तुर्कीमध्ये आंदोलनाची लाट, राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्याविरोधात हजारोंच्या संख्येनं लोक उतरले रस्त्यावर

तुर्कीची राजधानी अंकारामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि पोलीस बळाचा वापर आंदोलकांवर केला गेला.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जेम्स ग्रेगोरी
    • Role, बीबीसी न्यूज

इस्तांबूलचे महापौर इकरेम इमामोगूल यांना झालेल्या अटकेविरोधात तुर्कीमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले आहेत.

राष्ट्राध्यक्ष रेचेप तैय्यप अर्दोआन यांचे प्रमुख विरोधक असलेल्या इकरेम इमामोगूल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी देशभरात आंदोलनाचं लोण पेटलं आहे.

बऱ्याच ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला. मागच्या अनेक वर्षांतील हे तुर्कीमधील सर्वात मोठं आंदोलन बनलं असून देशातील परिस्थिती असमान्य आणि अस्थिर बनत चालली आहे.

आंदोलन पेटण्याचं कारण काय?

या आंदोलनाची सुरुवात इस्तांबूलमध्ये 19 मार्च रोजी झाली. त्या दिवशी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांचे कडवे टीकाकार इकरेम इमामोगूल यांना अटक झाल्यानंतर हे आंदोलन पेटायला सुरूवात झाली.

इकरेम इमामोगूल यांना पुढील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्दोआन यांच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू असतानाच ही अटक झाली असल्यानं या आंदोलनानं राजकीय वळण घेतलं.

सेक्युलर रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या प्रमुख विरोधी पक्षाकडून 2028 साली होणाऱ्या राष्ट्रीय निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी इकरेम इमामोगूल यांना जाहीर होणार होती. पण त्या आधीच त्यांना सरकारनं अटक केल्यानं या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उभा ठाकले होते.

पण सरकारच्या या कारवाईचा निषेध म्हणून सेक्युलर रिपब्लिकन पीपल्स पार्टी (सीएचपी) या पक्षानं इकरेम इमामोगूल तुरूंगात असतानाच 23 मार्च रोजी म्हणजे रविवारी तेच आमचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत, याची घोषणा केली. यासाठी पक्षांतर्गत मतदान देखील घेतलं गेलं. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तर आंदोलनाला आणखी धार आलेली आहे.

बऱ्याच ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बऱ्याच ठिकाणी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धूर आणि रबरी गोळ्यांचा मारा केला.

इकरेम इमामोगूल यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्यासाठीच आम्ही त्यांना अटक करत आहोत, असा दावा अर्दोआन सरकारनं केला आहे. तर दुसऱ्या बाजूला इकरेम इमामोगूल यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. इकरेम इमामोगूल सोबतच या आरोपांच्या तपासा करिता आणखी 100 लोकांना पोलिसांनी तुरुंगात डांबलं आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अटकेचं समर्थन करण्यासाठी इकरेम इमामोगूल यांच्यावर रविवारी विविध गुन्हे नोंदवले गेले.

यात गुन्हेगारांचं जाळं चालवणे, लाच घेणे, खंडणी वसूल करणे, गोपनीय व वैयक्तिक माहिती अवैधरित्या गोळा करणे आणि कंत्राट मिळवण्यासाठी अनैतिक मार्गांचा अवलंब करणे इत्यादी आरोप इकरेम इमामोगूल यांच्यावर ठेवले गेले आहेत. अटक झाल्यानंतर तत्काळ इकरेम इमामोगूल यांची इस्तांबूलच्या महापौर पदापासून गच्छंती करण्यात आलेली आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

इकरेम यांच्या सीएचपी पक्षानं ही कारवाई म्हणजे देशाच्या पुढील राष्ट्राध्यक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी रचलेलं षड्यंत्र असल्याचा आरोप केलाय.

या अनैतिक कारवाईचा निषेध करण्यासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं, असं जाहीर आवाहनही या पक्षानं केलं आहे.

देशभरात पसरलेली आंदोलनाची लाट बघता सीएचपी पक्षाच्या या आवाहनाला तुर्कीच्या नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे.

