हिमालयाच्या प्रदेशात वारंवार पूर, ढगफुटी, भुस्खलन का होतंय, या विनाशामागचं कारण काय?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

7 ऑक्टोबरला हिमाचल प्रदेशातल्या बिलासपूर जिल्ह्यातून एक खासगी बस जात असताना भूस्खलन झाले आणि त्यात 15 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. शिवाय, 18 जण जखमी झाले.

पण यंदाच्या पावसाळ्यातली ही काही पहिलीच घटना नव्हती. अशा असंख्य घटना झाल्या आहेत आणि दुर्घटनांची ही मालिका संपतानाच दिसत नाहीय.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, या वर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान तीव्र आपत्तीच्या घटनांमध्ये (Extreme Weather Events) एकट्या हिमाचलमध्ये 141 जणांचा मृत्यू झाला. भीती ही आहे की, वास्तवातला आकडा यापेक्षाही मोठा असू शकतो.

मात्र, त्यापेक्षा धक्कादायक हे आहे की, केवळ हिमाचलच नाही, तर या वर्षीच्या मान्सून हंगामात संपूर्ण भारतातच सर्वदूर अशा घटना घडल्या आहेत आणि त्यात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागानं वेगवेगळ्या प्रादेशातल्या बातम्या आणि राज्य सरकारांच्या यंत्रणांकडून संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत विविध अत्यंत तीव्र नैसर्गिक आपत्तींमध्ये 1528 जणांचा मृत्यू झाला.

पण हिमालयीन प्रदेशांसाठी मात्र हा काळ अधिक भयावह ठरला.

केवळ हिमाचलच नाही तर शेजारच्या उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये अशाच विध्वंसाच्या घटना घडल्या. अतिवृष्टी झाली, पूर आले, दरडी कोसळल्या. आयएमडीच्या आकडेवारीनुसार, या राज्यांमध्ये अनुक्रमे 41 आणि 139 जणांनी आपला जीव गमावला.

त्यामुळेच एक प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होतो आहे : हिमालयाचा प्रदेश धोकादायक का होतो आहे?

हिमाचल प्रदेशात काय घडलं?

हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यातल्या जंजेहलीत एका लहान पाण्याच्या प्रवाहाजवळ मोठमोठ्या दगडांनी भरलेल्या मोकळ्या जागेवर आम्ही उभे आहोत.

जे स्थानिक नाहीत त्या बाहेरच्या लोकांना ते कोणत्याही हिमालयतल्या नदीच्या खडकाळ खोऱ्यासारखे वाटेल. पण तसं नाही. इथं अशी मोकळी जागा कधीच नव्हती.

फक्त 3 महिन्यांपूर्वी इथं याच जागेवर बहुमजली घरं उभी होती. शेतं होती आणि तिथं पिकं घेतली जात होती. आता त्यावर कोणी कदाचित विश्वास ठेवणारही नाही.

30 जूनच्या रात्रीपूर्वी चंद्रा देवी आणि त्यांच्या कुटुंबाचाही त्यावर विश्वास बसला नसता. चंद्रा देवी ती जागा आम्हाला दाखवत त्यांची कहाणी सांगतात.

"इथं आमचं शेत होतं. त्याच शेतात एक घरही बांधलं. आमचे किराणा दुकानही होतं. गेल्या शंभर वर्षांत इथं पाणी आल्याचं कोणी ऐकलं नाही," चंद्रादेवी अश्रूसरल्या कोरड्या डोळ्यांनी वर्णन करतात.

आठ वर्षांपूर्वी चंद्रा आणि त्यांच्या पतीने त्यांच्या संपूर्ण आयुष्याची बचत या 8 खोल्या बांधण्यात घालवली. पण त्या रात्री पूर आला आणि सर्व काही वाहून गेलं.

त्या 30 जूनच्या रात्री ढगफुटीसारखा पाऊस पडत होता. चंद्राचं कुटुंब कसं तरी त्यांचे प्राण वाचवून लगतच्या उंच डोंगरगावर पळून आलं. त्यांची 19 वर्षांची मुलगी रितिका मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग आहे. चंद्रानं तिला पाठीला बांधलं आणि तिला घेऊन त्या डोंगरावर चढल्या.

काही दिवसांपूर्वी पाण्याच्या प्रवाहाजवळ राहणाऱ्या इतर अनेक लोकांप्रमाणे, आता चंद्राचं कुटुंबही भीतीने डोंगराच्या वरच्या भागात राहतं.

सेराज व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशानं 30 जूनसारखी रात्र कधीच पाहिली नव्हती. भूस्खलन, खराब झालेले रस्ते आणि कोसळलेल्या इमारतींचे अवशेष या स्वरूपात सर्वत्र विनाशाचे घाव आम्ही प्रवास करत असतांना सतत दिसत राहतात. तीन महिने उलटून गेले तरीही.

थुनाग अजूनही उद्ध्वस्तावस्थेतच असलेलं गावं आहे. जेव्हा आम्ही त्याच्या अरुंद गल्ल्यांमधून चालतो तेव्हा आपल्याला इमारतींचे अनेक उरलेले सांगाडे दिसतात. त्यापैकी अनेकांमध्ये अजूनही मलबा आहे.

