मान्सूनपूर्व वादळी पावसातल्या दुर्घटनांपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं? वाचा 12 प्रश्नांची उत्तरं

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

गुरुवारी 9 मे 2024 ची सकाळ झाली पण, सकाळी 10 वाजता अचानक काळोख पसरला. पावसाळ्यासारखे ढग दाटून आले. ढगांचा गडगडाट, सोसाट्याचा वादळी वारा, विजांचा कडकडाट सुरू झाला आणि तो धो धो बरसला.

नागपुरात तब्बल दोन तास वादळी वाऱ्यासह धुवाधार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे शहरातील अनेक भागांत झाडं उन्मळून पडली. विजांच्या तारा तुटल्यानं वीज पुरवठाही खंडीत झाला होता.

कामठी तालुक्यातल्या जाखेगाव इथं वीज कोसळल्यानं रामराव शिवराम आखरे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

पण, ऐन उन्हाळ्यात इतका विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला तर काय करायचं?

हे गडगडणारं वादळ आपल्या दिशेनं येणार आहे हे कसं ओळखायचं? आपल्या घरावर किंवा आपल्या परिसरात वीज पडणं रोखू शकतो का? त्यासाठी काय करायला हवं? अशा तुम्हाला पडणाऱ्या 12 प्रश्नांची उत्तरं आपण घेऊयात.

भारतीय हवामान विभागानं त्यांच्या वेबसाईटवर गडगडाटी वादळ आणि विजांबद्दल नागरिकांना पडणाऱ्या प्रश्नांबद्दल माहिती दिली आहे.

1. एप्रिल, मे महिन्यात वादळी पाऊस का पडतो?

भारतात मार्च ते ऑगस्ट हा कालावधी प्रचंड गडगडाटी वादळांसह पावसासाठी पोषक आहे. मार्च ते मे महिन्यात पावसासह गारपीट होण्याची शक्यता जास्त असते.

एप्रिल ते जुलै महिन्यादरम्यान वादळी वारा, तर एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस पडून पूरपरिस्थिती आणि विजांचा अति कडकडाट होऊ शकतो.

अशा वातावरणासाठी हा कालावधी अनुकूल असल्यानं उन्हाळ्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळतो.

2) सर्व गडगडाटी वादळं धोकादायक असतात का?

पूर्व मोसमी पावसात अनेकदा गडगडाटी वादळं येतात. त्यामुळे अनेकदा नुकसान होतं. पण, ही सगळीचं गडगडाटी वादळं धोकादायक असतात का? तर नाही.

प्रत्येक वादळाची तीव्रता वातावरणातल्या अनेक घटकांवर अवलंबून असते. त्यात वातावरणातील अस्थिरता, आर्द्रता किती आहे, समुद्राहून येणारे वारे, कमी दाबाचा पट्टा यांसारख्या सगळ्या वेदर सिस्टम सक्रीय झाल्यानंतर वादळ अधिक तीव्र होते आणि असे वादळ अधिक धोकादायक ठरतात.

या वादळी पावसासोबतच मार्चे ते मे महिन्यात गारपीटीची शक्यता अधिक असते. गेल्या महिन्यात विदर्भात आणि मराठवाड्यात गारपीट झाली. मग हे गारपीट म्हणजे काय? आणि गारा कशा तयार होतात?

3) गारा कशा तयार होतात?

गारा म्हणजे फक्त जमिनीवर पडणारा बर्फाचा गोळा इतकंच नाही. तिला पापुद्रे असतात. जितके पापुद्रे जास्त तितकी गार मोठी. तुम्ही कधी गार फोडून बघितली तर त्यात पापुद्रे दिसतील.

गारा म्हणजे पावसाचं स्वरुप. फरक फक्त इतकाच आहे ते गोठलेल्या म्हणजे बर्फाच्या स्वरुपात असतं.

अतिशीत पातळीच्या पलीकडे उंचावर ढग गेल्यानंतर त्यात बाष्पाचे सूक्ष्म कण गोठायला लागतात. जेव्हा मेघगर्जना अधिक तीव्र असते, ढग धावू लागतात तेव्हा हे बर्फाचे कण एकमेकांवर आदळतात आणि त्याचं वजन वाढत जातं. त्यालाच गारा म्हणतात.

या बर्फाच्या गोळ्यांचं एकदा वजन वाढलं की ते गुरुत्वाकर्षणामुळे जमिनीवर पडतात आणि त्यालाच गारपीट म्हणतात.

सर्व गडगडणाऱ्या ढगांची उंची अतिशीत म्हणजे अतिशय थंड पातळीच्या वर असते. त्यामुळे त्यात गारा असतात. पण, मग पाऊस पडताना प्रत्येकवेळी गारपीट का होत नाही? गारपीट एखाद्यावेळीच का होते?

4) गारपीट प्रत्येकवेळी का होत नाही?

गार ढगातून खाली यायला सुरुवात होते. पण, खाली येताना अनेक अडथळे येतात. जमिनीच्या दिशेनं येताना तिला तापमानाचा सामना करावा लागतो.

ढगांच्या खाली असणाऱ्या उष्ण हवेमुळे गारा वितळात आणि पावसात रुपांतर होऊन खाली पडतात. पण, ज्यावेळी गारा मोठ्या आकाराच्या असतात आणि ढगांच्या खाली असणारं वातावरण पोषक असतं त्यावेळी मात्र जमिनीवर गारांचा मारा होतो.

5) मेघगर्जना म्हणजे नेमकं काय असतं?

जागतिक हवामान संघटनेनुसार मेघगर्जना म्हणजे एक किंवा एकापेक्षा अधिक अचानक तयार होणारे इलेक्ट्रिक डिस्चार्ज असतात जे आदळल्यानंतर आपल्याला तीव्र असा गडगडाटाचा आवाज ऐकायला येतो आणि आकाशात प्रकाश दिसतो. मेघगर्जना होत असेल तर ते वातावरण अधिक धोकादायक असतं.

