You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बँकेमधल्या ज्या ठेवींवर कोणी हक्क सांगत नाही, त्यातल्या पैशांचं नेमकं काय होतं?
- Author, आलमुरु सौम्या
- Role, बीबीसी तेलुगू प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून भारताच्या बँकांमध्ये बऱ्याच ठेवी विनादावा पडून आहेत. अशा बेवारस ठेवी सहज शोधता याव्यात यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक नवीन वेब पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकांमध्ये पडून असलेल्या हक्क न सांगितलेल्या ठेवी वाढत चालल्या असल्याच्या मुद्द्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुमारे 35 हजार कोटी रुपयांच्या हक्क न सांगितलेल्या ठेवी फेब्रुवारी 2023 पर्यंत आरबीआयकडे हस्तांतरित केल्या आहेत. केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड यांनी संसदेत ही माहिती दिली.
कराड म्हणाले की, मार्च 2022 पर्यंत बँकांमध्ये 48,262 कोटी रुपये अनक्लेम्ड डिपॉझिटच्या स्वरूपात होते. 2022 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मध्ये अशा ठेवींचं प्रमाण कमी झालं आहे. कारण बँकांनी या ठेवींसंबंधी अनेक जनजागृती कार्यक्रम केले आहेत.
फायनान्शियल एक्सप्रेस मासिकाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2023 पर्यंत 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) बँकांमध्ये पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यात सुमारे 8,086 कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी (2,17,80,757 खाती) आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक आहे, ज्यांच्याकडे 5,340 कोटी रुपयांच्या ठेवी (1,50,48,156 खाती) आहेत. त्यानंतर कॅनरा बँक 4,558 कोटी रुपयांसह (1,56,22,262 खाती) तिसऱ्या स्थानावर आहे.
हक्क न सांगितलेल्या ठेवी बँकांमध्येच राहतात? खाती कधी निष्क्रिय होतात? बँका त्या पैशाचे काय करतात? निष्क्रिय खाती पुन्हा चालू करता येतात का? या प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
हक्क न सांगितलेल्या ठेवी म्हणजे काय?
हैदराबादमध्ये शिकणाऱ्या शिरीषाचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) खाते होते. ती नोकरीसाठी दिल्लीला गेली, पण तिचं खातं काही ट्रान्सफर झालं नाही. पगार जमा करण्यासाठी तिने दिल्लीतील दुसऱ्या बँकेत नवीन खातं उघडलं. हैदराबादमध्ये आपलं बँक खातं आहे हे ती पूर्णपणे विसरून गेली. त्यामुळे तिचं खातं निष्क्रिय झालं.
तिच्या खात्यात पाच हजार रुपये होते, त्याचं पुढे काय झालं याविषयी तिला काहीच माहिती नाही. बऱ्याच जणांच्या बाबतीत हेच घडतं.
बरेच लोक वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडतात. पण त्यांना ही सर्व खाती सुरू ठेवणं, व्यवहार करणं आणि सक्रिय राहणं शक्य होत नाही.
जर दोन वर्षांपेक्षा जास्त काळ खात्यात व्यवहार झाले नाहीत तर खाते निष्क्रिय होते. म्हणज बँक खात्यात पैसे जमा केले नाहीत किंवा काढले नाहीत तर बँक या खात्याला 'नॉन परफॉर्मिंग अकाउंट' च्या यादीत टाकते.
या नॉन परफॉर्मिंग अकाउंट मधील पैसे परत मिळवण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड ही महत्वाची कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतात. त्यानंतर तुमचं खातं पुन्हा सुरू होऊन तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील.
जर दहा वर्षांपर्यंत खात्यातून कोणतेही व्यवहार झाले नाही तर त्या खात्यातील रक्कम अनक्लेम डिपॉझिट म्हणून गणली जाते.
