जेलमधून बहिणीचं लग्न, बुलेटची खरेदी; कैदी आणि कर्मचाऱ्यांचा जेलमधूनच 52 लाखांचा घोटाळा

    • Author, सय्यद मोजिज इमाम
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील आझमगढ तुरुंगातून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.

येथील एक कैदी आणि एका माजी कैद्यानं तुरुंगातील दोन कर्मचाऱ्यांबरोबर मिळून सरकारी खात्यातून 52.85 लाख रुपये खासगी खात्यात वळवल्याचा आरोप आहे.

तुरुंग अधीक्षकांचे बनावट शिक्के आणि सही वापरून हा फसवणुकीचा प्रकार केला असल्याचे आझमगढचे पोलीस अधीक्षक (शहर) मधुबन सिंह यांनी सांगितलं.

आता प्रश्न असा आहे की, तुरुंगात राहूनही ते अशी फसवणूक करण्यात कसे यशस्वी झाले?

मधुबन सिंह म्हणाले की, "शिवशंकर आणि रामजीत यांनी मुशीर अहमद आणि चौकीदार अवधेश पांडे याच्यासोबत मिळून योजना आखली. चौघांनी मिळून तुरुंग अधीक्षकांची बनावट सही आणि शिक्का तयार केला."

तुरूंग अधीक्षक आदित्य कुमार म्हणाले की, हा प्रकार एका साध्या प्रश्नातून उघड झाला.

"बीएचयूमध्ये उपचारासाठी पाठवलेल्या रकमेतील उर्वरित पैसे अजून परत का आले नाहीत?", असं त्यांनी विचारलं होतं.

हा प्रश्न वरिष्ठ सहाय्यक (लेखा प्रभारी) मुशीर अहमद यांना विचारण्यात आला होता.

केवळ या एका प्रश्नामुळेच या घोटाळ्याचे धागेदोरे हाताला लागायला सुरूवात झाली.

फसवणुकीचा प्रकार कसा समोर आला?

कारागृह अधीक्षक आदित्य कुमार यांनी 10 ऑक्टोबर रोजी आझमगड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

आदित्य कुमार म्हणतात की, मुशीर अहमद याच्याकडून त्या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर न मिळाल्यावर संशय वाढला आणि त्यांनी बँकेकडून खात्याचे तपशील मागवले.

त्यांनी सांगितलं की, एका कैद्याला बनारसच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. त्याच्या उपचारासाठी कारागृह प्रशासनाकडून रुग्णालयाला पैसे पाठवण्यात आले होते. परंतु, चेकमध्ये बदल करून ही रक्कम रामजीतच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.

कॅनरा बँकेची कागदपत्रं समोर आली आणि तुरुंगाच्या सरकारी खात्यातून 2 लाख 60 हजार रुपये एका कैद्याच्या वैयक्तिक खात्यात ट्रान्सफर केले गेल्याचे उघड झाले.

आझमगढ पोलिसांनी सांगितलं की, एक कैदी, एक माजी कैदी, एक तुरुंग कर्मचारी आणि तुरुंगातील एका चौकीदारानं मिळून सरकारी खात्यातून 52 लाख 85 हजार रुपये काढले. ही रक्कम हळूहळू काही महिन्यांमध्ये काढली गेली. महत्त्वाचं म्हणजे याचा कुणाला सुगावाही लागला नाही.

पोलिसांनी सांगितलं की, तपासात समोर आलं की ही रक्कम रामजीत यादव नावाच्या एका कैद्याच्या खात्यात गेली होती. रामजीतला 2011 मध्ये हुंडाबळी (कलम 304 ब) आणि 498 अ प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं गेलं होतं. तो 2024 मध्ये शिक्षा पूर्ण करून तो तुरुंगातून बाहेर आला होता.

पोलिसांचा म्हणणं आहे की, शिवशंकर यादव नावाचा कैदी मुशीर अहमदचा 'रायटर' म्हणजे लेखा सहाय्यक होता. तो हत्या प्रकरणात शिक्षा भोगत होता.

तुरुंगात जे कैदी शिकलेले असतात, त्यांना अशा कामांसाठी ठेवलं जातं. हे लोक 2023 पासून हे काम तुरुंगाच्या आत पाहत होते.

याच दुव्यांमुळे कैद्यांना तुरुंगातील लेखा विभागात जाण्याचा मार्ग मिळाला. पोलिसांनी सांगितलं की, शिवशंकर यादवने चेकबुकपासून पासबुक, शिक्का आणि सहीपर्यंत लेखा विभागाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली होती.

कारागृहातच रचला कट

पोलीस अधीक्षक मधुबन सिंह म्हणाले की, "मुशीर अहमद हा चेकबुक आणि पासबुकची जबाबदारी सांभाळायचा. त्याने कोरे चेक काढून त्यावर बनावट सही केली."

पोलिसांनी सांगितलं की, हे सगळं काम इतक्या सराईतपणे केलं गेलं की तुरुंगाच्या नोंदीत सर्व काही बरोबरच दिसत होतं. पासबुक आणि रोख नोंदी एकमेकांशी जुळत होत्या.

