दलित मजुराचा मुलगा IIT तून शिकून अधिकारी झाला, मग त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं?

ललित बेनिवाल

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललित बेनिवाल
    • Author, मोहर सिंह मीणा
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

आयआयटी कानपूरमधून 2019 साली अर्थशास्त्रात बीएससीची पदवी घेतली. 2021 मध्ये राजस्थान लोकसेवा आयोग (आरपीएससी) च्या आरएएस भरतीसाठी मुख्य परीक्षा दिली.

2022 साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) मुख्य परीक्षा दिली. 2023 मध्ये राजस्थान सरकारमध्ये ग्राम विकास अधिकारीपदी निवड.

2023 मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा दिली.

मनरेगा मजुराचा मुलगा, वीटभट्टीवर छोटीमोठी कामं करणारे आई-वडील आणि तीन बहिणींचा मोठा भाऊ असलेल्या 25 वर्षीय ललित बेनीवालची ही शैक्षणिक कारकीर्द. 18 फेब्रुवारी रोजी राहत्या घरात त्याचा मृतदेह सापडला.

22 फेब्रुवारी दुपारची वेळ आहे. नीमकठाणा-अजितगड मार्गावरील थोई पोलीस ठाण्यात चेह-यावर पदर घेतलेल्या एका महिलेला आधार देत तीन मुली दाखल झाल्या.

भावनाहीन चेहरे, हळूहळू पुढे सरकणारी पावलं आणि निस्तेज डोळ्यांवरूनच त्यांची मानसिक अवस्था ओळखता येत होती.

ती महिला ललित बेनीवालची आई आंची देवी होती आणि तिच्यासोबत आलेल्या पूजा, अन्नू आणि अनिता या त्याच्या तीन बहिणी होत्या.

ललित बेनीवाल याच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआरच्या पाचव्या दिवशी हे सर्वजण पोलिसांसमोर साक्ष नोंदवण्यासाठी आले होते.

आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. तुम्हीसुद्धा तणावग्रस्त असाल, तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील संवाद साधायला हवा.

घोटाळ्याचा एफआयआर

थोई पोलीस ठाण्यापासून जवळपास बारा किलोमीटर अंतरावर चिपलाटा ग्रामपंचायत आहे. गावाच्या मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला ग्रामपंचायत कार्यालय आहे.

त्याच ग्रामपंचायतीमध्ये ललित बेनीवाल 19 एप्रिल 2023 पासून म्हणजे गेल्या दहा महिन्यांपासून ग्रामविकास अधिकारी (व्हिलेज डेव्हलपमेंट ऑफिसर - व्हिडीओ) या पदावर कार्यरत होता.

अजितगड पंचायत समिती अंतर्गत 2021-2022 आणि 2022-2023 या आर्थिक वर्षात या पंचायतीमध्ये झालेल्या व्यवहारांचं व कामांचं नुकतंच लेखापरीक्षण करण्यात आलेलं. यामध्ये पाच लाख वीस हजार अकरा रुपयांच्या सरकारी पैशांची अनियमितता उघडकीस आली होती.

लेखापरीक्षण अहवालाच्या आधारे अजितगड ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडिओ) अजय सिंग यांच्या तोंडी आदेशानुसार ललित बेनीवाल यांनी चिपलाटाचे सरपंच मनोज गुर्जर आणि माजी सरपंच बिरबल गुर्जर यांच्याविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी थोई पोलिस ठाण्यात सरकारी पैशांच्या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

ललित बेनीवालची शोकसभा

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललित बेनीवालची शोकसभा

एफआयआर नोंदवल्याची माहिती मिळाल्यानंतर सरपंच बिरबल आणि इतरांनी ललित बेनीवाल यांना धमकावलं आणि मानहानीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.

एफआयआर नोंदवल्यानंतर 18 फेब्रुवारीला सकाळी ललित बेनीवाल यांचा मृतदेह त्याच्या घरात आढळून आला.

घटनास्थळावरून पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेलं नऊ पानी पत्र सापडलं आहे. ज्यामध्ये धमकावणं, चुकीच्या कामासाठी दबाव टाकणं, सरकारी आयडीचा ओटीपी घेऊन लाखो रुपये काढणं, सरकारी पैशांचा घोटाळा व भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत.

या घटनेनंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पंचायतीचे लिपिक जगदेव, पोकर कंत्राटदार, सरपंच मनोज गुर्जर, माजी सरपंच बिरबल गुर्जर, माजी ग्रामसेवक नरेंद्र प्रताप, अजितगड विकास अधिकारी आणि मंगल यांच्याविरुद्ध थोई पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

'आम्हाला वाटलं तो अभ्यास करतोय'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

थोई पोलीस ठाण्यापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडली गावातील अरुंद आणि शांत कच्च्या रस्त्यांमधून आम्ही गावात पोहोचलो.

काही लोक मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूला तंबू ठोकून गेल्या पाच दिवसांपासून शोकसभेला बसले आहेत. टेबलावर ठेवलेल्या ललित बेनीवाल यांच्या फोटोवर फुलांच्या माळा लावण्यात आल्या आहेत.

शोकसभेच्या ठिकाणाच्या अगदी मागे छोट्या-छोट्या घरांपैकी दोन खोल्यांचं एक घर हे ललित बेनीवालचं आहे.

स्वयंपाकघराच्या शेजारी असलेल्या छोट्या खोलीच्या सिमेंटच्या खिडकीची काच तुटलेली आहे. आत्महत्येनंतर ललित बेनीवाल यांचा मृतदेह याच खोलीत आढळला होता.

शोकसभेत बसलेल्या ललितच्या तीन बहिणींपैकी सर्वात मोठी पूजा नजर खाली ठेवूनच दाटून आलेल्या कंठाने म्हणाली, "17 फेब्रुवारीला संध्याकाळी जेव्हा दादा मला लायब्ररीतून घरी घेऊन आला तेव्हा तो खूप अस्वस्थ होता. मी त्याला म्हटलं की दादा नोकरी सोडून दे, आमच्यासाठी तू आनंदी असणं जास्त महत्त्वाचं आहे.

"रात्री मी दादाला म्हणाले, की आम्ही तुला एकटं सोडणार नाही, आम्ही याच खोलीत झोपणार. परंतु, त्याने आम्हाला असं आश्वस्त केलं की जणू आता तो पूर्णपणे टेन्शन फ्री आहे. आम्ही सगळे झोपी गेलो.

रात्री उशिरा आईला जाग आली तेव्हा ललित काहीतरी लिहित होता. आईने विचारलं तर तो म्हणाला, की मी अभ्यास करतोय, तू जाऊन झोप. पहाटेचे चार वाजले आहेत."

ललित बेनीवालची आई

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललित बेनीवालची आई

ललितची आई आंची देवी यांनी सांगितलं की, "मी पहाटे चार-पाचच्या दरम्यान उठते. मी तीन वाजता उठले तेव्हा तो कदाचित फोनवर बोलत होता. मी चार वाजता उठले तेव्हा तो मला खोलीतील टेबलावर काहीतरी लिहित बसलेला दिसला."

"मी ललितला बाबू म्हणून हाक मारायचे. मी त्याला झोपायला सांगितल्यावर तो म्हणाला, बरं मी झोपतो. हे आमचं शेवटचं संभाषण होतं. आम्हाला वाटलं की तो अभ्यास करतोय पण तो आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहीत होता.”

त्याची बहीण पूजा म्हणाली, "सकाळी मला जाग आली तेव्हा खोलीत दिवा सुरू असल्याचं दिसलं. मी भावाला फोन करून दरवाजा उघडायला सांगितलं, पण त्याने तो उघडला नाही. तेव्हा आईने येऊन खिडकीतून पाहिलं आणि दादा दिसला"

"आम्हाला काहीच समजलं नाही आणि दरवाजा खिडकी तोडण्याचा प्रयत्न करत असताना गावकरी जमा झाले. त्यांनी दादाला रुग्णालयात नेलं आणि तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.”

कुटुंबाचे आरोप

“दादा आम्हाला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि प्रामाणिकपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचा. दादाने नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा हा परिणाम आहे,” असं म्हणताना अन्नूचा कंठ दाटून येतो.

