भारतातील दलितांच्या जीवनाची विविध रूपं

दलित महिला

फोटो स्रोत, Asha ThadanI

वरील छायाचित्रात भारतातील झारखंड राज्यातील एका कोळसा खाणीच्या निखाऱ्यांवरून एक दलित (पूर्वी ज्यांना अस्पृश्य म्हणून ओळखलं जायचं) महिला कामगार कुबड्या घेऊन चालताना दिसतेय.

तब्बल एक शतकाहून अधिक काळ या खाणीच्या पोटात आग धगधगतेय.

हे छायाचित्र आशा थडानी यांच्या 'ब्रोकन' या कृष्णधवल छायाचित्रांच्या मालिकेचा भाग असून गेली सात वर्षं त्या दलितांच्या जीवनाचं दस्ताऐवजीकरण करतायत.

भारतात अगदी खोलवर रूजलेल्या जातीव्यवस्थेत सर्वांत खालच्या थरामध्ये ज्यांची गणना केली जाते अशा 20 कोटी दलितांचा असा समज आहे की, आपण देशातील सर्वांत उपेक्षित नागरिक आहोत.

सरकारी आस्थापनांमध्ये दलितांसाठी असलेल्या आरक्षणामुळे शिक्षण, उत्पन्न आणि आरोग्य यामधील दरी कमी झाली आहे. आपणही कोट्यवधी रूपयांची उलाढाल असलेले व्यापार करत असल्याचा अनेक दलितांना अभिमान आहे.

अनेक संस्था त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी लढत आहेत. एवढंच नव्हे तर, आजवर दोन दलित व्यक्तींनी देशाची सर्वोच्च पदं भूषविलेली आहेत.

असं असतानाही, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावणं आणि गटारांची साफसफाई करणं यासारख्या इतरांनी करायचं टाळलेल्या कामांमध्ये दलितांची संख्या आजही लक्षणीय आहे.

दलित कलाकार

फोटो स्रोत, ASHA THADANI

‘थय्यम’ या धार्मिक विधीचा उगम केरळ राज्याच्या उत्तर भागात झाला आहे.

इथे थय्यम नृत्य सादर करणारा केरळ राज्यातील हा एक दलित कलाकार आहे, हे नर्तक ज्या देवतांची पूजा करतात त्यांना आपल्या नृत्याच्या माध्यमातून मूर्त रूप देण्याचा प्रयत्न करतात.

"थय्यम नर्तक झाल्यानंतर ते गोष्टीचं कथन करतात आणि त्या माध्यमातून देवाचं अस्तित्त्व भासवण्याचा प्रयत्न करतात. जातव्यवस्थेनुसार थय्यम हे कुणामार्फत सादर केलं जातं, हे माहिती असूनही सादरीकरणादरम्यान उच्च जातीच्या लोकांनी खालच्या जातीच्या या दैवी नर्तकाचा आदर करणं आणि आज्ञा पाळणं बंधनकारक आहे," असं थडानी म्हणतात.

मुसाहर

फोटो स्रोत, ASHA THADANI

मुसहर, ज्याचा शब्दश: अर्थ ''उंदीर पकडणारे लोक'' असा होतो, हे इतके गरीब असतात की त्यांच्या दैनंदिन आहारात उंदरांचा समावेश असतो.

बिहार राज्यातील हा दलित समुदाय बहुतांशवेळा जमीन मालकांच्या शेतात काम करतो आणि वर्षातून तब्बल आठ महिने बेरोजगार असतो.

रोजच्या जगण्यासाठी धडपड करणाऱ्या आणि जमीन मालकांच्या कृपादृष्टीवर अवलंबून असलेल्या मुसहरांना उपजीविकेचं एक पर्यायी साधन सापडलं आहे, ज्याला नचनिया (नाच्या) म्हणतात - मनोरंजनासाठी लैंगिक हावभावांचा आधार घेणाऱ्यांचा हा त्यांच्या समुदायातील एक गट आहे.

10 ते 23 वयोगटातील हे पुरुष स्त्रियांची वेशभूषा करतात आणि गावातील लग्नसमारंभ आणि विशेषतः पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपली कला सर्वांसमोर सादर करतात.

दलित महिला

फोटो स्रोत, ASHA THADANI

भक्तीमध्ये न्हाऊन निघाल्याचं हे दृष्य, ज्यामध्ये एक रामनामी स्त्री दारात विचार करत उभी आहे, तिचा चेहरा आणि मुंडण केलेल्या डोक्यावर देवनागरी लिपीत (हिंदी/मराठी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी ) "राम" हा शब्द लयबद्ध पद्धतीने गोंदवला गेलाय. नामजपाचं लिखित स्वरूपातील हे सादरीकरण आहे.

रॉकेलचा दिवा जळताना त्याच्या आगीतून गुंतागुंतीची तरीही अतिशय रेखीव अशी वर्तुळ तयार होतात. लाकडाचं अणुकुचिदार टोक त्याच दिव्याच्या काजळीमध्ये बुडवून त्याद्वारे तिच्या शरीरावर नक्षी काढण्यात आली आहे. पवित्र राम नाम शब्द असलेलं एक उपरणं तिच्या खांद्यावर आहे.