इस्तांबूलमधील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्तांबूलमधील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

इस्तांबूलमधील वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत. इस्तांबूलमधील रस्ते "आम्ही कोणाला भीत नाही, आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, आम्ही सत्तेपुढे झुकणार नाही," अशा घोषणांनी दुमदुमून गेले आहेत.

सुरुवातीला हे आंदोलन इस्तांबूलमध्ये अगदी छोट्या प्रमाणात सुरू झालं होतं. पण हळूहळू आंदोलनाची लाट इतकी पसरली की 1 कोटी 60 लाख लोकसंख्या असलेलं हे तुर्कीतील सगळ्यात मोठं शहर आता या आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनलं होतं. इस्तांबूलमधील रस्ते या आंदोलकांनी आणि त्यांच्या घोषणाबाजींनी दुमदुमून गेले आहेत.

इस्तांबूलनंतर या आंदोलनाचं लोण तुर्कीतील इतर शहरांमध्ये देखील पसरलं असून त्यामुळे हे आंदोलन आता देशव्यापी बनलं आहे. इतक्या मोठ्या संख्येनं देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं हे मागच्या काही वर्षातील सर्वात मोठं आंदोलन ठरलं आहे.

बहुतांशी ठिकाणी हे आंदोलन शांततापूर्ण मार्गानं पार पाडलं जात असलं तरी काही मोजक्या ठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष पेटलेला देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांनी आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचाही मारा केला.

मागच्या काही दिवसांपासून सरकारकडून पोलीस व तपास यंत्रणांमार्फत राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या विरोधात मत मांडणाऱ्या लोकांवर कारवाईचा बडगा सुरू झाला होता. यात फक्त विरोधी पक्षातील राजकारणीच नव्हे तर पत्रकार आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनाही सरकारकडून लक्ष्य केलं गेलं.

इकरेम इमामोगूल यांची अटक हे फक्त एक निमित्त अथवा हिमनगाचं टोक असून सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करत देशात अराजकता माजवत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.

राष्ट्राध्यक्ष अर्दोआन तुर्कीला लोकशाही कडून हुकूमशाही कडे घेऊन चालले आहेत, असा या आंदोलकांचा आरोप आहे. यासोबतच आरोग्य सेवा आणि एकूणात अर्थव्यवस्था हाताळण्यात राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांना आलेलं अपयश हे सुद्धा या आंदोलकांमधील वाढत्या रोषाचं प्रमुख कारण आहे.

राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांच्या या मनमानी एकाधिकारशाहीचा निषेध करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचं आंदोलकांनी म्हटलं.

हे आंदोलक आहेत तरी कोण?

इकरेम इमामोगूल यांच्या अटकेविरोधात आंदोलन करणाऱ्यांमध्ये विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. बुधवारी तुर्कीतील अनेक विद्यापीठांचे विद्यार्थी बेयझिक प्रांतातील इस्तांबूल विद्यापीठाच्या परिसरात जमले आणि पोलिसांनी रचलेले बॅरिकेड्स तोडून त्यांनी सारचेनच्या दिशेनं आगेकूच केली. सारचेनमध्येच इस्तांबूलची महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत वसलेली आहे. त्यानंतर गुरूवारी पुन्हा इस्तांबूलमधील विविध विद्यापीठांच्या परिसरात आंदोलनाची हाक दिली गेली‌‌. यानंतर हे आंदोलन वाढत जाऊन विद्यापीठातून रस्त्यांवरती पोहचलं.

आत्तापर्यंत पोलिसांनी 1100 पेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांना अटक केली असल्याची माहिती तुर्की सरकारमधील एका मंत्र्याने दिली. इस्तांबूल आणि इझमिर भागात पोलीसांनी छापे टाकून या आंदोलनाचं वृत्तांकन करणाऱ्या किमान 10 पत्रकारांनाही आपल्या ताब्यात घेतलं आहे.

या सगळ्या पोलीस कारवाया सुरू असताना विरोधी सीएचपी पक्षानं आपली मोहीम काही थांबवलेली नाही. या पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीची एक प्रतिकात्मक मतदानाची प्रक्रिया आपले नेते इकरेम इमामोगूल यांच्या समर्थनार्थ पार पाडली.

