चॉकलेट का महागलं? हवामान बदलाचा चॉकलेटवर काय परिणाम होतो आहे?

चॉकलेट आवडत नाही, असं क्वचितच कुणीतरी असेल जगात. म्हणजे अगदी रोज नाही पण कधीतरी चॉकलेट खाणं बहुतेकांना आवडतं.

जगभरात काही शतकांपासून चॉकलेटचं सेवन केलं जातं. पण सध्या चॉकलेट चर्चेत आहे, कारण जगभरात चॉकलेटच्या किंमती वाढल्या आहेत.

फेब्रुवारी 2024 मध्ये तर या किमतीत विक्रमी वाढ झाली. चॉकलेट बनवण्यासाठी वापरलं जाणारं कोको एवढं महाग झालंय की अमेरिकेत कोकोच्या प्रतिटन किंमतीत दुपटीनं वाढ झाली असून ती 5,874 डॉलर्सपर्यंत पोहोचली.

तेव्हापासून कोकोच्या किमतीत सतत वाढच होताना दिसते आहे. कोकोच्या उत्पादनात घट झाल्यानं त्याची किंमत अशी वाढली असावी असा अंदाज लावला जातो आहे.

जगभरात पुरवल्या जाणाऱ्या कोको उत्पादनांपैकी बहुतांश उत्पादन अशा दोन देशांत होतं, जिथे शेतकरी हवामान बदलाचे दुष्परिणाम झेलतायत.

तिथल्या हवामानात झालेल्या बदलांचा कोकोच्या उत्पादनावर फारच वाईट परिणाम झाला आहे. पण या शेतकऱ्यांसमोर इतरही काही समस्या आहेत.

चॉकलेटच्या उत्पादनावर हवामान बदलाचा परिणाम कसा होतो आहे, हे जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी चॉकलेटच्या इतिहासात डोकावून पाहावं लागले.

चॉकलेटचा इतिहास

डॉक्टर केटी सॅमपेक इंग्लंडच्या रेडिंग विद्यापिठात पुरातत्वशास्त्राच्या प्राध्यापक आहेत आणि चॉकलेटच्या इतिहासावर संशोधन करत आहेत.

त्या सांगतात की जवळपास चार हजार वर्षांपूर्वी उत्तर अमेझॉनिया म्हणजे आजच्या इक्वाडोर आणि व्हेनेझुएलाच्या भागात कोकोची झाडं सापडली होती.

त्यानंतर या झाडांची लागवड मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत केली जाऊ लागली. त्यामुळे कोकोच्या झाडाच्या नव्या प्रजाती तयार करण्यात आल्या.

डॉ. केटी सॅमपेक माहिती देतात, “सुरुवातीला कोकोच्या फळाचा रस फरमेंट करून खाण्यापिण्यासाठी वापरला जायचा. पुरातत्वज्ञांना प्राचीन काळातल्या अनेक बॉटल्स मिळाल्या आहेत ज्यात कोकोचे रासायनिक अंश सापडले आहेत. मग लोकांनी या फळाच्या बियांचा वापर करून खाद्यपदार्थ बनवायला सुरुवात केली. मंदिरांमध्ये आणि प्रार्थनास्थळी याचा वापर नैवेद्यासारखा केला जाऊ लागला.

“माया संस्कृतीतल्या काही शिलालेखांवर कोकोच्या फायद्यांचा उल्लेख आढळतो. कोको'ला प्रजनन क्षमतेशीही जोडून पाहिलं गेलं. चौथ्या शतकातल्या पुराव्यांनुसार कोको चा वापर तेव्हा देवाणघेवाण करण्यासाठी चलन म्हणूनही केला जायचा.”

पुढे एल साल्वाडोरमध्‌येही कोकोची लागवड केली जाऊ लागली. या भागातल्या शेतकऱ्यांनी कोकोची उत्पादकता वाढवण्यासाठी नव्या पद्धती शोधल्या आणि लवकरच एल साल्वाडोर कोको एक मोठा उत्पादक बनला. तिथून इतर ठिकाणी कोकोची निर्यात केली जाऊ लागली.

