जायंट रेडवुड्स : 30 मजली उंच इमारतीएवढी झाडं तुम्ही पाहिली आहेत का?

    • Author, रिबेका मोरेल आणि अॅलिसन फ्रान्सिस
    • Role, बीबीसी न्यूज सायन्स

जायंट रेडवूड्स ही जगातील सर्वात उंच वाढणारी झाडं आहेत. कॅलिफोर्नियात आढळणारे हे वृक्ष आता ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत.

सुमारे 160 वर्षांपूर्वी या झाडांची रोपं ब्रिटनमध्ये आणण्यात आली होती. आणि अभ्यासात असं दिसून आलंय की, ही झाडं आता कॅलिफोर्नियाच्या तुलनेत ब्रिटनमध्ये अगदी वेगाने वाढू लागली आहेत.

एका अंदाजानुसार, कॅलिफोर्नियामधील 80,000 झाडांच्या तुलनेत ब्रिटनमध्ये 5,00,000 रोपं आहेत.

मात्र या रोपट्यांची उंची तितकीशी वाढलेली नाही. कॅलिफोर्निया मधील झाडं 90 मीटर उंच आहेत तर ब्रिटनमधील झाडांची उंची 54.87 मीटर आहे.

यामागचं कारण म्हणजे या रोपट्यांची वाढ सुरू आहे. जायंट रेडवुड्स जवळपास 2,000 वर्षांहून अधिक काळ जगतात. त्यामुळे ब्रिटनमध्ये लावलेल्या या रोपट्यांकडे वाढीसाठी अजून भरपूर वेळ आहे.

ससेक्सच्या वेकहर्स्ट मधील डॉ. फिल विल्क्स म्हणाले की, "आत्तापर्यंत पाच लाख रोपटी रडारखाली आली आहेत. जेव्हा तुम्ही या रोपट्यांची माहिती गोळा करू लागता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की, एकूण रोपटी किती आहेत."

जायंट रेडवुड्सची (सेक्वियोएडेंड्रोन गिगेंटम) रोपं ब्रिटनमध्ये आणण्याचं श्रेय व्हिक्टोरियन लोकांना दिलं जातं. त्याकाळी ही रोपं श्रीमंतांच्या बागेत लावली जायची. थोडक्यात ही रोपं सांपत्तिक स्थितीचं प्रतीक होती.

आज या रोपट्यांचं रूपांतर भल्या मोठ्या झाडांमध्ये झालं आहे. काही झाडं हमरस्त्यांवर जोड्यांनी उभी असलेली दिसतात. ही झाडं ओळखणं देखील तेवढंच सोपं आहे. दाट, शंकूच्या आकाराची वाढलेली ही झाडं एखादा राजमुकुट धारण केल्यासारखी वाटतात.

ही झाडं ब्रिटनच्या वातावरणाशी कशाप्रकारे जुळवून घेतात हे पाहण्यासाठी वनस्पती शास्त्रज्ञांनी स्कॉटलंडमधील अर्गिलशायर वेकहर्स्टच्या बोटॅनिक गार्डन आणि हॅव्हरिंग कंट्री पार्क येथील 5,000 झाडांची नमुना निवड केली.

त्यांनी काही झाडांची उंची आणि वजन मोजण्यासाठी लेसर स्कॅनर वापरला. झाडं न तोडता त्यांचं वजन करण्यासाठी या लेसर स्कॅनरचा वापर केला जातो.

संशोधकांना असं आढळून आलं की, ज्या पद्धतीने ही झाडं त्यांच्या मूळ घरी म्हणजेच कॅलिफोर्नियामध्ये वाढतात, अगदी त्याच पद्धतीने त्यांची ब्रिटन मध्येही वाढ होत आहे. थोडक्यात ब्रिटनचं हवामान त्यांच्यासाठी अनुकूल असल्याचं डॉ. विल्क्स सांगतात.

