'आम्ही बिळात लपलेल्या उंदरांसारखं आयुष्य जगतोय'

फोटो स्रोत, BBC Turkey
- Author, फुंदानूर ओझतुर्क
- Role, बीबीसी तुर्की, अंकारा
"आमच्याकडे तीन पर्याय आहेत: एकतर युरोपला जा, सीरियाला परत जा किंवा तुर्कीमध्ये राहा आणि उंदरांसारखं लपून जगा," सीरियातून तुर्कस्थानमध्ये येऊन निर्वासितांचं आयुष्य जगणाऱ्या यासर सांगतात. त्यांच्याप्रमाणेच असं आयुष्य अनेक जण या ठिकाणी जगत आहेत.
सीरियातून तुर्कस्तानमध्ये आश्रय मिळवलेल्या काही लोकांनी तुर्की भाषा शिकून, शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवल्या असल्या तरी बहुतांश निर्वासित हे अत्यंत गरिबीत हलाखीचं जीवन जगत आहेत.
तुर्कस्तानच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांत 6,00,000 स्थलांतरित लोक स्वेच्छेने त्यांच्या त्यांच्या देशात परतले आहेत. पण सीरियाहून आलेल्या स्थलांतरितांचं असं म्हणणं आहे की त्यांना बळजबरीने तुर्कस्तान मधून बाहेर काढून टाकलं जातंय.
तीन महिन्यांपूर्वी यासर जिथे काम करायचा त्या कारखान्यात पोलीस आले आणि त्यांनी कारखान्यातल्या कामगारांची कागदपत्र तपासायला सुरुवात केली. यासर मागच्या पाच वर्षांपासून त्यांच्या कुटुंबीयांसोबत इस्तंबूलमध्ये राहत होते.
सिरियात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्वासित झालेल्या यासर यांची नोंद तुर्कस्तानातल्या अंकारा इथे झालेली होती.
इस्तंबूल मध्ये त्यांची नोंद झालेली नव्हती. म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर आधी त्यांना तुझला येथील निर्वासित छावणीत पाठवण्यात आलं आणि तिथून त्यांची रवानगी सीरियाच्या सीमेपासून 150 किमी अंतरावर असलेल्या मर्सिन येथे करण्यात आली.
यासर यांची पत्नी झाना तीन दिवस त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिल्या.
त्या सांगतात की, "पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे एवढंच मला माहित होतं पण त्यांनी माझ्या पतीला नेमकं कुठे नेलंय हे कळायला काही मार्ग नव्हता."
अखेर यासर यांची सुटका करण्यात आली पण त्यामुळे त्यांना इस्तंबूल सोडून अंकाराला परत यावं लागलं आणि आता ते त्यांच्या आठ महिन्यांच्या बाळासह एका मोडकळीस आलेल्या जीर्ण झोपडीत राहत आहेत.
यासर सांगतात की, "गेल्या काही महिन्यांपासून, तुर्कस्तानचे पोलीस किड्यामुंग्यांप्रमाणे सगळीकडे ओळखपत्र तपासत आहेत."
स्थलांतरितांची धरपकड सुरू झालीय
तुर्कस्तानच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या सहा महिन्यांत 173,000 बेकायदेशीर स्थलांतरितांना पकडण्यात आले आहे 2022 च्या तुलनेत ही लक्षणीय वाढ होती. त्यावर्षी संपूर्ण वर्षभरात 285,000 स्थलांतरितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं.
या सहा महिन्यांच्या काळात तुर्कस्तानातल्या 30 शहरांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईतून 44,572 लोकांना हद्दपार करण्यात आल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं.
गृहमंत्री अली येरलीकाया यांनी मात्र 6,04,277 लोक त्यांच्या इच्छेने स्वदेशी परत गेल्याचं म्हणाले होते.

फोटो स्रोत, BBC Turkey
अली येरलीकाया यांनी हेही सांगितलं की तुर्कस्तानने इतर कोर्त्याही देशापेक्षा जास्त सीरियन स्थलांतरितांना त्यांच्या देशात आश्रय दिलेला आहे.
सध्या तुर्कस्तानमध्ये तीस लाखांहून अधिक सीरियन निर्वासित राहत आहेत आणि यापुढे देखील त्यांना लक्ष्य करून देशाबाहेर काढलं जाणार नाही.
बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या किती आहे हे नक्की माहित नाही.
अलीकडेच तुर्कस्तानात आलेल्या सीरियाच्या नागरिकांनी सांगितलं की आधी ज्या पद्धतीने 'तात्पुरता आश्रय' मिळत होता, तसा आश्रय मिळवणं आता जवळपास अशक्यच होऊन बसलं आहे.
