You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ब्रेन स्ट्रोक आधीच ओळखता येतो का? तुम्हाला 'ही' लक्षणं माहिती असायला हवीत
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मेंदूवर अचानक आलेला आघात म्हणजे ब्रेन स्ट्रोक. योग्य वेळी लक्षणं ओळखली, तर जीव वाचवता येऊ शकतो.
मेंदू हा माणसाच्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो, कारण तो संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवत असतो.
शरीराच्या प्रत्येक अवयवाकडून संदेश मेंदूपर्यंत पोहोचतो आणि मग मेंदू गरजेनुसार त्या अवयवाला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद द्यायला सांगतो.
जेव्हा शरीराच्या एखाद्या भागातून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्यास, त्याला ब्रेन स्ट्रोक म्हणतात.
ब्रेन स्ट्रोक शरीराच्या एका भागाशी किंवा अनेक भागांशी संबंधित असू शकतो.
जेव्हा शरीराच्या एखाद्या भागातून मेंदूपर्यंत संदेश पोहोचत नाही, तेव्हा तो भाग लकवाग्रस्त (अर्धांगवायू) म्हणजेच हालचाल न करणारा होतो.
एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोकचा धोका असेल, तर त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि ते टाळण्यासाठी काय उपाय करायला हवेत?
हेच समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं
ब्रेन स्ट्रोक ही अचानक होणारी घटना मानली जाते.
एखाद्या निरोगी व्यक्तीला भविष्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे की नाही, हे काही सुरुवातीच्या लक्षणांवरून कळू शकतं.
सहसा डॉक्टर याला बीइएफएएसटी (BEFAST) असं म्हणतात.
- बी- बॅलन्स : निरोगी दिसणाऱ्या व्यक्तीचा अचानक तोल बिघडू शकतो आणि थोड्या वेळाने तो पुन्हा ठीक होतो.
- इ- आय (डोळे) : अचानक डोळ्यांसमोर अंधार येतो, जणू काही पडदा आल्यासारखं वाटतं आणि नंतर पुन्हा स्पष्ट दिसू लागतं.
- एफ- फेस (चेहरा) : बोलताना अचानक एखाद्याचा चेहरा वाकडा होतो आणि लगेच तो पुन्हा सामान्य किंवा बरा होतो.
- ए- आर्म्स (हात) : हाताची ताकद क्षणभर न राहणे किंवा हात थोडा वेळ शिथिल पडणे आणि लगेच ठीक होणे.
- एस- स्पीच (जीभ) : अचानक बोलणं थांबणं आणि काही काळ बोलता न येणं.
- टी- टाइम : अशी लक्षणं दिसली, तर लगेच हॉस्पिटलला जा.
यापैकी कुठलीही लक्षणं दिसली आणि ती काही वेळात ठीक झाली तरीही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.
कारण ही लक्षणं सांगतात की, मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा आहे, ज्यामुळे भविष्यात स्ट्रोकचा धोका वाढवू शकतो.
दिल्लीतील बी.एल. कपूर मॅक्स हॉस्पिटलचे न्युरोलॉजिस्ट डॉ. प्रतीक किशोर सांगतात, "अशा लक्षणांमागे दुसऱ्या एखाद्या आजाराची कारणंही असू शकतात. पण जर माणूस पूर्णपणे निरोगी असेल, तर ही लक्षणं भविष्यात त्याला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो याचा संकेत देतात. आणि ही लक्षणं लगेच बरी झाली नाहीत, तर याचा अर्थ असा की त्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक झाला आहे."
ब्रेन स्ट्रोकची लक्षणं दिसल्यावर काय करायचं?
एखाद्या व्यक्तीचा अचानक तोल जाणं, अचानक दिसेनासं होणं म्हणजे दृष्टी कमी होणं, बोलायला अडचण येणं, हात-पाय न चालणं किंवा चेहरा वाकडा होणं अशी लक्षणं दिसली आणि ती लगेच नाहीशी झाली नाहीत, तर ती ब्रेन स्ट्रोकची लक्षणं असू शकतात.
