एकेकाळी एअरबस विमान कंपनीशी स्पर्धा करणारी बोईंग आर्थिक अडचणीत का? पुन्हा भरारी घेऊ शकेल?

बोईंग विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

तुम्ही विमानानं प्रवास केला असेल, तर ते विमान कोणी बनवलं होतं, हे तुम्हाला आठवतंय का? तर ते विमान अमेरिकेतली बोईंग किंवा युरोपमधली एयरबस या दोनपैकी एका कंपनीनं उभारलं असण्याची शक्यता जास्त आहे.

जगभरात कमर्शियल एव्हिएशन म्हणजे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात या दोन कंपन्यांचीच मक्तेदारी आहे. आकाशात उडणारी जवळपास 90 टक्के विमानं या दोन कंपन्यांची असतात.

त्यात सध्या एअरबस कंपनी जोमात आहे, कारण जगभरातल्या एअरलाइन्स त्यांच्याकडूनच जास्त विमानं खरेदी करत आहेत.

दुसरीकडे बोईंग कंपनीला संकटांचा सामना करावा लागतो आहे. बोईंगच्या प्रसिद्ध 737 या विमानाचं नवं मॉडेल 737 मॅक्स 2018 आणि 2019 साली झालेल्या अपघातांमुळे चर्चेत आलं होतं.

त्यानंतर अनेक देशांनी या विमानाची उड्डाणं थांबवली. 2020 साली या विमानांना पुन्हा उड्डाणांची परवानगी मिळाली.

पण यंदा, म्हणजे जानेवारी 2024 मध्ये अमेरिकेत याच मॉडेलचं एक विमान थोडक्यात बचावलं. त्या विमानाचा दरवाजा तुटून बाहेर पडला होता आणि आपतकालीन लँडिंग करावं लागलं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

या अडचणींमधून कंपनी बाहेर पडायची धडपड करत असतानाच त्यांच्या कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यामुळे आर्थिक अडचणीही उभ्या राहिल्या.

मग बोईंग कंपनीचं कामकाज पुन्हा सुरळीत होऊ शकतं का, याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

यशाकडं उड्डाण

एखादं विमान बनवायला खूप वेळ आणि पैसा लागतो. त्यामुळे दोनच कंपन्या विमान वाहतूक क्षेत्रात अग्रेसर होऊ शकल्यात.

विमान वाहतूक तज्ज्ञ स्कॉट हॅमिलटन म्हणतात, "बोइंगनं 2008 मध्ये पहिल्यांदा 787 विमान बनवलं तेव्हा त्याची रचना ठरवायला आणि प्रत्यक्ष विमान बनवायला 10 अब्ज डॉलर्सचा खर्च आला होता. आता 20 ते 30 डॉलर खर्च येतो."

हॅमिलटन म्हणाले, "1916 मध्ये विल बोईंग यांनी सिअ‍ॅटल शहरात ही कंपनी स्थापन केली, तेव्हा विमान वाहतूक उद्योग सुरू होऊन केवळ 13 वर्षं झाली होती. 1903 मध्ये राईट बंधुंनी पहिलं विमान बनवलं होतं. त्यातून प्रेरणा घेऊनच विल बोईंग यांनी त्यांची स्वतःची कंपनी थाटली."

बोईंग 247 हे त्यांचं पहिलं यशस्वी मॉडेल 1933 मध्ये तयार झालं. या विमानाने सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क हे सुमारे 4 हजार किलोमीटरचं अंतर 19.5 तासात कापलं.

पण 1957 मध्ये बोईंग 707 या विमानात कंपनीनं पहिल्यांदा प्रोपेलर ऐवजी जेट इंजिन वापरलं आणि त्यांचा सुवर्ण काळ सुरू झाला.

बोईंग विमान

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

स्कॉट हॅमिलटन सांगतात, "अमेरिकेच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत हे विमान 8 ऐवजी 5 तासात जायचं. अमेरिकेतून युरोपला जाताना इंधन भरण्यासाठी विमानाला तीन वेळा खाली उतरावं लागे. पण नंतर विनाथांबा प्रवास सुरू झाला. त्यातून या उद्योगक्षेत्रात नवी क्रांती झाली."