अन्नू सांगतात, "एफआयआर दाखल झाल्यानंतर तो खूप तणावाखाली होता. त्याला धमक्या दिल्या जात होत्या. त्याला खूप नैराश्य आलं होतं. त्या रात्री तो जेवलासुद्धा नाही. तो आत्महत्या करू शकत नाही, त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेलंय. तो फक्त आमचा भाऊ नव्हता तर तो आमचं जग होता, आमच्यापासून आमचा देव हिसकावून नेण्यात आलाय."

"एक महिन्याहून जास्त काळ तो चिंतेत होता. परंतु तो घरच्यांपासून हे लपवायचा,” असं त्याची आई आंची देवी सांगतात.

"एक दिवस मला मिठी मारून तो रडला होता. तो मला म्हणायचा की मला कंटाळा आलाय, मी नोकरी सोडणार आहे. माझ्याकडून ते चुकीच्या कागदपत्रांवर सह्या करून घेतात आणि भ्रष्टाचार करतात.”

ललित बेनीवालची खोली

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC

फोटो कॅप्शन, ललित बेनीवालची खोली

ललितची बहीण अन्नू म्हणाली, "माझ्या भावाचा मानसिक छळ करण्यात आलाय. माजी सरपंच बिरबल गुर्जर, विद्यमान सरपंच मनोज कुमार आणि अजितगड विकास अधिकारी यांनी त्याचा खूप छळ केलाय."

“दादाला रजा दिली गेली नाही. तो राजीनामा द्यायला गेला तेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्याने काही दिवसांची वैद्यकीय रजा घेतली होती, त्या काळातही त्याला काम करण्यासाठी कामावर बोलवलं जायचं."

'बिनबुडाचे आरोप'

एफआयआर दाखल झाल्यापासून चिपलाटाचे सरपंच, माजी सरपंच आणि पंचायत कर्मचा-यांसह सर्वजण फरार आहेत.

चिपलाटा गावचे माजी सरपंच बिरबल गुर्जर यांचा मुलगा मनोज गुर्जर हे विद्यमान सरपंच आहेत. दोघेही घरी नव्हते पण मनोजचा लहान भाऊ राहुल गुर्जर याने या प्रकरणी आपली बाजू मांडताना हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय.

सरकारी पैशांच्या घोटाळ्याच्या आरोपांवर राहुल म्हणाले, “2021-2022 आणि 2022-23 या वर्षाच्या लेखापरीक्षणात काही उणीवा आढळून आल्या असून त्याला घोटाळा म्हटलं गेलंय. परंतु यात कोणताही घोटाळा झालेला नाही. त्याची बिलं आमच्याकडे आहेत."

“बिल रेकॉर्डवर आणण्याचं काम तत्कालीन बीडीओ नरेंद्र प्रताप सिंह यांनी केलेलं आणि इथून त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीमध्ये सर्व डेटा जमा केला होता.

राहुल सांगतात, "नरेंद्र यांच्या बदलीनंतर ललित बेनीवाल इथे रुजू झाले. अजितगडच्या ‘व्हिडिओ’ने ललितवर एफआयआर नोंदवण्यासाठी दबाव आणला. मात्र, नंतर त्यांना कळलं की हा घोटाळा नव्हता. आमच्याकडे बिलं आहेत. आम्हाला स्वतःला वाटतं की याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. जर आम्ही दोषी आढळलो तर नक्कीच कारवाई व्हायला हवी."

ओटीपीची मागणी करून सरकारी खात्यातून अकरा लाख रुपये काढण्यात आले. या आरोपाबाबत राहुल म्हणतात, “योग्य प्रक्रियेनुसारच ओटीपीची मागणी करण्यात आली होती. ज्या कामासाठी पैशांची मागणी केली होती, ते काम तीन महिन्यांपूर्वीच झालं होतं.”

आरोपी विकास अधिकारी काय म्हणाले?

ललितच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआरमध्ये अजितगडच्या बीडीओचंही नाव आहे.

एफआयआरनंतर सरकारने अजितगडचे बीडीओ अजय सिंग यांची एपीओ (फील्ड पोस्टिंगमधून काढून टाकलं) म्हणून नेमणूक केली.

सरपंचाने छळ केल्याची तक्रार केल्यानंतरही ललितची बदली करण्यात आली नसल्याचा अजय सिंह यांच्यावर आरोप आहे. कामाचा दबाव टाकला जाई आणि राजीनामासुद्धा स्वीकारला नाही.

