You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तरकाशीत फ्लॅश फ्लड : 50 हून अधिक लोक बेपत्ता, चौघांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
- Author, आसिफ अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात 5 ऑगस्टला फ्लॅश फ्लड म्हणजे अचानक मोठा पूर आल्याची घटना घडली. हर्षिल परिसरातील खीर गंगा गदेराच्या म्हणजेच खोल नाल्याच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यानं धाराली गावाचं मोठं नुकसान झालं.
उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी माध्यमांना सांगितलं की, आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि मालमत्तेचं नुकसान झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान, एनडीआरएफचे डीआयजी मोहसेन शहेदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, प्राथमिक माहितीनुसार, "या घटनेत 40 ते 50 घरं वाहून गेली आहेत आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत."
दरम्यान, धारली येथील स्थानिकांचा असा दावा आहे की, या विध्वंसाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक्सवर पोस्ट करून या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे . ते म्हणाले की, ते वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.
प्रत्यक्षदर्शीनं काय सांगितलं?
धाराली गावातील रहिवासी आस्था पवार यांनी बीबीसीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांच्यासोबत या भयानक घटनेबाबत आणि सध्या तिथे काय परिस्थिती आहे याची माहिती दिली.
आस्था म्हणाल्या, "सध्या मी धारलीमध्ये आहे. माझे घर रस्त्यापासून थोडं दूर आहे, त्यामुळे खाली किती नुकसान झाले आहे ते सर्व काही इथून दिसतं आहे."
"इथून मी माझ्या डोळ्यांसमोर अनेक हॉटेल्स वाहून जाताना पाहिली. सगळं काही एकाच वेळी वाहून गेलं असं नाही. पहिली लाट खूप जोरदार आणि भयानक होती. तुम्ही ते व्हीडिओ पाहिले असतीलच. त्यानंतरही दर 10–15 किंवा 20 मिनिटांनी ढिगाऱ्याच्या अनेक लाटा येत राहिल्या. आता लहान लाटा येत आहेत, पण त्या सुद्धा हॉटेल्सना सोबत घेऊन जात आहेत. एक-दोन हॉटेल्स त्यात वाहून जात आहेत."
सरकार किंवा प्रशासनानं आधीच काही माहिती दिली होती का? या प्रशानावर आस्था सांगतात की, त्यांना याबाबत काही माहिती नव्हतं.
आस्था म्हणाल्या, "आम्हाला कोणतीही सूचनाही देण्यात आली नव्हती. सुट्ट्या नव्हत्या. आज मुलं सुट्टीवर नव्हती. एवढा मोठा अपघात होणार आहे याची कोणालाही कल्पना नव्हती. ही घटना दुपारी घडली. आम्ही छतावर गेलो, तिथून सर्व काही स्पष्ट दिसत होतं. जणू काही काहीच उरलं नाही."
त्या म्हणाल्या की गावातील बहुतेक लोक स्थानिक पूजेमध्ये उपस्थित राहण्याची तयारी करत होते. आस्था म्हणाल्या, "चार ऑगस्टच्या रात्री आणि पाच ऑगस्टच्या सकाळी पूजा होती. सुदैवानं चार ऑगस्टच्या रात्री हे सगळं घडलं नाही, कारण त्यावेळी संपूर्ण गाव पूजेसाठी उपस्थित होता."
पुढे त्या म्हणाल्या, "जर आधी काही माहिती दिली गेली असती तर आपण पूजेला गेलो नसतो. जर दुसरीकडे कुठेतरी या दुर्घटनेबाबत इशारा दिला गेला असेल तर तो इथपर्यंत पोहोचला नाही. इथे सगळं नॉर्मल होतं. शाळा सुरूच होत्या, सुट्टी नव्हती. एवढी मोठी दुर्घटना घडणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं."
धाराली गावाभोवती काय काय होतं?
आस्था या तिथंच राहतात, जिथं ही घटना घडली.
त्या म्हणाल्या, "तिथं खूप मोठी तीन-चार मजली हॉटेल्स होती. आता त्यांचं छप्पर ही दिसत नाही. इतकं मोठं नुकसान झालं आहे की संपूर्ण बाजारपेठच उद्ध्वस्त झाली आहे. धारालीमध्ये खूप मोठी बाजारपेठ होती. तिथं एक खूप मोठं मंदिरही होतं. आता तिथं काहीही दिसत नाही. सर्व काही उद्ध्वस्त झालं आहे. अगदी कल्प केदार मंदिरही दिसत नाही."
गंगोत्रीच्या वाटेवर धराली येतं आणि हे ठिकाण हर्षिल खोऱ्याजवळ आहे. कल्प केदार हे येथील स्थानिक मंदिर आहे, जिथं भाविक दर्शनासाठी येतात.
चार धाम यात्रेचा मार्ग देखील धारलीपासून जातो. अशा परिस्थितीत, भाविक अनेकदा धारलीमधील हॉटेलमध्ये राहतात.
हर्षिल खोऱ्याच्या बागोरी गावात राहणारे करण यांनी बीबीसीला सांगितल की, खोऱ्याच्या आजूबाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. लोकांना जवळच्या उंच भागात पाठवलं जात आहे, जेणेकरून रात्रीच्या वेळी जर पाऊस पडला तर जीवित आणि मालमत्तेची हानी होण्यापासून वाचवता येईल.
'लष्करी छावणी आणि बचाव पथकही या दुर्घटनेमुळे प्रभावित'
आपत्तीग्रस्त धाराली गावापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर एक लष्करी छावणी देखील आहे. लष्कराच्या अतिरिक्त सार्वजनिक माहिती महासंचालनालयानं एक्सवरील पोस्टद्वारे या दुर्घटनेची माहिती दिली.
ब्रिगेड कमांडर, ब्रिगेडियर मनदीप ढिल्लन म्हणाले की, हर्षिल चौकीवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अवघ्या 10 मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी सांगितलं की, बचावकार्य अजूनही सुरू आहे आणि आतापर्यंत सुमारे 20 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत.
ब्रिगेडियर ढिल्लन यांच्या मते, भूस्खलन आणि पुराच्या घटनेमुळे लष्कराच्या छावणीचा एक भाग आणि बचाव पथकालाही फटका बसला आहे.
पंतप्रधान, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील या मोठ्या नैसर्गिक आपत्तीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं आहे की, "उत्तरकाशीतील धाराली येथील या दुर्घटनेत बाधित झालेल्या लोकांबद्दल मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. सर्व पीडितांनाच्या भल्यासाठी प्रार्थना करतो. मी मुख्यमंत्री पुष्कर धामीजी यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचावपथकं शक्य तितके प्रयत्न करत आहेत. लोकांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जात नाही."
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत की, आयटीबीपीच्या तीन पथकांना बाधित भागात पाठवण्यात आलं आहे. यासोबतच एनडीआरएफच्या चार पथकांनाही घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना गरजूंना शक्य तितकी मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
"उत्तराखंडमधील धराली येथे अचानक आलेल्या पुरामुळं झालेल्या प्रचंड विध्वंसात अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण बेपत्ता झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि चिंताजनक आहे," असं राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"मी पीडित कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि बेपत्ता व्यक्ती लवकरात लवकर सापडतील, अशी आशा करतो."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)