सोळाव्या शतकात स्पेनच्या नौका इथे पोहोचल्या आणि त्यांनी या क्षेत्रावर कब्जा केला. स्पेनच्या वसाहती एल साल्वाडोरमध्ये उभ्या राहिल्या आणि तिथेही लोक कोकोचा वापर चलन म्हणून करू लागले.

“एल सल्वाडोरमध्ये कोकोपासून एक पेय तयार केलं जायचं. त्याला चॉकलेट असं म्हणायचे. तिथून मग सोळाव्या शतकापर्यंत चॉकलेट स्पेन आणि इतर देशांमध्येही ते पोहोचलं आणि लोक सकाळची सुरुवात चॉकलेट पिऊन करू लागले,” केटी माहिती देतात.

त्या पुढे सांगतात, “चहाचं सेवन युरोपात सोळाव्या शतकाच्या मध्यावर सुरू झालं आणि कॉफीचं सेवन सत्रराव्या शतकाच्या मध्यावर प्रचलित झालं. पण त्याआधीच चॉकलेटचं सेवन सुरू झालं होतं.”

आजकाल जसे ठिकठिकाणी कॅफे किंवा टी हाऊस असतात, तसं लंडनमध्ये सोळाव्या शतकच्या मध्यापर्यंत चॉकलेट हाऊस उघडले गेले होते. तोवर युरोपात चॉकोलेट आणि कोकोचं सेवन लोकप्रिय झालं होतं.

युरोपात चॉकलेटची मागणी वाढली, तेव्हा मोठे बदल घडले. सुरुवातीला शंभर वर्ष चॉकलेट उत्पादनाविषयीचे निर्णय स्थानिक लोकांच्या हातात होते. स्पॅनिश वसाहतवादींनी दक्षिण अमेरिकेतली कोकोची शेती आपल्या हाती घेतली, तेव्हा उत्पादनात खूप घट झाली.

कारण कोकोचं झाड संवेदनशील असतं. त्याला योग्य प्रमाणात उष्णता आणि आर्द्रतेची गरज असते. खास प्रकारानं त्याची काळजी घ्यावी लागते.

स्थानिक लोकांना त्याचं ज्ञान होतं आणि त्यामुळे ते उत्पादन घेण्यात जास्त यशस्वी ठरायचे.

केटी सांगतात, “स्पॅनिश लोकांनी सुरुवातीला कोकोच्या उत्पादनात लक्ष घातलं नाही. पण कोकोची मागणी वाढली, तेव्हा त्यांनी कोकोची मोठ्या बागांमध्ये लागवड सुरू केली आणि त्यात स्थानिक गुलामांना कामाला ठेवलं.”

“त्यानंतर 1890 मध्ये पोर्तुगालच्या राजाला ब्राझिल त्यांच्या हातून निसटून जाणार, अशी चिंता वाटू लागली. त्यामुळे त्यांनी ब्राझिल आणि आफ्रिकेतल्या वसाहतींमध्ये कोकोची शेती सुरू केली.”

मग अठरावं शतक उजाडेपर्यंत कोकोचं बहुतांश उत्पादन आफ्रिकेत होऊ लागलं.

आज अनेक देशांमध्ये कोकोची शेती केली जाते. लॅटिन अमेरिकेत ब्राझिल, इक्वाडोर आणि व्हेनेझुएला अजूनही कोकोचे मोठे उत्पादक देश आहेत. पण आता आशियात थायलंड, मलेशिया आणि भारतातही कोकोचं उत्पादन वेगानं वाढतंय.

पण कोकोच्या उत्पादनात पश्चिम आफ्रिकेचा दबदबा निर्माण झाला, जो आजही कायम आहे. त्यामुळे आता तिथे जाऊया.

कोकोच्या शेतीतली आव्हानं

फिलिप ऐंटवी अगाये घानाच्या क्वामे एनक्रूमा यूनिवर्सिटीत पर्यावरणशास्त्राचे असोसिएट प्रोफेसर आहेत. ते माहिती देतात की जगात आयव्हरी कोस्ट आणि घाना हे दोन सर्वांत मोठे कोको उत्पादक देश आहेत.

जगभरात पुरवल्या जाणाऱ्या कोकोपैकी 20 टक्के कोको घानातून येतं. पण घानाच्या कोको उत्पादनावर हवामान बदलाचा वाईट परिणाम होतो आहे असं फिलिप सांगतात.