तुमच्या बँकेतील सेव्हींग खाते, फिक्स्ड डिपॉझिट, टर्म डिपॉझिट, रिकरंट डिपॉझिट यामध्ये जर कोणतेही व्यवहार झाले नाहीत तर याला अनक्लेम म्हणजेच हक्क नसलेल्या ठेवी समजल्या जातात.
अशा हक्क नसलेल्या ठेवींचे तपशील, खात्यांची संख्या, त्यातील रक्कम आदी तपशील बँका आर्थिक वर्षाच्या अखेरीस रिझर्व्ह बँकेला सादर करतात. त्यानंतर, या सर्व ठेवी डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेरनेस फंडात (DEAF) वळवल्या जातात.
त्यानंतर, हक्क नसलेल्या ठेवींबद्दल आरबीआय जागरुकता मोहीम हाती घेईल.
खाती निष्क्रिय का होतात?
खाती निष्क्रिय होण्याची आणि हक्क न सांगितलेल्या ठेवी तशाच पडून राहण्याची अनेक कारणे असू शकतात.
बँक खात्यांबद्दल योग्य जागरूकता नसणे, खातेदाराचे निधन होणे, कुटुंबातील सदस्यांना खात्याच्या तपशीलांची माहिती नसणे किंवा दावा करण्यासाठी कोणीही व्यक्ती ह्यात नसणे आदी कारणांमुळे खाती तशीच पडून राहतात.
बऱ्याचदा होतं असं की, कुटुंब प्रमुख कुटुंबातील सदस्यांना आपल्या बँक खात्याविषयी काहीच माहिती देत नाहीत. कधी कधी तर पतीच्या बँक खात्याची माहिती पत्नी किंवा मुलांनाही नसते.
हैदराबादमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काम करणाऱ्या सरला सांगतात, फिक्स्ड डिपॉझिट अकाऊंटच्या गोष्टी मात्र वेगळ्या असतात. खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटची पावती घरात सापडू शकते. यावरून कुटुंबातील सदस्यांना त्या खात्याविषयी माहिती मिळण्याची शक्यता जास्त असते. बँकेत येणारी बहुतांश प्रकरणे ही अशीच आहेत.
"पण खेड्यापाड्यातील लोकांना बँक खात्यांबाबत पुरेशी माहिती नसते. आणि त्यामुळे ती खाती निष्क्रिय होतात, ठेवी ही तशाच पडून राहतात."
आरबीआयचे नियम काय आहेत?
आरबीआयने 6 एप्रिल रोजी विविध बँकांमध्ये ठेवीदारांनी किंवा त्यांच्या लाभार्थ्यांनी ठेवलेल्या आणि दावा न केलेल्या ठेवींचा तपशील मिळविण्यासाठी पोर्टल स्थापन करण्याची घोषणा केलीय.
सध्याच्या प्रक्रियेनुसार, ग्राहकांना दावा न केलेल्या ठेवी पाहायच्या असतील तर त्यासाठी बँकेच्या वेबसाइटवर जावे लागेल.
यापूर्वी 2014 मध्ये आरबीआयने ग्राहक सेवांबाबत प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार, बँकांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ व्यवहार न केलेल्या खात्यांचे वार्षिक पुनरावलोकन केले पाहिजे.
त्यानंतर ग्राहकांना त्यांच्या खात्याविषयी माहिती दिली पाहिजे. याशिवाय बँकांनी खातेदार किंवा त्यांच्या वारसांचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करावा असं ही आरबीआयने त्यांच्या सूचनांमध्ये सांगितलं आहे.
आणि एवढं सगळं करून बँकांना दहा वर्षांहून अधिक काळ निष्क्रिय असलेल्या खात्यांचा तपशील, खातेदारांची नावे, त्यांचा पत्ता आणि इतर तपशील त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करावेत.
दहा वर्ष निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करता येतील का? तर आपण कितीही वर्षांनी खाती पुन्हा सुरू शकतो. पण त्या खात्याशी संबंधित कागदपत्रे बँकेला सादर करावी लागतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)