1969 मध्ये कंपनीनं बोईंग 747 जंबो जेट लाँच केलं. 350 टन वजनाचं हे विशाल विमान 707 पेक्षा तिप्पट मोठं होतं. त्यात एकावेळी 350 प्रवासी बसू शकायचे.

स्कॉट हॅमिलटन सांगतात की, प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता वाढल्यावर एअरलाइन्सनं तिकिटाचे दरही कमी केले, त्यामुळे आणखी लोक विमानप्रवास करू लागले.

मग बोईंगला टक्कर देण्यासाठी 1970 मध्ये ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या युरोपियन देशांनी मिळून एअरबस या कंपनीची स्थापना केली.

स्कॉट हॅमिलटन सांगतात, "सुरुवातीला बोईंगनं एअरबसकडं गांभीर्यानं पाहिलं नाही. पण 1992 मध्ये अमेरिकेतल्या युनायटेड एअरलाइन्सनं एयरबसची विमानं खरेदी करायचं ठरवलं, तेव्हा बोईंगला आश्चर्याचा धक्काच बसला.

दरम्यान, मॅकडोनाल्ड डग्लस ही आणखी एक प्रतिस्पर्धी कंपनी डबघाईला आली होती. बोईंगनं 1997 मध्ये मॅकडोमनाल्ड डग्लस विकत घेतली आणि त्यांचे कारखानेही वापरायला सुरुवात केली.

पण या दोन कंपन्या एकत्र आणताना बोईंगच्या कॉर्पोरेट संस्कृतीत मोठा बदल झाला आणि त्यामुळेच बोईंगसमोर समस्या उभ्या राहिल्या, असं अनेकांचं म्हणणं आहे."

स्कॉट हॅमिलटन यांच्या मते बोईंगनं नफा आणि कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढवायला हवी असं मॅकडोनाल्ड डग्लस ग्रुपचे प्रमुख वारंवार सांगू लागले. त्यानंतर पैसे वाचवण्यासाठी कंपनीनं कामागारांचे पगार कमी करणं आणि कर्मचारी कमी करणं सुरू केलं.

सगळं लक्ष कामगारांचे पगार कमी करण्यावर आणि कंपनीचा फायदा कसा होईल यावरच असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा बाजूला पडणारंच.

बोईंग संकटात कशी सापडली?

विमान वाहतूक क्षेत्रातल्या पत्रकार क्रिस्टीन नेग्रोनी यांची विमान वाहतुकीतल्या सुरक्षा विशेषज्ज्ञ म्हणून ओळख आहे.

नेग्रोनी सांगतात, "मॅकडोनाल्ड डग्लस विकत घेण्यापूर्वीच बोईंगला अडचणींनी वेढलं होतं, पण दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर परिस्थिती आणखी चिघळली."

क्रिस्टीन नेग्रोनी म्हणतात, "माझ्या माहितीप्रमाणं मॅकडोनाल्ड डग्लस विकत घेण्याआधीपासूनच बोईंग कंपनीची वाटचाल या दिशेनं होऊ लागली होती. पण दोन कंपन्यांचं एकत्रीकरण झाल्यावर ही प्रक्रिया झपट्यानं झाली."

2010 च्या दशकात बोईंगनं एअरबसला तोंड देण्यासाठी नवं विमान लाँच केलं, तेव्हा विमानांच्या सुरक्षेविषयीच्या समस्या स्पष्टपणे जाणवू लागल्या.

बोईंग विमान

फोटो स्रोत, Getty Images

खरंतर बोईंगला एक नवं विमान बनवायचं होतं. पण मग त्यांनी 50 वर्ष जुन्या बोईंग 737 मॉडेलमध्येच सुधारणा करायचं ठरवलं आणि नव्या विमानाला 737 मॅक्स हे नाव दिलं गेलं.

क्रिस्टीन नेग्रोनी म्हणतात, "या विमानाचा मूळ आराखडा 1960 च्या दशकात तयार केला होता. हे म्हणजे 1960 च्या काळातल्या फोक्स वॅगन कारमध्ये टेस्ला सारख्या अत्याधुनिक कारचं तंत्रज्ञान लावल्यासारखं झालं, असं 737 मॅक्स चालवणाऱ्या एका वैमानिकांनी मला सांगितलं होतं. थोडक्यात, पैसे वाचवायचे म्हणून नवीन डिझाईन बनवण्याऐवजी बोईंगनं जुन्याच मालाला रंगरंगोटी करून बाजारात आणलं."

