आधी धूसर दिसायला लागलं, मग थेट डोळ्यात दात आला; हे दुर्मिळ प्रकरण नेमकं काय आहे?

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, पाटणा

वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनव्या घटना घडताना दिसतात. अनेकदा रुग्ण एखाद्या आजारावर उपचारासाठी जातो. मात्र, जेव्हा उपचार सुरू होतात, तेव्हा त्याला वेगळाच आजार असल्याचं समोर येतं.

पाटणा येथील इंदिरा गांधी मेडिकल सायन्सेस (आयजीआयएमएस) रुग्णालयात नुकतंच असंच एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे.

या रूग्णालयात आलेल्या एका रुग्णाच्या उजव्या डोळ्यात दात निघाला. या रुग्णावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, हा प्रकार वैद्यकीय शास्त्रातील अत्यंत दुर्मिळ प्रकारांपैकी एक आहे.

11 ऑगस्टला रुग्णाची शस्त्रक्रिया करून त्याच्या डोळ्यातील दात काढण्यात आला असून आता तो रुग्ण बरा आहे. बीबीसीने या रुग्णाशी आणि ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधून हा प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

या वृत्तात आम्ही आयजीआयएमएसच्या गोपनीयतेच्या नियमांचं पालन करून रुग्णाची खरी ओळख लपवण्यासाठी त्याचं नाव बदललं आहे.

काय आहे प्रकरण?

रमेश कुमार (नाव बदललं आहे) हे बिहारच्या सिवान जिल्ह्यातील आहेत. 42 वर्षीय रमेश यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांच्या वरच्या एका दाताजवळून रक्तस्राव होत असल्याची तक्रार केली होती.

गावात राहणाऱ्या रमेश यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी उपचार केल्यानंतर डिसेंबर 2024 पर्यंत रमेश पूर्णपणे बरे झाले.

परंतु, मार्च 2025 मध्ये रमेश यांना जाणवलं की, त्यांचा उजवा डोळा आणि दात यांच्या मधील गालावर गाठीसारखं काहीतरी होत आहे. मग त्यांनी पुन्हा स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. यावेळी डॉक्टरांनी रमेश यांना पाटणा येथे जाऊन तपासणी करण्याचा सल्ला दिला

रमेश यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं, "त्या गाठीमुळे मला थोडंसं धूसर म्हणजे अस्पष्ट दिसत होतं. डोक्याच्या उजव्या बाजूला दुखायचं. त्यामुळे चक्कर यायची आणि अंगात सुस्तपणामुळे नेहमी झोपावं असंच वाटायचं."

"माझं सगळं काम बिघडलं होतं. मग मी जूनमध्ये आयजीआयएमएसमध्ये डेंटिस्टला दाखवलं. डॉक्टरांनी माझं सीबीसीटी स्कॅन केलं. त्यातून समजलं की, माझ्या डोळ्यात दात आहे. 11 ऑगस्टला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. आता मी पूर्णपणे निरोगी आहे."

सीबीसीटी म्हणजे 'कोन बीम कॉम्प्युटेड टोमोग्राफी'. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक्स-रेचा एक प्रकार आहे. यात चेहरा आणि जबड्याचा भाग स्कॅन करून त्याची 3D म्हणजे त्रिमिती चित्रं तयार होतात.

डोळ्यात दात कसा उगवला?

रमेश यांच्यावर दंत (डेंटल) विभागातील मॅक्सिलोफेशियल, ओएमआर (ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी) आणि अ‍ॅनेस्थेशिया विभागाने मिळून उपचार केले.

'मॅक्सिलो' म्हणजे जबडा आणि 'फेशियल' म्हणजे चेहरा. मॅक्सिलोफेशियल सर्जन मेंदू, डोळे, कान यांचे आतील भाग सोडून उरलेल्या डोक्यापासून ते मानेपर्यंतच्या भागावर शस्त्रक्रिया करतो.

अशाच प्रकारे ओएमआरचं काम म्हणजे एक्स-रेसारख्या तंत्राचा वापर करून दात, तोंड, जबडा आणि चेहऱ्यातील अशा समस्या शोधणं, ज्या साध्या किंवा सामान्य तपासणीत दिसत नाहीत.

रुग्णाच्या डोळ्यात दात कसा उगवला?

या प्रश्नाचं उत्तर देताना हॉस्पिटलच्या ओएमआर डिपार्टमेंटच्या प्रमुख निम्मी सिंह म्हणाल्या, "हा एक जन्मजात दोष आहे. म्हणजे लहानपणी शरीर जसजसं वाढतं, तसंच दातही विकसित होत असतात. त्याच वेळी हा दात अशा ठिकाणी वाढायला लागला, जिथे तो सामान्यपणे वाढत नाही."

ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले मॅक्सिलोफेशियल सर्जन प्रियांकर सिंह म्हणतात, "आपल्या शरीरात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सामान्य ठिकाणी तयार न होता कुठेतरी वेगळ्या जागी तयार होतात."

"जेव्हा बाळ गर्भात असतं किंवा चेहऱ्याची वाढ होत असते, तेव्हा दात तयार होणारे पदार्थ काही ठिकाणी चुकीने जाऊ शकतात आणि त्या भागात दात वाढू लागतो. या प्रकरणातही असंच झालं आणि दात डोळ्याच्या तळाशी (फ्लोर ऑफ द ऑर्बिट) वाढला."

डोळ्याच्या आत दातांची मुळे गेली होती

"मानवाच्या डोक्यात किंवा कवटीत अशी हाडांची जागा असते जिथे डोळे असतात, त्याला ऑर्बिट म्हणतात. साध्या भाषेत सांगायचं तर डोळ्याभोवती डोळे सुरक्षित ठेवणारं सॉकेट म्हणजे ऑर्बिट. डोळ्याच्या तळाच्या भागाला 'फ्लोर ऑफ द ऑर्बिट' म्हणतात."

