दलित मुलाशी लग्न केलं म्हणून वडिलांनीच केली मुलीची निर्घृणपणे हत्या

नवीन आणि ऐश्वर्या
फोटो कॅप्शन, नवीन आणि ऐश्वर्या
    • Author, प्रभाकर तमिलासुरू
    • Role, बीबीसी तामिळ

सूचना : यातले काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात.

तामिळनाडूमधील तंजावर जिल्ह्यामध्ये अनुसूचित जातीमधल्या मुलाशी लग्न केलं म्हणून आईवडिलांनीच आपल्या मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पूवालूर गावातील भास्कर यांचा मुलगा नवीन हा जवळच्याच गावातल्या 19 वर्षांच्या ऐश्वर्याच्या प्रेमात पडला. नवीन हा अनुसूचित जातीतील होता.

जवळपास पाच वर्षं हे जोडपं एकमेकांच्या प्रेमात होतं आणि त्यांनी लग्न करून आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून तिरुप्पूर जिल्ह्यात काम करत होते आणि तिथल्याच विनयनगर मंदिरात 31 डिसेंबरला लग्न केलंं.

हे जातीबाह्य प्रेम आणि लग्न ऐश्वर्याच्या घरच्यांना मान्य नव्हतं. त्यामुळेच ऐश्वर्या आणि नवीनच्या नात्याबद्दल कळल्यानंतर तिच्या घरच्यांनी दोघांनाही वेगळं करण्याचे प्रयत्न केले.

2 जानेवारीला ऐश्वर्याच्या पालकांनी त्यांच्या काही नातेवाईकांसोबत तिरुप्पूर जिल्ह्यातील पल्लडम पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. केस नोंदविण्यात आली आणि धक्कादायक बाब म्हणजे ऐश्वर्याला पोलिसांनी तिच्या पालकांकडे सोपवलं.

यानंतर नवीनने 7 जानेवारीला वाट्टाथिकोट्टाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्याने आपल्या तक्रारी म्हटलं की तो एससी प्रवर्गातला आहे तर ऐश्वर्या ओबीसी प्रवर्गातली. ते दोघंही पाच वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करतात.

त्याने म्हटलं, “2 जानेवारीला दुपारी 2 च्या सुमारास सुमारास ऐश्वर्या आणि तिचे वडील त्यांच्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशनमध्ये गेले. अर्ध्या तासाने तिचे वडील आणि तिचे नातेवाईक तिला घेऊन कारमधून निघून गेले.”

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

नवीनच्या तक्रारीवरून एक एफआयआर फाईल करण्यात आली. त्यात असं म्हटलं की ऐश्वर्याला 3 जानेवारीला सकाळी मारून टाकलं आहे आणि लगेचच तिचा अंत्यसंस्कारही करण्यात आला अशी माहिती नवीनला मिळाली.

तिच्यावर अंत्यसंस्कार झाले ही माहिती स्थानिक लोकांना नव्हती.

तपासाअंती पोलिसांना लक्षात आलं की ऐश्वर्याला तिच्या आईवडिलांनी नेयवावीदुधी गावात चिंचेच्या झाडाला फास देऊन मारून टाकलं. तिला कोणत्या ठिकाणी फाशीला लटकवलं हेही पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.

जेव्हा आम्ही ऐश्वर्याच्या गावी गेली आणि तिच्या घराजवळ राहाणाऱ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते फारसं बोलण्यास तयार नव्हते.

याच चिंचेच्या झाडाला फास देऊन ऐश्वर्याची हत्या करण्यात आली
फोटो कॅप्शन, याच चिंचेच्या झाडाला फास देऊन ऐश्वर्याची हत्या करण्यात आली

पण एक प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की ऐश्वर्याला तिचे वडील जबरदस्ती घेऊन जाताना त्यांनी पाहिलं, पण तिचा खून त्यांनी केला याला दुजोरा देण्यास नकार दिला.

दुसऱ्या एका गावकऱ्याने सांगितलं की आम्हाला खूप आरडाओरडा ऐकू आला.

“जेव्हा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो तेव्हा आम्हाला तो त्याच्या मुलीला ओढत ओढत चिंचेच्या झाडाकडे नेताना दिसला.”

ऐश्वर्याचा खून कसा झाला?

सहाय्यक पोलीस निरीक्षक नवीन प्रसाद यांनी या तपासाचं नेतृत्वं केलं. त्यांनी ऐश्वर्याचा निर्घृण खून झाला याला दुजोरा दिला.

त्यांनी सांगितलं की ऐश्वर्याचे वडील पेरुमल आणि आई रोजा यांना अटक झालेली आहे.

चौकशी दरम्यान पेरुमलने आपल्या मुलीचा खून कसा केला ते सांगितलं.

जिल्हा पोलीस अधीक्षक आशिष रावत म्हणाले,

“पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार ते तिरुप्पूर पोलीस स्टेशनमधून परत आल्या आल्या त्यांनी आपल्या मुलीला फासावर लटकवलं. पेरुमलने आपल्या पत्नाला खुर्ची आणि दोरी आणायला सांगितलं. त्यांनी आपल्या मुलीला म्हटलं की माफी माग आणि फाशी घे. जेव्हा त्यांनी थोडावेळाने ऐश्वर्या लटकत असलेली दोरी तोडली तेव्हा ती जिवंत असल्याचं दिसलं. मग पेरुमलने तिचा गळा दाबून खून केला.”