हवामान बदलामुळे कोकोचं पिक घेण्याचा कालावधी कमी होतो आहे.

फिलिप माहिती देतात की या देशाच्या उत्तर भागातले अनेक शेतकरी सांगतात की पन्नास वर्षांपूर्वी ते फेब्रुवारीत कोकोची लागवड सुरू करायचे पण आता त्यांना मे महिन्यापर्यंत वाट पाहावी लागते आहे.

“घानामध्ये शेतीची वेगवेगळी क्षेत्रं आहेत. उत्तरेत जिथे कोको लागवड केली जाते, तिथे वर्षातून एकदाच शेतीचा सीझन असतो. तो सीझन आता छोटा झाल्यानं शेतकरी आपली कामं ठीकपणे करू शकत नाहीत.”

गेल्या काही दशकांत घानाला पूर आणि दुष्काळासारख्या नैसर्गिक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

त्याशिवाय कीटकांमुळेही या समस्यांमध्ये भर पडली आहे. कारण कीटक कोकोचं पीक आणि झाडाचं नुकसान करतात.

याचा घानामधल्या कोको आणि अन्य पिकांवर वाईट परिणाम होत असल्याचं फिलिप अगाये सांगतात. “येत्या काही वर्षांतही घानामध्ये भीषण दुष्काळाची शक्यता असून त्याचा या देशातल्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल.”

घानामध्ये कोकोच्या बागायती लहान शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. तिथे अंदाजे आठ लाख पासष्ठ हजार शेतकरी कोकोची शेती करतात.

“कोको लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सीझन संपेपर्यंत पैशाची वाट पाहावी लागते. पिक विकलं जातं, तेव्हा त्यातून त्यांचा वर्षाचा खर्च चालतो. कोकोचं उत्पादन घेणाऱ्या प्रदेशात गरिबीचं प्रमाण मोठं आहे. सरकार या प्रश्नाकडे आता गांभिर्यानं पाहतंय कारण हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे.”

घानाच्या कोको उद्योग नियंत्रण बोर्डावर सरकारचा ताबा आहे. हा कोको नियंत्रण बोर्ड शेतकऱ्यांना कोकोची रोपं आणि खत विनामुल्य पुरवतो. आपलं पीक या बोर्डाला विकणं सध्या शेतकऱ्यांसाठी सक्तीचं आहे. बोर्डच या कोकोची किंमतही ठरवतं, जेणेकरून शेतकऱ्यांचं शोषण होणार नाही.

स्वतः शेतकरीही हवामान बदलाच्या परिणामांपासून आपली शेती वाचवण्यासाठी अनेक पावलं उचलत आहेत. कोकोवर अवलंबून राहून चालणार नाही, हे लक्षात आल्यानं हे शेतकरी इतर कामंही करू लागले आहेत.

चॉकलेट मनी

स्टेफानी बर्मुडेज कॅनडाच्या इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ सस्टेनेबल डेवलपमेंटमध्ये धोरण सल्लागार आहेत. त्यांच्या मते जगाच्या अर्थव्यवस्थेत कोको उद्योगाची भूमिका महत्त्वाची आहे कारण यातून विकसनशील देशांतल्या पाच कोटी लोकांना रोजगार मिळतो.

पण हवामान बदलामुळे कोकोच्या उत्पादनावर परिणाम होतो आहे.

अनेक देशांत वाढती उष्णता आणि दुष्काळामुळे कोकोची लागवड करणं कठीण झालं आहे आणि कोकोच्या उत्पादनात घट होते आहे.

स्टेफानी बर्मुडेज सांगतात, “पश्चिम आफ्रिकेत 2018 पासून ते 2019 या काळात कोको उत्पादनात पाच टक्के घट झाली आहे. इतर काही देशांतही कोकोची लागवड करणे कठीण होते आहे. काही देशांत तर हवामानातल्या बदलांमुळे कोकोची लागवड करणं अशक्य होईल.

