You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
असा ग्रह जिथलं एक वर्ष पृथ्वीवरील 84 वर्षांच्या बरोबरीचं आहे...
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने युरेनस या ग्रहाची नवी छायाचित्रं शेअर केली असून नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने ही छायाचित्रं टिपली आहेत.
सौरमालेतील या ग्रहाभोवती प्रकाशाची वलयं दिसत आहेत. दुरून पाहिल्यास हा ग्रह एखाद्या प्रकाशाच्या गोल कडीत बंदिस्त झाल्याचं दिसतोय.
युरेनस हा सूर्यमालेतील सातवा ग्रह असून त्याला हिंदी भाषेत ‘अरुण ग्रह’ असं नाव आहे.
1986 साली व्हॉएजर 2 हे अंतराळयान युरेनसजवळून गेलं होतं. त्यावेळी या यानाने युरेनसची निळ्या-हिरव्या रंगाच्या बॉलच्या आकाराची छबी टिपली होती. त्यावेळी कैद झालेल्या छायाचित्रात प्रकाशाची कडी दिसत नव्हती.
पण नासाच्या म्हणण्यानुसार जेम्स वेब या टेलिस्कोपने इन्फ्रारेड व्हेवलेंथच्या मदतीने युरेनसची छायाचित्रे काढली आहेत. यात ग्रहाभोवती चमकदार कडी दिसून आली आहे.
युरेनस हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळा असा ग्रह आहे. हा ग्रह आपल्याच अक्षावर 90 अंशाच्या कोनात फिरत असतो.
यामुळे या ग्रहावर जो कोणता ऋतू सुरू असतो तो अगदीच रुक्ष असतो. इथल्या ध्रुवीय प्रदेशात वर्षानुवर्षे सूर्यप्रकाश असतो आणि नंतर तेवढीच वर्षे दाट अंधार असतो.
84 वर्षांच्या बरोबरीचं एक वर्ष
युरेनसवरील एक दिवस हा 17 तास, 14 मिनिटांचा असतो. म्हणजेच या वेळेत युरेनस त्याच्या अक्षावर एक फेरी पूर्ण करतो.
पण या ग्रहावरील एक वर्ष पृथ्वीवरील 84 वर्षांच्या म्हणजे 30,687 दिवसांच्या बरोबरीचं असतं. थोडक्यात या ग्रहाला सूर्याची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 84 वर्षे लागतात.
असं म्हटलं जातं की, युरेनसभोवती 13 कड्या असून जेम्स वेबने यातल्या 11 कड्या टिपल्या आहेत. काही कड्या इतक्या तेजस्वी आहेत की त्यांचंच एक प्रचंड वलय तयार होताना दिसतं.
शास्त्रज्ञांना आशा आहे की, भविष्यातील छायाचित्रांमध्ये आणखी दोन कड्या दिसू शकतील. 2007 मध्ये या कड्यांची माहिती मिळाली होती.
या छायाचित्रांमध्ये युरेनसच्या 27 ज्ञात चंद्रांपैकी काही चंद्र दिसतात. पण यातले काही चंद्र इत्तके लहान आहेत की ते टिपणं खूप अवघड आहे.
भूपृष्ठावर बर्फाची चादर
युरेनसच्या कठीण भूपृष्ठावर हलका वितळलेला बर्फ दिसून येतो.
नेपच्यून आणि युरेनस हे ग्रह बर्फाचे बनलेले आहेत असं म्हणतात. कारण हे ग्रह गोठलेलं पाणी, मिथेन आणि अमोनियापासून बनलेले आहेत. शिवाय हे ग्रह गुरू (ज्यूपिटर) आणि शनी (सॅटर्न) सारखे वायू तत्वाने देखील बनलेले आहेत.
छायाचित्रात दिसणारा युरेनसचा निळा रंग दोन फिल्टरमधून गोळा केलेल्या डेटाच्या आधारे दाखवण्यात आलाय.
यात दिसणारा तेजस्वी ध्रुवीय भाग सूर्याच्या बाजूला आहे. त्याला पोलर कॅप असं देखील म्हणतात. हा भाग ग्रहाच्या उजव्या बाजूला आहे.
जेव्हा हा ध्रुवीय भाग सूर्यप्रकाशाच्या बाजूने येतो तेव्हा ही कॅप दिसते आणि सूर्यास्त झाल्यावर गायब होते. हे नेमकं कसं घडतं याबाबत काही माहिती मिळालेली नाही.
ग्रहाचा दक्षिण ध्रुव अंधारात असल्यामुळे दिसत नाही.
अवघ्या बारा मिनिटात टिपला फोटो
पोलार कॅपच्या काठावर एक तेजस्वी ढग आहे आणि ग्रहाच्या डाव्या बाजूला आणखी एक तेजस्वी ढग दिसतोय. हे ढग बहुधा हिमवादळांशी संबंधित आहेत.
युरेनस 12 मिनिटांसाठी दोन फिल्टर असलेल्या कॅमेऱ्यासमोर आला तेव्हाच छायाचित्र कैद झाल्याचं नासाने सांगितलं. पण नासाच्या म्हणण्यानुसार जेम्स वेब टेलिस्कोप मधून मिळालेली माहिती हा ग्रह समजून घेण्यासाठी अपुरी आहे.
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप बनविण्यासाठी 10 अब्ज डॉलर इतका खर्च आला असून डिसेंबर 2021 मध्ये हा टेलिस्कोप लॉन्च करण्यात आला. प्रसिद्ध अशा हबल स्पेस टेलिस्कोपच्याही तुलनेत हा अद्यावत असा टेलिस्कोप आहे.
यातून अंतराळातील अनेक सूक्ष्म गोष्टींवर लक्ष ठेवता येते. पण या टेलिस्कोपची दोन मुख्य कामं आहेत. यात अंतराळात 13.5 अब्ज वर्षांपूर्वी पासून अस्तित्वात असणाऱ्या ताऱ्यांचे फोटो घेणं आणि दुसरं म्हणजे ज्या ग्रहावर जीवन जगता येईल अशा ग्रहांचा शोध घेणं
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)