200 चेले आणि 20 मालमत्ता, तृतीयपंथी 'गुरू माँ' बांगलादेशातून मुंबईत आली? आतापर्यंत 'ही' माहिती समोर

    • Author, अल्पेश करकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबई पोलिसांनी गोवंडी परिसरात बांगलादेशातून आलेली आणि 'गुरू माँ' या नावाने ओळखली जाणारी तृतीयपंथी महिला गुरू माँ उर्फ बाबू खान हिला 17 ऑक्टोबर 2025 रोजी अटक केली.

या कथित 'गुरू माँ'ने बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी भारतीय कागदपत्रे बनवून गेल्या 30 वर्षापासून अवैधरित्या भारतात वास्तव्य केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

महत्त्वाचं म्हणजे, 'गुरु माँ'च्या नावे मुंबईतील रफिक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत 20 हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, विविध पोलीस ठाण्यामध्ये पाच गुन्हे देखील तिच्या नावावर आहेत.

"गुरु माँ'च्या आश्रयात 200 पेक्षा अधिक तृतीयपंथी मुंबई उपनगरात विविध ठिकाणी वास्तव्य करतात, अशी पोलीस तपासातील माहिती आहे.

सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी मुंबई पोलिसांना मुंबईत अवैधरित्या बांगलादेशी तृतीयपंथी असल्यासंदर्भात जानेवारी महिन्यात तक्रार दिली होती. यावरून ही कारवाई झाल्याचा दावा आडेलकर करत आहेत.

बांगलादेशी तृतीयपंथींच मोठं रॅकेट मुंबईत आहे. त्यातील एका व्यक्तीवर कारवाई झाली आहे, आणखी सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी आडेलकर करत आहेत.

त्यातच आडेलकर यांनी तृतीयपंथींची संघटना असणाऱ्या किन्नर माँ संघटनेवर आणि त्यांच्या प्रमुखांवरही बांगलादेशी नागरिक, तसंच लोकांची लूट करत असल्याचे आरोप केले आहेत.

या आरोपांनंतर किन्नर माँ संघटनेच्या तृतीयपंथी सदस्यांनी आपली बदनामी होत असल्याचं म्हटलं. तसंच, आडेलकरांवर कारवाई करण्याची मागणी करत, 20 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईतीलच विक्रोळीत 12 किन्नरांनी सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

आडेलकर यांनी आपली बदनामी केली आणि ते सूडभावनेने असं करत आहेत, त्यांच्याविरोधात तक्रार करणार आहोत, अशी माहिती काही तृतीयपंथी सदस्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

काही दिवसांपूर्वी इंदूर येथेही काही तृतीयपंथीयांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या किन्नरांना जवळच असलेल्या रुग्णालयात दाखल करत उपचार करण्यात आले, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नक्की प्रकरण काय आहे?

गेल्या वर्षभरापासून अवैधरित्या भारतात राहणार्‍या बांगलादेशींविरोधात सुरक्षा यंत्रणांनी कठोर पावलं उचलली आहेत. घुसखोरी करुन भारतात राहणाऱ्या हजारो बांगलादेशींना आतापर्यंत हद्दपार करण्यात आलं आहे.

मुंबईतदेखील अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशींवर मुंबई पोलीस कारवाया करत आहेत. त्यातच मुंबईत अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी विरोधात मोहीम सुरू असताना गोवंडी येथील रफिक नगर परिसरातील आलेल्या तक्रारीवरून आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार बाबू खान उर्फ गुरु माँसह अनेक तृतीयपंथीयांसंदर्भात कागदपत्रांची जानेवारी महिन्यापासून गोवंडी पोलीस पडताळणी करत होते.

पोलीस पडताळणी दरम्यान गुरु माँच्या कागदपत्रात अनेक विसंगती आढळून आल्या. पोलिसांनी अधिक तपास केला असता बनावट कागदपत्र बनवली असल्याचं समोर आलं. तसेच गुरु माँ बांगलादेशी असल्याचं तपासात निष्पन्न झालं.

त्यामुळे गोवंडी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी 'गुरु माँ' उर्फ बाबू अयलान खान हिच्या विरोधात बेकायदेशीर वास्तव्य आणि इतर कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.

गुरु माँ सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

गुरु माँ नक्की कोण आहे ?

बाबू खान उर्फ गुरु माँ ही एक 36 वर्षीय तृतीयपंथी गुरु आहे. मुंबईतील गोवंडी रफिक नगर परिसरामध्ये गेल्या काही वर्षापासून ती वास्तव्यास होती.

ती मूळची बांगलादेशची असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.

गुरु माँ मुंबई उपनगरातील तृतीयपंथींना मार्गदर्शन आणि आश्रय देत असे. मुंबईच्या विविध भागांमध्ये 200 हून अधिक तिला मानणारे तृतीयपंथी अनुयायी आहेत.

मुंबईतील रफीक नगर आणि गोवंडीसह विविध भागांत 20 हून अधिक मालमत्ता असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

स्वतःच्या मालकीच्या असणाऱ्या घरांमध्ये इतर तृतीयपंथींना आश्रय देऊन त्यांच्याकडून प्रतिदिन पैसे गोळा करणे, तृतीयपंथींचे कागदपत्र बनवून देणे, त्यांच्याकडून विविध प्रकारचे काम करून घेणे. हे काम गुरु माँ करते असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

अनेक बांगलादेशी नागरिकांना भारतात आणून तिने तृतीयपंथी बनवण्याचा आरोप देखील तिच्यावर आहे.