सिरियात झालेल्या स्फोटामुळे जखमी झालेला 23 वर्षांचा माहीर उपचार घेण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी तुर्कीमध्ये आला होता. पण आता जर एखाद्या जखमी व्यक्तीला उपचार घेण्यासाठी अंकाराला यायचं असेल तर ते शक्य नाही कारण तशी नोंदणी करणारं केंद्रच बंद करण्यात आलेलं आहे. इतरही बड्या शहरांमध्ये ही सुविधा बंद करण्यात आल्याचं माहीर सांगतो.
हे केंद्र बंद झाल्यामुळे त्याचं राहण्याचं ठिकाण सोडणं माहीरसाठी सुरक्षित राहिलेलं नाही.
याबाबत बोलताना तो म्हणतो की, "एकदा मी असाच फेरफटका मारायला बाहेर पडलो होतो तेव्हा पोलिसांनी मला अडवलं. त्यांनी माझं ओळखपत्र तपासलं आणि कदाचित माझ्या जळलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यांना माझी दया आली असावी. 'पुन्हा इकडे भटकू नकोस', अशी तंबी देऊन त्यांनी मला सोडलं."
'अत्यंत आवश्यक काम असेल तरच बाहेर पडता येतं'
माहीर सांगतो, "काही तातडीचे काम असल्याशिवाय, मी बाजारातही जाऊ शकत नाही. जर बाहेर जायची गरज पडलीच तर पटकन जाऊन मी परत येतो कारण इकडे सतत पोलिसांची पाळत असते."
इतरांचीही अशीच स्थिती आहे.
सोळा वर्षांचा नासेर शहराच्या आल्टिंडाग परिसरात आधी मुक्तपणे फिरत असे, पण आता तो नेहमी सतर्क असतो, असं त्याने सांगितलं.
नासेर म्हणतो की, "वर्षभरापूर्वी जेव्हा मी पोलिसांच्या जवळून जायचो तेव्हा मला कोणीही ओळखपत्र मागत नव्हतं, पण आता मी पोलिसांना पाहिलं तरी तिथून काढता पाय घेतो."
पोलिसांच्या धाकामुळे शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचं आणि तुर्की भाषा शिकण्याचं त्याचं स्वप्न आता भंगलं आहे.
"भविष्यात ही परिस्थिती बदलेल मी काहीतरी करू शकेन असं मला वाटत नाही. माझं अतिमहत्त्वाचं काम नसेल तर मी घराबाहेर पाऊलही टाकत नाही, हे एखाद्या तुरुंगात राहिल्यासारखं आहे," नासेर सांगतो
परत जायला घरच उरलेली नाही
नासेर सांगतो की सीरियातल्या त्याच्या घरावर सीरियन सैन्याने बॉम्ब फेकले आणि त्यानंतर त्याने सात वर्षं निर्वासितांच्या छावणीत काढली. त्याचे आईवडील मरण पावले आहेत त्यामुळे तो आता परत जाऊ शकत नाही. सिरीयात त्याचा एकही नातेवाईकसुद्धा राहत नाही.
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार सीरियाच्या सीमेवर सध्या शांतता असली तरीही त्या देशातली अंतर्गत परिस्थिती अवघड आहे. हिंसाचार आणि अटकेच्या भीतीमुळे लोकांसाठी सिरीयात परत जाणं सुरक्षित राहिलेलं नाही.
अंकारामधील केसीओरेन जिल्ह्यात राहणाऱ्या राशा यांना दोन मुलं आहेत. पाच आणि सात वर्षांच्या या दोन मुलांचा एकटीने सांभाळ करणाऱ्या राशा म्हणतात की आम्ही तीन महिन्यांपूर्वी खरेदीसाठी शेवटचं घर सोडून शहरात गेलो होतो.
"आम्ही एक पोलिस आमच्याकडे येताना पाहिला आणि आम्ही गुन्हेगार असल्याप्रमाणे गर्दीतून पळू लागलो.

फोटो स्रोत, BBC Turkey
त्यानंतर त्यांनी आमच्या शेजारी राहणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आणि सीरियाला पाठवलं. त्या दिवसापासून, मी बाजारातही जाऊ शकत नाही, मला अत्यंत हतबल झाल्यासारखं वाटत आहे ना धड मी सीरियाला परत जाऊ शकते ना इथे राहू शकते. "
राशा म्हणतात की आम्हा तिघांचं नैराश्य दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
मागच्या 10 वर्षांपासून तुर्कीमध्ये राहणारे तमीम म्हणतात की दोन वर्षांपूर्वी सीरिया आणि तुर्कस्तानच्या तरुणांमध्ये झालेल्या वादानंतर अधिकाऱ्यांचा निर्वासितांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तुर्कस्तानच्या अल्टिंडाग मध्ये झालेल्या या भांडणात एका तुर्की तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याला चाकूने भोसकून ठार मारण्यात आलं होतं.