19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या अवहेलनेचा छत्तीसगड राज्यातील रामनाम्यांनी एका विशिष्ट पद्धतीने निषेध व्यक्त केलाय, ज्यातून त्यांनी त्वचा आणि आत्म्यावर भक्तीची एक सुदंर नक्षी कोरलेली आहे - ज्याला विश्वास आणि ओळख यांचं एक कालातीत मिश्रण म्हणता येईल.

दलित व्यक्ती

फोटो स्रोत, ASHA THADANI

वाराणसी या पवित्र शहरात गंगेच्या पवित्र पात्रामधून कुशलपणे पोहणारी एक दलित व्यक्ती त्याच्या दातांमध्ये नाणी पडकून पृष्ठभागावर येते - नदीशी संबंधित गोष्टीत गुंतागुंतीने विणलेल्या आयुष्याचं हे एक उद्बोधक छायाचित्र आहे.

'गोताखोर' किंवा कुशल पोहणारा म्हणून ओळखला जाणारा तो, मुक्ती मिळावी म्हणून भक्तांकडून नदीत अर्पण केलेली नाणी दातांमध्ये पकडून पाण्याच्या पृष्ठभागावर आणतो.

सुश्री थडानी यांच्या म्हणण्यानुसार, नदीत बुडलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढण्याचंही काम गोताखोरांना देण्यात आलंय आणि त्याबदल्यात त्यांना स्वस्तातली दारू दिली जाते.

"प्रत्येक डुबकी हा विधीचा एक भाग आहे आणि त्यातून मिळवलेले प्रत्येक नाणं हे एक सांकेतिक चिन्ह आहे, जे जीवनातील चढउतरांप्रमाणेच खवळलेल्या पाण्याचा प्रवाह सुलभ करण्यासाठी अर्पण करण्यात आलंय,” असं त्या म्हणतात.

दलित महिला

फोटो स्रोत, ASHA THADANI

बिहारच्या एका कोपऱ्यात, या दलित महिलांनी उच्च जातीच्या निर्बंधांना विरोध केला आणि दागिन्यांचा एक अनोखा प्रकार विकसित केला - टॅटू.

शेण, बांबू, पेंढा, डहाळ्या आणि ताडाच्या पानांचा वापर करून त्यांनी झोपड्या बांधल्या आणि भिंतींचं कॅनव्हासमध्ये रूपांतर केलं.

"हिंदू देवतांची चित्रे काढण्यास मनाई असल्याने, त्यांनी निसर्गातून प्रेरणा घेतली. आज, त्यांची [शैली] चित्रं प्रसिद्ध आहेत, जी त्यांच्यासाठी उपजीविकेचं साधन म्हणून काम करतात आणि या महिलांची सर्जनशीलता आणि धैर्याचा दाखला देतात," असं थडानी म्हणतात.

दलित महिला

फोटो स्रोत, ASHA THADANI

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर शोक करणं (रडणे) हा या स्त्रियांचा व्यवसाय आहे. तामिळनाडूतील दलित समुदायामध्ये खोलवर रुजलेल्या ओपारी शोक विधीची ही प्रथा त्या आजही पाळत आहेत.

पारंपारिकपणे कुटुंबातील जवळचा सदस्य गेल्यानंतर भावना व्यक्त करण्याठी त्यांना बोलावण्यात येतं. ओपारी शोकग्रस्त कुटुंबाच्या वतीने किंवा स्वत:च आपल्या भावना व्यक्त करतात.

निधन झालेल्या घरात या स्त्रियांना बोलावलं जातं, एका गंभीर विधीमध्ये दुःखाला वाट मोकळी करून दिली जाते.

ही कृती 'प्रदूषणकारी' आणि दलितांसाठी राखीव असल्याचं मानलं जातं. दु:खाच्या बाह्य प्रदर्शनाचा कमकुवतपणाशी संबंध जोडणारी आणि सामाजिक नियमांना आव्हान देणारी ही धारणा पारंपरिकरित्या स्त्रियांपर्यंतच मर्यादित आहे.

दलित व्यक्ती

फोटो स्रोत, ASHA THADANI

दलित समुदायातील शिवा हा कर्नाटकातील बंगळुरू शहरातील मांस बाजाराबाहेर बकऱ्यांचं डोकं जाळणाऱ्या समुदायातील लोकांपैकी एक आहे.

शेळीच्या डोक्यावरील कातडं काढण्यासाठी आगीचा उपयोग केला जातो, ज्यामुळे सर्वांत महागडा समजला जाणारा मेंदू हा अवयव मिळवणं आणि विकणं सोपं होतं. मेंदू मिळवण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक आहे.

हे करताना प्रखर उष्णता, विषारी धूर आणि कोळशाच्या धुळीचा दररोज सामना करावा लागतो, हे काम करणाऱ्यांचे आयुर्मान 35 ते 45 वर्ष असतं. मांस भाजण्यासाठी वापरल्या जाणार्‍या लोखंडी सळ्या आगीमुळे खूप गरम होतात, त्या दिवसभर धरून ठेवल्याने त्याचा हातांच्या संवेदनशीलतेवर परिणाम होतो.

काही 10 ते 12 वर्षं वयोगटातील फक्त दलित मुलं हे काम करतात, ज्यांना शेळीच्या डोक्यावरील कातडं काढण्यासाठी 15 रुपये दिले जातात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)