गुरु माँ ने स्वतःला भारतीय नागरिक दाखवण्यासाठी जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी अनेक बनावट कागदपत्रे तयार केली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या चौकशीत ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचं आढळल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली.

तपास यंत्रणा तिच्याशी संबंधित इतर लोकांचा आणि त्यांच्या ठिकाणांचा शोध घेत तपास करत आहेत.

यापूर्वी मानव तस्करी आणि फसवणूक यांसारख्या विविध कलमांखाली मुंबईतील शिवाजी नगर, नारपोली, देवनार, ट्रॉम्बे आणि कुर्ला पोलीस ठाण्यांमध्ये तिच्यावर गुन्हे दाखल आहेत.

या प्रकरणी अधिक तपास सुरू; गुरु माँची बाजू अस्पष्ट

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा सातवसे यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, "याप्रकरणी आरोपीला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आमचा अधिक तपास सुरू आहे."

याप्रकरणी गुरु माँ यांची बाजू त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांकडून आणि त्यांच्या वकीलांकडून बीबीसी मराठीच्या टीमने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. काही प्रतिक्रिया आल्यास अपडेट करण्यात येईल.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या या कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात राहणाऱ्या अवैध बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने वारंवार मुंबईसह राज्यभरात राहणाऱ्या अवैध बांगलादेशी नागरिकां विरोधात कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे.

या अनुषंगाने मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात मार्फत अनेक पथक हे या बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोहीम राबवत पडताळणी करत आहेत. याबाबत पोलीस कायदेशीर पडताळणी करून संबंधितांवर कारवाई करत असल्याचं मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आणखी घुसखोरांवर कारवाई कधी?

बांगलादेशातील व्यक्ती (तृतीयपंथी) हे भारतात घुसखोरी करून अमली पदार्थ आणि वैश्या व्यवसाय चालविणारे व यांना सहकार्य करणारे गुरू व नायक यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि मुंबई पोलिसांना एप्रिल 2025 मध्ये पत्र लिहीत केली होती.

यानुसार बांगलादेशी तृतीयपंथीयांवर कारवाई झाल्याचा दावा कृष्णा आडेलकर यांनी पुढे येत केला आहे.

मात्र, ही कारवाई फक्त एकावर न करता संबंधित असणाऱ्या सर्वांवर करावी आणि हे पूर्ण रॅकेट उघड करावं, अशी मागणी गुरु माँच्या अटकेनंतर आडेलकर यांनी केली आहे.

आडेलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटले आहे की, "गुरु माँ यांच्यासारखेच मुंबई उपनगरात किन्नर माँ संघटना आणि त्याच्या प्रमुख सलमा खान यांचीदेखील चौकशी व्हावी आणि कारवाई व्हावी. यांनी इतकी संपत्ती आणली कुठून, लोकांना लुटून आणि अवैध व्यवसाय हे करत आहेत. गुरू माँ फक्त एक दुवा आहे आणखी घुसखोरांवर कारवाई कधी होणार?"

10 ते 12 तृतीयपंथीयांचा आत्महत्येचा प्रयत्न

गुरु माँवर झालेल्या कारवाईनंतर माध्यमांशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते कृष्णा आडेलकर यांनी किन्नर माँ संस्थेचं आणि पदाधिकाऱ्यांचा नाव घेऊन त्यांच्यावरही कारवाईची मागणी केल्यानंतर तृतीयपंथींयांनी कृष्णा यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

तृतीयपंथींच्या होणाऱ्या बदनामीला आणि होणाऱ्या आरोपाविरोधात मुंबईतील विक्रोळी पार्क साईट भागातील 10 ते 12 तृतीयपंथींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर देखील वायरल झाला आहे.

या तृतीयपंथींना तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

या सर्व घटने संदर्भात आणि होणाऱ्या आरोपात संदर्भात किन्नर माँ संस्थेच्या सलमा खान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "त्या व्यक्तीने केलेल्या आरोपात तथ्य नाही, हे आरोप खोटे आहेत. त्या व्यक्तीला संस्थेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीच्या तक्रारीवरून अटक झाली होती. यामुळे सूडबुद्धीने त्यांनी आरोप केले आहेत. आमचा आणि गुरु माँचा काहीही संबंध नाही, फोटो वगैरे बनावट असतील. बांगलादेशींविरोधात पोलीस योग्य कारवाई करतील. पण आमच्या बदनामीने किन्नर समाज दुखी झाला आहे, त्यामुळे आमच्या काही लोकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संबंधित व्यक्तीला जबाबदार धरून कारवाई करावी."

याप्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी संबंधित घटनेची नोंद घेतली असून, कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तपास सुरू आहे. तृतीयपंथीयांचे जबाब नोंदवले जात आहेत असे पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या वतीने बीबीसी मराठीला सांगण्यात आले.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

  • हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
  • सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
  • इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
  • नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
  • विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)