You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'माळीणसारखा प्रकार झाला असता आम्ही रातोरात गाडल्या गेलो असतो'; खचत चाललेल्या गावाची आणि लोकांची गोष्ट
"गेल्या 30 तारखेला हाच प्रकार माळीण गावासारखा झाला असता आणि आम्ही रातोरात गाडल्या गेलो असतो," कपिलधारवाडीचे रुद्र महाकले सांगत होते.
बीड जिल्ह्यातल्या कपिलधारवाडी गावातील रस्त्यांना भेगा पडल्यात. तर घरं आणि शाळेच्या भिंतीला तडे गेलेत. सप्टेंबर महिन्यातील सततच्या पावसामुळे असं झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
गावातील रस्त्याला सुरुवातीला 10 ते 15 सेंटीमीटरचा तडा गेला. आता हा रस्ता 5 ते 6 फुटांपर्यंत खचलाय. गावातील एक घर पूर्णपणे पडलंय.
गावात आमची भेट रुद्र महाकले यांच्याशी झाली.
ते सांगायला लागले, "हा प्रकार 30 सप्टेंबरपासून सुरू झाला, ते आज 10 ऑक्टोबरपर्यंत चालूच आहे. हा भाग खाली खसत चाललाय. खालचा नदीकाठचा भाग, रस्त्याचा भाग आणि वरचा डोंगराचा भाग खसत चाललाय."
कपिलधारवाडी गावच्या चारही बाजूंनी डोंगर आहे. जवळपास 500 लोकसंख्येचं हे गाव पाली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येतं. सध्या इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
गावकरी कौशल्या शिंदे या कपिलधार देवस्थानाकडे निघाल्या होत्या. वाटेत आमची त्यांच्याशी भेट झाली.
त्या सांगायला लागल्या, "गावात कुणीच राहत नाही. भीती वाटती ना, कसं राहावं आम्ही गावामधी? पावसामुळे तडे गेलेत."
तर जानकीराम शिंदे हे ग्रामस्थ म्हणाले, "लय भीती आहे. इथं राहण्यासारखंच नाहीये. भीती म्हणजे कव्हा काय होईन म्हणून भरोसाच नाही."
माणसांची सोय, पण जनावरांंचं काय?
कपिलधारवाडीतील नागरिकांना गावापासून दीड किलोमीटर अंतरावरील कपिलधार देवस्थानात प्रशासनाच्या वतीनं शिफ्ट करण्यात आलंय. इथं या ग्रामस्थांची राहण्या-खाण्याची सोय करण्यात आलीय.
गावाच्या पाराजवळ सखाराम दळवे आणि साहेबराव शिंदे बसलेले होते.
सखाराम दळवे सांगू लागले, "आमची सोय केलेली आहे सगळी कपिलधारामध्ये. खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी सोय केलेली आहे. पण आता तिथं जीव राहतो का आमचा? अर्धा जीव इथं आणि अर्धा जीव तिथं होतोय ना. इथं जित्राब (जनावरं) हाय, पसारा आहे. तिथं निवांत झोप येती का माणसाला?"
तर साहेबराव शिंदे म्हणाले, "शासनानं आमची सोय केली. परंतु जनावरं, ढोरं जे आहेत त्यांची काही सोय झालेली नाही. काही शेतानं हायेत, काही गावात हायेत."
भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या पथकानं कपिलधारवाडी गावातील भूस्खलजन्य परिस्थितीची पाहणी करुन याबाबतचा प्राथमिक अहवाल सुपूर्द केलाय. त्यानुसार-
"संबंधित ठिकाणी पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही. त्यामुळे बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध भागात पाण्याचे झिरपणे व भूपृष्ठाखाली साठवण होत असल्याचे निदर्शनास आले आहे, या कारणामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू असून ती काही काळ पुढेही सुरू राहण्याची शक्यता आहे. तसेच या भागाला बहुआयामी धोकाही निर्माण झालाय."
प्रशासकीय स्तरावरील कार्यवाहीबाबत बोलताना बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, "प्राथमिक अहवालाच्या अनुषंगानं 5 ते 6 कुटुंब यांना धोके खूप जास्त असल्याचं सांगितलं आहे. त्या सर्वांना दुसऱ्या सेफर ठिकाणी शिफ्ट करण्यासाठी सांगितलं आहे. तिकडच्या लोकांची सुद्धा मागणी आहे पुनर्वसन करण्यासाठी. त्याबद्दल आम्ही तहसीलदारमार्फत कुठेकुठे करू शकतो यासाठी योग्य गायरान जागासुद्धा शोधून ठेवलेली आहे."
गावातील परिस्थिती पाहण्यासाठी शिवसंग्राम संघटनेच्या नेत्या ज्योती मेटे आल्या होत्या.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "जेव्हा मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो आणि पाणी मुरतं तेव्हा अशा घटना स्वाभाविक असतात हे सगळं आपण समजू शकतो. पण, या गावकऱ्यांना त्यांच्या जीविताच्या आणि वित्तहानीची जी भीती आहे ती दूर करण्यासाठी प्रशासनाला इथून पुढे landslide prone area आणि non-prone area असं दोन भागात वर्गीकरण करुन पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम करावं लागणार आहे."
2023 पासून पुनर्वसन प्रलंबित?
दोन वर्षांपूर्वी पुनवर्सनाचा प्रस्ताव स्थानिक प्रशासनाकडे दिला होता, पण त्यावर पुढे काही झालं नाही, असं कपिलधारवाडीच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे.
रुद्र महाकाले म्हणाले, "2023 ला आम्ही निवेदन दिलं होतं गावाच्या वतीनं की कपिलधारवाडीचं पनर्वसन करा. त्यावेळेस प्रशासनानं पुनर्वसन केलं असतं तर आम्ही नवीन घरात स्थलांतरित झालो असतो आणि या धोक्यापासून वाचलो असतो. गेल्या 30 तारखेला हाच प्रकार माळीण गावासारखा झाला असता आणि आम्ही रातोरात गाडल्या गेलो असतो."
पाली गावचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सोळंके याविषयी म्हणाले, "पुनर्वसनाचा प्रस्ताव 2023 साली दिला होता. पण त्यावर काही ॲक्शनच झाली नाही."
याविषयी बोलताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, "2023 चे ते पत्र मी बघितलं आहे. पण ते काही असं तडा पडून वैगरे नव्हते. तुम्ही बघितलं असेल तिथं मोठमोठे डोंगर आहेत. त्यापैकी एक दगड पडला म्हणून ते पत्र होतं. त्यामध्ये त्यानंतर कुठलाही पाठपुरावा कुणीही केलेला नव्हता."
जोपर्यंत कपिलधारवाडीतील विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत इथल्या नागरिकांना सर्व सोयीसुविधा देण्याचं नियोजन करण्यात आल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलंय.
पण, पुढच्या काही दिवसांमध्ये कपिलधार संस्थानात यात्रा भरणार आहे. तेव्हा इथं राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लोक येतात. त्यामुळे तातडीनं पुनर्वसन करण्याची कपिलधारवाडीच्या ग्रामस्थांची मागणी आहे.
शिवाय ऑक्टोबरमध्ये पाऊस पडल्यास गावातील स्थिती अधिक धोकादायक होऊ शकते, अशी धास्तीही कपिलधारवाडीचे ग्रामस्थ बाळगून आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)