'मला वाचवा'... म्हणत पोलिसांसमोर अचानक आला आरोपी, शेजाऱ्याचा खून करणाऱ्याला 11 वर्षांनी जन्मठेप

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबईच्या गजबजलेल्या गोरेगाव परिसरात संध्याकाळची वेळ होती. पोलीस अधिकारी आणि वाहनचालक शिपाई नेहमीप्रमाणे काम संपवून घरी जात होते.

ओबेरॉय मॉलजवळ वाहतूक कोंडीमुळे गाड्यांची रांग लागली होती. थकलेल्या दिवसानंतर ते फक्त घरी पोहोचण्याची वाट पाहत होते.

तेव्हाच एका खून प्रकरणातील आरोपी अचानक पोलिसांसमोर आला. मला वाचवा अशी या पोलिसांना विनंती करू लागला. काय होती ही घटना? आणि पुढे काय घडलं?....

मालाड पूर्व येथे एकाने दारू आणून देण्यास नकार दिल्याने झालेल्या भांडणात शेजाऱ्याला स्क्रू ड्रायव्हरने 25 हून अधिक वार करून ठार मारल्याची घटना 2014 रोजी घडली होती.

या प्रकरणातील आरोपी गोरेगाव परिसरात घरी जाणाऱ्या पोलिसांना रस्त्यात अचानक दिसला होता अन् पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पुढे खुनाचा उलगडा झाला होता.

याप्रकरणी 11 वर्षांनंतर अखेर 17 ऑक्टोबर 2025 रोजी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण नक्की काय आहे?

10 ऑक्टोबर 2014 रोजी संध्याकाळची वेळ होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस वाहन चालक पोलीस ठाण्यातून काम संपवून घराकडे निघाले होते.

थकलेल्या दिवसानंतर दोन्ही पोलीस फक्त घरी पोहोचण्याची वाट पाहत होते. पण पुढे जे घडलं, त्याने एका महत्त्वपूर्ण घटनेचा उलगडा या दोन पोलिसांनी केला.

प्रवास करताना वाहतूक कोंडीत अडकलेल्या या पोलिसांना घाबरलेल्या स्थितीत एक व्यक्ती दिसला. तो जोरजोराने 'मला वाचवा', 'मला वाचवा'... म्हणत ओरडत होता. पोलिसांनी तत्काळ गाडी थांबवून त्याच्याकडे धाव घेतली.

तो माणूस दारुच्या नशेत होता. पोलिसांनी विचारलं, "काय झालं?" त्यावर तो अडखळत म्हणाला

"मी... एका माणसावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले... तो कदाचित मेला असेल."

क्षणभर पोलिसांनाही विश्वास बसला नाही. त्यांनी लगेच त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात आणलं. चौकशीत त्याने आपलं नाव रणजीत चौहान सांगितलं. तो मालाड गोविंद गार्डन परिसरात राहत होता.

गोरेगाव पोलिसांनी संबंधित दिंडोशी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता मालाड येथे एक घटना घडल्याचं समोर आलं.

यानंतर या गोरेगाव पोलिसांनी दिंडोशी पोलीस ठाणे येथे या व्यक्तीला घेऊन जात तिथे चौकशी केली असता. खून झाल्याची घटना समोर आली.

खुनामागे किरकोळ वाद

दिंडोशी पोलिसांनी आरोपी चौहानची सखोल विचारपूस केली असता, त्याने सांगितलं की त्याचं ओळखीच्या व्यक्तीशी म्हणजे संदीप धामणस्कर याच्याशी वाद झाला.

दारू आणण्यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. रणजीतने संदीपला दारू आणण्यास सांगितले होते. संदीपने याबाबत नकार दिला आणि त्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि वाढत गेला .

रणजीत चौहान हा एका डेकोरेशन व्यवसायात काम करत होता. तर संदीप धामणस्कर हे भांडुप येथील एका खाजगी कंपनीत कामाला होते. पीडित संदीप धामणस्कर हे रणजीतच्या मालकाचे म्हणजेच हरीश शहा यांचे शेजारी होते.

संदीप यांनी दारू आणून देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद सुरू होऊन हातापायी होण्यापर्यंत वाढत गेला.

त्या वादात संदीप यांनी रणजीतला थप्पड मारल्याने वाद आणखी चिघळला.