हजारो लोकांनी या प्रतिकात्मक मतदानात इकरेम इमामोगूल यांना आपलं मत दिलं‌.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हजारो लोकांनी या प्रतिकात्मक मतदानात इकरेम इमामोगूल यांना आपलं मत दिलं‌.

हजारो लोकांनी या प्रतिकात्मक मतदानात इकरेम इमामोगूल यांना आपलं मत दिलं‌. अर्दोआन यांची पायउतार होण्याची व इकरेम इमामोगूल यांची राष्ट्राध्यक्ष बनण्याची वेळ आलेली आहे, असा संदेश या अभिनव आंदोलनातून सीएचपीने दिला. तुरुंगात डांबलं गेलं असलं तरी राष्ट्राध्यक्ष पदावर आता इकरेम इमामोगूल यांचीच दावेदारी असणार आहे, असा थेट संदेश या आंदोलनातून देण्यात आला.

इस्तांबूल सिटी हॉलजवळ एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना 29 वर्षीय आंदोलक फरहत म्हणाला की, "जेव्हा जेव्हा अर्दोआन यांना आव्हान उभं करू शकेल अशा नेतृत्वाचा उदय होऊ लागतो तेव्हा तेव्हा त्या नेतृत्वाला अटक केली जाते. तुर्कीमध्ये सध्या लोकशाही नावाला उरली असून प्रत्यक्षात राष्ट्राध्यक्ष अर्दोआन आपली हुकूमशाही चालवत आहेत."

"आंदोलकांना पोलिसांशी बाचाबाची करण्यात अथवा वाद घालण्यात अजिबात रस नाही. त्यांना फक्त ज्या नेत्याला आपण निवडून दिलंय त्यांच्या सुरक्षेची हमी हवी आहे," अशा शब्दात 70 वर्षीय सुक्रू इलकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"तुर्की या आमच्या देशाला सरतेशेवटी जाग आली असून आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध इथला सामान्य नागरिक आता पेटून उठला आहे. न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत आमचा हक्क परत मिळवणारंच," असा आपला निर्धार औषधांचं दुकान चालवणाऱ्या 63 वर्षीय आयतेन ओकटे यांनी बीबीसीला बोलून दाखवला‌.

तुर्कीच्या सरकारनं आंदोलनाला दिलेली प्रतिक्रिया

राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्येप अर्दोआन यांनी या देशव्यापी आंदोलनाचा निषेध केला असून या आंदोलनाची तुलना त्यांनी दादागिरी आणि दहशतवादाशी केली. "काही झालं तरी सरकार या आंदोलनाला शरण जाणार नाही. देशात अस्थिरता आणि अराजकता माजवू पाहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल," अशी ताठर भूमिका अर्दोआन यांनी घेतली आहे.

प्रशासनाकडून जमावबंदीचा आदेश देण्यात आलेला असला तरी या धमकीचा कुठलाही परिणाम आंदोलकांवर झालेला दिसत नाही. उलट सरकारी निर्बंध आणि कारवाईला न जुमानता हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत असंच पुढे चालवलं जाईल, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

इकरेम इमामोगूल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इकरेम इमामोगूल

इकरेम इमामोगूल यांना झालेली अटक हा राजकीय सूडबुद्धीतून केला गेलेला प्रकार आहे, हा आंदोलकांचा आरोप अर्दोआन प्रशासनानं फेटाळून लावलाय‌. तुर्कीमधील न्यायव्यवस्था ही स्वायत्त असून तिच्या कारभारात सरकारचा कुठलाही हस्तक्षेप अथवा प्रभाव नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

याउलट आपल्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना उत्तर द्यायला सीएचपी पक्ष असमर्थ ठरला असून पक्षाचे प्रमुख ओझगुर ओझेल या आरोपांना उत्तर देण्याऐवजी आंदोलकांना भडकावून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी केला.