त्यांनी पुढे सांगितलं की,"कॅलिफोर्निया मधील वातावरण ब्रिटनच्या तुलनेत थंड आणि आर्द्र आहे."

"ब्रिटनमध्ये असलेलं आर्द्र या झाडांच्या वाढीसाठी पोषक आहे. या झाडांच्या वाढीसाठी ओलावा आवश्यक असतो."

ही झाडं किती प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात हे देखील वैज्ञानिकांनी पाहिलं. ही झाडं वातावरणातील हरितगृह वायू शोषून घेतात. त्यामुळे ही झाडं मोठ्या प्रमाणावर लावल्यास हवामान बदलाचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

संशोधकांना असंही आढळून आलं की, त्यांच्या मोठ्या आकारामुळे ते आपल्या झाडाच्या खोडापेक्षाही जास्त प्रमाणात कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात. मात्र कॅलिफोर्निया मधील झाडांची शोषणाची क्षमता याहीपेक्षा जास्त आहे.

डॉ. विल्क्स सांगतात वेकहर्स्ट मधील झाडं सुमारे 45 मीटर उंच आहेत. त्यांच्यामध्ये सुमारे 10 ते 15 टन कार्बन जमा झाला आहे.

"परंतु याची तुलना कॅलिफोर्नियातील सर्वांत मोठ्या झाडाशी होऊ शकत नाही. कारण कॅलिफोर्नियातील झाडांमध्ये जवळपास 250 टन कार्बन साठलेला आहे. पण ही झाडं अजून मोठी होणार आहेत आणि याची आपल्याला कल्पना आहे."

संशोधनात सामील असलेल्या शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आलं की, रेडवुड्सची जंगलं तयार करून आपल्याला वातावरणातील कार्बन डायऑक्साइड कमी करता येणार नाही किंवा तितकंच पुरेसं नाही.

पण इतर झाडांबरोबर याची लागवड करून मिश्र वनं तयार करता येतील.

हवामान बदलामुळे कॅलिफोर्नियामधील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. वातावरण अधिक उष्ण आणि कोरडं होऊ लागलंय आणि यामुळे जंगलात वणवे पेटत आहेत.

त्यामुळे ब्रिटन हे जायंट रेडवूड्सचं नवं घर बनणार का? हॅव्हरिंग कंट्री पार्कमधील प्रवेशद्वारावर लावलेले जायंट रेडवूड्स बघून युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे प्राध्यापक मॅट डिस्ने म्हणतात की, हे शक्य आहे.

ते म्हणाले, "हवामानाच्या बाबतीत सांगायचं तर कॅलिफोर्नियाच्या तुलनेत ब्रिटनमधील वातावरण स्थिर आणि झाडांच्या वाढीसाठी पोषक आहे."

मात्र हवामान बदलाचा परिणाम आता ब्रिटन मध्येही जाणवू लागलाय.

स्थानिक अधिकारी आता रेडवुड्सची रोपं सार्वजनिक उद्याने किंवा मैदानांमध्ये लावत आहेत.

प्राध्यापक डिस्ने म्हणतात की, या रोपांच्या वाढीसाठी फार मोठा अवकाश आहे. ती कायमच लहान राहणार आहेत असं नाही.

त्यांनी सांगितलं की, "ही झाडं वेगाने वाढू लागली आहेत. त्यांनी एकदा 60 मीटर इतकी उंची गाठली की, ती ब्रिटनमधील सर्वात उंच झाडं ठरतील. आणि ती कायमच वाढत राहतील."

ही झाडं नक्कीच चांगली कामगिरी करत आहेत, पण लोकांना असा प्रश्न पडलाय की इथल्या मूळ झाडाझुडपांचं काय? ते ब्रिटन मधील जंगलांचा ताबा घेतील का? तर असं होणार नाही, कारण या झाडांच्या पुनरुत्पादनासाठी अतिशय विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते.