You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बेरोजगार तरुणाच्या बँक खात्यात अचानक जमा झाले अब्जावधी रुपये, पुढे काय घडलं?
उत्तर प्रदेशात दनकौर गावात राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाच्या बाबतीत एक अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय गोष्ट घडली आहे. त्याच्या बँक खात्यात अचानक अब्जावधी रुपये जमा झाल्याचं प्रकरण घडलं आहे.
या 20 वर्षांच्या तरुणाचं नाव दीपू उर्फ दिलीप सिंह आहे. त्यानं दोन महिन्यांपूर्वीच कोटक महिंद्रा बँकेत खातं उघडलं होतं.
दोन ऑगस्टला दिलीपनं बँकेच्या मोबाईल ॲपवर लॉगिन केलं. त्यानंतर बँक खात्यात त्याला जे दिसलं त्यामुळे त्याचं डोकंच चक्रावलं. त्याचं ह्रदय जोरजोरात धडधडू लागलं.
दिलीप सिंहला त्याच्या बँक खात्यात एक भली मोठी रक्कम जमा झालेली दिसत होती. खरंतर भलीमोठी हा शब्ददेखील त्या रकमेसमोर छोटा वाटेल इतकी ती होती.
ती रक्कम होती - 10,01,35,60,00,00,00,00,00,01,00,23,56,00,00,00,00,299 रुपये
हे पाहून दिलीप सिंह चक्रावला. त्यानं अनेकवळा मोबाईल ॲप बंद केलं, पासवर्ड बदलला. मात्र प्रत्येकवेळेस बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये लॉगिन केल्यावर ते अब्जावधी रुपये बँक खात्यात दिसतंच होते.
त्यानं बीबीसीला सांगितलं, "रक्कम इतकी मोठी होती की मला मोजताच आली नाही. फक्त इतकंच मोजता आलं की ही संख्या 37 अंकी आहे. गुगलवर ट्रान्सलेट करण्याचादेखील प्रयत्न केला. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही."
दिलीप म्हणतो, "इतर अनेकजणांना देखील ती संख्या दाखवली. मात्र इतकी मोठी रक्कम कोणालाच मोजता येत नव्हती."
कॅमेऱ्यासमोर दिलीप स्वत: जेव्हा ही रक्कम मोजण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो दहा अब्जापर्यंत मोजून झाल्यावर हात वर करतो. तो म्हणतो, "याच्या पुढची मोजणी मला येत नाही."
दिलीपच्या मनातील घालमेल
दिलीप सिंह बारावी पास आहे आणि बेरोजगार आहे. गेल्या काही काळापासून तो कामाच्या शोधात आहे.
बँक खात्यात अब्जावधी रुपये जमा झालेले पाहून दिलीपच्या मनात सुरुवातीला विचार आला की ही काहीतरी तांत्रिक चूक असू शकते. मात्र वारंवार चेक केल्यानंतर देखील खात्यात तीच रक्कम दिसत होती.
दिलीप सांगतो, "मला वाटलं की खात्यात इतकी रक्कम जमा झाली आहे म्हणून मी दुसऱ्या खात्यात 10 हजार रुपये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते झालं नाही. बँकवाल्यांनी माझं बँक खातं गोठवलं आहे."
तो म्हणतो, "इतके पैसे पाहून मी थक्क झालो होतो. एकदा वाटलं की मला लॉटरी लागली आहे. मात्र लॉटरीदेखील इतकी मोठी कशी असेल."
दिलीप सिंहला जेव्हा विचारलं की बँक खात्यात अब्जावधी रुपये येण्याआधी किती बॅलन्स होता. त्यावर तो मला की, "माझ्या बँक खात्यात 10-20 रुपयेच होते."
बँकेनं काय सांगितलं?
दिलीप सिंहनं कोटक महिंद्रा बँकेत स्वत:च ऑनलाइन सेव्हिंग्स अकाउंट उघडलं होतं.
खात्यात अब्जावधी रुपये आल्याची माहिती देण्यासाठी दिलीप सिंह स्वत:देखील बँकेत गेला होता. बँकेनं दिलीपला सांगितलं की, "घाबरण्याचं कारण नाही. ही जी रक्कम दिसते आहे, ते पैसे नाहीत. ती एक तांत्रिक चूक (टेक्निकल एरर)आहे."
दनकौर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक (सब इन्स्पेक्टर) सोहनपाल सिंह यांनी बीबीसीला सांगितलं, "पोलिसांनी याचा तपास केला आहे. फोनपे आणि बँक स्टेटमेंट तपासल्यानंतर तरुणाच्या बँक खात्यात झिरो बॅलन्स दिसतो आहे."
ते म्हणाले, "बँकेनं देखील पोलिसांना संपर्क केला. टेक्निकल एररमुळे एका विशिष्ट ॲपमध्ये ही रक्कम दिसते आहे. प्रत्यक्षात बँक खात्यात एक रुपयादेखील नाही."
शेजारी काय म्हणतात?
दिलीपच्या बँक खात्यात अब्जावधी रुपये आल्याची बातमी संपूर्ण दनकौरमध्ये पसरली आहे.
प्रत्येकाच्या तोंडी हाच विषय आहे. अनेक दिवसांपासून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीदेखील सातत्यानं दिलीपला भेटण्यासाठी येत आहेत.
दिलीपचे एक शेजारी म्हणतात, "माझं नावदेखील दिलीप आहे. या संपूर्ण विषयामुळे अनेक दिवसांनी लोक मलादेखील फोन करत आहेत. या भागातील बहुतांश लोक गरीब आहेत. इतकी मोठी रक्कम बँक खात्यात पाहून प्रत्येकजण थक्क झाला आहे."
ते म्हणतात, "दिलीपचे मित्र बँक बॅलन्सचा स्क्रिन शॉट त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट पोस्ट करत आहेत. कोणाकोणाची पोस्ट तर व्हायरलदेखील होते आहे."
शेजारी राहणाऱ्या सुमन म्हणतात, "पैसे आल्यावर कोणालाही वाईट थोडंच वाटतं? खूप छान वाटतं आहे. संपूर्ण दनकौरमध्ये याची चर्चा होते आहे."
त्या म्हणतात, "दिलीपच्या आई-वडिलांचं निधन झालं आहे. तो त्याच्या आजीकडे राहतो. त्याच्याकडे काम नाही. त्याला थोडी मदत व्हावी, असं आम्हाला वाटतं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)