हिमालयातील बौद्ध मठांना हवामान बदलाचा धोका, ही पडझड स्थानिक कशी रोखतायेत?

    • Author, तुलसी रौनियार
    • Role, बीबीसी न्यूज

तिबेटमधील बौद्ध मठ, बौद्ध संस्कृती यांचं जतन स्थानिक लोकांनी शतकानुशतके केलं आहे. सर्व जगाला या मठाबद्दल, या समुदायांबद्दल आणि त्यांच्या बौद्ध संसृत्तीबद्दल प्रचंड कुतुहल आणि आकर्षण आहे.

मात्र, जगाचा सांस्कृतिक वारसा असणारे हिमालयातील हे वैभवशाली मठ आज हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जात आहे. स्थानिक लोक या आव्हानाचा मुकाबला करत आहेत आणि त्यातून आशेचा किरण निर्माण झाला आहे.

अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे या 14 व्या शतकातील तिबेटी मठांना धोका निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक लोक या मठांना जतन करण्याचं आव्हान पेलत आहेत.

तिबेट-नेपाळ सीमेवर असलेल्या धौलागिरी पर्वतरांगांमध्ये बांधलेल्या कांग चोडे मठाच्या समोर ताशी कुंगा उभे आहेत. गुरु रिनपोचे यांच्या राक्षसाबरोबर झालेल्या युद्धाच्या प्राचीन दंतकथेविषयी सांगताना या बौद्ध भिक्कूचे कापडी झगे पावसात चमकत आहेत.

ही कथा कित्येक शतकं जुनी आहे. एका राक्षसानं तिबेटमधील एका मठाचा विनाश केला होता. गुरु रिनपोचे यांनी नेपाळमधील अप्पर मुस्तांग च्या दक्षिणेपर्यत त्याचा पाठलाग केला आणि अत्यंत भयानक युद्धात त्याचा पराभव केला. त्यानंतर त्याच डोंगररांगामध्ये त्या राक्षसाचे अवशेष दफन केलेत. मुस्तांगच्या लोकांनी त्या राक्षसाच्या दफन केलेल्या अवशेषांवरच मठ बांधून त्या पवित्रभूमीचा सन्मान केला.

आणि 1380 मध्ये त्या राक्षसाच्या अगदी ह्रदयावर लो मांथांग ही राजधानी बांधण्यात आली, असं कुंगा सांगतात. अरुंद गल्ल्या, प्राचीन मठ आणि सपाट छतावर प्रार्थना ध्वजांनी सुशोभित केलेल्या मध्ययुगीन तटबंदी असलेल्या जगातील शेवटच्या शहरांपैकी एका शहराकडे बोट दाखवत ते सांगतात.

अनेक शतकं तिबेटच्या पठारावर असलेल्या या भागात लोबा या स्थानिक जमातीचं लोक राहत आहेत. इथे होणाऱ्या बदलांमध्ये एकच गोष्ट स्थिर राहिली आहे ती म्हणजे हे मठ. यांना स्थानिक भाषेत गोनपास म्हणतात. या प्रदेशाचा तो सर्वात अनमोल वारसा आहे. मात्र जवळपास दोन दशकांपूर्वी यातील अनेक मठ ज्यांचं बांधकाम 14 व्या शतकात झालं होतं त्यामध्ये पडझड होण्यास सुरूवात झाली.

तज्ज्ञांनी याबद्दल सतर्कतेचा इशारा दिली आहे. हवामान बदलाचा गंभीर परिणाम होत या मठांची पडझड होत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या प्रदेशातील वादळं आणि पाऊस यांच्या तीव्रतेत वाढ झाल्याचं दिसून येतं आहे. पावसात वाढ झाल्याचा विपरित परिणाम या मातीच्या इमारतींवर होतो आहे. जमिनीत असणारा ओलावा इमारतींच्या भीतींमध्ये वरच्या दिशेने वाढत जातो. त्यामुळे भिंतीत ओलावा वाढणे, छप्पर गळणे यासारख्या समस्या उद्भवतात.

"आम्हा बौद्धांसाठी मठांमधील चित्रं आणि कलाकृती या देवतांचंच मूर्त रुप आहेत आणि अर्धवट हानी झालेल्या प्रतीकांची आम्ही पूजा करू शकत नाही. त्यांची दुरुस्ती करण्यासाठी इथं कोणीही नाही. आमचा वारसा हळूहळू लोप पावतो आहे. आम्हाला वाटलं की देवता आमच्यावर रागावली आहे," असं कांगा सांगतात.