यानंतर लगेचच रणजीतचा मालक हरीश शाह हा धामणस्कर यांच्या घरी गेला आणि त्याने संदीपच्या या वागण्याची माहिती पत्नी भक्तीला दिली.

भक्ती यांनी संदीपला फोन केला आणि त्या आपल्या मुलासोबत गोविंद गार्डन येथे पोहोचल्या. तिथे त्यांनी पाहिले की रणजीत तिच्या पतीवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करत आहे. भक्ती यांच्या किंकाळ्या ऐकून आरोपी रणजीत घटनास्थळावरून पळून गेला.

संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आसपास उपस्थित असलेल्या लोकांच्या आणि भक्तीच्या उपस्थितीत संदीपला जवळच्या रुग्णालयात नेलं. पण तेव्हा उशीर झाला होता. रुग्णालयात पोहोचेपर्यंत संदीप याचा मृत्यू झाला होता.

घटनेनंतर पळणारा खुनी... ट्रॅफिकमध्येच दिसला

खून करून रणजीत चौहान घटनास्थळावरून पळून गेला. नशेत असलेला तो पुढे रस्त्यावर फिरत राहिला आणि योगायोगाने त्याच काही किलोमीटरवर पोलिसांना ट्रॅफिकमध्ये दिसला.

दारूच्या नशेत आणि घाबरला असल्याने तो मला वाचवा, मला वाचवा असं ओरडत राहिला. पोलिसांनी जवळजवळ त्याची विचारपूस केली असता, तो सांगत असलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे सुरुवातीला पोलिसांना कठीण होते. कारण तो दारूच्या नशेत होता.

मात्र तो देत असलेल्या माहितीवर पोलिसांनी विश्वास ठेवत त्याला गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये नेलं.

गोरेगाव पोलिसांनी संबंधित दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत चौकशी केली असता असे काहीतरी प्रकरण घडले असल्याचं समोर आलं. पोलिसांनी लगेच संबंधित पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी पाठवलं आणि चौहानने सांगितलेली माहिती खरी असल्याचं समोर आलं.

मालाड पोलिसांनी यासंदर्भात 302, 105, 506, 34 120 बी अन्वये गुन्हा दाखल केला. रणजीत गेली अनेक वर्ष न्यायालयीन कोठडीत होता. धामणस्कर यांच्या पत्नी, इतर साक्षीदार आणि पोलिसांच्या साक्षीने पुढे याप्रकरणी गुन्हा घडल्यापासून काही महिन्यांनीच भक्कम पुरावे सादर करत सत्र न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले.

मागील 11 वर्षांपासून हे प्रकरण दिंडोशी सत्र न्यायालयात होते.

रणजीत यांच्या बाजूने देखील बचावा संदर्भात गेले अनेक वर्ष कोर्टात युक्तिवाद सुरू होता. तर गेले काही वर्ष पोलिसांनी भक्कम पुराव्यानुसार कठोर कारवाईची मागणी लावून धरली होती.

अकरा वर्षांनी शिक्षा

या प्रकरणाचा अंतिम निकाल 17 ऑक्टोबर 2025 रोजी सेशन कोर्टात लागला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश नंदकिशोर एल. मोरे यांनी हा निर्णय दिला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

न्यायालयाने अखेर 11 वर्षानंतर रणजीत चौहानला खुनाचा दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालयाने म्हटलं केलं की "आरोपीने स्क्रू ड्रायव्हरने 25 पेक्षा अधिक वार करून संदीपचा खून केला. अशा प्रकारच्या वारांमुळे मृत्यू होणार हे आरोपीला ठाऊक होतं. त्यामुळे हा हेतुपुरस्सर खून आहे."

पीडित संदीप धामणस्कर यांच्या पत्नी आणि इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष आणि भक्कम पुराव्याच्या आधारे कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली. यामध्ये स्वतः रणजीत याने देखील पोलिसांपुढे या घटनेची कबुली दिली होती.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्रकरणाचा सुगावा

दारूचा वाद, खून आणि पोलिसांसमोर अचानक आलेला तो व्यक्ती या प्रकरणाचा सुगावा लागण्यासाठी पोलिसांची सतर्कता फार महत्वाची ठरली.

या प्रकरणांमध्ये अचानक पोलिसांना सापडलेल्या त्या व्यक्तीची कबुली पुढे कोर्टात न्याय देताना आणि पुढे प्रकरणाचा तपास करताना मोलाची ठरली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.