बोईंग 737 मॅक्स विमानातली समस्या केवढी गंभीर आहे, हे 2018 साली समोर आलं. त्यावेळी इंडोनेशियातल्या लायन एअरलाइन्सच्या ताफ्यातलं एक विमान जकार्तावरून उड्डान केल्यावर काही वेळातच कोसळलं आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

737 मॅक्स या मॉडेलचं इंजिन आधीच्या विमानांपेक्षा थोडं मोठ्या आकाराचं होतं. ते थोडं पुढे आणि पंखांच्या वर लावण्यात आलं होतं

त्यामुळे कमी वेगानं उडताना विमानात समस्या निर्माण व्हायचा धोका होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी विमानाच्या नियंत्रण यंत्रणेत एक सॉफ्टवेअर टाकण्यात आलं. पण हे विमान उडवण्याची ती पद्धत वैमानिकांना समजली नव्हती.

विमानाचं निमुळतं टोकं म्हणजे नाक नेहमीपेक्षा जास्त वर जाऊ लागलं की हे सॉफ्टवेअर ते खाली आणत असे, असं नेग्रोनी सांगतात.

लायन एअरलाईन्सचं बोईंग-737 विमान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, लायन एअरलाईन्सचं बोईंग-737 विमान

प्रशिक्षणाच्या वेळी वैमानिकांना हे शिकवलं नव्हतं. त्यामुळे ते गोंधळात पडले आणि नाक वर करायचा प्रयत्न करू लागले. मात्र, सॉफ्टवेअरनं ते आणखी खाली आणलं आणि शेवटी विमान समुद्रात पडलं.

या समस्येकडे गांभीर्यानं पाहण्याऐवजी बोईंगनं वैमानिकांना दोषी ठरवलं. स्वतःला वाचवण्यासाठी बोईंगनं वैमानिकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. शिवाय या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी काम सुरू केलं.

पण उपाय सापडण्याआधीच 2019 साली इथियोपियन एअरलाइन्सचं 737 मॅक्स विमानही कोसळलं. या दोन अपघातांनंतर जगभरात 737 मॅक्स विमानांवर बंदी घालण्यात आली.

सुरुवातीला बोईंग आणि अमेरिकन विमान वाहतूक संस्था FAAनं विरोध केला. पण त्यातून बोईंग सुरक्षेचा मुद्दा गांभीर्यानं घेत नसल्याचंच दिसलं, असं नेग्रोनी सांगतात.

क्रिस्टीन नेग्रोनी म्हणतात, "विमान निर्मिती करणारी मोठी कंपनी धोक्याच्या सगळ्या शक्यता पारखून विमानाची तपासणी केल्याचं सांगते, तेव्हा त्यावर विश्वास ठेवला जातो. त्यामुळे विमानाचं नियंत्रण वैमानिकाऐवजी सॉफ्टवेअर करेल आणि त्यामुळे काहीही त्रास होणार नाही असं बोईंगनं म्हटलं, तेव्हा त्यावर विश्वास ठेवला गेला. पण तीच गोष्ट दोन्ही विमान अपघातांचं कारण ठरली."

"बोईंगनं आधी खर्च कमी करण्याच्या गडबडीत घाईनंच विमान लॉन्च केलं होतं. मग विमानाच्या सुरक्षेचा मुद्दा बाजुला पडला आहे, असं बोईंगला वाटत असतानाच 2024 मध्ये अलास्का एअरलाइन्सच्या 737 मॅक्स विमानाचा दरवाजा तुटून खाली पडला.

हा सॉफ्टवेअरचा नाही, तर विमान तयार करताना वापरलेल्या गोष्टींच्या दर्जाचा प्रश्न आहे, असं क्रिस्टीन सांगतात. मुळात प्रश्न विमानाच्या डिझाईनचाही नाही, तर कंपनीच्या कामाच्या पद्धतीचाही आहे.

लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी झाला आहे आणि आता कंपनीला कामकाजाच्या पद्धती बदलाव्या लागतील, हे बोईंगच्या सीईओंनीही मान्य केलं आहे," असं क्रिस्टीन नेग्रोनी यांनी सांगितलं.

आर्थिक चणचण

इथियोपियन एअरलाइन्सच्या अपघातानंतर सगळ्या बोईंग 737 मॅक्स विमानांवर वीस महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. सोबतच, दंड, भरपाई आणि नव्या विमानांच्या मागण्या रद्द झाल्याने बोईंगचं 80 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं.

मग कोविडच्या साथीमुळे एअरलाइन्स उद्योग थंड पडला. या सगळ्या अडचणी आणि कामगारांचे प्रश्न एकाचवेळी उभे राहिले.

त्यामुळे कंपनीच्या आर्थिक स्थितीवर झालेला परिणाम अजूनही टिकून आहे, असं शॅरन टर्लिप सांगतात.

वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तसंस्थेत विमान वाहतूक विषयक पत्रकार असणाऱ्या शॅरन टर्लिप म्हणतात, "या सगळ्या अडचणी आणि कामगारांचे प्रश्न बोइंगसमोर एकाचवेळी उभे राहिल्यानं कंपनीच्या आर्थिक परिस्थितीवर झालेला वाईट परिणाम अजूनही टिकून आहे."

शॅरन टर्लिप म्हणतात, "जगभरात विमान विक्री करणाऱ्या या कंपनीचं काम एकदा नाही, तर दोनदा ठप्प झालं. त्यामुळे या कंपनीतले अनेक चांगले कामगार आणि अभियंते नोकरी सोडून गेले. कंपनीत येणाऱ्या कच्चा मालाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला."

अमेरिकन विमान वाहतूक संस्थेनं बोईंगवर लावलेली बंदी मागे घेतली, पण दरवर्षी कंपनी किती विमानं बनवू शकते, याचा आकडा ठरवून दिला.

जास्त विमानं बनवण्याच्या हव्यासापोटी बोईंगनं सुरक्षेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये हा त्यामागचा उद्देश होता, असं शॅरन टर्लिप सांगतात.

बोईंग कंपनीचं कार्यालय

फोटो स्रोत, Getty Images

या नियंत्रणाची मुदतही यावर्षाच्या शेवटी संपणार होती. पण त्याआधीच अलास्का एयरच्या बोईंग 737 मॅक्सचा दरवाजा तुटून खाली पडला. त्यामुळं कंपनीवरची बंधनं अजूनही कायम आहेत.

त्यातच सप्टेंबर 2024 मध्ये बोईंगच्या कारखान्यातले 33 हजारहून अधिक कामगार संपावर गेले.

आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कंपनीनं शेअर्स विकायला काढले आणि त्यातून 21 अब्ज डॉलर्स मिळवले.

ऑगस्टमध्ये कंपनीच्या सीईओपदी आलेल्या केली ओटबर्ग यांना अखेर नोव्हेंबरमध्ये कामगारांचा संप मिटवण्यात यश आलं.

लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी ओटबर्ग प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

शॅरन टर्लिप म्हणाल्या, "केली ओर्टबर्ग यांची पार्श्वभूमी मार्केटिंग किंवा फायनान्सची नाही. ते स्वतः इंजिनियर म्हणजे अभियंता आहेत. याआधी अभियांत्रिकी क्षेत्राशी किंवा गोष्टींच्या उत्पादनाबद्दल कंपनीचा संबंध नाही, अशी टीका बोईंगवर व्हायची. आता ओटबर्ग यांची नियुक्ती करून बोईंगनं आपण व्यवस्थापन सुधारण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संकेत दिले आहेत."

ग्राहकांनी अजूनही बोईंगचा हात सोडलेला नाही, बाजारात फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या कंपनीकडे 2030 पर्यंत विमानांच्या ऑर्डर्स आधीच आल्या आहेत.