“पश्चिम आफ्रिका तसंच लॅटिन अमेरिकेत ब्राझिल आणि पेरूमध्ये या समस्या जाणवू लागल्या आहेत. तिथे वाढत्या उष्णतेमुळे एकतर कोकोची झाडं मरून जातात किंवा त्यांना नीट फळ धरत नाही, ज्यामुळे कोकोच्या क्वालिटितही घसरण होते आहे आणि कोकोची किंमतही वाढते आहे.”

स्टेफानी कोकोच्या बाजारपेठेविषयीही माहिती देतात.

नेदरलँड, जर्मनी आणि अमेरिका कोकोचे सर्वात मोठे ग्राहक आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या एका रिपोर्टनुसार ककोकोचा व्यापार 20 अब्ज डॉलर्सचा आहे ज्यात कोको भाजून तयार केलेली पावडर आणि लिक्विडचाही समावेश आहे.

कोकोच्या एकूण उत्पादनापैकी पन्नास टक्क कोको चॉकलेट उद्योगात वापरलं जातं. बाजारात चॉकलेट उद्योग 100 अब्ज डॉलर्सचा असून, 2026 पर्यंत हा आकडा 189 अब्जांवर जाईल असा अंदाज आहे.

कोकोची विक्री आणि खरेदी आंतराष्ट्रीय कमॉडिटी मार्केटमध्ये होते आणि त्याची किंमत मागणी आणि पुरवठ्यानुसार कमी जास्त होते.

“कोकोचं घटलेलं उत्पादन पाहता त्याची किंमत विक्रमी उंचीवर गेली आहे. आता कोकोची किंमत प्रतिटन सात हजार डॉलर्स झाली आहे. म्हणजे गेल्या एका वर्षातच कोकोच्या किंमतीत 163 टक्के वाढ झाली आहे,” स्टेफानी सांगतात.

पण याचा फायदा सर्वांनाच होतोय, असं मात्र नाही. कोको बीन्स पासून चॉकलेट बनवणाच्या पक्रियेत सहभागी असलेले काही गट इतरांपेक्षा जास्त फायदा कमवतात. आपल्याकडे शेतमालाची साठेबाजी होते, तसाच हा काहीसा प्रकार आहे.

स्टेफनी बर्मुडेज सांगतात की कोकोच्या उत्पादनातील 70 टक्के हिस्सा चॉकलेट बनावणाऱ्या कंपन्यांच्या खिशात जातो. या कंपन्या जेव्हा कोको बिन्सची किंमत घटते, तेव्हा बाजारातून कोको बिन्स खरेदी करतात. आणि मग जास्त किंमतीला चॉकलेटची विक्री होते.

पण कोको लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना लगेच पैशाची गरज असते, त्यामुळे ते किंमत वाढण्याची वाट पाहात नाहीत.

खताची वाढती किंमत, आर्थिक मदतीची कमतरता आणि बिघडत्या ऋतुमानामुळे शेतकऱ्यांसमोरच्या समस्या वाढल्या आहेत. त्याचा परिणामही कोकोच्या उत्पादनावर होतो आहे.

मग भविष्यात आता चॉकलेटची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसं कोको उपलब्ध होई का? हा प्रश्न निर्माण होतो कारण, आधी अमेरिका आणि पाश्चिम युरोपातच प्रामुख्‌यानं चॉकलेटचा वापर व्हायचा.

पण आता चीन, मेक्सिको, तुर्की, इंडोनेशिया आणि अनेक आशियाई देशांत चॉकलेटची मागणी वाढते आहे. लवकरच आशिया ही चॉकलेट उत्पादनांची दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनेल, असा अंदाज लावला जातो आहे.

उत्पादन वाढवण्याचं आव्हान

यूनूसा अबूबकर आयव्हरी कोस्टमध्ये इंटरनैशनल कोको ऑर्गनायझेशन म्हणजे आयसीसीओ ICCO चे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. आयसीसीओ ही संघटना कोकोच्या व्यापाराशी जोडल्या गेलेल्या 52 देशांची संघटना आहे.

त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे, ते या उद्‌योगला ‘सस्टेनेबल’ किंवा शाश्वत बनवणं, म्हणजे त्यातून पर्यावरणाचं नुकसान होऊ न देणं. यूनूसा अबूबकर सांगतात की शेतकरी हा कोको उद्योगातला सर्वांत महत्त्वाचा पण सर्वात कमकुवत दुवा आहे.