हिमालयाच्या प्रदेशात डोंगराळ प्रदेशात उंचावरही अनेक वस्त्या, गावं असतात. अनेक वस्त्यांचे भूस्खलनामुळे, दरडी कोसळ्यानं नुकसान झालं आहे. काही वस्त्या कायमस्वरुपी विस्थापित झाल्या आहेत तर काही कशाबशा टिकून आहेत.

तसंच, एक थुनाडी गाव. खाली पाण्याचा जोरदार प्रवाह आणि वरुन आलेली मोठी दरड यांच्यात हे गाव अडकलं होतं.

या थुनाडीचे 90 वर्षांचे रहिवासी जयराम म्हणतात की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही असा विनाश पाहिला नव्हता.

"आम्ही दोन महिने डोंगरावर राहिलो. दोन महिन्यांनंतर, जेव्हा प्रशासनाने आम्हाला खाली जायला सांगितलं. आम्ही अजूनही आमची घरं साफ करत आहोत. मलब्याचे ढीग अजूनही तिथेच आहेत," जय राम म्हणतात.

हे सगळं का होतंय?

गेल्या काही वर्षांपासून हिमालयीन प्रदेशात अशा प्रकारच्या दुर्घटना घडत आहेत.

हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणं आहे की जागतिक हवामान बदल आणि तापमान वाढीचे जे दूरगामी परिणाम होत आहेत, त्यातला एक म्हणजे पावसाळ्याचा हंगाम, मॉन्सूनचं स्वरुप बदलत आहे.

त्यामुळे कधी अतिवृष्टी, कधी मोठा काळ कोरडा हंगाम असं चक्रावून टाकणारं वेळापत्रक देशभर दिसतं आहे. त्याचा दृष्य आणि भयावह परिणाम म्हणजे त्यामुळे घडून येणा-या दुर्घटना.

ढगफुटी (एका तासात 100 मिमी पाऊस) सारख्या अत्यंत तीव्र हवामानशास्त्रीय घटना आता अधिक वारंवार घडत आहेत.

गेल्या 5 वर्षांतला अतिवृष्टीच्या पावसाची (204.5 मिमी पेक्षा जास्त) आयएमडीच्या नोंदींची आकडेवारी ते स्पष्टपणे दाखवते.

जागतिक तापमानवाढीमुळे महासागरांच्या तापमानात वाढ होण्याशी याचा थेट संबंध आहे.

"अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांचं तापमान गेल्या काही दशकांमध्ये वाढलं आहे. जर त्यांचं तापमान जास्त असेल तर वातावरणात जास्त आर्द्रता येईल, कारण पाण्याचं बाष्पीकरण होतं आणि जास्त आर्द्रता असेल तर ती अधिक पर्जन्यमानात रूपांतरित होईल. तसं होतं आहे म्हणून आपल्याकडे अतिवृष्टीच्या घटना वाढत आहेत," आयआयटी मुंबईच्या हवामान विज्ञान विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अक्षया निकुंभ स्पष्ट करतात.

हिमालयात अजून काही घटक महत्वाचे ठरतात. "हिमालयीन प्रदेशात जी पर्वतीय संरचना आहे आहे तिच्यामुळे ही आर्द्रता (ढगांच्या स्वरुपात) अधिक जास्त उंचीवर जाते आणि तिथे पाऊस पडतो. हे वर्षानुवर्षं घडतं आहे. परंतु आता आपल्याकडे वातावरणात जास्त आर्द्रता असल्याने ढगफुटी वाढलेल्या आहेत," डॉ निकुंभ म्हणतात.

पण यावर्षी, युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे, 'वेस्टर्न डिस्टर्बन्स' नावाच्या हवामानशास्त्रीय घटनेनंही हिमालयाच्या त्रासात भर घातली.

"या वर्षी, केवळ पर्वतीय प्रदेशाचा घटक नव्हता, तर त्या पर्वतरांगांवर आधीच काहीतरी अस्तित्वात होते. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ढगांची हालचाल होऊन एस सिस्टिम तयार झाली होती. त्यामुळे पाऊस आणखी वाढला आणि कदाचित म्हणूनच यंदा ढग फुटीचे प्रमाण जास्त आहे," डॉ. निकुंभ म्हणतात.

अस्थिर झालेल्या पर्वतरांगा

ढगफुटीमुळे एक गंभीर परिणाम झाला आहे म्हणजे हिमालयातल्या भूस्खलनाचं प्रमाण वाढलं आहे. अगोदर दरडी कोसळत नव्हत्या असं नाही, पण आता काही भूगर्भशास्त्रीय परिणाम झाला आहे. त्यामुळे प्रमाण वाढलं आहे.

आयआयटी मंडी येथील संशोधकांनी गेल्या 30 वर्षांतील पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास केला. त्यांना आढळलं की कोरडा काळ आणि पावसाळा, यांच्यातलं अंतर (वेट पिरियड) लक्षणीयरित्या कमी झालं आहे, विशेषतः हिमालयीन प्रदेशात.

