हिमाचल प्रदेशमध्ये भूस्खलनात मृत्यू झालेल्या 15 जणांमध्ये 4 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश

हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भूस्खलनाच्या तडाख्यात एक बस सापडली. त्यात 15 जणांचा मृत्यू झाला.

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृत्यू झालेल्या 15 जणांमध्ये दोन लहान मुले आणि चार महिला यांचा समावेश आहे. ही माहिती बिलासपूरचे पोलीस अधीक्षक संदीप धवल यांनी दिली.

पोलीस अधीक्षक संदीप धवल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "खाजगी बसवर डोंगरावरून दरड पडली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये 9 पुरुष, 4 महिला आणि 2 लहान मुले आहेत. याशिवाय दोन मुलांना स्थानिक नागरिक आणि मदतकार्य पथकाने वाचवले."

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे, तसंच त्याच्याशी निगडीत माहिती दिली आहे.

या घटनेची माहिती देताना त्यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "बिलासपूर जिल्ह्यातील झंडूता विधानसभा मतदारसंघातील बालूघाटजवळ झालेल्या भीषण भूस्खलनाच्या वृत्तानं माझं मन हादरलं आहे."

ते म्हणाले, "या प्रचंड भूस्खलनाच्या तडाख्यात एक खासगी बस सापडली असून त्यात 15 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली इतरही काहीजण अडकले असण्याची शंका आहे."

या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणाले की अधिकाऱ्यांना सर्व यंत्रणा कामाला लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले की, "या कठीण प्रसंगी मी सर्व पीडितांच्या कुटुंबासोबत आहे."

पंतप्रधानांनी केले दुःख व्यक्त

या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दु:ख व्यक्त केलं आहे.

त्याचबरोबर या दुर्घटनेत मृत पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदतीची घोषणादेखील केली आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून एक्स या सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचं मला दु:ख आहे. या कठीण प्रसंगी या दुर्घटनेतील पीडित आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर माझ्या संवेदना आहेत."

"पीएमएनआरएफ मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत करण्यात येईल."

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, "हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यात भूस्खलनामुळे भयंकर घटना घडली. ज्यात अनेक लोकांच्या मृत्यूचे वृत्त आले आहे, ते अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे. राज्य सरकारकडून बचावकार्य युद्ध स्तरावर सुरू आहे. सरकार पीडितांना शक्य तितकी मदत करत आहे. आम्ही शोकाकुल कुटुंबांसोबत आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)