“आपल्या समोर दोन आव्हानं आहेत. एक तर कोको उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीची, पिकाची योग्य किंमत मिळेल हे निश्चित करणं आणि दुसरं म्हणजे कोकोची उच्च क्वालिटी कायम राखणे.

कोको उद्योगाला पर्यावरणपूरक आणि फायद्याचं कसं बनवता येईल आणि शेतकऱ्यांची स्थिती कशी सुधारता येईल?

युनूसा त्यासाठीच काम करतात. ते सांगतात, “बहुतांश शेतकऱ्यांना कोकोच्या बागा वारशात मिळाल्या आहेत. त्यांमध्ये ते पारंपरिक पद्धतीनं लागवड करतात आणि यातून जे मिळतं त्यावर समाधानी राहण्याची त्यांची मानसिकता असते. कोको लागवडीच्या नव्या पद्धती कशा वापरायच्या आणि त्यात गुंतवणूक करणं का गरजेचं आहे, हे आम्ही त्यांना समजावून सांगतो.

“सोबतच मुलांचं शिक्षण आणि जीवनमान सुधारणंही गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही नव्या पिढीला या उद्योगाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणजे ते कोको उत्पादनांकडे फक्त परंपरागत शेती म्हणून नाही तर व्यापाराच्या दृष्टीनंही पाहतील.

कोकोचा दर्जा सुधारण्यासाठी अनेक कंपन्याही शेतकऱ्यांना नवं तंत्रज्ञान उपलब्ध करून देत आहेत आणि कोकोची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूकही करत आहेत.

आयसीसीओ समोरचं दुसरं मोठं आव्हान हेही आहे की पर्यावरणावर कोको उद्योगाचा वाईट परिणाम होऊ न देणं.त्यासाठी आयसीसीओ शेतकऱ्यांना परस्पर सहकार्य आणि सहकारी शेती सोबतच आधुनिक तत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसते.

यूनूसा अबूबकर सांगतात की जवळपास पन्नास लाख शेतकरी कोको लागवडीशी जोडले गेले आहेत. पण यातले अनेकजण कुठल्या सहकारी संस्थेशी निगडीत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचणं कठीण जातं.

कोकोचा दर्जा जेवढा महत्त्वाचा आहे, तेवढंच त्याच्या लागवडीतून पर्यावरणाचं नुकसान होत नाही ना, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.

युरोपियन युनियनच्या एका कायद्यानुसार कोकोच्या लागवडीसाठी कुठे जंगलं तोडली जात असतील, तर त्या भागातलं उत्पादन खरेदी करण्यावर बंदी घातली जाते.

“कोको उत्पादनानं पर्यावरणाचं नुकसान होऊ नये असं आम्हालाही वाटतं. पण त्यासाठी शेतकऱ्यांना कोको शेतीच्या पद्धतीत बदल करण्यासाठी जो अतिरिक्त खर्च येतो, तो पैसा उपलब्ध करणंही गरजेचं आहे. शेतकऱ्यांना कोकोची योग्य किंमत मिळणंही गरजेचं आहे.

“अशी चिंता केली जाते आहे की भविष्यात बाजारातून चॉकलेट गायब होईल. मला आशा आहे की असं होणार नाही. कुठली मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली नाही, तर कोकोचं उत्पादन दीर्घकाळ सुरू राहील.”

हवामान बदलामुळे कोको उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर वाईट परिणाम होतो आहे. त्यामुळे निश्चितच चॉकलेट उत्पादनावरही हवामान बदलाचा परिणाम होतो आहे.

ऋतुमानात होणारे मोठे बदल आणि टोळधाडी किंवा किटकांच्या प्रससारामुळे कोकोच्या झाडांवर परिणाम होतो आहे.

पण कोको उत्पादक आणि त्याची आयात करणाऱ्या पाश्चिमात्य देशांना यातून मिळणारा फायदा यातही बरीच असमानता आहे.

पाश्चिमात्य देशांकडे सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या तरी ते कोकोची खरेदी आणि साठवणूक करून चॉकलेट फॅक्टरींना होणारा पुरवठा सुरू ठेवू शकतात.

पुढे काय होईल, हे मात्र सांगता येणार नाही.