आपल्यावरील या आरोपांवर अजय सिंह म्हणतात, "ललित यांनी ऑक्टोबरमध्येसुद्धा राजीनामा दिलेला. पण राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार सीईओ जिल्हा परिषदेला असतो. त्यामुळे मी इथून प्रकरण बनवून सीईओंकडे पाठवलं. सीईओ यांनी ललितला बोलवून घेतलं आणि चर्चेनंतर ललितने आपला राजीनामा मागे घेतला.

गटविकास अधिकारी सांगतात, "सरपंच माझा छळ करत असल्याने मला राजीनामा द्यायचा आहे असं त्याने दुसऱ्यांदा 15 तारखेला तोंडी सांगितलं. पण, सरपंच किंवा माजी सरपंचाने कसा छळ केला, हे ललितने मला लेखी दिलेलं नाही."

आरोपी असलेल्या चिपलाटा सरपंचाचा भाऊ आणि माजी सरपंचाचा मुलगा राहुल गुर्जर.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, आरोपी असलेल्या चिपलाटा सरपंचाचा भाऊ आणि माजी सरपंचाचा मुलगा राहुल गुर्जर.

बदली न केल्याच्या आरोपावर ते म्हणतात, "पंचायती राज विभागाच्या नियमानुसार, ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना नाही. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांच्या स्थायी समितीद्वारे ही बदली केली जाते. 19 तारखेला स्थायी समितीची बैठक बोलावली होती. प्रधानांना सांगून बदली करून घेऊ, असं मी ललितला सांगितलं होतं."

रजा न दिल्याच्या आरोपावर अजय सिंह म्हणतात, "त्याने रजा मागितली होती आणि त्याला रजासुद्धा देण्यात आली आहे. तो 10 जुलै ते 25 सप्टेंबर दरम्यान 78 दिवसांच्या रजेवर होता."

"निवड झाल्यानंतर 19 एप्रिल 2023 रोजी चिपलाटा पंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी या पदावर त्यांची पहिली पोस्टिंग झाली. त्यानंतर तो यूपीएसी मुख्य पेपरच्या तयारीसाठी 10 जुलै ते 25 सप्टेंबर या कालावधीत 78 दिवसांच्या रजेवर गेला.”

"19 एप्रिल ते 18 फेब्रुवारी या 10 महिन्यांच्या काळात म्हणजेच 300 दिवसांच्या नोकरीमध्ये त्याने 101 दिवसांची सुट्टी घेतली आहे. याशिवाय शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्ट्या वेगळ्या होत्या."

बेकायदेशीरपणे पैसे काढल्याबद्दल अजय सिंह म्हणतात, "मी त्याला फोन करून सांगितेलं की पंचायतीच्या ऑडिटमध्ये आर्थिक समस्या येत आहेत. त्यामुळे कोणताही व्यवहार करू नका. मी नकार दिल्यानंतरही त्याने ट्रान्जॅक्शनसाठी ओटीपी दिले.”

आतापर्यंत काय कारवाई झाली

ललितच्या आत्महत्येप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पीडिताच्या कुटुंबीयांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. मात्र, सर्व आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.

अजितगडचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सिंह यांनी बीबीसीला थोई पोलीस ठाण्यात सांगितलं की, “18 फेब्रुवारी रोजी सात आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आलाय. घटनास्थळावरून एक सुसाईड नोट सापडली आहे, मोबाईल जप्त करण्यात आलाय. पीडिताच्या कुटुंबीयांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहे."

ते म्हणतात, "आम्ही पुरावे गोळा करतोय. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. सुसाईड नोटमध्ये आणि कुटुंबीयांचा आरोप आहे की, आरोपींकडून त्याला त्रास दिला जात होता आणि धमक्या देण्यात येत होत्या, त्याच्याकडून चुकीच्या पद्धतीने ओटीपी घेऊन पैशाचे व्यवहार केले जात होते. आम्ही तपास करत आहोत. यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्यालाही अटक केली जाईल.

15 तारखेला ललितने सरपंच आणि माजी सरपंचाविरुद्ध सरकारी पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली. त्या तपासाचं पुढे काय झालं?

