You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
श्री बैठका म्हणजे काय, आप्पासाहेब धर्माधिकारींनी लाखो अनुयायी कसे जोडले?
- Author, मानसी देशपांडे
- Role, बीबीसी मराठीसाठी
6 एप्रिल 2023 रोजी खारघर येथे महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वर्षीचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार राज्य सरकारकडून ज्येष्ठ निरुपणकार आणि सामाजिक कार्यात सक्रीय असलेले आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर केला.
खारघरमधल्या कार्यक्रमासाठी अंदाजे वीस लाख लोक जमतील असा अंदाज बांधण्यात आला होता. पण कार्यक्रमासाठी आलेल्या लाखो उपस्थितांमधल्या 13 जणांचे मृत्यू झाले तर अनेक जण जखमी झाले असून दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्याशी जोडले गेलेले लाखो अनुयायी या गोष्टी प्रकाशझोतात आल्या.
दर आठवड्याला होणाऱ्या श्री बैठकांच्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातले लाखो अनुयायी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सोबत कसे जोडले गेले आहेत ते आपण जाणून घेऊया.
श्री बैठका म्हणजे काय?
दर आठवड्यात महिला, पुरुष आणि लहान मुलं वेगवेगळ्या दिवशी 2-3 तासांसाठी नियोजित ठिकाणी एकत्रित जमतात.
तिथे दासबोधाचं वाचन होतं आणि बैठक प्रमुखांकडून त्यातील ओव्यांचं निरुपण केलं जातं.
महिला आणि पुरुषांच्या बैठका वेगवेगळ्या होतात. यालाच श्री बैठक म्हटलं जातं.
श्री बैठकांना जाणाऱ्या अनेक वेगवेगळ्या लोकांशी बीबीसी मराठीने संवाद साधला. काही जण 10-15 वर्षांपासून बैठकांमध्ये जातात.
तसंच काहींच्या घरातले ज्येष्ठ सदस्यांपासून ते तरुणांपर्यंत बैठकांमध्ये सहभागी होतात. त्यांना श्री सदस्य म्हणूनही ओळखलं जातं. श्री सदस्य आप्पासाहेब धर्माधिकारी यांना गुरू मानतात.
श्री बैठकांची सुरुवात कशी झाली?
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून रायगड जिल्ह्यातील रेवदंड्यामधून त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी श्री बैठकांची सुरुवात केली.
हळूहळू या बैठका सगळीकडे होऊ लागल्या. या बैठकाच्या माध्यमातून संत साहित्याचा प्रसार आणि सामाजिक मुल्यांची शिकवण या बैठकांमधून दिली जाते, असं नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचं म्हणणं आहे.
श्री दत्तात्रय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी हे नानासाहेब धर्माधिकारी यांचे थोरले चिरंजीव आहेत. त्यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील रेवदंडा गावात 14 मे 1946 रोजी झाला.
नानासाहेब धर्माधिकारी यांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी पुढे चालवला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची’ स्थापना केली. या प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमेसारखे विविध उपक्रम राबवले जातात.
अशा प्रकारे गेल्या सात दशकांपासून बैठकांच्या मार्फत लाखो लोक धर्माधिकारी कुटुंबासोबत जोडले गेले आहेत.
श्री बैठकांचं स्वरूप कसं असतं?
बैठकांना नियमितपणे जाणाऱ्या एका अनुयायाने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर श्री बैठकांच्या रुपरेषेविषयी माहिती दिली.
“बैठकांमध्ये जाऊन शांत वाटतं. आनंद वाटतो म्हणून आम्ही जातो. तिथे येणाऱ्या वर कोणतंही बंधन नाहीये. कुणी काही जोर जबदरस्ती करत नाही. पण तिथे शिस्त असते. दर बैठक मधल्या हजेरीची नोंद ठेवली जाते.
"सदस्यांपैकी कुणाच्या मनात कुठलाही निर्णय घेण्याबाबत जर काही साशंकता असेल तर ते बैठक प्रमुखांसमोर निवेदन ठेवतात. जसं की कुणाला एखादी प्रॅपर्टी घ्यायची असेल आणि त्याबाबत काही संदेह असेल तर निवेदनात ते समोर मांडलं जातं.
"मग ते निवेदन रेवदंड्याला पाठवलं जातं आणि त्यावर गुरुंचा आदेश येतो. जो आदेश येतो तो मान्य केला जातो. फक्त प्रॅपर्टीच नाही तर लग्न, व्यवहार, खरेदी, नोकरी अशा विषयांवर निवेदन ठेवले जाऊ शकतात. पण ते करावंच असं काही बंधन नाहीये. तसंच जर कुणाला गुरुंचा फोटो किंवा अधिष्ठान घरी हवं असेल तर त्यासाठीही निवेदन द्यावं लागतं,” असं त्या अनुयायाने सांगितलं.
बैठकीमधल्या एका महिला अनुयायाने सांगितलं की त्यांना गुरूंचं अधिष्ठान घ्यायची इच्छा आहे. पण त्यांच्या घरातल्या त्या एकट्याच बैठकीत जात असल्यामुळे त्यांना ते मिळू शकत नाही.
“माझे मालक बैठकीत येत नाहीत ना त्यामुळे मला नाही अधिष्ठान मिळू शकत. अधिष्ठान मिळणं मोठा मान असतो. त्यासाठी निवेदन दिलं तर रेवदंड्याहून ठरतं कुणाला द्यायचं कुणाला नाही. त्यासाठी गुरुंचा फोटो मिळतो. पण माझ्या घरातली मी एकटीच जाते. तिथे गेलं की बरं वाटतं. घरातल्या पूजा, काही खरेदीचा मुहूर्त, शुभकार्याच्या तारखा हे सगळं बैठकीतून घ्यावं लागतं. निवेदन दिलं की ते रेवदंड्याला जातं आणि मग गुरुंचा आदेश येतो,” असं या महिला अनुयायाने सांगितलं.
धर्माधिकारी कुटुंबाची राजकीय जवळीक
खारघर येथील घटनेनंतर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावतीने शोकसंदेश देण्यात आला आहे. त्यांनी या शोकसंदेशात पीडित कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि ते आमच्याच परिवाराचा भाग होते त्यामुळे ही आपल्यावरच आलेली आपत्ती आहे असं त्यांनी म्हटलं.
या घटनेचे राजकारण करू नये असे देखील त्यांनी त्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
शिंदे- फडणवीस सरकारने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर केला.
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनाही 2008 साली महाराष्ट्र भुषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. तेव्हा आघाडीचं सरकार होतं आणि काँग्रेसचे नेते दिवंगत नेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते.
महाराष्ट्र भुषण पुरस्कार सोहळ्या आधी नानासाहेब धर्माधिकारी यांचं निधन झालं. त्यामुळे आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
25 नोव्हेंबर 2008 रोजी खारघरमध्येच जवळपास 510 एकर जमिनीवर हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी 40 लाख लोकांची उपस्थिती होती असं नानासाहेब प्रतिष्ठानच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. या कार्यक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याचंही वेबसाईटवर नमूद करण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)