अशावेळी वेळ न दवडता लगेचच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं असतं.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) न्युरोलॉजी विभागातील डॉ. मंजरी त्रिपाठी म्हणतात, "ब्रेन स्ट्रोक झाल्यावर साडेचार तासांच्या आत उपचार सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हा आजार धमनीत अडथळा आल्यामुळे किंवा ती फुटल्यामुळे होतो, ज्यामुळे रक्त मेंदूपर्यंत पोहोचत नाही."
डॉक्टरांच्या मते, ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर सुरुवातीच्या साडेचार तासांना गोल्डन पीरियड म्हटलं जातं.
तरीही, काही प्रकरणांत सहा ते आठ तासांच्या आत उपचार सुरू केल्यास रुग्ण बरा होण्याची शक्यता असते.
डॉ. मंजरी त्रिपाठी सांगतात, "जर धमनीत रक्ताची गुठळी झाली असेल, तर ती विरघळवण्यासाठी ब्लड क्लॉट बस्टर इंजेक्शन दिलं जातं. काही वेळा, गरज असल्यास आणि शक्य असेल तर थ्रोम्बेक्टॉमी (एक प्रकारची शस्त्रक्रिया) करून ती गुठळी काढली जाते."
मेट्रो ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सीनियर कन्सल्टंट न्युरोलॉजिस्ट डॉ. सोनिया लाल गुप्ता म्हणतात, "शस्त्रक्रियेद्वारे रक्ताची गुठळी काढता येते, परंतु त्याला मर्यादा आहेत. मोठ्या धमनीत गुठळी असेल तरच हे शक्य होतं. ब्रेन स्ट्रोकच्या वेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं आहे."
ब्रेन स्ट्रोक झाल्यावर रुग्ण पुन्हा बरा होऊ शकतो, पण त्यासाठी वेळेवर उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.
सीटी स्कॅन आणि एमआरआयसारख्या चाचण्या करून ब्रेन स्ट्रोकचं स्वरूप आणि त्याची तीव्रता कळते, ज्यामुळे योग्य उपचार करता येतात.
बर्याचदा लोक ब्रेन स्ट्रोकच्या बाबतीत निष्काळजीपणा करतात, त्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होणं कठीण होतं.
डॉ. सोनिया लाल गुप्ता म्हणतात की, "ब्रेन स्ट्रोक किंवा लकव्याने (अर्धांगवायू) त्रस्त रुग्णांना बरं होण्यासाठी सुरूवातीचे तीन महिने खूप महत्त्वाचे असतात. या काळात फिजिओथेरपीमुळेही फायदा होतो."
अशा रुग्णांमध्ये तीन महिन्यांनंतरही सुधारणा दिसून येते, पण ती खूप धीम्या गतीने होते.
ब्रेन स्ट्रोकची कारणं
ब्रेन स्ट्रोक कुणालाही, कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु काही लोकांमध्ये त्याचा धोका जास्त असतो.
अनियंत्रित सततचा उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, दारूचं सेवन आणि लठ्ठपणा ही याची प्रमुख कारणं आहेत.
अनेकवेळा तरुणांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे रक्त घट्ट होतं आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
एम्सच्या डॉ. मंजरी त्रिपाठी सांगतात, "हा आजार सामान्यपणे वयस्कर लोकांमध्ये जास्त दिसतो. परंतु, चुकीची जीवनशैली, जिममध्ये व्यायाम करताना झालेली दुखापत किंवा मानेला मसाज केल्यामुळेही काही लोकांना ब्रेन हॅमरेज होऊ शकतं."
हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येते.
यामागील मोठं कारण म्हणजे भारतासारख्या देशांतील आहाराची पद्धत किंवा सवय. हिवाळ्यात लोक साधारणपणे जास्त चरबीयुक्त अन्न खातात.
तसंच, या ऋतूमध्ये रक्तदाब नियंत्रणात ठेवणंही खूप महत्त्वाचं असतं.
डॉ. प्रतीक किशोर सांगतात, "सामान्यपणे 60 ते 65 वयाच्या वयस्कर लोकांना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो. परंतु, अलीकडच्या काळात आम्ही पाहिलं आहे की आमच्याकडे येणाऱ्या 40 ते 45 टक्के ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णांचं वय 50 वर्षांपेक्षा कमी आहे."
यासाठी ते चुकीची जीवनशैली आणि दारू किंवा सिगारेट पिण्याच्या सवयींना जबाबदार धरतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)