बीबीसीच्या या प्रश्नावर पोलीस उपअधीक्षक म्हणतात, " ऑडिटदरम्यान आढळून आलेल्या 5 लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली होती. ललितची साक्ष नोंदवण्यात आलेली. त्या प्रकरणीही तपशील घेतला जातोय आणि तपास सुरू आहे."

अजितगढचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सिंह

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC

फोटो कॅप्शन, अजितगढचे पोलीस उपअधीक्षक राजेंद्र सिंह

या संपूर्ण घटनेत सामाजिक कार्यकर्ते गिगराज जाडोली हे कागदपत्रांच्या कारवाईसाठी पीडित कुटुंबाची मदत करत आहेत.

ते म्हणतात, "ही आत्महत्या नसून नियोजित हत्या आहे. पोलीस प्रशासनाने सात दिवसांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय."

“जर त्यांनी योग्यरित्या तपास केला नाही तर सात दिवसांनंतर राज्यभर आंदोलन केलं जाईल. ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एफआयआर दाखल होताच पोलीसांनी सर्वप्रथम आरोपींना अटक करायला हवी. पण, तसं झालं नाही."

गिगराज म्हणतात, “अजूनही नुकसानभरपाई मिळालेली नाही. आरोपींना अटक, 50 लाख रुपयांची भरपाई आणि एका सरकारी नोकरीची सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आम्ही 23 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिलंय."

कुटुंबीय कोणत्या मनस्थितीत आहेत

ललितचं दोन खोल्यांचं छोटसं घर आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूंमध्ये दोन खाटा, स्वयंपाकघरातील भांडी आणि कपडे दिसतात. पण, भिंतीत बांधलेल्या कपाटात भरपूर पुस्तके ठेवली आहेत.

ललितची बहीण अन्नू म्हणते, “दादा या नोकरीबाबत आनंदी नव्हता पण कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेता तो रुजू झाला. त्याला यूपीएससीमधून आयएएस व्हायचं होतं.”

कार्यालय

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA/BBC

सहा जणांच्या कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी ललितच्या खांद्यावर होती.

ललितची आई आंची देवी मनरेगा मजूर म्हणून काम करते. वडील हिरालाल बेनीवाल यांना पाच वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला होता, मागच्या वर्षी त्यांना थोडं बरं वाटू लागल्यानंतर ते पंजाबमध्ये वीटभट्ट्यांवर छोटीमोठी कामं करतायत.

ललितच्या तिन्ही बहिणी शिक्षण घेत आहेत. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी ललितवर होती.

ललितचे कुटुंबीय आणि त्याला ओळखणारे म्हणतात, "ललित यावेळी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला असता. आमच्या गावाने एक आयएएस गमावलाय."

त्याच्या तिन्ही बहिणी सरकारी शाळेतून शिकल्या असून शाळेत अव्वल होत्या.

ललितची धाकटी बहीण अनिता सीकरमधून ‘नीट’ची तयारी करत आहे. दुसरी बहीण अन्नू हिने राजस्थान विद्यापीठाच्या महाराणी कॉलेजमधून डिस्टिंक्शनसह पदवी प्राप्त केली आहे आणि आता ती यूपीएससीची तयारी करतेय.

तिसरी बहीण पूजा हिने बीएससी केलंय आणि आता बीएड करतीये.

ललितचे गावकरी

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललितचे गावकरी

झाझली गावचे प्रमोद हा एका खाजगी शाळेत शिक्षक आहेत. ललितच्या कुटुंबाला ते अनेक दशकांपासून ओळखतात.

ते म्हणतात, “त्यांच्या पालकांनी आपल्या मुलांना मोठ्या कष्टानं शिकवलंय. अभ्यासामधे कधीही आर्थिक अडसर येऊ दिला नाही."

"ललित हा गावातील तरुणांसाठी एक आदर्श होता आणि सर्वजण त्याच्याकडून प्रेरणा घेत असत. सर्वजण ललितकडे भावी आयएएस म्हणून पाहत असत. आम्ही एक प्रामाणिक आयएएस गमावला आहे."

घटनेनंतर चिपलाटाचं वातावरण

थोई पोलीस ठाण्यापासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिपलाटा पंचायत मुख्यालयाला आता कुलूप लागलंय. या घटनेची गावात सर्वत्र चर्चा आहे.

