बदलापूर अत्याचार प्रकरण : अक्षय शिंदेचा मृत्यू, सहआरोपींबाबतचा तपास कुठवर आला आहे?

- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठीसाठी
बदलापूर येथील एका खासगी शाळेत ऑगस्ट महिन्यात दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद बदलापूरमध्ये उमटले आहेत.
या प्रकरणी संबंधित शाळेच्या संस्थाचालकांवरही आतापर्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
शाळेतल्या पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थिनींसोबत लैंगिक अत्याचाराच्या घटनेत शाळेच्या व्यवस्थापनाने निष्काळजीपणा करत घटना लपवल्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी पोलिसांनी पाॅक्सो अॅक्ट अंतर्गत संस्थेचे सचिव आणि अध्यक्षांवर सेक्शन 21 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु अद्याप दोन्ही संस्थाचालकांना पोलिसांनी अटक केलेली नाही.
अक्षय शिंदेचा एन्काउन्टर झाल्यानंतर आता सहआरोपींना अटक कधी केली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आला?
लहान मुलींच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे (विशेष तपास पथक) देण्यात आला होता. एसआयटी यात दोषारोपपत्र दाखल केलं होतं.
या प्रकरणात बदलापूरच्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापिकांनाही या प्रकरणात पोलिसांनी सहआरोपी केलं आहे. त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.
तर संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हा दाखल असून ते फरार आहेत अशी माहिती ठाण्यातील उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
ते म्हणाले, "संस्थेतील दोघांवर पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. आम्ही त्यांचा शोध घेतोय. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. घटना घडल्यानंतर दोन दिवसापर्यंत माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे."
तर पोलिसांवर कोणाचा दबाव आहे म्हणून त्यांना अटक केली जात नाही? असा प्रश्न या प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी उपस्थित केला आहे.

वकील प्रियेश जाधव सांगतात, "शाळेच्या मुख्याध्यापिका आणि संस्थाचालकांवर माहिती लपवल्याप्रकरणी पाॅक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे. हा अजमीनपात्र गुन्हा आहे. तरीही सहआरोपींनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे."
ते पुढे सांगतात, "पोलीस शोध घेत नाहीयेत. मोबाईल ट्रेस करून त्यांना ताब्यात घेतलं जाऊ शकतं मग का अटक होत नाहीये? आंदोलकांना शोधून शोधून पोलीस पकडत आहेत. मग संस्थाचालकांना अटक का होत नाही. त्यांच्या मागे राजकीय वरदहस्त आहे असं वाटतं यामुळेच त्यांना अटक होत नाही."
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
संस्थाचालक भाजपशी संबंधित?
संबंधित शाळेचे संस्थाचालक भाजपशी संबंधित नेते किंवा पदाधिकारी असल्याचा आरोप सुरुवातीपासून विरोधी पक्षांकडून केला जात आहे.
राज्य बाल हक्क आयोगानेही शाळेच्या कारभारावरअनेक प्रश्न उपस्थित केले होते. तसंच राज्य सरकारच्या द्विसदस्यीय समितीच्या अहवालातही शाळेवर अनेक गोष्टींचा ठपका ठेवण्यात आला होता.
शाळेकडून झालेली दिरंगाई ते 15 दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याचं समोर आलं होतं.
या शाळेच्या संस्थेच्या सचिवांशी आम्ही 21 ऑगस्ट रोजी संपर्क केला होता त्यावेळी त्यांनी शाळेच्या विश्वस्त मंडळावर भाजपशी संबंधित पदाधिकारी असल्याचं मान्य केलं होतं.


बदलापूरमधील संबंधित शाळा ही 62 वर्षं जुनी आहे. या ठिकाणी पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत वर्ग चालतात.
ही शाळा मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमाची असून सुमारे साडे पाच हजार विद्यार्थी शाळेत शिकतात.
'शाळेच्या विश्वस्त मंडळात भाजपशी संबंधित व्यक्तीचा समावेश आहे पण त्यांनी कुठलाही राजकीय दबाव टाकला नाही', असे शाळेच्या विश्वस्त मंडळाच्या सचिवांनी बीबीसी मराठीशी बोलताना 21 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं.
राजकीय आरोप
अक्षय शिंदेचा पोलीस एनकाउंटरमध्ये मृत्यू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केलीय. कोणाला वाचवण्यासाठी हे एन्काउंटर घडवलं असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, "या प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे. हा प्रकार पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय मिळाली? पोलीस इतके बेसावध कसे असू शकतात?" असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
"तसंच बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपाशी सबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे हा सर्व प्रकार अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.
बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे की आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे!” अशीही मागणी त्यांनी केली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
तर राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनीही राजकीय दबाव असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, "अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले.
"स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो. सदर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळाचालक भाजपा पदाधिकारी देखील आहेत.
"आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नरेटीव्ह सेट केले जात आहे," असं देशमुख म्हणाले.
राज्य सरकारचं म्हणणं काय?
23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक अत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन, पोलीस त्याला नेत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
देवेंद्र फडणवीस म्हणतात, त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला.
पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. त्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे, असं फडणवीस म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











