणारी नेपती- निमगाव नहर, इमामपुर नहर, नहर पिंपळगाव, नागापूर नहर ही उखळी भूमिगत नळ योजना देखील अहमदनगर शहरात आहे.
याव्यतिरिक्त दर्गाह आणि 20-25 ऐतिहासिक मसजिदी आहेत. शहातील मस्जिद आणि दर्गाहवरील मध्य युगीन घुमटांची संख्या 80 इतकी आहे. जी कोणत्याही मध्ययुगीन शहरात आढळत नाही.”
दखनेच्या काळ्या मुसलमानांना पुन्हा हिणवलं जातंय
मोहम्मद तुघलकाने दखनी मुसलमानांच्या द्वेषातून अनेक निर्णय घेतले. मुराद, जहांगीर, शहाजहानने या दखनी मुसलमानांना चिरडण्यासाठी बरीच उठाठेव केली.
शेवटी औरंगजेबने इथल्या दखनी संस्कृतीवर आघात करत सर्व दखनी मुस्लिम शाह्या संपवल्या. दखनी विद्वानांना पळवून लावले. त्यांचे विद्यापीठ पाडले.
बिजापूरातील दखनी साहित्याचे ग्रंथ नष्ट केले. दखनेत हबशी मुसलमान मोठ्या संख्येत होते. त्यावरुन दखनी मुसलमानांचा उल्लेख मध्युयागात काळे मुसलमान असा करुन त्यांच्या संस्कृतीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न अनेक उत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी केला.
आता काळ बदलला आहे. लोकशाही राज्यात तरी दखनेतील या काळ्या मुसलमानांच्या संस्कृतीचा वारसा जपायला हवा होता. पण तो लोकशाहीतही संपवला जातोय हे दुर्दैवी आहे.
(सरफराज अहमद हे मध्ययुगीन दख्खनच्या इतिहासाचे अभ्यासक आहेत. तसंच, 'गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर'चे सदस्य आहेत.)











