तुर्कीयेत अग्नितांडव, हॉटेलला लागलेल्या आगीत अनेकांचा मृत्यू

टर्की हॉटेलला आग

फोटो स्रोत, Getty Images

तुर्कीयेत (तुर्की) रिसोर्टला लागलेल्या आगीत किमान 66 जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्कीयेतील पर्यटकांच्या पसंतीचे ग्रँड कार्तल हॉटेल या ठिकाणी स्थानिक वेळेनुसार पहाटे 3.27 वाजता आग लागली.

तुर्कीत एका लोकप्रिय स्की रिसॉर्ट हॉटेलला भीषण आग लागल्यानं किमान 66 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीतून जीव वाचवण्यासाठी काहीजणांनी हॉटेलच्या खिडकीतून उड्या मारल्या.

आग लागल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांतच 10 जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती तुर्कीयेच्या गृह मंत्रालयानं दिली आहे. आगीपासून जीव वाचण्यासाठी म्हणून दोन जणांनी हॉटेलच्या खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

हॉटेलला लागलेली आग विझवण्यासाठी 12 तास लागले. या घटनेसंदर्भात हॉटेल मालकासह चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती तुर्कीयेच्या न्याय मंत्र्यांनी दिली.

"या घटनेचं आम्हाला प्रचंड दु:ख आहे," असं तुर्कीचे अंतर्गत मंत्री अली येरलीकाया म्हणाले.

या आगीचे व्हिडिओ तुर्कीयेत सर्वत्र शेअर केले जात आहेत. त्यात हॉटेलच्या खिडक्यांमधून कापड खाली लोंबकळत असल्याचं दिसतं आहे. आगीपासून जीव वाचण्यासाठी पेटलेल्या हॉटेलच्या खिडकीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्याचा वापर केला होता.

स्की प्रशिक्षक नेकमी केपसेतुतन यांनी बीबीसीला सांगितलं की आग लागली तेव्हा ते हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर होते. हॉटेलच्या स्की रुममधून बाहेर पडण्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी बचाव कार्य करणाऱ्यांना मदत केली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की हॉटेलला आग लागली तेव्हा हॉटेलची मालकी असलेलं कुटुंब तिथेच होतं. केपसेतुतन म्हणाले की त्यांनी कुटुंबातील काही सदस्यांना हॉटेलबाहेर पाहिलं.

आगीमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र बोलू चे गर्व्हनर अबदुलअझिझ आयदिन म्हणाले की प्राथमिक माहितीनुसार, हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये ही आग लागली आणि तिथून ती हॉटेलच्या वरच्या मजल्यांमध्ये पसरली.

आयदिन म्हणाले की त्या परिसरातील थंड हवामान यामुळे हॉटेलपर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. तुर्कीयेतील आपत्कालीन सेवांनी 267 कामगारांना घटनास्थळी पाठवलं आहे.

हॉटेलमध्ये आग पसरताच हॉटेलमध्ये मुक्कामाला असणारे लोक, मुलं हॉटेलच्या रुममध्ये अडकले आहेत का याचा तपास करण्यात येत होता.

टर्की आग

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गृह मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी दोन आपत्कालीन मार्ग होते. तर हॉटेलच्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं की त्यांनी 30-35 जणांना वाचवलं आहे.

तुर्कीयेचे न्याय मंत्री यिलमाझ तुंक म्हणाले की आगीच्या घटनेचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा, सरकारी वकिलांना नियुक्त करण्यात आलं आहे.

2024 मध्ये या हॉटेलची शेवटची तपासणी झाली होती. तुर्कीचे पर्यटन मंत्री म्हणाले की मंगळवारची (21 जानेवारी) घटना घडण्यापूर्वी या हॉटेलमध्ये आगीशी संबंधित सुरक्षेच्या बाबतीत कोणताही मुद्दा उपस्थित झाला नव्हता.

इस्तंबूल आणि तुर्कीयेची राजधानी असलेल्या अंकारातील स्कीअर्समध्ये बोलू डोंगर लोकप्रिय आहेत. सध्या तुर्कीयेमध्ये शाळांना दोन आठवड्यांची सुट्टी असल्यामुळे या हॉटेलमध्ये पर्यटकांची खूप गर्दी झाली होती.

बोलू हे शहर तुर्कीच्या वायव्य भागात असून अंकारापासून ते जवळपास 170 किलोमीटर (105 मैल) अंतरावर आहे.

ही आग जरी फक्त एका हॉटेलला लागली असली तरी खबरदारीचा म्हणून शेजारचं एक हॉटेल रिकामं करण्यात आलं असल्याची माहिती गव्हर्नरनं तुर्कीतील प्रसारमाध्यमांना दिली.

हॉटेलमधील बाहेर काढण्यात आलेल्या पर्यटकांना बोलूच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हॉटेल्समध्ये हलवण्यात आलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.