You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तरकाशी: एरवी शांत असणाऱ्या खीर गंगेनी कसं केलं रौद्र रूप धारण, काय आहे परिसरातील पुराचा इतिहास?
- Author, दिनेश उप्रेती
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चीनच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात मंगळवारी (5 ऑगस्ट) अचानक आलेल्या पुरामध्ये चार जणांचा मृत्यू आणि 50 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये स्थानिक लोक ओरडून एकमेकांना पुराच्या धोक्याबद्दल आणि नदीपासून दूर पळायला सांगत असल्याचं ऐकू येत आहे.
या व्हीडिओमध्ये दिसतं आहे की नदीमध्ये अचानक पाण्याचा लोंढा आणि त्यासोबत गाळ आणि ढिगारा वाहत आला. या वेगवान प्रवाहात अनेक घरं आणि काही मजले असलेल्या इमारती अक्षरश: पत्त्यांप्रमाणे वाहून गेल्या.
उत्तराखंड सरकारनं दावा केला आहे की मदत आणि बचाव कार्य पूर्ण वेगानं सुरू आहे. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन दलांव्यतिरिक्त, सैन्य आणि निमलष्करी दलांचीही मदत घेतली जाते आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर खीर गंगा नदी खूप चर्चेत आहे. ही नदी भागीरथी नदीला जाऊन मिळते.
धराली हे उत्तरकाशी जिल्ह्यातील एक गाव आहे. ते गंगोत्रीकडे जाणाऱ्या हर्षिल खोऱ्याचा भाग आहे. चारधामांपैकी एक असलेल्या गंगोत्री धामच्या यात्रेला जाणाऱ्या लोकांसाठी तो एक महत्त्वाचा टप्पा देखील आहे.
या गावापासून गंगोत्री जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार करता हे गाव समुद्रसपाटीपासून जवळपास 3,100 मीटर उंचीवर आहे. ते निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
हिमालयाच्या उंच शिखरांमधून वाहत खीर गंगा नदी धराली गावात येते. एरवी वर्षभर ही नदी शांत असते आणि तिचा प्रवाह धीम्या गतीनं वाहत असतो. मात्र पावसाळ्यात ही नदी उग्र रूप धारण करते.
मंगळवारी (5 ऑगस्ट) खीर गंगा नदीनं प्रचंड रौद्र रुप दाखवलं. इतिहासाचे जाणकार आणि भूगर्भशास्त्रज्ञ मानतात की याआधी देखील खीर गंगा नदीत प्रचंड पूर आला आहे.
भूगर्भशास्त्रज्ञ प्राध्यापक एस पी सती सांगतात की 1835 मध्ये खीर गंगा नदीत सर्वात भयंकर पूर आला होता. त्यावेळेस संपूर्ण धराली गाव पुराच्या तडाख्यात सापडलं होतं. पुरामुळे गावात मोठ्या प्रमाणात गाळ आणि ढिगारा जमा झाला होता.
ते दावा करतात की आता जी गावातील वस्ती आहे ती त्यावेळेस नदीबरोबर वाहत आलेल्या गाळावरच वसलेली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये खीर गंगा नदीमध्ये जोरात पाणी वाहून आल्याच्या किंवा पूर आल्याच्या घटना घडल्या आहेत. यात अनेक घर पुराच्या पाण्यात वाहूनदेखील गेली होती. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
इतिहासकार डॉ. शेखर पाठक, हिमालयाचा इतिहास आणि पर्यावरणाचे तज्ज्ञ मानले जातात. डॉ. पाठक चीयांनादेखील वाटतं की हा परिसर अतिशय संवेदनशील आहे. या भागात भूस्खलन आणि हिमस्खलनासारख्या (एव्हलांच) घटनांची शक्यता कायम असते.
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "हिमालयाच्या चौखंभा वेस्टर्न रेंजचा हा भाग आहे. 1700 मध्ये गढवालमध्ये परमार घराण्याची राजवट होती. त्यावेळेस देखील मोठं भूस्खलन झालं होतं."
"त्यातून झालामध्ये 14 किलोमीटर लांबीचं सरोवर तयार झालं होतं. त्याचे पुरावे आजदेखील दिसतात. कारण तिथे भागीरथीचा प्रवाह थांबल्यासारखा वाटतो."
डॉक्टर पाठक सांगतात की 1978 मध्ये धरालीहून उत्तरकाशीकडे खालच्या बाजूला 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या डबराणीमध्ये एक धरण फुटलं होतं. त्यामुळे भागीरथी नदीला पूर आला होता. त्या पुरात अनेक गावं वाहून गेली होती.
त्यानंतर धराली आणि जवळपासच्या भागात अनेकदा ढगफुटीच्या, भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्यात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नव्हती.
नदीला खीर गंगा हे नाव कसं पडलं यावरून सोशल मीडियावर चर्चा होते आहे. वेगवेगळ्या कथा सांगितल्या जात आहेत. शेखर पाठक या सर्व कथा ऐकीव किंवा सांगोवागीच्या कथा असल्याचंच मानतात.
ते म्हणतात, "ही नदी आधी हिमनदी आणि मग घनदाट जंगलातून वाहते. त्यामुळे नदीचं पाणी शुद्ध असतं. त्याचा अर्थ इतर नद्यांप्रमाणे या नदीमध्ये चुन्याचं पाणी मिसळलेलं नाही. त्यामुळेच तिला खीर नदी म्हटलं जातं."
ढगफुटी होणं, हे हिमालयातील सर्वात विनाशकारी नैसर्गिक संकटांपैकी एक आहे. फार थोड्या वेळात एखाद्या छोट्या भागात प्रचंड पाऊस होतो. त्यातून प्रचंड पूर येतो.
भारतीय हवामान विभागानं (आयएमडी), ढगफुटीची व्याख्या केली आहे. त्यानुसार जेव्हा 20 ते 30 चौ. किलोमीटर परिसरात, एका तासात 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडतो, तेव्हा त्याला ढगफुटी म्हणतात.
तज्ज्ञांना वाटतं की हवामान बदलामुळे या प्रकारच्या घटना होण्याची शक्यता सातत्यानं वाढते आहे. या घटनांचं प्रमाण वाढतं आहे.
शेखर पाठक म्हणतात, "आधी उंचावरील प्रदेशात बर्फ पडायचा, हिमवर्षाव व्हायचा. हिमनद्या तयार व्हायच्या. पावसाचं प्रमाण खूप कमी होतं. मात्र आता बर्फ कमी प्रमाणात पडतं आणि पाऊस मात्र प्रचंड होतो."
"हवामान बदल हे त्यामागचं कारण आहे. त्यामुळे होणारा परिणाम, अनेकदा अशाप्रकारच्या नैसर्गिक संकटाच्या रुपात समोर येतो."
2023 मध्ये आयआयटी, रुरकीमधील संशोधकांनी एक अभ्यास केला होता. त्यात त्यांनी म्हटलं होतं की ढगफुटी होण्याच्या बहुतांश घटना सर्वसाधारणपणे 2000 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भागात होतात. त्यामध्ये हिमालयातील लोकवस्ती असलेल्या अनेक खोऱ्यांचाही समावेश आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.