रमेश कुमार यांच्या सीबीसीटी स्कॅनमध्ये समजलं की, डोळ्याच्या तळाशी (फ्लोर ऑफ द ऑर्बिट) दाताचे मुळे आहेत.

प्रियांकर सांगतात, "या प्रकरणात दाताची मुळे डोळ्याच्या तळाशी (फ्लोर ऑफ द ऑर्बिट) होते, तर क्राऊन (दाताचा पांढरा भाग) जबड्याच्या सायनसमध्ये होता. कारण हा दात आपल्या सामान्य जागी नव्हता. त्यामुळे शरीरासाठी तो फॉरेन बॉडीसारखा (वस्तू) होता."

"शरीराच्या संरक्षणासाठी या फॉरेन बॉडीभोवती एक सिस्ट (गळू किंवा पिशवीसारखी रचना) तयार झाली होती. या सिस्टमुळे संपूर्ण जबड्याच्या भागावर दबाव पडला आणि चेहऱ्यावर सूज आली होती."

मॅक्सिलरी सायनस, फ्लोर ऑफ द ऑर्बिट आणि आपल्या वरच्या जबड्याचा भाग यांच्यातील जागा म्हणजे गालाचा एक भाग आहे.

कारण हा दात डोळ्याच्या तळाशी (फ्लोर ऑफ द ऑर्बिट) होता, जिथून अनेक नसा जातात, त्यामुळे ही शस्त्रक्रिया खूप कठीण होती.

दाताचा आकार कसा आणि किती होता?

जेव्हा मी रुग्ण रमेश कुमार यांना भेटले, ते अगदी सामान्य दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची खूण किंवा डाग दिसत नव्हता.

खरं तर त्यांची शस्त्रक्रिया तोंडाच्या आत किंवा जबड्यातून केली गेली होती. यात त्यांना 10 ते 12 टाके घ्यावे लागले आहेत.

सर्जन प्रियांकर सिंह यांनी सुरुवातीला ऑपरेशन डोळ्याजवळ चीर करून करण्याचं ठरवलं होतं. परंतु, रमेश यांचं वय आणि त्यांचं काम पाहता, शस्त्रक्रिया इंट्रा ओरल म्हणजेच तोंडाच्या आतून करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या ऑपरेशननंतर रुग्णाचे डोळे पूर्णपणे ठीक आहेत आणि दृष्टी पूर्वीसारखी आहे.

दरम्यान, बाहेर काढलेला दाताचा आकार किती आणि कसा होता? असा प्रश्न निम्मी सिंह यांना विचारला असता, त्या म्हणाल्या की, "रुग्णाचा हा दात प्रीमोलर दातासारख्या आकाराचा होता."

प्रीमोलर दात हे आपल्या तोंडात मागच्या बाजूला असतात. हे समोरच्या कॅनाइन दात आणि मागच्या मोलर (दाढ) दातांच्यामध्ये असतात.

प्रियांकर सिंह सांगतात, "रुग्णाचे सर्व दात होते. तरीही नवीन दात आला, तर त्याला सुपरन्यूमरी टूथ (असामान्य दात) म्हणतात."

अशा प्रकरणांची यापूर्वी नोंद झाली आहे का?

निम्मी सिंह आणि प्रियांकर सिंह, दोघेही याला अत्यंत दुर्मिळ प्रकार मानतात.

प्रियांकर सिंह सांगतात की, "भारतामध्ये अशा फक्त 2 किंवा 3 प्रकरणांचीच नोंद आहेत. 2020 मध्ये चेन्नईमध्ये प्रसिद्ध सर्जन एस.एम. बालाजी यांनी अशाच प्रकारची शस्त्रक्रिया केली होती. या प्रकरणातही दात शरीराच्या महत्त्वाच्या भागाजवळ होता, जसं आमच्या रुग्णाच्या प्रकरणात दिसून आलं होतं."

असा दात (अ‍ॅक्टोपिक दात) पुन्हा येण्याचा धोका आहे का?

प्रियांकर सिंह सांगतात, "असा दात पुन्हा येण्याची शक्यता नाही. पण आम्ही रुग्णाचा सतत फॉलो अप ठेवतो. रुग्णाची सिस्ट आम्ही खूप काळजीपूर्वक काढली आहे. तरीही काही भाग राहिला असेल, असं आम्ही गृहीत धरतो."

"अशा परिस्थितीत आम्ही त्या भागाला, म्हणजे मॅक्सिलरी सायनसला, कॉटराइज केलं आहे. म्हणजे सिस्टचा उरलेला भाग जाळून टाकला आहे, ज्यामुळे भविष्यात संक्रमण होणार नाही."

बीबीसीची टीम जेव्हा रमेश यांना भेटली, तेव्हा टाक्यांमुळे त्यांना बोलायला आणि हसायला थोडी अडचण येत होती. परंतु, ते आपल्या उपचारावर खूश आणि समाधानी दिसले.

रमेश सांगतात, "माझी पत्नीने खूप टेन्शन घेतलं होतं, ती सतत चिंतेत असायची आणि सतत रडायची. शेजारच्या गावकऱ्यांनाही जेव्हा कळलं, तेव्हा सगळे माझी विचारपूस करायचे. पण सध्या माझ्यासाठी जास्त बोलणं योग्य नाही. मी माझं आयुष्य पुन्हा लोकांमध्ये सुरू करण्यासाठी आणि पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी उत्सुक आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)