चिपलाटा या सुमारे आठशे घरांच्या गावात एक वृद्ध व्यक्ती झाडाखाली पत्ते खेळत बसली होती. या घटनेबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला. पण, ही घटना वाईट असल्याचं म्हटलं आहे.

पंचायत कार्यालयाजवळ सरकारी शाळा आहे. याच शाळेसमोर रस्त्याच्या कडेला पूरण सिंग एक दुकान चालवतात.

नोटीस

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

62 वर्षीय पूरण सिंह सांगतात, "त्या मुलासोबत खूप वाईट झालं. सरपंच आणि या सगळ्यांनी भ्रष्टाचार केल्याची गावात सगळीकडे चर्चा आहे."

ते म्हणतात, "त्या घटनेनंतर पंचायत कार्यालय बंद आहे. तेव्हापासून इथे कुणीही दिसलं नाही. पण, पोलिसांची रोज ये-जा सुरू असते."

चिपलाटा गावातील बाजारपेठेत चहाच्या टपऱीवर काही लोकं बसले होती. त्यापैकी एक माजी सरपंच महावीर प्रसाद मीणा होते. ते म्हणतात, "ही अत्यंत दुःखद घटना आहे. गरीब कुटुंबातील मुलाचा छळ झाल्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण आहे."

'मी आजपर्यंत कोणतीही चुकीची गोष्ट केलेली नाही.

ललितने 9 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे की, 'मी 15 तारखेला पंचायत समिती अजितगड इथे राजीनामा पत्र देण्यासाठी गेलो होतो. कारण चिपलाटा पंचायतीतील या नोकरीमुळे मी खूप तणावाखाली आहे. त्यांनी सांगितलं की, आधी एफआयआर दाखल करा मग मी बदलीबाबत प्रमुखांशी बोलेन. मी आधीच खूप घाबरलेलो आणि नैराश्यात होतो.

ऑडिट रिपोर्टच्या आधारे मी 5,20,011 रुपयांच्या भ्रष्टाचाराचा अहवाल दाखल केला. माजी सरपंच बिरबल यांनी मला फोन करून मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचं सांगितलं. पण, मला न्यायालय आणि पोलिसांच्या या सर्व अडचणीत पडायचं नव्हतं."

"माजी सरपंच, लिपिक जगदीश आणि पोकर कंत्राटदार यांनी ओटीपीद्वारे पेमेंट केलं. जमिनीवर काम झालं होतं पण त्याची फाईल तयार केली नव्हती, सर्व फाईल्स मला तयार कराव्या लागत आहेत."

ललित बेनीवालचं गाव झाझली.

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललित बेनीवालचं गाव झाझली.

त्याने लिहिलेलं की, “ऑडिटमुळे खातं गोठवलं जाणार असल्याची त्यांना माहिती होती म्हणून त्यांनी घाईघाईने पैसे दयायला सांगितले. परंतु, सर्वांना असं वाटतंय की मी लोभापायी पैसे दिले आहेत. सर्वत्र माझीच बदनामी केली गेली आहे.

“आता मी हे प्रेशर हाताळू शकत नाही. बदली करा किंवा राजीनामा घ्या, असं मी बीडीओला सांगितलं.

मी आयआयटी पदवीधर आहे, यूपीएससी करत असताना मी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या नोकरीत अडकलो आणि आता मला यूपीएससीसुद्धा करता येत नाहीए."

ललित बेनिवाल

फोटो स्रोत, MOHAR SINGH MEENA

फोटो कॅप्शन, ललित बेनिवाल

सुसाईड नोटच्या शेवटी ललितने आपल्या बहिणींना उद्देशून लिहिलं की, 'जे मी करू शकलो नाही, ते तुम्ही तिघी जगाला करून दाखवा. मी लढू शकलो नाही, तुम्ही लढा, खूप प्रगती करा...’

महत्वाची माहिती-

तुमच्या मनात जर आत्महत्येचे विचार येत असतील किंवा तुमच्या ओळखीत कुणासोबत असं होत असेल, तर तुम्ही भारतात आसरा वेबसाइट किंवा जागतिक स्तरावर बीफ्रेंडर्स वर्ल्डवाइड ची मदत घेऊ शकता.