यामुळे वर्षातील बहुतेक काळ पर्वतीय उतार ओले राहतात, ज्यामुळे भूस्खलनाची वारंवारता वाढते. हिमालय हा तुलनेनं तरुण पर्वत आहे. अजूनही इथले भूस्तत पक्के झालेले नाहीत. त्यामुले ओले राहिल्याने ते अधिक धोकादायक झाले आहेत.

मानवनिर्मित आपत्ती

पर्यावरणतज्ञांचं मात्र अनेक दशकांपासून हे सातत्यानं म्हणणं आहे की हवामान बदल जरी खरा असला तरीही परंतु मानवानं हिमालयाशी ज्या प्रकारे छेडछाड केली आहे, त्यामुळे तो या विनाशाला तितकाच जबाबदार आहेत.

अंदाधुंद बांधकाम, महामार्ग, बोगदे, जलविद्युत प्रकल्पांसाठी केले जाणारे काम, हिमालय पर्वत कमकुवत करत आहेत. हा वाद हिमालयाच्या बाबतीत कायम होत राहिला आहे.

जेव्हा आम्ही हिमाचलमधील मंडी ते कुल्लू-मनाली या बांधकाम सुरु असलेल्या महामार्गावरून प्रवास करतो तेव्हा भागातल्या पर्वतांवर यंदाच्या पावसाळ्यात घडलेलं भूस्खलन ठिकठिकाणी दिसतं. अनेक ठिकाणी दरडींमुळे महामार्गाचे नुकसान झालं आहे.

ते सांगतात की, प्रचंड बांधकामांमुळे अनियंत्रित मलबा निर्माण होत आहे आणि पावसाळ्यात त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होत आहेत.

"जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा सर्व मलबा नदीत जातो. तो पाण्यासारखा तरंगत नाही. तो तळाशी स्थिरावतो. आणि जेव्हा तो स्थिरावतो तेव्हा तो नदीचं पात्र व्यापतो. जेव्हा नदी वर येते तेव्हा जवळपास बांधलेले महामार्ग आणि घरं नष्ट होतात आणि त्यांची किंमत चुकवतात. तेचं यंदा सर्वाधिक झालं आहे," पाठक म्हणतात.

"याचे सर्वात मोठे उदाहरण फक्त उत्तराखंडमध्येच नाही तर कुलू खोऱ्यातही दिसते, जिथे सलग चार वर्षं दुर्घटना घडत आहेत. पण आम्ही त्यातून काही शिकलो नाही," ते पुढे म्हणतात.

"उत्तराखंडमधील धरालीचं उदाहरण घ्या. एक आपत्ती आली आणि त्यामुळे अनेक लोक मरण पावले. ही तीच धराली आहे जिथे 2013 मध्येही अशीच आपत्ती आली. आम्ही त्यातून काहीही शिकलो नाही. लोक पुन्हा तिथे जाऊन स्थायिक झाले. जर आम्ही भूतकाळातून काहू शिकलो असतो तर आम्ही कोणालाही तिथे परत स्थायिक होऊ दिले नसते. पण आम्ही काहीही शिकलो नाही. सगळ्याच दुर्घटनांबद्दल आपण असं म्हणू शकतो," हिमांशू म्हणतात.

"काहीच वर्षांपूर्वी आम्ही लिहिलं होतं की 'यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'. त्या म्हणण्याला आता आमच्याकडे पुरावे आहेत," हिमांशू पुढे म्हणतात.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री काय म्हणाले?

हिमालयीन पर्वतीय प्रदेशातील विकास मॉडेलबद्दल आम्ही हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की, हिमालयच्या प्रदेशातील राज्यांसाठी वेगळा विकासाचा दृष्टिकोन आवश्यक आहे आणि सध्याच्या धोरणात काहीतरी चुकतं आहे.

ते म्हणतात, "भूस्खलन हे हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये होतंच असतं. त्यात नवीन नाही. जेव्हा तुम्ही रस्ता बांधता तेव्हा तुम्ही पर्वत 90 अंशाच्या कोनात कापता. त्यावेळेस पर्वताचे स्तर हालतात. ते थर स्थिर होण्यासाठी किमान चार ते सहा वर्षे लागतात."

"आता असे होतंय की NHAI चा चार पदरी रस्ता बांधल्यापासून, मोठ्या यंत्रसामग्री आणल्या गेल्या आहेत. त्यांनी हा पर्वत, त्याचे थर हलवले आहेत आणि तो सतत कोसळत आहे. जेव्हा जेव्हा नवीन रस्ते बांधले जातात तेव्हा ते स्थिर होण्यासाठी चार ते पाच वर्षे लागतात."

एकंदरीत, आपण असे म्हणू शकतो की, हिमालय आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. हवामान बदलामुळे या प्रदेशातील पावसाचे स्वरूप बदलले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे पर्वतांचा कणा मोडला आहे.

आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही एकच प्रश्न उरतो : यावेळी आपण काही शिकू का?

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)