कारागृह अधीक्षक आदित्य कुमार यांनी या प्रकारावर आश्चर्य व्यक्त केलं. "माझ्या हाताखाली काम करणारे लोक असं करतील याची मी कल्पनाही केली नव्हती," असं त्यांनी म्हटलं.

हा प्रकार माझ्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हता, असं आदित्य कुमार यांनी सांगितलं. ते म्हणाले, "जर आम्ही त्या दिवशी बँकेचं स्टेटमेंट मागवलं नसतं, तर हा प्रकार कदाचित कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहिला असता."

त्यांच्या मते, "हा कट तुरुंगात तयार केला गेला होता आणि बाहेरच्या यंत्रणांनीही याकडे डोळेझाक केली होती."

तुरुंगापासून ते बँकेपर्यंत पसरलं होतं जाळं

पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे की रामजीत यादवला 20 मे 2024 रोजी शिक्षा पूर्ण झाल्यामुळे सोडण्यात आलं होतं.

दुसऱ्या कैद्याचं नाव शिवशंकर असून तो हत्या प्रकरणात तुरुंगात आहे. या दोघांना कारागृहाच्या लेखा कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक मुशीर अहमदचा रायटर म्हणून ठेवण्यात आलं होतं.

कारागृहातील सर्व खात्यांचे पासबुक आणि चेकबुक वरिष्ठ सहाय्यक मुशीर अहमदकडे होते आणि बँकेच्या रोजच्या कामाची जबाबदारी अवधेश पांडेकडे होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधेश पांडे बनावट चेक रामजीतला देत असत आणि तो स्वतःच्या नावावर पैसे काढून घेत असत.

पोलिसांच्या तपासात समोर आलं की, रामजीत कारागृहामधून बाहेर आल्यानंतरही आपल्या साथीदारांच्या संपर्कात होता. तो स्वतःला कारागृहाचा ठेकेदार सांगून बँकेत जात असत आणि बनावट कागदांच्या आधारावर चेक जमा करत असत.

पोलिसांनी सांगितलं की, संशय येऊ नये म्हणून सुरुवातीला 10-20 हजार रुपये काढले गेले. बँकेच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केल्यावर रक्कम लाखोंमध्ये ट्रान्सफर होऊ लागली.

पोलिसांना शंका आहे की, यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा किंवा संगनमत असावं. कारण कारागृहाच्या सरकारी खात्यातून इतके मोठे व्यवहार क्रॉस-व्हेरिफकेशनशिवाय होऊ शकत नव्हते.

बँकेच्या अधिकाऱ्यांनी वारंवार होणाऱ्या व्यवहारांवर कधीच प्रश्न उपस्थित केला नाही, असं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे.

सरकारी खात्यातून सतत एकाच नावावर पैसे काढले जात असल्याचेही त्यांना संशयास्पद वाटलं नाही. आता पोलिसांचं पथक बँक कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचा देखील तपास करत आहेत.

कारागृहाच्या पैशातून बहिणीचं लग्न

पोलीस चौकशीत आरोपी रामजीत यादवने सांगितलं की, घोटाळ्याच्या पैशातून त्याने आपल्या बहिणीचं लग्न थाटामाटात केलं होतं. या लग्नावर सुमारे 25 लाख रुपये खर्च झाले. आरोपीने 3.75 लाख रूपयांना बुलेट मोटरसायकलही खरेदी केली.

काही रक्कम त्यानं त्याचं जुनं कर्ज फेडण्यासाठी वापरली आणि उरलेली रक्कम आपल्या सहकाऱ्यांमध्ये वाटली. मुशीर अहमदने 7 लाख, शिवशंकरने 5 लाख आणि अवधेशने 1.5 लाख रुपये स्वतःसाठी खर्च केले.

या प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम 318 (4), 61 (2), 316 (5), 338 आणि 336 (3) अंतर्गत कारवाई सुरू आहे.

11 ऑक्टोबरच्या रात्री पोलिसांनी चारही आरोपींना चौकशीनंतर पोलीस ठाण्याच्या परिसरातून अटक केली.

या प्रकरणात अनेक प्रयत्न करूनही आरोपींशी अद्याप बोलता आलं नाही.

डीआयजी कारागृह शैलेंद्र कुमार यांनी शनिवारी (11 ऑक्टोबर) जिल्हा कारागाराचे निरीक्षण केले. त्यांनी सुमारे आठ तास सर्व नोंदी तपासल्या आणि अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांची चौकशी केली.

शैलेंद्र कुमार म्हणाले की, हे प्रकरण म्हणजे 'कारागृह प्रशासनातील विश्वास आणि देखरेखीतील मोठी चूक' आहे.

आझमगढ कारागृहातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "या घटनेवरून दिसून येतं की कारागृहाची आर्थिक व्यवस्था किती बेफिकीर असू शकते".

त्यांनी म्हटलं की, "कैदी बंद आहेत आणि ते काहीही करू शकत नाहीत, हे आता मानणं चुकीचं आहे. जेव्हा गुन्हा तुरुंगाच्या आतच घडतो, तेव्हा तो 'कारागृहाच्या आतला खेळ' बनतो."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.