तिबेटी संस्कृतीचा पाया म्हणून फार पूर्वीपासूनच बौद्ध मठांचा आदर केला जातो. मूर्त कलाकृती आणि प्रगल्भ बौद्धिक परंपरा यांची निर्मिती आणि संरक्षण करण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून हे मठ काम करत आले आहेत. मात्र आता अभूतपूर्व हवामान बदलामुळं या मठांच्या सांस्कृतिक वारशाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानक समुदायाच्या लोकांनी हा वारसा जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक लोकांनी यासाठी विविध कौशल्य मिळवली आहेत. त्यातून भिंती मजबूत करण्यापासून ते धातूचे पुतळे तयार करणं आणि चित्रांचं संवर्धन करण्यासारख्या गोष्टी ते करत आहेत.

मागील 20 वर्षांमध्ये पाश्चात्य कला संवर्धकांकडून प्रशिक्षण घेतलेल्या स्थानिक लोबा लोकांच्या टीमने मठांची जुनी आणि गळणारी छतं बदलली आहेत. यासाठी त्यांनी गोल लाकूड, नदीतील दगडं आणि स्थानिक मातीच्या चिखलाचा उपयोग वॉटरप्रूफिंग म्हणून केला आहे. त्यांनी मठाच्या भिंतींवरील चित्र, पुतळे आणि कोरीब खांब आणि छतावरील सजावट यांचं संवर्धन केलं आहे. यामुळे या कित्येक शतकं जुन्या स्मारकांना नवजीवन मिळालं आहे.

लो मांथांग येथील लुगी फेगनी या कला संवर्धकानं मठांच्या संवर्धनाच्या किंवा जीर्णोध्दाराच्या प्रकल्पात पुढाकार घेतला आहे. ते सांगतात, यासाठी शेतकऱ्यांचं रुपांतर संवर्धकांमध्ये करणं ही खूप आव्हानात्मक बाब होती. बहुसंख्य लोबास लोकांनी यापूर्वी कधीही हातात पेन किंवा चित्र रंगवण्याचा ब्रश धरला नव्हता. त्यामुळे 15 व्या शतकातील चित्रांचं संवर्धन करण्याचं काम सुरू करण्यापूर्वी त्यांना अतिशय विस्तृत असं प्रशिक्षण द्यावं लागलं.

"मात्र हे सर्व कामी आलं आहे. मुस्तांगला भेट देणाऱ्या पर्यटकांना धर्माबद्दल अत्यंत कुतुहल असतं. त्यामुळे आम्हाला वाटलं की फक्त ऐतिहासिक महत्त्व म्हणून नव्हे तर येथील लोकांची उपजीविका टिकविण्यासाठी या पवित्र कलाकृतींचं संरक्षण केलं पाहिजे," असं फिगनी सांगतात.

आधी 10 जणांनी बनलेली संरक्षकांची टीम आता 45 सदस्यांवर पोहोचली आहे. सुरूवातीला जरी या टीममध्ये महिलांचा समावेश करण्यास अनिच्छा दर्शविण्यात आली होती तरी आता यात बहुतांश महिला आहेत. अखेर लो मांथांग संरक्षण प्रकल्पात महिलांनी भाग घेतला आहे.

"स्थानिक समुदायातील महत्त्वाचे लोक आणि समुदायाशी चर्चा आणि वाटाघाटी करण्यासाठी अनेक वर्षे लागली. मात्र भिंत्तीचित्रांचं संवर्धन करणाऱ्या टीममध्ये स्थानिक महिलांचा समावेश करण्यात आम्हाला यश आलं आहे," असं फिगनी सांगतात.

विवाह झालेल्या तिबेटी महिला सर्वसाधारणपणे स्वयंपाक करणं, सफाई करणं, जनावरांचं दूध काढणं, लोणी बनवणं आणि याक या प्राण्याचं शेण इंधनासाठी गोळा करणं ही काम करतात. 40 वर्षाच्या ताशी वांगमो यांचा वेळ याक पाळणं, औषधी वनस्पती गोळा करणं आणि विकणं आणि इतर विविध अवघड काम करणं यात जात असे. मात्र यातून त्यांना कधीही फारसं उत्पन्न मिळालं नाही. मात्र जेव्हा त्यांना नवीन प्रशिक्षण घेण्याची आणि संवर्धन प्रकल्पांमधून रोजचा रोजगार मिळवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी ती चटकन स्वीकारली.

"त्यामुळे आमच्यातील बहुतांश महिलांना आमच्या घरांतील मर्यादा ओलांडता आल्या, आमचं कौशल्य वाढवतं आला आणि नवीन संधी शोधता आल्या. नाहीतर आमचं आयुष्य साचलेलं होतं, छोटे उद्देश किंवा शक्यतांच्या चौकटीतपुरतं ते मर्यादित होतं," असं त्या सांगतात.