त्यानंतर तणाव इतर शहरांमध्येही पसरला.
त्यानंतर तुर्कस्तानमध्ये अधिकृत आश्रय मिळवण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जास्त कठीण झाली. तमीम यांची स्वतःची नोंदणी झालेली असली तरीही आता त्यांना त्यांचं राहतं ठिकाण सोडून कुठेही जाता येत नाही.
त्यांच्या चुलत भावाला संरक्षित दर्जा मिळू न शकल्याने हद्दपार केलं गेलं होतं पण त्यानंतर काही काळातच त्यांचा भाऊ अवैध मार्गाने परत आला होता.
तमीम सांगतात की, "त्यांनी त्याला दोन आठवड्यांपूर्वी सीरियाला परत पाठवले, पण त्याची बायको आणि पत्नी तुर्कस्तानमध्येच राहत होते म्हणून तस्करांच्या मदतीने तो परत इथे आला."
नवीन समाजात एकरूप होणं कठीण आहे
तुर्कस्तानमध्ये निर्माण झालेलं आर्थिक संकट आणि इतर समस्यांमुळे या देशातील निर्वासितांबाबतचा दृष्टिकोन बदलला आहे.
तुर्कस्तानमधल्या तरुणांना असं वाटतं की त्यांच्या कोसळलेल्या अर्थव्यवस्थेसाठी सीरियातून त्यांच्या देशात आलेले निर्वासित जबाबदार आहेत असं काही सर्वेक्षणांमधून स्पष्ट झालं आहे.
निर्वासितांनी त्यांच्या नोकऱ्यांवर अतिक्रमण केल्याचा आरोपही तरुणांकडून केला जातो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत स्थलांतरितांच्या मुद्द्यावर मोठा राजकीय वाद तयार झाला होता.
सीरियातून तुर्कस्तानमध्ये आश्रय मिळवलेल्या काही लोकांनी तुर्की भाषा शिकून, शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळवल्या असल्या तरी बहुतांश निर्वासित हे अत्यंत गरिबीत हलाखीचं जीवन जगत आहेत.
यासरची पत्नी झाना, जिला इस्तंबूलहून अंकाराला जाण्यास भाग पाडले गेले होते, तिला वसंत ऋतूमध्ये दुसरं बाळ होणार आहे.
यासर यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे असली तरी झाना यांच्याकडे मात्र तसे कागदपत्रं नाहीत. याचाच अर्थ त्यांना कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा आरोग्याच्या सुविधांचा लाभ मिळणार नाही. त्यांना एखाद्या खाजगी रुग्णालयात प्रसूत व्हावं लागेल.
झाना यांच्या पहिल्या प्रसूतीसाठी सुमारे 5,000 लिरा म्हणजेच 14,225 रुपये खर्च आला होता आणि आता त्यांना आधीच सांगितलं गेलं आहे की दुसऱ्या प्रसूतीसाठी त्याच्या दुप्पट पैसे खर्च करावे लागतील. हा खर्च या गरीब कुटुंबाला पेलवेल की नाही हे मात्र झाना आणि यासर या दोघांनाही माहीत नाही.
त्या म्हणतात की, "कधीकधी मला असह्य वेदना होतात, पण मी डॉक्टरांकडे जाऊ शकत नाही."

फोटो स्रोत, BBC Turkey
यासर म्हणतात की सीरियाच्या तुलनेत तुर्कस्तानमध्ये राहणं कधीही चांगलंच होतं पण आता आम्हाला हे सहन होत नाहीये.
"आमच्याकडे तीन पर्याय आहेत: एकतर युरोपला जा, सीरियाला परत जा किंवा तुर्कीमध्ये राहा आणि उंदरांसारखं लपून जगा.
मी युरोपला जाऊ शकत नाही कारण माझ्याकडे पुरेसा पैसा नाही आणि युद्धामुळे मी सीरियाला परत जाऊ शकत नाही. पण जर सीरियातील परिस्थिती सुधारली तर मी इथे राहणार नाही, आम्ही परत आमच्या देशात निघून जाऊ."
(सर्व नावे बदलली आहेत)
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