अशावेळी गडगडाट करणारं हे वादळ अतिशय तीव्र असतं. हे वादळ आपल्या दिशेनं येत आहे, आपल्या गावावर किंवा आपल्या परिसरात हे गडगडाट करणारं तीव्र वादळ येणार हे नेमकं कसं ओळखायचं?

7) मग वादळ तुमच्या दिशेनं येत असेल तर स्वतःला कसं वाचवायचं?

जागतिक हवामान संघटनेनं यासंदर्भात एक 30-30 असा नियम आखून दिलेला आहे. त्यानुसार जेव्हा तुम्हाला वीज दिसते तिथपासून त्याचा आवाज येईपर्यंत 30 सेकंद मोजा.

वीज चमकल्यानंतर तुम्हाला 30 सेकंदात किंवा त्यापेक्षा कमी वेळात आवाज ऐकायला आला तर ढगाचं गडगडाट करणारं हे वादळ धोकादायक असतं. अशावेळी जवळ असलेल्या निवाऱ्यात आश्रय घ्या.

पण, विजा चमकणं बदं झालं आणि ढगांचा गडगडाट बंद झाला म्हणून लगेच बाहेर पडू नका. वीज चमकल्याचा शेवटचा आवाज ऐकायला आल्यानंतर जवळपास 30 मिनिटं वाट बघा आणि त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी निवारा घेतला असेल तिथून बाहेर पडा.

8) ढग आणि गडगडाटी वादळ तुमच्यापासून दूर असेल तरी स्वतःचं रक्षण करण्याची गरज आहे का?

होय. कारण मेघगर्जनेपासून 1-12 किलोमीटर अंतरावर वीज पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तुमच्या भागात मेघगर्जना होतेय म्हणजे वीज तिथेच पडेल असं नसतं.

तुमच्या भागापासून काही अंतरावर मेघगर्जना होत असेल, गडगडाटी वादळ असेल तर तुमच्या परिसरात देखील वीज पडू शकते.

9) वीज पडण्याचा सर्वाधिक धोका कुठे असतो?

विजांचा कडकडाट होत असेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जे जे उंच ठिकाण असेल त्याठिकाणी विजा पडण्याची शक्यता असते. यामध्ये उंच टोलेजंग इमारती, झाडे, धातूच्या वस्तू, विद्युत तारा, उभी असलेली माणसं आणि प्राणी, जलस्रोत हे वीज पडण्याच्या दृष्टीनं संवेदनशील आहेत.

कारण, या सगळ्या गोष्टींमधून वीज अतिशय सहजरित्या जमिनीत जाऊ शकते. त्यामुळे वीज गर्जना होत असेल त्यावेळी अशा गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला हवामान विभागाकडून दिला जातो.

10) वीज आपल्या घरावर किंवा परिसरात पडण्यापासून रोखू शकतो का?

काही वेळा घराच्या समोर मैदानात उभं असताना, अंगणात उभं असताना वीज पडून मृत्यू झाला अशा बातम्या येतात. मग ही वीज आपल्या परिसरात पडू नये किंवा त्यापासून नुकसान होऊ नये यासाठी काय करायला हवं?

वीज कितीही तीव्र असेल तरी ती आपल्या परिसरात पडण्यापासून रोखता येते. आपल्या इमारतीवर किंवा घरावर लायटनिंग अरेस्टर हे उपकरण बसवायचं. यामुळे आपलं घर आणि आजूबाजूच्या परिसराचं विजांपासून संरक्षण होतं.

पण, हे लायटनिंग अरेस्टर काम कसं करतं?

ढगांवर जो इलेक्ट्रीक चार्ज तयार होतो जो विजेच्या स्वरुपात खाली येतो त्या चार्जला वहन करण्यासाठी लायटनिंग अरेस्टर एक मार्ग तयार करून देतो. त्यामुळे ढगांवरील चार्ज न्यूट्रल होतात आणि लायटनिंग अरेस्टरने तयार करून दिलेल्या मेकॅनिझमद्वारे खोल जमिनीत जातात. त्यामुळे विजेमुळं होणारं नुकसान टाळलं जातं. या लायटींग अरेस्टरची किंमत जवळपास 3-4 हजार रुपये असते. पण, या उपकरणामुळे आपल्या घरावर किंवा परिसरात वीज पडण्याचा धोका कमी होतो.

11) वादळी वाऱ्याचं वातावरण अचानक तयार झालं आणि तुम्ही शेतात असाल तर काय करायचं?

सर्वात आधी वातावरण चांगलं होईपर्यंत शेतीची सगळी काम बंद करा. फोन, इलेक्ट्रिक पॉवर, धातूचे कुंपण, पवनचक्की अशा वीजेवर चालणाऱ्या सर्व उपकरणांपासून दूर राहा. तिसरं म्हणजे तलाव, ओलीत केलेलं शेत यापासूनही दूर राहा. कोरड्या जागेवर राहण्याचा प्रयत्न करा.

12) वादळी पाऊस सुरू असताना तुमच्या वाहनानं प्रवास करत असाल तर?

मोटारसायकल, बैलगाडी, सायकल, ट्रॅक्टर, शेतातली वाहनं अशा उघड्या वाहनांनं तुम्ही प्रवास करत असाल तर तत्काळ तिथून उतरून निवारा शोधा.

पण, तुम्ही जर कार, बस इत्यादी बंद खिडक्यांच्या आणि वर कठीण छप्पर असलेल्या वाहनांमधून प्रवास करत असाल तर तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात असं समजा.