डोलमा सेरिंग या 42 वर्षाच्या आणखी एक महिला आहेत. त्या तिथं फक्त कला शिकण्यासाठी किंवा चित्रकलेचं कौशल्य शिकण्यासाठी नाहीत. त्यांना वाटतं मठाच्या संवर्धनाच्या कामात सहभाग घेतल्यानं त्यांना अध्यात्मिक बळ मिळेल आणि त्यांच्या कामाद्वारे त्या तिबेटमधील बौद्ध धर्माचा प्रचार करण्याच्या कामात योगदान देता येईल.

"एकदा का तुम्ही देवतांच्या विस्कटलेल्या, पुसलेल्या बाह्यरेषा आणि पुनरुज्जीवित करण्यात आलेल्या आकृत्यांच्या अभिव्यक्तीची तुलना केली की प्रत्येकाच्या प्रचंड, अविश्वसनीय प्रयत्नांचा आवाका तुमच्या लक्षा येईल. यामुळे लो मंथांगचे सांस्कृतिक मूल्य वाढलं आहे. आणि महिला म्हणून आम्हाला त्यात भूमिका निभावू शकलो," असं त्या सांगतात.

मात्र स्थानिक समुदायापुढं अजूनही हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आव्हानं येत आहेत. वाढतं तापमान आणि हवामान बदलाच्या परिणामांमुळे हिमालय पर्वत असुरक्षित आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो प्रचंड प्रमाणात कोसळतो. तर त्याचवेळी दीर्घकाळ पडणारा दुष्काळ देखील नेहमीचाच आहे.

2023 मध्ये प्रचंड पावसामुळे मुस्तांगमधील अनेक छोट्या नदी आणि नाल्यांना पूर आला होता. पुरामुळे आसपासच्या गावांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

लोबा समुदायातील अनेक लोक आर्थिक संधींच्या शोधात शहरांची वाट धरत असताना या प्रदेशात असणाऱ्या चांगल्या वाहतूक व्यवस्थेचादेखील या प्रदेशातील लोकसंख्या झपाट्याने कमी होण्यात हातभार लागला आहे, असं गुरुंग सांगतात.

या प्रदेशात राहण्याचा निर्णय घेणारे ताशी गुरुंग हे शेतकऱ्याचा संवर्धकात रुपांतर होण्याचं प्रमुख उदाहरण आहेत. लहानपणी त्यांचा संबंध तिबेटच्या बौद्ध कलेशी आला नव्हता, मात्र आज लो मांथांगमध्ये त्यांच्या मालकीचं कला दालन आहे.

त्यांच्या कला दालनात थंगकांची एक उल्लेखनीय श्रेणी आहे. त्यात बुद्ध, त्याची शिकवण आणि विविध देवता आणि बोधिसत्वांसारख्या इतर अध्यात्मिक व्यक्तिमत्वांचा समावेश आहे. आपल्या कलाकृतींच्या विक्रीतून गुरुंग फक्त स्वत:ची उपजीविका चालवत नाहीत तर त्यांना त्यांच्या मुलांना शाळेतदेखील पाठवणं शक्य झालं आहे.

आपल्या आयुष्यावर या मठांचा असलेल्या प्रचंड प्रभावामुळेच या प्रदेशातच राहण्याच्या निर्णय आपण घेतला असं गुरुंग सांगतात.

"जर हे मठ नसते तर माझे मित्र ज्याप्रमाणे चांगल्या संधींच्या शोधात मुस्तांग सोडून इतरत्र निघून गेले त्याप्रमाणे मीदेखील गेलो असतो," असं ते सांगतात.

मठांच्या संवर्धनाच्या प्रकल्पांमुळे इथे एकप्रकारचं सांस्कृतिक पुनर्जागरण घडलं आहे, असं फिगनी यांना वाटतं. ते पुढे सांगतात की अनेक महिला आणि तरुणांना पारंपारिक कारागिरीचं प्रशिक्षण मिळालं आहे, अनेक विस्मृतीत गेलेले उत्सव पुन्हा सुरू झाले आहेत, धार्मिक हेतूंसाठी अद्वितीय भित्तीचित्रांचं संवर्धन करण्यात आलं आहे. त्यामुळे मठांची पुन्हा एकदा भरभराट होत आहे.

ओम मणि पद्मे हुम या मंत्राचा जप मठाद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी करतात. या मंत्राचा वापर तिबेटमधील लोकांनी करुणेच्या बोधिसत्वाला आवाहन करण्यासाठी करतात. ते तिबेटचे संरक्षक संत देखील आहेत.

कुंगा सांगतात, आज लो मंथांग शहर आणि जुन्या मठांना पौराणिक राक्षकांपासून नाहीतर हवामान बदलांच्या परिणामांमुळे धोका आहे.

"जर आम्हाला आमची संस्कृती वाचवायची असेल तर आम्हाला एकत्र यावं लागेल आणि मठांचं जतन करावं लागेल. कारण इथे प्रत्येक गोष्ट धर्माभोवती गुंफलेली आहे," असं सेरिंग सांगतात.