शॅरन टर्लिप म्हणाल्या, "आपले ग्राहक कुठेही पळून जात नाहीत हे बोईंगला माहीत आहे. त्यांना फक्त विमान बनवून विकायचं आहे. त्यांच्याकडे अब्जावधी डॉलर्स आधीच आहेत. एकच प्रतिस्पर्धी असल्याने बोईंगचा उद्योग पूर्णपणे ठप्प होईल असं कोणालाही वाटत नाही."

दोन मोठ्या कंपन्यांना आव्हान

विमान निर्मिती उद्योगात गेली 50 वर्षं बोईंग आणि एअरबसचंच वर्चस्व आहे. पण आता चीनची सरकारी विमान निर्मिती कंपनी कोमॅक आणि त्याचं सी 919 हे विमान त्यांना आव्हान देऊ शकतं.

त्याविषयी रिचर्ड अबुलाफिया माहिती देतात. ते विमान वाहतूक कंपन्यांना सल्ला देणाऱ्या एयरोडायनॅमिक अडवायझरी या कंपनीचे प्रमुख आहेत.

त्यांच्या मते कोमॅकचं सी 919 हे विमान जुन्या तंत्रज्ञानाचा वापर करतं. त्यामुळे सध्यातरी एअरबस आणि बोईंगची बरोबरी कोमॅक करू शकत नाही.

मात्र ब्राझीलची एमब्रेयर ही कंपनी या दोन्ही मोठ्या कंपन्यांना नक्कीच टक्कर देऊ शकते.

रिचर्ड अबूलाफिया म्हणतात, "एमब्रेयरमुळं विमान वाहतूक उद्योगात उलथापालथ होऊ शकते अशी चर्चा आहे. खरंतर त्यांच्या सर्वात मोठ्या जेट विमानात फक्त 120 प्रवासी बसू शकतात. ही एक प्रतिष्ठीत कंपनी आहे आणि मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित केलं, तर ही कंपनी खूप पुढे जाऊ शकते."

विमान निर्मिती उद्योगात आणखीही काही कंपन्या आहेत. उदाहरणार्थ, जेट झीरो ही अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधली कंपनी एक नवं जेट विमान तयार करते आहे. त्याचे पंख मोठे असतील आणि मुख्य अंग मध्यभागी असेल. त्यामुळे इंधनाचा वापर कमी होईल.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

रिचर्ड अबूलाफिया म्हणतात, "हे विमान स्वस्त असेल आणि त्यानं प्रदूषणही कमी होईल. पण ते विकसित करण्यासाठी भरपूर पैसे लागतील. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कंपनीला 15 ते 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे."

सध्यातरी बोईंगसमोर एअरबस हा एकमेव तगडा प्रतिस्पर्धी आहे. बोईंगच्या व्यवस्थापनात झालेल्या बदलांमुळे एअरबस सतर्कही झाला आहे.

रिचर्ड अबूलाफिया म्हणाले, "गेली 15-20 वर्षं बोईंगचं व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांना विमानाच्या निर्मितीत कमी रस होता आणि नफा तसंच खर्चाचे आकडे कमी करण्यात जास्त रस होता."

आता एका जाहिरातीतून बोईंगनं सुरक्षेबद्दल गंभीर असल्याचं, आपल्या कर्मचाऱ्यांच्या मताला महत्त्व देत असल्याचं आणि हवाई वाहतूक संस्थांसोबत पादर्शकता ठेवत असल्याचं सांगितलं आहे.

विमानातली सुरक्षा व्यवस्था आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असंही कंपनी सांगते. पण हे दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी बोईंगला वेळ लागेल आणि त्यासाठी कंपनीला बरीच मेहनत करावी लागेल, असं रिचर्ड अबूलाफिया सांगतात.

तेव्हा 'बोईंगचं विमान पुन्हा रुळावर येईल का, या आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळुया.

बोईंग कंपनी बंद पडणार नाही हे स्पष्टच आहे. पण कंपनीचं कमी झालेलं कामकाज पाहता, ती कमतरता भरून काढण्यासाठी कंपनीला पैसा आणि वेळेची गरज आहे.

आर्थिक संकटाचं वादळ कंपनीवर अजूनही घोंगावतंय. पण एअरलाइन्स आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा जिंकणं हे त्यांचं सगळ्यात मोठं लक्ष्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)