तुर्कीने आंदोलनाची हाताळणी करताना लोकशाही मूल्यांचं जतन करावं, असं आवाहन सोमवारी युरोपियन महासंघानं अर्दोआन प्रशासनाला केलं. तुर्की हा देश कौन्सिल ऑफ युरोपचा सदस्य असून युरोपियन महासंघाचा

सदस्य होण्यासाठी देखील तुर्की उत्सुक आहे. या पार्श्वभूमीवर युरोपियन महासंघांनं केलेलं हे आवाहन महत्वाचं ठरतं.

22 वर्षांपासून सत्तेच्या खुर्चीवर पाय रोवून असलेले अर्दोआन

आधी पंतप्रधान आणि नंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून अर्दोआन मागच्या 22 वर्षांपासून तुर्कीच्या प्रमुख पदावर विराजमान आहेत. उजव्या इस्लामिक विचारधारेच्या जस्टिस ऍन्ड डेव्हलपमेंट पार्टी (एकेपी) या आपल्या पक्षाची स्थापना 2001 साठी अर्दोआन यांनी स्वतः केली होती. 2002 रोजी हा पक्ष निवडणूक जिंकून सत्तेत आल्यानंतर आजतागायत ते सत्तेत टिकून आहेत.

तुर्कीच्या संविधानानुसार सलग 5 वर्षांचा कार्यकाळ एका राष्ट्राध्यक्षाला दोनदाच पूर्ण करता येतो. त्यामुळे कायद्यानुसार अर्दोआन येणारी 2028 ची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकत नाहीत‌‌. पण सत्ता कायम राखण्यासाठी अर्दोआन संविधानाच्या या तरतुदीत बदल करू शकतात, अशी चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात कायम सुरू असते.

इकरेम यांच्या सीएचपी पक्षानं ही कारवाई म्हणजे देशाच्या पुढील राष्ट्राध्यक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी रचलेलं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय.

फोटो स्रोत, Getty Images

अर्दोआन यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांना पदावरून हटवण्याचे देखील अनेकदा प्रयत्न झाले. पण ते सगळे अपयशी ठरले. 2016 साली त्यांचं सरकार उलथवून लावण्याचा देखील प्रयत्न झाला होता. हा सत्तापालट घडवून आणण्यासाठी झालेला संघर्ष रक्तरंजित होता. या दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये पेटलेल्या हिंसेत तब्बल 256 लोकांचा मृत्यू देखील झाला होता.

अर्दोआन यांनी मागच्या 20 वर्षात तुर्कीमध्ये आर्थिक विकास आणि अनेक सुधारणा घडवून आणल्या, असा दावा त्यांचे समर्थक एका बाजूला करत असतात. तर दुसऱ्या बाजूला अर्दोआन हे हुकूमशाही वृत्तीचे नेते असून आपल्या विरोधकांना ठेचून काढत सत्ता कायम राखण्यासाठी अनैतिक आणि हिंसक मार्ग वापरायला ते कचरत नाहीत, असा आरोप त्यांचे टीकाकार कायम करत असतात.

तुर्कीला भेट देणं पर्यटकांसाठी सुरक्षित आहे का ?

तुर्कीमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे जाण्यासंबंधी कुठलीही नवी अधिकृत सूचना अथवा निर्बंध अद्याप तरी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं पारित केलेले नाहीत. पण तुर्कीतील शहरांमध्ये सुरू असलेली आंदोलनं कधीही हिंसक वळण घेऊ शकतात, अशी चेतावणी ब्रिटनच्या परकीय विभागानं दिली आहे.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रू धुराच्या नळकांड्या आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला जात असल्याचाही इथे उल्लेख करण्यात आलाय.

तुर्कीला भेट द्यायची झाल्यास अशा आंदोलनाच्या जागी जाणं टाळा आणि आंदोलन सुरू होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणावरून वेळीच निघून जा, असा सल्लाही या विभागानं दिलेला आहे.

याशिवाय सिरीयाला लागून असलेल्या सीमेलगतच्या 10 किलोमीटरच्या प्रदेशात न जाण्याची सक्त सूचना या परकीय विभागानं आधीच देऊ केलेली आहे. कारण या प्रदेशात संघर्षाची परिस्थिती कायम असून दहशतवादी हल्ल्यांचा मोठा धोका इथे असतो.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.