ऐश्वर्याचे आईवडील पेरुमल आणि रोजा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऐश्वर्याचे आईवडील पेरुमल आणि रोजा

या प्रकरणी पेरुमल आणि रोजाला कोणी कोणी मदत केली, त्यांनी तिचा ठरवून खून केला का ? याची चौकशी आता पोलीस करत आहे. त्यावरून आणखी गुन्हे दाखल होतील.

जातीय तणाव

नवीन आणि ऐश्वर्या दोघंही एकमेकांना शाळेपासून ओळखत होते. जेव्हा आम्ही नवीनच्या गावी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि माध्यमांना तिथे जाण्याची परवानगी नाही असं सांगितलं.

नंतर आम्ही नवीनचे वडील भास्कर यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये भेटलो. त्यांनी पार्श्वभूमी सांगितली.

“मी नवीनला नववीत असतानाच समजावून सांगितलं होतं. ते वेगवेगळ्या शाळेत होते, पण बसने प्रवास करताना एकमेकांना भेटले आणि प्रेमात पडले.”

त्यांना लांब ठेवण्याचे प्रयत्न करूनही नवीन आणि ऐश्वर्या यांचं प्रेम बहरलं आणि त्याची परिणीती लग्नात झाली.

त्यामुळे नेयवावीदुधी गावातल्या ओबीसी आणि पूवालूर गावातल्या एससी जातींमधला तणाव वाढला. त्यामुळे इथे अतिरिक्त बंदोबस्त लावावा लागला.

नवीनचे वडील भास्कर यांनी हेही सांगितलं की ते पेरुमलला आधीपासून ओळखत होते. या गावांमधल्या जातींमधले संबंध किती गुंतागुंतीचे आहेत हे ते सांगत होते.

एक व्हॉट्स अॅप व्हीडिओ ज्यामुळे तणाव वाढला

नवीन आणि ऐश्वर्याच्या लग्नाचा एक व्हीडिओ दोन्ही गावांमध्ये व्हायरल झाला, त्यामुळे तणाव आणखीनच वाढला.

समाजातले लोक या लग्नाला विरोध करू लागले, इथे आधीच असलेली भेदाभेदाची दरी आणखी मोठी झाली.

या भागात जातीभेदाची मोठी दरीआहे
फोटो कॅप्शन, या भागात जातीभेदाची मोठी दरी आहे.

पूवालूरमधले तमिलचेवी यांनी ऐश्वर्याच्या खूनाच्या आधी काय काय घडत गेलं ते सांगितलं.

“दलित आणि ओबीसी समाजाच्या मुलामुलींनी याआधीही इथे लग्न केली आहेत. पण ती मुलं कधीच गावाकडे परत येत नाहीत. त्यामुळे गावातल्या लोकांना याबद्दल फारशी माहिती नसते. पण नवीन आणि ऐश्वर्याच्या बाबतीत त्यांच्या लग्नाचा व्हीडिओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला. त्यामुळे ही घटना घडली.”

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

या प्रकरणात पोलिसांवरही आरोप केले गेले आहेत.

नवीनने दावा केला की ऐश्वर्याला पकडून पोलीस स्टेशनला नेलं आणि पोलिसांनी तिला धमकावलं.

पण पल्लडमचे डीएसपी विजयकुमार यांनी म्हटलं की ऐश्वर्या आपल्या मर्जीने तिच्या आईवडिलांसोबत गेली.

“तिने आईवडिलांसोबत जायला संमती दिली आहे हे पाहूनच आम्ही तिला पाठवलं.”

पोलिसांनी ऐश्वर्याला तिच्या आईवडिलांसोबत पाठवलं का हा प्रश्न विचारला जातोय
फोटो कॅप्शन, पोलिसांनी ऐश्वर्याला तिच्या आईवडिलांसोबत पाठवलं का हा प्रश्न विचारला जातोय.

एका लग्न झालेल्या मुलीला तिच्या घरी पाठवून दिल्यानंतर तिच्याच पालकांनी तिचा खून केला. त्यामुळे या घटनेनंतर पल्लडम पोलीस स्टेशनचे निरीक्षक मुरुगायह यांना निलंबित केलं आहे.

चुकीचा पायंडा

गेल्या काही वर्षांत तामिळनाडूत ऑनर किलिंगच्या केसेस समोर आल्या आहेत.

इथले सामाजिक कार्यकर्ते काथीर दलितांविरोधात होणाऱ्या हिंसेचा अभ्यास करतात आणि त्याबद्दल नोंदी ठेवतात.

त्यांनी 2022 या वर्षांत प्रेम किंवा प्रेमविवाहांशी संबंधित किती हत्या झाल्या याबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

त्यात असं म्हटलं आहे की, "दरवर्षी 120 ते 150 खून होतात. या निर्घृण हत्याच म्हणायला हव्यात.”

काथीर आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आता ऑनर किलिंगच्या विरोधात एक विशेष कायदा असावा अशी मागणी करत आहेत.

हेही वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.